Tuesday, March 27, 2018

दोन जगे

दिवस उगवायला नाना परळ एस.टी तून गावाबाहेरच्या फाट्यावर उतरले अन गठुळं घेऊन चालू लागले. फाट्यापासून मैलभर चालत गेलं की डोंगराच्या उताराला हजारभर लोकवस्तीची आपली सुळेवाडी येणार या आनंदात ते झपा झपा पावले टाकत चालू लागले. मुरुमाड रस्ता असल्यानं पायाला ठेचा लागत होत्या. विचाराच्या तंद्रीत वाडीबाहेरचा ओढा ओलांडून नाना गावात शिरले. गल्लीबोळातून सकाळी माणसांची कामधंद्यासाठी लगभग चाललेली. दुधाची गाडी गावतलं दुध गोळा करून गावाबाहेर पडत होती. नानाच्या डोक्यावरचं गठुळं बघून येणा जाणारा एखादा विचारायचा, "नाना लेकाकडून एवढं मोठं कशाचं गठुळं घेऊन आलासा. नाना खोटंच कायतरी सांगून वेळ मारत होते. अखेर नाना घराजवळ आले. नानाची बायको फुलाबाई बाहेरच्या चुलवाणावर पाण्याची तवली ठेवून जाळ लावत बसली होती. सगळ्या अंगणात धूर पसरला होता. आत थोरली सून स्वयंपाकाला लागली होती. नानानी खांद्यावरचं गठुळं सोफ्याला खाली ठेवलं आणि भिंतीला टेकून बसले. मागोमाग फुलाबाई जवळ आली आणि खाली बसत म्हणाली, 
"हायती कि वं बरी सगळी!” 
"बरीच म्हणायची!” 
"सून बोलली का यवस्थित तुमच्याशी!” 
"हा बोलली कि!” 
"मग येतू म्हणाली का नाहीच सुट्टीला!” 
"सत्यवान म्हणालाय यावेळी मी तिला पुढं घालून आणतो!” 
"नातवंडं मोठी झाली असतील न्हवं!” 
"तर तर चांगली इंग्लिश शाळात जात्याती!” 
"कवा जन्माच्या येळी म्या बघितलेली!” 
"पोरं आपल्या सत्यवानावरच गेल्याती बघ!” 
"असं व्हय! ते कपड्यांच्या चिंध्या आणल्या न्हवं!” 
"तू म्हणलीस म्हणून आणल्या बघ!” 
"बरं झालं! उठा अंगुळ करून घ्या अन घासभर खावा! थोरला दिस उगवायलाच गेलाय रानात!” 
नाना उठून खुंटीवरची कापडं घेऊन बाहेर अंघोळीला गेले. थोरली सून चुलीपुढं भाकरी थापता थापता मघापासून सगळं कान देऊन ऐकत होती. ती बिचारी साधी भोळी. घरचं बघून नवऱ्यासोबत रानंतलं सगळं करायची. तिला पण तिची शहरातली नोकरीवाली जाऊ एकवेळ लग्नातच बघायला मिळाली होती. फुलाबाईंनं नवऱ्यानं आणलेलं गठुळं सोडलं. गठूळ्यातल्या सगळया जुन्या कपड्यांच्या चिंध्या भसा भसा बाहेर काढल्या. तिचा जीव हरखून गेला. एक एक चिंधी ती डोळे भरून पाहू लागली. 

सुगीचे दिवस सुरु असल्यानं माणसांची आपल्या शेताकडं नुसती झुंबड उडालेली. रस्त्यानं चरायच्या ओढीने गुरंढोरं वाटला लागलेली. दिवस वाढेल तसा गाव ओस पडत निघालेला. नुसती म्हातारी कोतारी माणसं गावात उरत होती. सगळी रानात गेल्यावर फुलाबाईंनं घराला कुलूप घातलं आणि खालच्या आळीच्या बायजा म्हातारीकडं गेली. बायजा म्हातारी जेवण आटोपून मिसरीचं बोट तोंडात धरून बसल्याली. फुलाबाई समोर आलेली बघून म्हणाली, 
"ये बाय कवा सुरु करायची तुजी वाकाळ!” 
"आवं त्यासाठीच आलीया तुंमच्याकडं! झालीय सगळी तयारी आजच करूया म्हणतीय!” 
"अगं पण अजून दुघी लागत्याली कि!” 
लव्हारची पारू, किसना आप्पाची धुरपा यितू म्हणल्यात! तुम्ही घराकडं या थोड्या टायमानं!” फुलाबाई आल्या पावली निरोप देऊन गडबडीनं घराकडं परत पळाली. लाकडी पेटीतनं आधीच बाजारातून खरेदी केलेल्या जाड दोऱ्याच्या गुंडया आणि मोठया सुया तिनं बाहेर काढल्या. घरातली सगळी जुनी गाठुळी काढली. सगळी सुती कापडं एकत्र करून पाणी मारून अंथरून ठेवली. दुपारी चौघीनी मिळून चांगली सात हाताची वाकाळ शिवायला घेतली. रोज दुपारी चार कोपऱ्यावर चौघी बसून वाकाळ शिवू लागल्या. सत्यवान आणि बायकोचा विषय वाकळ शिवताना बायजा म्हातारी रोज काढू लागली, "काय बाय त्येची बायको शहरात जन्मली म्हणून काय झालं! आपल्या गावाला याला नकू व्हय! एवढी कशाची तिला घाण येतीया माणसांची! अन ल्योक तरी तुझा असा कसा गं निघाला!” लव्हारची पारू लगेच सुरात सूर मिसळायची, "अगं त्येचं काय चालत नसलं बायलंच्या म्होरं! येसन घातल्यावर जनावर कुठं वड करील सांग कि!” दुपारी ओस पडलेल्या साऱ्या गावाच्या घराघरावर अश्या गप्पा गोष्टी करत चार पाच महिन्यात फुलाबाईंनं दोन वाकळा शिवून काढल्या. 

सुगी केव्हाच संपली. सारी रानं ओस पडली. उन्हाळ्याचं दिवस सुरु झालं. दूर एखादया माळावर नांगरकऱ्यांचे आवाज दणाणू लागले. सत्यवानचा दोन दिवसात बायका मुलासोबत गावी येतोय म्हणून नानांना फोन आला. फुलाबाईचा जीव फुलासारखा फुलला. सुट्टीला सात वर्षांनी धाकटी सून मुलांना घेऊन गावी येणार म्हणून फुलाबाईंनं घराचं उभं कुडी सारवण काढलं. सारं अंगण शेणानं सारवून काढलं. सोफ्यातला रांजण तळापासून धुऊन पाण्यानं भरून ठेवला. आठवडी बाजारातून हिरव्या गार भाज्या आणून घरात ठेवल्या. पेटीतली नवी भांडी काढून कपाटात मांडली. नवं कप बाहेर आलं. दांडा तुटलेलं कप पेटीत जावून गप्पगार पडलं. 

एका भर दुपारी सुळेवाडीच्या फाट्यावरून सत्यवानाची गाडी धुरळा उडवत फाट्यावरून आत वळाली. गावाच्या खुणा बघून तो दूर कुठेतरी खोल हरवून गेला. त्याने गाडीचा स्पीड कमी केला. तेच माळरान. तीच जुनी सडक. दूर डोंगराकडेला हिंडणारी गाई गुरे आणि त्यांच्यामागे फिरणारे मुंडासे गुंडाळलेले गुराखी. उताराला हिंडणारा मेंढराचा एक कळप. वाऱ्याच्या झुळकेने रस्ताच्या कडेची डुलणारी डेरेदार झाडे. याच माळावर आपण लहानपणी गुरे चारायला येत असू. ते पलीकडे गोठ्याबाहेरच्या पिपर्णीच्या झाडाखाली सावलीत बसलेले आप्पा आहेत कि कोण? हो आप्पाच आहेत कि ते. एवढे कसे काय थकले असतील. त्यांची म्हातारी कुठेच दिसेना. शाळेत जाताना पाऊस आला कि या आप्पांच्या वस्तीला आपण थांबायचो. त्यांची म्हातारी आपल्याला विजा वाऱ्याची पुढच्या ओढ्यापर्यंत घालवायला काठी टेकत यायची. उन्हाची म्हातारी आज कुठेच दिसली नाही. उद्या तिला नक्की भेटायला यायला हवं. पण ती उरली असेल का अजून? सात वर्षात अशी कितीतरी जुनी माणसं आता गळून गेली असतील का? त्या समोरच्या माळावर लहानपणी मित्रांच्या सोबतीने आपण कितीतरी खेळ खेळलेत. या रस्त्याने आपण तालुक्याच्या शाळेत अनवाणी पायांनी चालत जायचो. ते माळावरचं पलीकडचं दगडांच्या भिंतीनी बांधलेलं तामजाईचं मंदिर, अजूनही उजाड माळावर ऊन वारा पचवत तसच उभं आहे. त्याच्यावरची ती फडफडणारी भगवी पताका युगानुयुगे अजूनही तशीच फडफडतेय. परीक्षेला जाताना या तामजाईला हात जोडल्याशिवाय आपण कधीच पुढे जात नव्हतो. आज आपल्याला का थांबावं वाटत नाही. तिच्या जवळ जाऊन तिला हात जोडण्याची का इच्छा होत नाही. कशाचा परिणाम हा. काळाचा कि शहरी जगण्याचा. माणसं भौतिक सुखाच्या मागे इतकी कशी काय लागू शकतात. आपण का विसरू पाहतोय या आपल्या गावाला. या तांबड्या मातीला. वरून काळपट पडलेल्या आपल्याच माणसाना. आपल्या जान्हवीला ही खेडी आणि येथली खेडवळ माणसं का आवडत नसावीत. जन्मभर ऊन वारा खाऊन ती बाहेरून फाटली असतील, तुटली असतील. पण तरीही अजून ती उभी आहेत भक्कम. एखांद्या बुरर्जासारखी. ती कोणासाठी जगत असतील? सुखाच्या अपेक्षा तरी कोणत्या असतील यांच्या? त्यांच्या जगण्याच्या प्रेरणा तरी नक्की काय असतील? जान्हवीचा जन्म शहरातला असला म्हणून काय झालं. आता तिनं आपल्याशी लग्न केलय. बायको आहे ती आपली. नानांची - आईची सून होऊन तिला सात वर्षे उलटलीत आता. मग आपल्या माणसांना आता तरी स्वीकारायला नको कि तिनं. दादा वाहिनी कधी आपल्याला एका शब्दानेही टोकाचे बोलले नाहीत. आपलं अर्धे आयुष्य रानामाळात येथल्या माणसांत गेलय. आपल्या पोरांना शेती कशी असते यातलं काहीच माहित नाही. कधी कळणार त्यांना हे सगळं. जान्हवीशी लग्न करून आपला निर्णय चुकला तर नाही ना? आपण तिच्याशी हे सगळं आधीच का नाही बोललो. आपण लहानपणापासून गरिबीत दिवस काढले. वाटलं तिची उच्च पदाची नोकरी. आपल्या घरादाराला आधार होईल. शेतीत राबणाऱ्या आपल्या दादा वहिनीला चार पैशांचा आधार होईल. पण हे काय होऊन बसलंय. मनातली ही सगळी घुसमट याक्षणी गाडीचा करकचून ब्रेक लावून आपण ओरडून का नाही सांगू शकत तिला? विचाराच्या तंद्रीत गाडी गावाचा ओढा ओलांडून लिंबाच्या झाडापुढील घरापुढे येवून थांबली. फुलाबाईच्या घरापुढं थांबलेली लाल रंगाची गाडी बघून गल्ली बोळातली बारकी पोरं गाडीभोवती जमली. आजूबाजूची बाया माणसं नानांची ल्योक सून इतक्या वर्षांनी आली म्हणून उंबऱ्यात येऊन डोकावू लागली.

दोन दिवस उलटले. जान्हवी कामापुरतेच घरातल्या लोकांशी बोलत होती. तिला घरातल्या सगळ्याच गोष्टींची उबळ येत होती. आजूबाजूच्या गोठ्यातल्या म्हसरांचे दिसणारे शेणाचे पव, शेरडांच्या लेंड्या आणि मूत, उकिरंड्यावर उकरणाऱ्या कोंबड्या, गल्लीतून ओरडत पळणारी डुकरे, ओढ्याच्या पाण्यावरून घोंगावणाऱ्या माशा, उघडी गटारे, उन्हाची धापा टाकत सावलीत पडलेली कुत्री पाहून तिला जास्तच उबळ येऊ लागलेली. म्हणून सत्यवान तिला शेतात जरा फिरून येऊ म्हणाला. तुला तेवढच बरे वाटेल. मुलांनाही आपला मळा दाखवू. तिचा काहीसा होकार आल्यावर तो मुलांना घेऊन घराबाहेर आला. जवळच मळा असल्याने आपण चालतच जाऊ. चालत गेल्याने येता जाता लोकांच्या गाठी भेटी होतात. बोलता येतं त्यांच्याशी असं तो म्हणाला. पण त्याला तोडत ‘तुम्हाला माहितेय ना मला जास्त चालण्याची सवय नाही आपण कारनेच शेताकडे जाऊ अशी जान्हवी म्हणाली.

मळ्यात गोठ्याला गाडी लावून सत्यवान मुलांना आणि जान्हवीला घेऊन मळ्यातून फिरू लागला. मुले हरखून गेलेली. पहिल्यांदाच त्यांना असं रिकामं रिकामं वाटत होतं. सत्यावानलाही खूप वर्षांची घुसमट रिकामी होत असल्याचं जाणवत होतं. दोन्ही मुलं त्याला “हे काय पप्पा”? म्हणत प्रश्नांचा सतत भडीमार करत होती. पण मुलं उन्हाने काळी पडतील म्हणून जान्हवी त्यांना आडवत विहिरीजवळच्या आंब्याच्या झाडाखाली बसूया म्हणाली. दोन्ही मुलं झाडाखाली खेळू लागली. सत्यवान जान्हवीकडे पहात म्हणाला, 

“माझं सगळं बालपण इथेच गेलय, याच मातीत आजोबा पणजोबा जन्माला आले. ते बघ विहिरीच्या पलीकडे बांधावर त्या समाध्या दिसतात ना त्या त्यांच्याच आहेत. आपला सगळा गोतावळा येथलाच. या समोरच्या शेतात सगळ्या पिढ्या खपल्यात. तो बघ दादा खालच्या तालीत कांद्याला पाणी पाजतोय. ते बघ ओढ्याकडेचे चिंचेचे झाड. राघू चिंचा आहेत त्या. अशी झाडं कुठेही येत नाहीत. पण तू काहीच का नाहीस बोलत.” 
“खरं तर मला हे असलं नाही हो आवडत. आई, नाना, जाऊबाई इतके सगळे राबताहेत या मळ्यात. किती शिल्लक पडते हो या शेतीत. साधे कोण आजारी पडले तरी पैसे पाठवा म्हणून तुम्हालाच फोन करतात”. 
“मग त्यांचा हक्कच आहे. त्यांनी किती खस्ता खाल्लेत माझ्यासाठी. माझ्या शिक्षणासाठी. मग मला नाही मागणार तर कोणाला मागणार”. 
“तुमच्याशी बोलायला लागले कि असल्या काहीतरी जुनाट गोष्ठी तुम्ही सतत सांगत राहता.” 
“बरं जाऊ दे ते! आपल्या या विहिरीत आपण मुलांना पोहायला शिकवू या का? मी येथेच पोहायला शिकलो होतो.” 
“काही नको. ते किती काळे पडलेले पाणी आहे पाहिलेत का तुम्ही! अंगाला उठेल मुलांच्या! सहन नाही होणार त्यांना! आपण परत गेलो कि स्विमिंग क्लास लावू त्यांना!” इतक्यात गोठ्याकडून नातवांडाना नानांनी हाक दिली. रोकडेवाडी कडून गावाकडे निघालेला गारीगारवाला नानांनी थांबविला होता. जवळ गेल्यावर जान्हवी ‘नको नको ती आजारी पडतील’ म्हणतानाही नानींनी दोन कांड्या घेऊन पोरांच्या हातात दिल्या. 

रात्री मुलं रानाचा ऊन वारा खाऊन नकळत तापली. मात्र जान्हवीनं आकाश पातळ एक केलं. आपण उद्याच निघू. तुमच्या बहिणी उद्या भेटायला येणार आहेत तर त्यांना लवकर सकाळी यायला सांगा. म्हणजे आपणाला दुपारी निघता येईल. सत्यवानने तिची खूप समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण त्याला काही यश आले नाही. अखेर नाना आणि फुलाबाई म्हणाली, “आता चार दिस का होईना राहिलासा तुम्ही! जावा बाबानो आता माघारी.

सकाळी बाजूच्या गावावरून आलेल्या दोन्ही बहिणीशी बराच वेळ सत्यवान बोलत बसला. कितीतरी वर्षांनी त्यांच्याशी भेट झाली होती. दुपारी जान्हवीने सामानाची बांधाबांधी करून सामान कार मध्ये नेऊन ठेवलं. निघण्याची वेळ झाली. जान्हवी मुलांना घेऊन सर्वात आधी कारमध्ये जाऊन बसली. आत बसलेल्या मुलांभोवती सगळी जमा झालेली. नानानी त्यांच्या गालावरून हात फिरवले आणि पुढच्या वर्षी नक्की या म्हणत पाहुण्यासारखं आमंत्रण दिलं. बहिणीची पोरं त्यांना टाटा करू लागली. सगळे गाडीभोवती जमा झाले होते. पण सत्यवान अजून का आला नसेल या विचारात जान्हवीची आत तळमळ चाललेली. नानांनी त्याला बाहेरूनच आवाज दिला. घराच्या आतल्या खोलीत गडबडीनं फुलाबाईनं शिवलेली एक नवी कोरी वाकळ बाहेर काढली आणि सत्यवानाला म्हणाली, 

“तुला शिकलेली बायको मिळाली! तिचा जन्म शहरातला! गाव खेडं आणि येथली माया ममता तिला कधीच नाय समजायची! निदान तुला तरी आपल्या माणसांचा विसर पडुनी म्हणून हि वाकाळ शिवलीय! तुज्या बंगल्यात या वाकळंला अडगळीत टाकू नकुस! तुज्या अंगावर पांघरत जा! या वाकळंच्या वरच्या बाजूला तुज्या बहिणींच्या तुटक्या संसाराच्या सुती साड्या लावल्यात! मधल्या भागाला माझं लुगडं आणि खालच्या बाजूला तुज्या दादाचा आणि नानांच्या बनियनचा कपडा लावलाय! दादाच्या पोरांच्या फाटक्या खाकी चड्ड्या पण चार महिने डोळे जाळून या वाकळला जोडल्यात. हि वाकाळ तुला रात्री झोपल्यानंतर आपल्या माणसांच्या आठवणींचा वास देईल! घरादारापासून तुला कधीच तोडणार नाही!”

सत्यवानाचे डोळे भरून आलेले. कोपऱ्यातल्या दुसऱ्या वाकाळकडं त्याचं लक्ष गेलं. आईनं मागच्या चार महिन्यापूर्वी नानासोबत शहरातल्या बंगल्यातल्या जुन्या कपड्यांच्या चिंध्या का मागितल्या होत्या याचा एका क्षणात त्याला सारा उलगडा झाला. दुसऱ्या वाकळंवर वरच्या बाजूला त्याच्या पोरांच्या जुन्या कपड्यांच्या चिंध्याचे तुकडे जोडले होते. मध्यभागी त्याच्या विजारीचा तुकडा पण जोडला होता. होय! फुलाबाईनं ती स्वत:साठी शिवली होती. निदान त्याच्या पोरांना वाकळंच्या रूपानं तरी आपल्या अंगावर जन्मभर पांघरून घेता येईल या वेड्या आशेसाठी.... 

#ज्ञानदेवपोळ
Photo Credit: AdarshGramGramodyog

No comments:

Post a Comment