Tuesday, February 13, 2018

वाडा चिरेबंदी

"आमच्या सात पिढ्यानी बसून खाल्लं तरी काय कमी पडायचं नाय! माज्या सुबरावला कुठं बँरीस्टर करायचा हाय!" असं जेव्हा मिशांना पीळ देत बापू म्हणायचा तेव्हा मला सात पिढ्या हि काय भानगड असावी ते नक्की कळायचं नाय. आमच्या लहानपणी बघावं तेव्हा रिकामं टेकड्या लोकांचा बापूच्या तीस खणी वाडयात राबता असायचा. बापू पान खाऊन पिंकदाणीत पिचकाऱ्या मारत अनेक पराक्रमाच्या गोष्टी सांगायचे. गांधीवधानंतर खेड्यापाड्यात अनेक ब्राम्हणांचे वाडे जाळले. त्यात बापूच्या शेजारचा भाऊ ब्राम्हणाचा वाडा पण जळाला. भाऊ ब्राह्मण गाव सोडून जाताना ह्यो जळका वाडा बापूनं विकत घेतला आणि त्याची पुन्हा नव्याने उभारणी केली. बापूचा वाडा गावाच्या मध्यभागी. वाड्याला भली मोठी दगडी चौकट. तितकाच उंचीचा कोरीव दरवाजा. जुन्या तटवजा भिंती. गावाच्या मध्यभागी उंचीवर हा दिमाखात वाडा उभा. वाड्याच्या बाहेरून घसरणीला लागलेलं सगळं गाव दिसायचं. एका महापुरात याच तीस खणी वाड्यानं साऱ्या गावाला आसरा दिलेला. वाड्याच्या बाहेर मोठा दगडी कडेपाट बांधलेला. या कडीपाटाला कधीकाळी बापूचा घोडा बांधलेला असायचा. बापू तरुणपणात शेता शिवारात या घोड्यावरून फिरायचे. अश्या एक ना अनेक गोष्टी बापू दिवसभर तरण्या पोरांना सांगत बसायचे. जग, माणसे कितीही काळासोबत पुढं गेली तरी बापू अजूनही त्याच इतिहास काळात.

बापू हे जन्मताच इरसाल व्यक्तिमत्व. अस्सल देशी बियाणंच म्हणा. रंगेलपणा तर बापूच्या नसानसात भिनलेला. पण गडी तापट. आता खेड्यात असा इरसाल माणूस म्हंटल कि त्याच्या अनेक करामती लोकांच्या तोंडी. बापूच्या अंगावर कायम पांढरा पोशाख, झुबकेदार पांढऱ्या मिशा आणि दोन्ही कानावर पिंजारलेला केसांचा पुंजका. तर अश्या या बापूच्या दोन बायका. शकुंतला आणि बकुळा. पहिल्या बायकोला काहीच मुलबाळ झालं नाही म्हणून बापूनं बकुळाला केली. बापू पिंक टाकत म्हणायचा, "आरं आमच्या शकुंतलीचं सारं खानदानच रोगाट तर तिला कशी पोरं बाळं व्हूयाची.” बकुळाला मात्र चार पोरी आणि अन सगळ्यात धाकटा संभाजीराव पोटाला आलेला. अन याच संभाजीरावाच्या पोटी जन्माला आलेलं बापुसारखंच इरसाल बियाणं म्हणजे एकुलता एक सुबराव.

वाड्यात एकुलता एक नातू जन्माला आल्यानं बापुचा या सुबराववर जीव बसलेला. सुबराव म्हणजे बापूच्या काळजाचा तुकडा. जेव्हा बघावं तेव्हा सुबराव बापूच्या खांद्यावर बसलेला दिसायचा. यात्रा जत्रा असू, कुणाचं लग्न असो, कुठल्या पाव्हण्याकडं जायाचं असो, बापू सुबरावला घेऊन हजर. सुबराव मोठा होऊ लागला तरी बापूची काय पाठ सोडायचा नाही. सुबराव माझ्यापेक्षा वयानं मोठा. गुरुजी आम्हांला सुबरावच्या घरी जाऊन त्याला शाळेला उचलून आणा म्हणाले कि आम्ही चार पाच पोरं बापूच्या वाड्याच्या दिशेने पळतच जायचो. वाड्यातल्या साखळीने बांधलेल्या लाकडी झोक्यावर बसून पिंकदाणीत लालभडक पानाची पिंक टाकीत बापू म्हणायचा, "आरं फुकणीच्यानो शिकून माणूस कवा सुधारलाय व्हय? शिकलेला माणूस कापल्या करंगळीवर पण मुतायचा नाय! मास्तरला म्हणावं त्यो गुऱ्हाळावर गेलाय काकवी आणाय! आज काय याचा नाय!" आम्ही माना हलवून माघारी वळालो कि पुन्हा मागून बापूचा आवाज. "मास्तरला म्हणावं जाताना वाड्यावरनं जरा काकवी घिऊन जावा सांच्याला! सांगशीला नवका!" आम्ही शाळेत येऊन मास्तरला बापूचा निरोप दिला की मास्तर बी खुश व्हायचे.

सुबराव नावाचं मला विशेष कौतुक वाटायचं. त्याच्या आख्या घराण्यात सगळे “राव” कसे काय जन्माला आले असतील हा मला नेहमी प्रश्न पडायचा. सुबरावच्या वाड्यात आणि मळ्यात खाण्याची कायम चंगळ असायची. त्यामुळे सुबराव सोबत आमचा हळूहळू चांगलाच दोस्ताना जमला. सुबराव खोडी काढण्यात आणि चोऱ्या करण्यात पटाईत. हळूहळू तो बापूच्या चंचीतले बिडीचे बंडल चोरून आणू लागला. ओढ्याला जाऊन अख्खा बिडीचा बंडल हा धूर सोडत एकटा संपवायचा. आम्हाला म्हणायचा, "शरीराला चांगलं असतया हे! तब्बेत आमच्या बापूगत हुतीया यानं!" असं काय बाय सांगून नुसती उरलेली थोटकं हा आम्हाला फुकायला द्यायचा. खेळात पण साऱ्या गल्लीत हाच राजा. गोठ्या खेळताना ह्यो गडी कायम नर. आम्ही मात्र सतत मादी.

एखदा आम्ही वाड्यात गेलो तर बापू कुठेच नव्हते. सुबरावनं आईला विचारलं तर म्हणाली, "गेलं असत्याली रोजच्या ठिकाणावर!" मग सुबराव सोबत एका बोळातनं सुंदराबाईच्या घरापाशी गेलो. आत डोकावून पाहिलं तर बापूचं दोन्ही गुडघं उघडं करून सुंदराबाई तेल लावून चोळत बसलेली. सुबराव अचानक आलेला बघून सुंदराबाई म्हणाली, "मुडद्या ऐन वक्ताला आलास का रं घाण करायला!" तसा बापू जागचा उठला अन दातओठ खाऊन सुंदराबाईला म्हणाला, "टवळेss कुणाला गं मुडद्या म्हणालीस! अगं तुज्यासारख्या पन्नास रांडा ठेवीन अजून! आजपासनं लिपान लावलं तुला!" ताडकन उठून बापू सुबरावला घेऊन वाड्याकडं गेला. बापूच्या असल्या कितीतरी गोष्टी वाढत्या वयासोबत समजत गेल्या.

सुबरावच्या नादाला लागून आम्ही अनेक उद्योग करतोय हे बापाला समजलं. एखदा शाळत जाताना सुबराव रस्त्यात भेटला. म्हणाला चला मळ्यात. आम्ही तडक सुबरावच्या मळ्यावर. पोरगं शाळेत आलं नाही म्हणून मास्तरनं घरी पोरं पाठवली आणि बापाला सगळा उलगडा झाला. बाप थेट सुबरावच्या मळ्यावर आला. बाप जेव्हा मळ्यात आला तेव्हा आमचा पत्याचा डाव रंगात आलेला. बाप हळूच आला अन मागूनच पेकाटात चार पाच लाथा घातल्या. म्हणाला. "आय घाल्या मागच्या सात पिढ्यात कोण शिकलं नाय! अन तू बी ह्यो दिवटा जन्माला आलास व्हय! आता गावात ठिवित नाय तुला! परत गावाचं तोंड बघायचं नाय नायतर तंगड तोडून हातात दिन!" त्या दिवशी गाव तुटलं अन गावासोबत सुबराव मागं पडला.

काळानुसार पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. आता सुबरावच्या गाव आठवणी फिकट होत गेलेल्या. जुने सारे संवगडी काळजापासून दूर गेले. शिक्षणामुळे नव्या जाणिवा आल्या. नोकरी मिळाली. पुढं लग्न झालं. अधे मधे कधी गावच्या वाऱ्या व्हायच्या. तेव्हा कधी सुबराव पुढारी झालेचं समजलं. नंतरच्या फेरीत सुबरावनं आक्खं गाव झाडून खाल्लेचं समजलं. एका पावसात बापूचा काळानुसार जीर्ण झालेला वाडाही पडलेचं समजलं. कधी येता जाता एखांदा मित्र रस्त्यात भेटला तर सुबरावचे अनेक पराक्रम सांगायचा. एखदा आईला सुबराव विषयी विचारलं तर म्हणाली, बापू मेल्यावर भाड्यानं सारं ईकून खाल्लं! मळा गेला, शेतं गेली, बायका पोरं सुद्धा त्याला सोडून गेली!”

एखदा जत्रा संपवून शहराकडे बायका पोरांना घेऊन, आमची सर्कस गावाबाहेरच्या फाट्याच्या दिशेने चाललेली. रस्त्यात किसानानी भेटली. तिच्याशी चार दोन गोष्टी बोलून झाल्यावर म्हणाली. "सुबरावनं पडक्या वाड्याचा दगुड बी ठेवला नाय! दगाड सुद्धा भाड्यानं ईकलं! आज्ज्यावर गेलं गाबडं!” मी सुन्न झालो. त्याचे आईवडील कुठे राहतात विचारल्यावर म्हणाली, "आय बा राहिलाय मळ्यात छपार घालून! घर लयाला गेलं बघ समदं!" मी किसानानीचा निरोप घेऊन वाट चालू लागलो. तर डोळ्यासमोरून सुबराव जायला तयार नाही. फाट्यावर पोहचलो. तर एका वडापमधून सुबराव भेलकंडत खाली उतरताना दिसला. दारू पिऊन फुल्ल टाईट. इच्छा असूनही मी त्याला आवाज देण्याचं टाळलं. पण त्याची सैरभर नजर माझ्यावर पडली आणि तो माझ्या दिशेने वळाला. बायका पोरांना गावाची जास्त सवय नाही. पण वाटा चालू ठेवण्यासाठी अशी अधी मधी घेऊन जावी लागतात. त्यात दारुडी दिसली की लांब घाबरून पळत्यात. म्हणून तो येण्याआधी मीच त्याच्या पुढं गेलो. म्हणालो. "काय हि अवस्था सुभा!" तर म्हणाला, "ssहाss राव म्हणायचं राव! दारू पेलो म्हणून काय झालं! या सुबरावाला तू ईसरलास!" मी म्हंटल, "सुबराव मी तुला कसा विसरलं! जुना दोस्त तू माझा!" तर म्हणाला "मग दोस्ताला शंभर रुपये दे! माहेरासनं बायका पोरांना आणायचं हाय!" मी पटकन जागचा हललो. म्हणजे बुडीतच कि पैसे. मी बायकोकडे पाहीलं तर तिनं नको म्हणून मान हलवली. मी त्याच्याकडं पहात म्हणालो, "सुबराव! तू खोटं बोलून दारूसाठी पैसे मागतोस! मी दारूला पैसे देणार नाही!"

माझ्या नकारावर तो चिडला. त्यानं माझ्या नजरेत नजर रोखली. म्हणाला, "आमचा बापू म्हणायचा, शिकलेला माणूस कापल्या कंरगळीवर पण मुतायचा नाय!" मी काहीच बोललो नाही. तो लटपटत खाली वाकला. खालचा एक दगड उचलला. उचलताना त्यानं माझ्याकडं पाहिलं. माझ्या बायकोकडं पाहिलं. माझ्या घाबरलेल्या चिमुकल्या पोरांच्याकडं पाहिलं. बायकोच्या काळजाचं क्षणात पाणी पाणी झालं. तिनं पोरांना जवळ ओढलं. पण त्याने तो दगड मला मारला नाही. माझ्या बायकोला मारला नाही. माझ्या चिमुकल्यानाही मारला नाही. उचललेला दगड त्याने उंच आकाशात भिरकावला आणि ओरडला, "बापूsss म्हणाला हुतास कि आमच्या सात पिढ्यानी बसून खाल्लं तरी काय कमी पडायचं नाय! आरं बघ वाकून खाली! वाड्याचा दगूड बी उरला नाय तुज्या!" त्याने पुन्हा दुसरा दगड उचलला. असेल नसेल तेवढ्या ताकतीने भेलकंडत पुन्हा आकाशात भिरकावला आणि मोठ्याने किंकाळला. "बापूsss बरबादी केलीस लका घरादाराची! नुसत्या गावच्या रांडा नासीवल्यास! तुझ्याss आयलाsss लावलाsss...!!!"


#ज्ञानदेवपोळ
प्रातिनिधिक फोटो, Credit Indian Frame

Wednesday, February 7, 2018

अलविदा केलेल्या आठवणी...

माहेरात येऊन चार दिवस उलटले तरी तो कुठेच दिसेना म्हंटल्यावर ती आणखी काळजीत पडली. त्याच्या आठवणीनं जास्तच व्याकुळ झाली. अखेर काल संध्याकाळी मागच्या गल्लीतनं हातात बैग घेऊन जाताना तिला अंधारात तो दिसला आणि मुद्दाम वाट वाकडी करून ती त्याला आडवी गेली अन आवाज दिला...
रविंद्रss.”
प्राजक्ताss.”
कसा आहेस?”
आहे बरातू कधी आलीस?”
चार दिवस झालं.” 
बरं हाय का तुझं?” 
बरं नसाय काय झालं?”
तसं न्हवं! सासरची माणसं हाईत का चांगली?” 
अजून तरी चांगलीच हाईत.” 
मग आहेस ना सुखात!
जसा तू आतून असशील तशीच मी पण आहे!
...क्षणभर कोणीच बोललं नाही मग प्राजक्ताच म्हणाली,
मला तू लवकर विसरलास!
हवं तर तसं समज आता!
अजून गेला नाही का राग?”
राग कसला! तुझ्या आयुष्याचा तू योग्यच निर्णय घेतलास! बेरोजगार तरुणाशी लग्न करून तुला शेवटी पश्चातापच झाला असता!
तुझ्या नोकरीचं जमतच नव्हतं! मी तरी किती दिवस थांबणार रे!
बरंजाऊ का मी? एस.टी चुकेल माझी.
कुठे निघालायस?”
जायाचं पोटाच्या मागं हिंडत....
असं कोड्यातलं नको रे बोलूस! मिळाली नोकरी?”
नाही अजून!
शहरात पोहचल्यावर आमच्या यांना भेट ना एखदा! ओळखीनं बघतील कुठेतरी?”
तुझ्या संसाराच्या वळचणीखाली थांबून आयुष्याला पुन्हा दुख:ची अंघोळ घालायची नाही मला!
पण नव्या आयुष्यात मित्र बनून जवळ राहू शकतोस ना?”
जुन्या नात्यांना नवी लेबलं लावून जगण्यापेक्षा फकीर बनून जगायला आवडेल मला!
पण छळणाऱ्या आठ्वणींचं काय?”
चल विसरून जाऊ त्यांना! नाहीतर सीझर केलेल्या काळजावरचे टाके कधीच गळालेत! आता हे हि दिवस बरे वाटताहेत...
...तो धपाधपा पावलं टाकत एका वळणावर अंधारात गुडूप्त झाला आणि ती जड पापण्यातून पुन्हा पुन्हा त्याला पहातच राहिली...

प्रातिनिधिक फोटो 


Monday, January 29, 2018

मध्यरात्री पेटवलेली प्रेयसी

कित्येक वर्षानंतरही तुझ्या आठवणी
बंद खिडक्यांच्या फटीमधून शिरून
भयान रात्री माझ्या मेंदूला
छळू लागल्या तेव्हा मात्र
मी पेटून उठलो.

अखेर तुझ्या आठवणींचा खून करायचा
मी निर्णय घेतला.
मग तुला कोंबलेली अडगळीतली
जुनी ट्रंक मी बाहेर काढली
मध्यरात्री सुनसान झालेल्या रस्त्यावर आलो
तर लुटून नेल्यागत शहर गप्पगार पडलेलं
आकाशाकडे वर पाहिलं तर
चांदण्यांनी डोळे टवकारलं
पळणाऱ्या झिपऱ्या ढगांना
मला पाहून हसू फुटलं
मी पुन्हा प्रचंड चिडलो.

काठोकाट भरलेली तुझ्या आठवणींची ट्रंक
रस्त्यावर एका क्षणात मी विस्कटली,
तू दिलेली प्रेमपत्रं, भेटवस्तू आणि
तुझ्या कवितांचे विखुरलेले कागद
या साऱ्यांची मिळून एक चिता रचली रस्त्यावर.

होळीच्या ढिगात ऊस उभा करावा
तशी तुझ्या तसबिरीला त्या चितेवर उभी केली
काडेपेटी काढली आणि त्या मध्यरात्री
मी तुला भर रस्त्यावर पेटवून दिली.
धडाधडा जळणाऱ्या तुझ्या चितेची उब घेता घेता
अर्धवट जळालेल्या कागदाच्या एका तुकड्यावर
नजर येऊन पडली  
आणि तेथेच मी अडकलो  -

त्यात तू लिहलं होतंस,
"निदान आता जाळलेल्या आठवणींचं श्राद्ध तरी
पुन्हा घालू नकोस
नाहीतर आणखी गुंतून जाशील,
आणि नव्याने जळत राहशील
वर्षानुवर्षे....पुन्हा पुन्हा..."


#ज्ञानदेवपोळ

Tuesday, January 23, 2018

गोष्ट १६ एमएम सिनेमांची


पूर्वी गावागावात लग्नकार्ये, भंडारा, गणपती, यासारखे अनेक छोटे मोठे उत्सव साजरे व्हायचे. या कार्यक्रमात मनोरंजनाचे हमखास साधन असायचे ते पडद्यावरचा 16 एमएम चा सिनेमा. गावात रात्री पडद्यावर सिनेमा असला कि भर दुपारी पारापुढच्या दगडी दीपमाळेवर लाऊड स्पिकरचे जर्मनी कर्णे वर चढायचे. काही वेळातच लाऊड स्पिकरमधून पुकारण्याचा आवाज बाहेर पडला की गावासहित रानामाळात असलेल्या लोकांचे श्वास जाग्यावर थांबायचे. हात विश्रांती घ्यायचे. कान उभे राहायचे. स्पिकरच्या आवाजाने सारा आसमंत दणाणून उठायचा. झाडावरची पाखरं भुर्रकन हवेत उडायची. साऱ्या नजरा एका क्षणात गावाच्या दिशेला वळायच्या. "आज रात्री ठीक साडे नऊ वाजता मस्त मराठी चित्रपट सुळावरची पोळी" सिनेमाचे नाव सांगून झाले की पुढे हमखास आवाज निघायचा, "याल तर हसाल न याल तर फसाल सकाळ उठून शेजाऱ्याला विचारत बसाल". या आवाजाने शिवारात राबणाऱ्या हातांना जोर चढायचा. आज सिनेमा बघायला मिळणार म्हणून बायका दिवस मावळायलाच चुली पेटवून स्वयंपाकाला लागायच्या. म्हातारी कोतारी माणसं सुद्धा मिळेल ते खाऊन पाराच्या दिशेने सरकायला लागायची.

दिवस मावळून अंधार पडायला लागला की सर्वांचे डोळे एस.टीच्या थांब्याकडे लागायचे. फाट्यावरून जाणाऱ्या शेवटच्या एस.टीतून टाकीवाला बाबा उतरायचा. मोठया सुटकेस सारख्या त्याच्या पेटीत प्रोजेक्टर, पिशवीत रीळा, वायरबोर्ड, रिकामे चक्रे, वायरा, इत्यादी साहित्य. सिनेमा ठरवून आलेली चार दोन पोर ते सामान घ्यायला हजर असायची. अंधार वाढत जाईल तसा गावात लाऊड स्पीकर वरून पुकारणाऱ्या माणसाला जोर चढलेला असायचा. हि कला काही खास लोकांनाच जमायची. यांच्या ठराविक लयबद्ध आवाजाची सगळ्या कानांना सवयच झालेली. टाकीवाला गावात शिरताना दिसला की बारकी पोरं गल्लीबोळानं टाकीवाला आला म्हणत पळायची. ज्याच्या घरी कार्यक्रमानिमित्त सिनेमा ठेवलेला असायचा. त्याच्या घरी टाकीवाल्याच्या खास जेवणाची खास सोय.

तोपर्यंत इकडे पाराजवळ रिकाम्या पटांगणावर दोन मोठे बांबू जमिनीत ठराविक अंतरावर खड्डा काढून रोवले जायचे. दोन्ही बाबूंना ताणून पडदा बांधला जाई. दुपारी दीपमाळेवर चढवलेले जर्मनी कर्णे आता खाली उतरून या बांबूवर चढून बसायचे. पडद्याजवळ तोपर्यंत लहान पोरं एकमेकांना जागा मिळेल तेथे खेटून बसायची. घरातून लवकर बाहेर पडलेली म्हातारी माणसं पोती टाकून बसायची. बघता बघता सारं मैदान गर्दीनं फुलून जायचं. पडद्यापासून काही अंतरावर टाकीवाला प्रोजेक्टर मांडून तयारीला लागायचा. त्याला एक वर आणि खाली अशी दोन मोठी फिरणारी चक्रे जोडली जायची. वरचे चक्र रिळाणी भरलेले. तर खालचे रिकामे. वरच्यातून आलेली रीळ खालच्या चक्रात जोडली जाई. मशीनवाल्याचं पडद्यावर फोकस मारून सेटिंग सुरु झालं कि अंधाराचा फायदा घेऊन बारकी पोरं हळूच कुणाचे तरी पटके, टोप्या पडद्याच्या उजेडावर दिसेल असं उडवायची. लगेच "कुणाचं रं गाबडं हाय!" म्हणत शिव्यांचा भडिमार घुमायचा. दुपारपासून पुकारणारा गडी आता फडक्यात गुंडाळलेला माईक हातात घेवून आपल्या गावचे अमके अमके जेष्ठ यांच्या हस्ते नारळ फोडतील अशी शेवटची आरोळी देणार. तोपर्यंत कोणतरी डीपीत जाऊन सगळ्या खांबावरच्या लाईटी बंद करणार. आणि इकडे रिळांचा कर कर आवाज करीत टाकीवाल्याने प्रकाश किरण थेट पडद्यावर सोडले कि सिनेमा सुरु. कुंकू, पुढचं पाऊल, सांगते ऐका, मुंबईचा जावई, सोंगाड्या, पिंजरा, सामना, उंबरठा ते माहेरची साडी असे अनेक सिनिमे तेव्हा पडद्यावर लागायचे. 

चंद्रकांत-सुर्यकांत, जयश्री गडकर पासून स्मिता पाटील, अशोक सराफ, निळू फुले, रंजना, दादा कोंडके यांचेच हे प्रामुख्याने सिनेमे असायचे. दादा कोंडके किंवा अशोक सराफची एंट्री झाली की माणसं हसून हसून बेजार व्हायची. तर निळू फुले आले की बायकांचा शिव्यांचा भडीमार. एखादी म्हातारी अंधारतूनच, "आला बघ किरड्या!" म्हणून शिव्या हासडणार. मध्येच एखाद्या वेळी कोणतरी मुसमुसणार. गावात चार दोन बायका अश्या असणार कि अख्खा सिनेमा संपेपर्यँत यांची तोंड सुरू. तर पडद्यावर मारामारी सुरु झाली की एखांदा म्हातारा "हाण अजून हाण!" म्हणून ओरडणारच. त्यात मोक्याची क्षणी टाकीवाल्याकडून हमखास रीळ तुटणार. मग एका दमात सगळी "आरं कट करू कं रं! मागं घे मागं!" म्हणत पुन्हा कालवा सुरू. एक रीळ संपली की सिनेमा न थांबता दुसरी रीळ जोडणं हे फार हात चलाखीचं काम. यात काही टाकीवाले खास पारंगत. अशी न थांबता रीळ जोडून खेळ दाखवणाऱ्यास पुढची सुपारी हमखास मिळणार.

तर या सिनेमा बघणाऱ्यात काही लफडेवाले प्रेमिक हमखास असणार. असाच सिनेमाचा खेळ सुरु असताना खालच्या आळीच्या तानीला चिकटायसाठी माळावरचा किश्या पाताळ नेसून अंधारातून  बायकांच्या घोळक्यात शिरलेला. बायकांना वाटलं परगावची एखांदी बाई सिनेमा बघायला आलेली असावी. अंधाराचा फायदा घेऊन किश्या तानीच्या अंगाला अंग लावून चिकटून बसलेला. किश्या म्हणजे महाबिलंदर गडी. नाना युक्त्या करणारा. पाताळ नसलेलं असल्यानं कुणालाही संशय आला नाही. चांगला अर्धा सिनेमा संपेपर्यंत अंधारात दोघांचा खेळ चाललेला. सिनेमाची मध्यांतर झाल्यावर ह्यो बी गडी बायकांच्या घोळक्यातनं शिरून लघवीला जाऊन आला. सिनेमा पुन्हा सुरु झाला. काही वेळ गेला. अन टाकीवाल्याच्या मागच्या बाजूनं अंधारानं अचानकच आवाज आला, "तुझं मडं बसिवलं भाड्या! माझ्या चोळीला हात घालतुयास व्ह्य रं! आरं गड्याचा हात मला ओळखू ईना व्हय!" म्हणून धूरपा नाणी किश्याला बडवायला लागलेली. मध्यंतरानंतर तानीची जागा धुरपा नानीनं बळकावलेली. अन धुरपा नानाच्या जागी तानी बसलेली. त्यामुळे सगळा खेळाचा बेरंग झालेला. पण किश्या चलाख प्राणी. नेमकं काय झालय हे लोकांना कळेपर्यंत पाताळ सावरीत किश्या चार ढेंगात गावाशेजारच्या ओढ्यात गायब. लोकांना वाटलं हि बाईच पळतीय म्हणजे हिलाच कोणीतरी काय केलय. अश्या कित्येक किश्या आणि तानीच्या गोष्टी या 16 एम एम च्या सिनेमांनी खेड्यात घडवल्या. एक ना हजार गोष्टी.

काळ बदलला. दूरदर्शन वर आठवड्यातून एखांदा मराठी सिनेमा दिसू लागला. पुढल्या रविवारी कोणता सिनेमा लागणार म्हणून आठ दिवस आधीलोकं "साप्ताहिकी" सारखे कार्यक्रम बघू लागले. नव्वदच्या दशकानंतर बदलाचे वारे खेड्यावरुन वेगाने घोंगावू लागले. नासातून तंत्रज्ञानाने भरलेल्या उपग्रहाच्या सिगारेटी धूर ओकत आकाशात उंच उडाल्या. झाडावर बांधलेल्या घरट्यासारख्या कौलारू घरावर छत्र्या लोंबकळू लागल्या. अल्फा मराठी, ईटीव्ही सारखे मनोरंजनाचे शब्द नव्याने खेड्यातल्या डिक्शनरीत सामील झाले. हैद्राबादवरून रामोजीरावांनी सोडलेले ईटीव्ही मराठीच्या सिग्नलचे धूर कौलारू घरावरच्या छत्र्या पोटात ओढू लागल्या. या उपग्रह वाहिन्यांनी सिनेमा नजरेच्या टप्प्यात आणला. पडद्यावरच्या सिनेमांची क्रेझ विझू लागली. तालुक्याच्या टुरिंग टाक्या ओस पडल्या. गावात येणारे टाकीवाले फाट्यावरच्या एस.टी तून उतरताना दिसेनाशे झाले. दुपारपासून गाव दणाणून सोडणारा लाऊड स्पीकरवाल्याचा आवाज थांबला. पाराजवळ सिनेमा संपल्यावर उजाडे पर्यंत पडद्याच्या समोर झोपा लागलेली बारकी पोरं दिसेनाशी झाली. रात्रभर दोन जर्मनी करन्या मधून गावाला हसवत ठेवणारा अशोक सराफांचा आवाज विसावला. बायकांना मुसमुसून रडायला लावणारा पारासमोरच्या पडद्यावरचा जयश्री गडकरांचा अभिनय थांबला. निळू फुल्यांचे पडद्यावरचे राजकारण आता प्रत्यक्ष गावा गावातच शिरू लागलं. किश्या आणि तानी सारख्या प्रेमिकांच्या भेटीची ठिकाणं आठवणीत परिवर्तित झाली. टाकीवाल्या बाबाची मशीन श्वास विझवून कोपऱ्यातल्या अडगळीत कायमची विसावली. घरात जन्माला येणाऱ्या नव्या पिढ्यांना टाकीवाला बाबा आता जुन्या सिनेमांच्या गोष्टी शून्यात हरवून सांगू लागला. म्हणूनच मल्टिप्लेक्स, हॉटस्टार, प्राईम आणि नेटफिल्क्सवर सिनेमे बघणाऱ्या भविष्यातील पिढ्यांना काळजावर कोरलेला हा जादुई रिळांचा ठसा कधीच अनुभवता येणार नाही...

#ज्ञानदेवपोळ