हजार स्वप्नं डोक्यात भरून जगायला गेलेल्या बापूसाबाचा तरुण श्वास मुंबईतल्या एका इस्पितळात थांबल्याचं आताच कळालं आणि मी प्रचंड अस्वस्थ झालो. लहानपणी त्याच्यासोबत घालवलेल्या सगळ्या आठवणी वाऱ्याच्या वेगानं तळातून वर येऊन डोक्यातून लाह्या फुटाव्यात तशा फुटू लागल्या. तडतड करू लागल्या. बापूसाब गरिबीत जन्मला. गरिबीच्या पदराला धरूनच वाढला. हायस्कुलची शाळा तीन किलोमीटर लांब. दगड धोंड्याचा रस्ता. असला रस्ता बिना चप्पलांचा तुडवत बापूसाब शाळत यायचा. आतल्या चड्डीचा फटका भाग दिसू नये म्हणून एकावर एक चढवलेल्या दोन खाकी फाटक्या चड्ड्या, चुरगळलेला पांढरा शर्ट, डोक्याच्या बारीक केसांच्यावर चढवलेली पांढरी टोपी. एका ठिक्याच्या पोत्याची दप्तरासाठी शिवलेली पिशवी. आणि आभाळातनं ढासळणारं पावसाचं पाणी चुकवण्यासाठी पोत्याच्या बारदानाची अंगावर खोळ. गरिबीचा हा साज अंगावर चढवलेला बापूसाब माळाचा चिखल तुडवत सकाळी सगळ्यांच्या अगोदर शाळेच्या वाटला लागलेला दिसायचा.
लहानपणापासूनच बापूसाबाला वाचनाचं प्रचंड वेड. कुठून कुठून तो पुस्तकं मिळवायचा. देव जाणे पण मी आजपर्यंत जेवढी पुस्तकं वाचली नसतील तेवढी त्यानं शाळेच्या काळात वाचली असतील. बाबा कदमांचा तर तो निस्सीम भक्त होता. सुट्टीदिवशी आम्हाला गुरांमागे तो बाबा कदमांच्या कादंबऱ्या वाचायला आणायचा. बाबा कदम, बाबुराव अर्नाळकर, ना.सी.फडके, वि.स.खांडेकर यांच्या कादंबऱ्यातली प्रेमाची वर्णने वाचून अक्षरशः त्या वयात या बापूसाबानं आम्हाला वेड लावलं. आपल्या जगण्यात, वागण्यात, दिसण्यात नसलेली एक वेगळीच दुनिया या पुस्तकांनी रानामाळात समोर आणून दाखवली. ती या बापूसाबामुळंच. पुस्तकं वाचण्याचा खरा प्रवास येथून सुरु होतो. अर्नाळकरांच्या रहस्यकथा बापूसाब मोठ्या आवाजात गुरामागं वाचायचा. नंतर त्याला पोलीस टाईम्स वाचायचं एक प्रचंड वेड लागलं. म्हणायचा,"असलं वाचल्यानं आपल्याला शहाणं होता येतं. आपला घातपात करणारी माणसं चटकन ओळखता येतात. वेळीच सावध होता येतं! आणि उद्या पोलीस झाल्यावर आपल्याला तपास करायला पण सोपं जाईल" असं काही बाही त्याच्या जीवनाचं त्या काळातलं तत्वज्ञान.
मोठं होऊन पोलीस व्हायचं त्याचं स्वप्न होतं. त्याची तयारी तो शालेय जीवनापासून करत होता. गुरामागं त्याला अचानक हुक्की यायची. डोळ्यांत स्वप्नं उतरली कि भर दिवसा असा रानामाळात जोर बैठका मारायचा. पळायचा. लहानपणी पाहिलेली स्वप्नं हि लहानपणीच मरून जातात. कुठेतरी वाऱ्यासोबत ती विरून जातात. पण पुढं कॉलेजला गेलं तरी बापूसाबानं हे स्वन्न उराशी धरून ठेवलेलं. भरतीला लांब लांब जायचा. पण कशात तरी बाहेर निघायचा. पुन्हा तयारीला लागायचा. बापू कॉलेजात आला तरी गरिबीनं काही त्याची पाठ सोडली नाही. नाही म्हणायला आता त्याच्या पायांना चप्पला चिकटल्या होत्या. पण त्याही चामड्याच्या. पना तुटलेल्या चप्पला घालून मिरवायला बापूला कधी खंतही वाटली नाही आणि डांबरी सडकेवर कॉलेजच्या पोरीसमोर त्यातून करकर आवाज काढताना त्याची त्याला लाजही वाटली नाही. सत्यापासून पळवाटा शोधून जगणं त्याला पसंत नव्हतंच. एस.टि च्या पासाला पंचवीस रुपये मिळाले नाहीत म्हणून उलट्या वाऱ्यावर दिवस उगवायला सायकल मारत निघालेला बापू कित्येक महिने मी पाहिलाय.
मोठेपणी बापूसाब पोलीस बनला नाही. पण त्याची त्याला खंत वाटली नाही. अखेर जगण्याची स्वप्नं एका पिशवीत भरून तो मायानगरीत उतरला. कित्येक वर्षे परिस्थितीशी झुंज देत तो लढत राहिला. टकरा घेत राहिला. त्याला अखेर यशही मिळालं. पण गरिबीत काढलेल्या जुन्या दिवसांना तो कधी विसरला नाही. स्वतःला पोलीस होता आलं नाही पण त्याचा एक भाऊ फौजदार आणि शिक्षक बनला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर पसरलेला आनंद अवर्णनीय होता. मागच्या 10 मार्चला बापूसाब पुण्यात भेटला. तसाच साधा भोळा. बदलांचा कुठलाच वारा अंगावर न झेललेला चेहरा. सैदव हसतमुख. चहा पिता पिता सगळ्या जुन्या आठवणी चाललेल्या. आता वाचन करतोस का म्हंटल्यावर म्हणाला, आता पोरंबाळं संसार सारं काही मागं लागलंय. पहिल्यासारखा वेळ मिळत नाही. तरीपण वेळ असला की अजून वाचत बसतो. पण आता संसाराची चांगली घडी बसलीय.
त्या दिवशी बापूसाबाला पाठमोरा बघताना हि त्याची शेवटचीच भेट ठरेल अशी मी कल्पनाही करू शकलो नसतो. लहानपणी वादळवाऱ्याशी आणि मातीशी हजार टकरा घेणारा बापूसाब मायानगरीनं अंगावर चढवलेल्या कविळीसारख्या दुखण्याला कसा काय भिडू शकला नसेल? माहित नाही. शालेय जीवनात गुरामागं बाबुराव अर्नाळकरांच्या रहस्यकथा वाचणाऱ्या बापूसाबाला त्याच्या जीवनाचीच रहस्यकथा कशी काय समजली नसेल? माहित नाही. काही वर्षापूर्वी कपडयाची एक पिशवी भरून गेलेल्या बापूसाबाला संसार उभा करताना काय काय कष्ट पडले असतील? ते हि माहित नाही.
अखेर काही वेळात नियतीने पंख छाटलेल्या तुझ्या ओल्या देहातील स्वप्नांचा अखेरचा प्रवास तुझ्या बायका पोरासोबत गावच्या मातीच्या दिशेने सुरु होईल. जीवनाच्या रंगमंचावरून तू अशी अकाली घेतलेली एक्झिट डोळ्यांचा पडदा उघडला कि कित्येक वर्षे ती दिसत राहील. आठवतच राहील. तू केलेल्या संघर्षाला आणि जिद्दीला सलाम...
©ज्ञानदेव पोळ
No comments:
Post a Comment