माझे फायदे सगळे करून घेतले त्यानं. आजही करून घेतोय. माझं ऑफिस म्हणजे प्रसिद्धीखातं. तिथं सरसकट माझं नाव वापरून कामं करून घ्यायची. पुन्हा तुमच्या खात्यातल्या लोकांना दारू पाजावी लागते म्हणून ऐकवायचं. कधीकधी इतका संताप होतो ना…खूप शिव्या घालाव्या वाटतात. माझी आजी द्यायची तशा इरसाल शिव्या. पण जमत नाही. वाटतं, की जर अडाणीच राहिले असते अन् नवर्यानं असं वागवलं असतं ना, तर सरळ फारकत घेऊन मोकळी झाली असते. सुखानं एकटी राहिले असते, नाहीतर दुसर्याशी पाट लावला असता. पण आता ? आता असं करून कसं चालेल ? मी शिकलेली आहे. सुसंस्कृत आहे. मध्यमवर्गीय नोकरदार बाई आहे. आज माझी प्रतिष्ठा निराळी आहे. मला असं काही कसं करता येईल ? शिकणं, सुसंस्कृत होणं; या गोष्टीचे परिणाम असे होणार असतील…आपण अधिक भेकड, अधिक भाकड होणार असू…तर खरंच पुनर्विचार केला पाहिजे ना अशा गोष्टींचा…
हा प्यारेग्राफ आहे एका प्रसिद्ध लेखिकेच्या ब्र या कादंबरीतील. एक महिला सरपंच आणि तिच्या आयुष्यवर भाष्य करणारा. जेव्हा जेव्हा हा वाचला जाईल तेव्हा तेव्हा तो चेहरा डोळ्यासमोर येईल. आणि तो चेहरा असेल ब्र, भिन्न, कुहू, रजईच्या लेखिका Kavita Mahajan ताई यांचा. ताईंची अशी अकाली एक्झिट? विश्वासच बसत नाही अजून. अजून वाटतं हे स्वप्न असावं. खोटं खोटं पडलेलं. सारं आयुष्य साहित्य क्षेत्राला वाहून घेतलेली ही लेखिका अशी कशी काय सोडून जाऊ शकते? त्या पुण्यात आल्यानंतर त्यांना भेटायचं मनोमन ठरवलं होतं.
काही दिवसांपूर्वीच त्या कर्वे नगरला वसईहुन नव्या घरी शिफ्ट झाल्या होत्या. जणू काळच त्यांना वैकुंट भूमीत घेऊन येत असेल याची कल्पनाहि त्यांना नसावी. या काळात झालेली दगदग, त्रास त्यांच्या तब्बेतीला सहन झाला नाही असेच म्हणावे लागेल. किरकोळ दुखण्याने त्या अशा अकाली जातील असे कोणालाही वाटले नाही. वसईहून निघताना त्यांना कोणीतरी म्हणालं होतं तिकडे आता परमनंटच जाणार का? तेव्हा त्या म्हणाल्या होत्या. काय असतं हे परमनंट जाणं? मला तर अख्ख्या पृथ्वीवरच उपरं उपरं वाटत आलंय. सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या ताई सप्टेंबर महिन्यातच गेल्या. त्यांचा जन्म आणि मृत्यू हा एकाच महिन्यात नियतीने का लिहिला असेल?
त्यांनी संपादित केलेल्या आदिवासी लोकगीतांना साहित्य अकादमी सुद्धा मिळाला. ग्राफिटी वॉल, ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम, ब्र हि कादंबरी रसिकांनी उचलून डोक्यावर घेतली. त्यांनी अनेक पुस्तकांच्या संपादना बरोबरच बकरीचं पिल्लू, जंगल गोष्टी इत्यादी बाल कथासंग्रह, लेखसंग्रह, मृगजळीचा मासा, धुळीचा आवाज इत्यादी कविता लेखन आणि जोयनाचे रंग, पूल नसलेली नदी इत्यादी कथासंग्रह लेखनही केलं. त्यांचा घुमक्कडी हा ब्लॉग विशेष वाचनीय ठरला. मराठी साहित्याला साता समुद्रापार पोहचवणाऱ्या या लढवय्या लेखिकीच्या अशा अकाली जाण्याने साहित्य क्षेत्राचं खूप मोठं नुकसान झालय. त्यांचे कित्येक संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर होते.
एबीपी माझाचा ब्लॉग माझा पुरस्कार मिळाला तेव्हा कविताताई परीक्षक म्हणून होत्या. त्यांनी लिखाणाबाबत अनेक सूचना केल्या होत्या. त्या सातत्याने लेखनात आणण्याचा मनोमन प्रयत्न चालू होता. या साऱ्यांच्या आता फक्त आठवणी झाल्यात.
त्यांच्यात भाषेत सांगायचं तर मुसळधार पावसाचे आवाज ऐकत मी शांत बसून आहे. मन अशावेळी रिकामं असावं आणि एकही अक्षर ऐकू येऊ नये असं वाटतं. दरड कोसळत राहावी कितीतरी वेळ आणि राडा व्हावा जे खाली सापडेल त्याचा. एक उबदार कुस हवी वाटतेय. माझ्या मऊ टेडीबीअरला जवळ घेऊन मी खिडकीबाहेरचा काळोख बघत बसतेय. प्रत्येक झाडावर वेगळा वाजतोय पाऊस, दगडावर-खडकावर वेगळा, घराच्या प्रत्येक छतावर वेगळा, समुद्राच्या अथांग पाण्यावर वेगळा आणि माझ्या पापण्यांवर वेगळा.
खरंय ताई सगळ्यांच्या पापण्यांवर असा वेगळा पाऊस पाडून तुम्ही निघून गेलात. दूरच्या प्रवासाला. कधीही न परतण्यासाठी. काही दिवसापूर्वीच तुम्ही म्हणाला होतात, "माणसं गेली की, उत्सुकतेने ढीगभर काव्यात्मक श्रद्धांजल्या वाहणारे आपण. हयात असलेल्या व्यक्तींसाठी आपल्याला वेळ असतो का?’ खरंय ताई.
शेवटी क्षणाचाही भरोसा नसलेल्या भयाण जगात वावरत असताना एका वळणावर आज नियतीने तुमचा श्वास थांबवला. मराठी साहित्यातील एक लढवय्या बंड शमलं. अखेर स्त्री साहित्याला नवी दिशा दाखवून स्वतःच्या दिशाला (लेकीला) तुम्ही घरात एकटी एकटी मागे ठेवून गेलात. नाहीतर कामवाल्या बाईला वसईहून निघताना तुम्ही म्हणाला होतातच. मी मेले की दिशाला पुस्तकांचा पसारा आवरायला किती त्रास होईल गं. तो त्रास इतक्या लवकर तुम्ही तिला द्याला असं स्वप्नातही वाटलं नव्हतं...
©ज्ञानदेव पोळ
No comments:
Post a Comment