सारी दुनिया पुढं गेली तरी नाना देसाई अजून जुन्या काळातच जगतोय. नानाला भेटलं कि कधी कधी वाटतं. एकेकाळी नांगरटीसाठी त्यानं आणलेला घरातील एक जुनाट दोरखंड बाहेर काढावा. तो नानाच्या कमरेला घट्ट बांधावा. आणि अलगद त्याला त्या जुन्या काळातून या नव्या जगात ओढून घ्यावा. पण नानाला असं अलगद ओढून नव्या जगाशी जोडणं तितकं सोपं नाही. का नाही ते पुढं सांगत जाईलच तुम्हाला. पहाट संपून गावावर तांबडं फुटावं. दिवस उगवावा. पाखरं घरट्यातून उंच आकाशी उडावी. गुरं ढोरं चरायच्या ओढीनं पांदिला लागावी. अजून कडाक्याची थंडी गावावर पसरलेली असावी. अशा अंगाला चावणाऱ्या थंडीत माणसं घरोघरी शेकोट्या करून बसलेली असावी. आणि दाट धुक्यातून वाट काढत अचाकन अंथरुणावर येऊन कुणीतरी आवाज द्यावा. " उठा कि वं उजाडलं आता! तेवढी कुळवट करून घेतली पाहिजेल! शाळवाचं रान पेरायला लागलं!" होय! हा आवाज देऊन सकाळी झोपेतून उठवायला आलेली आणि मळ्यात कुळवावर बसायला चला म्हणून सांगणारी व्यक्ती नाना देसाईंच असायची.
1. Notionpress Store
2. Amazon store
3. Flipkart store
पूर्ण कथा वाचा पुस्तक रुपात.....
©ज्ञानदेव पोळ
No comments:
Post a Comment