आसिफा बद्दलच्या पोस्ट वाचल्यानंतर तिच्या विषयीचा पुढचा घटनाक्रम वाचणे माझ्या सहन शक्तीच्या पलीकडे गेलेले. काय हे भयानक चालूय आजूबाजूला या प्रचंड निराशेत रात्री बेडवर पडलेलो. अगदी तिच्याच सेम वयाची माझी मुलगी माझ्या जवळ आली. नेहमीप्रमाणे माझ्या बाजूला असलेला मोबाईल तिने हातात घेतला. बऱ्याच वेळा ती फेसबुकवरचे फोटो पहात राहते. जिथं जिथं लहान मुलांचे वाढदिवसाचे वगेरे फोटो दिसतात तेथे ती नेहमी लाईक करत राहते. खरे तर माझ्या फ्रेंड लिस्टमधील लहान मुलांच्या फोटोवरचे असे बरेच लाईक हे तिनेच केलेले असतात. ते चिंटू नावाचे पेज तिला प्रचंड आवडते. ते तिच्यासाठी मी फेवरेट लिस्टमध्ये ‘सी फर्स्ट’ केल्याने सतत तो चिंटू माझ्या वालवर फिरत राहतो.
पण रात्री तो चिंटू स्क्रोल करूनही तिला वालवर कुठेच दिसत नव्हता. अधे मध्ये ती गंभीरपणे काहीतरी वाचताना दिसत होती. मी काही बोलण्याआधीच तिने विचारले, “पप्पा हि मुलगी कोण आहे? मी हादरलोच. पुन्हा तेच डोळ्यासमोर. म्हंटलं, “का रे! असेल कोणतरी!” पप्पा सगळीकडे हिचेच फोटो दिसताहेत! हिला मारलय का कोणी? मी अडखळलो. शब्दच फुटेना. रक्ताळलेल्या एका फोटोवर लाईक करताना तिचा हात आज अडखळा होता. “सांगा ना पप्पा?” पुन्हा तिचा तोच प्रश्न. अखेर मी धाडस केलं. म्हणालो. “हो बाळा मारलय तिला!” पण का पप्पा? का मारलं तिला? तिला नेमके कसं समजून सांगावं या विचारात डोकं बधीर होऊन गेलेलं. आपण एखादी गोष्ट लहान मुलांपासून लपविण्याचा प्रयत्न केला कि त्यांची उत्कंठा जास्तच ताणली जाते. तिचं असच काहीसं झालेलं. अखेर मी आसिफावर रेप झाल्याचं सांगून टाकलं. पुन्हा तिचा तोच प्रश्न. “रेप म्हणजे काय हो पप्पा?” आसिफच्याच वयाची माझी मुलगी. मला विचारतेय. रेप म्हणजे काय असतं. आणि मी पालक असून तिच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देऊ शकत नाही. या साऱ्या गोष्ठी अजून समजून घेण्याचं या लहान मुलांचं वय नसताना आसिफा हकनाक कुस्करली गेली. अनेकांकडून...
मी जागेवरून उठणार इतक्यात तिचा पुन्हा प्रश्न. “पप्पा तिला मारून या नालायक लोकांना काय मिळतं हो? ती कुठं राहते? मला तिची स्टोरी सांगा ना?” मी जागेवरून उठलो तिच्या जवळ गेलो. तिच्या नजरेला नजर दिली. म्हणालो,
“बाळा! आसिफा शेळ्या मेंढ्या पाळणाऱ्या काश्मीरातल्या गरीब बकरवाल समाजात जन्माला आली. पण तिला इथल्या धर्म रक्षकांनी जातीधर्माच्या सुळावर उभी केली? तिचं अपहरण करून तिला तिला मंदिरात जनावरासारखी बांधून घातली. विकृत नराधमांनी तिचं गुप्तांग उध्वस्त करून टाकलं. इतकं सारं सोसूनही आसिफा जिवंत राहिली. लुळ पडत चाललेलं शरीर घेऊन झुंजत राहिली. वेदनांनी आणि उपाशी पोटाने गहिवरत राहिली. पण तिची दया येणार कोणाला? अखेर नराधमांनी डोक्यात दगड घालून तिला काश्मीरच्या दऱ्या खोऱ्यातून कायमची मुक्त केली”. मी हे सगळं सगळं तिला सांगितलं. पण.... ओठ मिठून... मनातल्या मनात.... नुसतच भरल्या डोळ्यांनी...
आसिफाच्या प्रश्नातून मला मुक्ती घ्यायची होती. माझी सोडवणूक करायची होती. हा विषय थांबविण्यासाठी उठून मी बाहेर निघालो तर माझ्या मागे येत पुन्हा ती म्हणाली, “मग तुम्ही का लिहित नाही तिच्यावर आर्टिकल! हे बघा! सगळे तिचेच फोटो दिसताहेत! तुम्ही पण लिहा ना?” मी माघारी वळलो आणि तिच्याकडे पहात म्हणालो, “बाळा! स्फोटात उडालेली शब्दांची दगडे आज माझ्याच डोक्यावर येऊन धडाधडा आपटताहेत! माझ्याकडे शब्द नाहीत. काय लिहणार मी तुझ्यासारख्याच निरागस
आसिफावर....!”
![]() |
photo credit:newscode |
No comments:
Post a Comment