Wednesday, April 11, 2018

दमयंती

एका सकाळी पेपरची पाने चाळताना मधल्या पानावर एक छोटीशी बातमी दिसली, "विष पिऊन तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न." एकदम हादरलोच. आता तुम्ही म्हणाल यात नवल वाटण्यासारखं काहीच नाही. मरण स्वस्त झालेल्या देशात अशा बातम्यांनी रोज वर्तमानपत्रांची कितीतरी पाने काठोकाठ भरलेली असतात. पण मी मात्र तीच बातमी पुन्हा पुन्हा वाचू लागलो. हवं तर तुम्ही मला वेडा माणूस म्हणा. नाहीतर आणखी काहीही म्हणा. पण त्या तरुणीच्या नावाजवळच मी पुन्हा पुन्हा फिरू लागलो. गावाचं नाव वाचू लागलो. गावही तेच होतं. पळसगाव. झर्रकण मेंदूच्या पोटात शिरून तळात गेलो. त्यातील त्या व्यक्तीला शोधू लागलो. अखेर एका कोपऱ्यात पोहचल्यावर माझा शोध थांबला. तळात सापडलेली आणि पेपरमध्ये उमटलेली ती व्यक्ती होती, "दमयंती उमाजीराव जहागीदार". पहिल्यांदा आयुष्यात कधी भेटली? नेमकी केव्हा भेटली? कि मीच तिला भेटलो? यातलं मला काहीच आठवत नाही. पण माझ्या सबंध बालपणाच्या आयुष्यावर तिच्या आठवणींचं पांढरं फिकट धुकं पांघरलेलं आहे हे मात्र खरं आहे. मी पुन्हा तिच्या आठवणींच्या धुक्यात हरवलो. 

माझ्या वडिलांची एक गुरुबहीण पळसगावात राहायची. म्हणजे आजही राहते. आता ती थकून गेलीय. या गुरुबहिणीचा वडिलांवर विशेष जीव होता. दरवर्षी ती न चुकता वडिलांना राखी बांधायला यायची. हिला मुलबाळ नसल्यानं दिवाळी आणि उन्हाळी सुट्टी लागली की ती हमखास मला तिच्या पळसगावला घेऊन जायची. तिच्या गावाला तुडूंब भरून वाहणारी नदी असल्यानं तिचं गाव मला खूप आवडायचं. त्या आत्याच्या घराला अगदी चिकटूनच गावाच्या देवळासमोर काळाच्या पिढ्या मोजत एक वाडा दिमाखात उभा होता. तो वाडा उमाजीराव जहागीरदार यांचा. या वाड्याच्या बाहेरच्या मोठ्या पटांगणात पायातील पैंजणाचा छम छम आवाज काढत नव नव्या रंग बिरंगी कपड्यात दुडु दुडु धावणारी एक चिमुकली गोरीपान मुलगी फिरायची. तिचं नाव दमयंती. 

वाड्याच्या अगदी समोर उंच कळस असलेली तीन गावदेवांची मंदिरे. बाजूला भलं मोठं पटांगण. या पटांगणात सायंकाळी रोज सनई चौघडा वाजायचा. आरत्या म्हंटल्या जायच्या. आम्ही सगळी लहान मुले जमायचो. दमयंती आमच्यात खेळायला यायची. तिच्या अंगात रोज नवीन कपडे दिसायची. पायाला नव्या चपला. तिच्याशी अनेक प्रकारचे खेळ आम्ही खेळायचो. ती जिंकायची. मी हरायचो. ती लहान असल्यानं आम्हीच तिला जिंकू द्यायचो. सतत म्हणायची, “मी कधीच हरणार नाही”. तिच्या वाड्याला भला मोठा झोपाळा झुलायचा. त्याच्यावर दमयंती बसायची. पाय हलवत डुलायची. हसायची. मागून मोठ्याने झोका हलवायला लावायची. हलताना साखळीचा ‘कर कर’ आवाज निघायचा. दरवाज्यातून आत गेल्यावर एक चौरसाकार मोकळी जागा व लगेचच दिवाणखाणा होता. दिवाणखाण्यात मोठी जाजमं पसरलेली असायची. भिंतीवर एक वाघाचे कातडे टांगलेले होते. जहागीरदारी वळणाचे मिशीवाले उमाजीराव पान खात बसलेले दिसायचे. आतल्या एका खोलीतून तबला पेटीचा नादमधुर आवाज निघायचा. दमयंतीच्या आईचा कधी कधी गाणं म्हणताना आवाज यायचा. दुपारी दमयंतीची आई – वत्सलाबाई लाकडी रवी घेऊन ताक घुसळायची. उन्हाचा तांब्या भरून ती मला प्यायला द्यायची. पण वाड्याबाहेर आलेली कधी नजरेला ती दिसायचीच नाही. तिच्या केसात नेहमी सुवासिक फुलांचा गजरा असे. त्या वाड्यात सहसा बाहेरचा माणूसही कधी बसलेला दिसायचा नाही. दमयंती मात्र आमच्यासोबत वाड्यात लपाछपीच्या खेळ खेळायची. सापडायचीच नाही. अजून तुझी सुट्टी किती आहे? तू शाळेला इथेच का नाही येत? एक ना अनेक प्रश्न विचारत राहायची. उन्हाळा संपून मिरीग निघायचा. आभाळात ढगांची पळापळ सुरु व्हायची. माझा सुट्टीतला मुक्काम सपंत आलेला असायचा. सुट्टी संपून जाताना ती अस्वस्थ व्हायची. नदी ओलांडून दूर जाईपर्यंत पाठमोरी पहात राहायची. ‘दिवाळीच्या सुट्टीला नक्की ये हं!” सांगायला विसरायची नाही. वाट पहात राहायची. पुढच्या सुट्टीची. 

कितीतरी वर्षे उलटली. वय वाढलं कि नाती बदलतात. वाढणाऱ्या वयासोबत प्रत्येक सुट्टीला दमयंती दूर होत गेली. नंतर नंतर ती मुलींमध्ये खेळताना दिसू लागली. मात्र बोलायची. हसायची. आईने तुला वाड्यात बोलावलय म्हणून निरोप घेऊन यायची. सुट्टी संपून जाताना तिची आई रिकाम्या हाती पाठवायची नाही. हळूहळू वय वाढत गेलं तसं पळसगाव दूर जाऊ लागलं. तिकडं जाणं कमी झालं. तिकडे कधी गेलंच तर दमयंतीनं आपल्याला भेटावं किंवा दिसावं असं अजिबात वाटेना झालं. पुढे दहावीनंतर कॉलेजमध्ये गेल्यावर तर पळसगावात तिच्या वाड्याशेजारच्या घरात कित्येकदा राहून गेल्यावरही तिची आठवण आली नाही. मात्र वत्सलाबाई दिसल्या कि, “वाड्यात चहाला ये!” म्हणायच्या. दमयंती कधी येता जाता दिसलीच तर नुसती आहो जाहो करून "कधी आलात!" या शब्दापलीकडे कधी बोलली नाही. त्याचं काही वाटायचंही नाही. पुढं पुढं तिकडे जाणेच बंद झालं. हळूहळू दमयंती विस्मरणात गेली. खोल खोल तळात गेली. कशी गेली? नाही सांगता येत. तुम्ही मला शिव्या घाला. मी त्या नाकारणार नाही. मात्र एखदा आत्या आजारी असल्यानं पळसगावला गेलेलो. काहीही करून संध्याकाळी परत निघायचं होतं. मात्र अंधार पडल्यानं मुक्काम करावा लागला. मी सहज म्हणून दमयंती सध्या कुठे शिकते वगैरे असं काहीतरी आत्यांना विचारत होतो. मात्र उमाजीरावाच्या वाड्याची जी हकीकत समजली ते ऐकून मी वेडा कसा झालो नाही तेच मला समजले नाही. बालपणापासून कित्येक वेळा त्या वाड्याशी कृणानुबंध असूनही या गोष्टी मला कशा काय समजल्या नाहीत तेच मला कळाले नाही. 

उमाजीरावांच्या बायकोच्या मृत्यूनंतर वत्सलाबाई त्यांच्या आयुष्यात आल्या. वत्सलाबाई उमाजीरावांची खरी पत्नी नव्हती. समाजाच्या दृष्टीने ती एक रखेल होती. ठेवलेली बाई. उमाजीरावांनी बायकोच्या मृत्यूनंतर घरात नाच गाणं करणारी नायकीन आणली म्हणून पहिल्या बायकोची दोन्ही मुले आजोळीच्यांनी तिकडे नेली. एकटे पडलेले रंगेल उमाजीरावांनी वाड्यात एका नायकीनीसोबत राहू लागले. बऱ्याच वर्षांनी तिच्या पोटी जन्माला एक मुलगी आली. ती दमयंती. कोणी म्हणायचं उमाजीरावांनी वत्सलाबाईशी लग्न केलंय. कोणी म्हणायचं तिला वाड्यात बाई म्हणून ठेवलीय. एक ना अनेक जिभा फुटलेल्या... 

मी भानावर आलो. हातातला पेपर बाजूला ठेवला. आता माझं एक स्वतंत्र जग होतं. त्या जगात रोज नव्या माणसांची ये जा होती. पण डोक्यातून दमयंती जाईना. तिने असं टोकाचं पाऊल का उचललं असेल? या प्रश्नाभोवती मी पुन्हा फिरू लागलो. या प्रश्नानच मला आतून पोखरायला सुरवात केली. तिचा माझा या क्षणी तसा काही एक सबंध नव्हता. ती फक्त माझ्या आत्याच्या गावची. एक बालमैत्रीण. तिचा वाडा शेजारी असल्यानं लहानपणी आम्ही एकत्र खेळायचो. या व्यतिरिक्त तिचा आणि माझा काहीएक संबंध नसताना मी अस्वथ का झालोय? हेच मला कळेना. 

चार दिवस उलटले. दमयंतीने असं का केलं असेल? या मुख्य प्रश्नातून मला माझी सोडवणूक करून घ्यायची होती. नोकरी लागल्यानंतर माझंच गाव सुटलं होतं. तिथं पळसगावला जाणं कुठलं? यावेळी मात्र मी पळसगावला निघालो होतो. पोहचे पर्यंत दुपार झालेली. गावातली एस.टी चुकल्याने फाट्यावर उतरून चालू लागलो. लांबून गाव पूर्वीसारखंच दिसू लागलं. पण जवळ येईल तसं बदलतानाही दिसत होतं. मारुतीच्या देवळावरचा मोठा कळस इतक्या लांबूनही स्पष्ट दिसत होता. गावाकडून कारखान्याच्या दिशेने ऊसाने भरलेला एक ट्रक्टर आपल्याच तालात घुरघुरत चालला होता. शेतीतून बैल जवळ जवळ हद्दपार होत असताना लांब माळावर एक चार बैलांचा नांगर चाललेला दिसला. बरं वाटलं. नदीच्या पुलाजवळ आलो. वाहणारं सगळं हिरवं गार पाणी. धरणातून सोडलेलं. चार दोन बायका खडकावर धुणी आपटत होत्या. नागडी तीन पोरं पाण्यात उड्या घेत होती. याच पुलावरून लहानपणी सुट्टीला आल्यावर कितीतरी उड्या मारलेल्या. डगरट चढून देवळपाशी आलो. तीन चार म्हातारी उघडी होऊन देवळात पडलेली. बाहेरच्या पायऱ्यांवर दोन कुत्री धापा टाकत पेंगुळलेली. देवळाच्या पटांगणात कोणीतरी भल्या मोठ्या ताडपदरीवर उन्हात ज्वारी वाळत घातलेली. इतक्या वर्षानंतर उमाजीरावांच्या वाड्यासमोर आलो. थबकलोच. काळानुसार वाड्याची बरीच पडझड झालेली. वाड्याचं ते रूप, पूर्वीचं वैभव, गाण्यांचा निघणारा नादमधुर आवाज, सारं काही लयाला गेल्याच्या खुणा स्पष्ट जाणवत होत्या. 

आत्या उन्हाची मुटका घालून सोफ्याला पडलेली. मी दिसताच धरपडत उठली. तिचं थकलेलं शरीर स्पष्ट जाणवत होतं. म्हणाली, "असा ऊन करून अचानकच कसा रं आलास!" भिजलेल्या मानेवरचा रुमालाने घाम पुसत मी म्हंटल, "सुट्टी आहे, म्हंटल बरीच वर्षे तुझी गाठभेट नाही! यावं जाऊन!" “बरं झालं बाबा!” म्हणत आत्यानं सोफ्यात मांडलेल्या माठातल्या पाण्याचा लिंबू पिळून तांब्यात घुसळून घुसळून सरबत केला. जरा मोकळं वाटलं. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. मी ज्या उद्देशाने आलो होतो त्या विषयाला हात घातला. दमयंती आता कुठे असते? तिचं लग्न झालं का? तिच्याविषयी वेगळंच काही आयकायला मिळतय? खरंय का? असे एका दमात तीन चार प्रश्न विचारून मी मोकळा झालो. मला आत्यानी सांगितलं, "तुझं कालच वत्सलाबाईनं नाव काढलंवतं! गावाकडं आला तर हिकडं बोलवून घ्या म्हणून! त्येच्याकडं लई मोठं काम हाय म्हणून! उमाजीराव मेल्यापासनं लई वनवास आलं बघ वाड्याला.! उमाजीरावच्या पहिल्या बायकोच्या मुलांनी वत्सलाबाईला एक जमिनीचा तुकडा आणि अर्धा वाडा दिलाय! बाकी सगळं त्यांनी यिकून टाकलं! हिचं दिवस मस्त चांगलं गेलं कडव. पण पोरीचं अडलंय न्हवं! आता कितीबी झालं तरी उमाजीरावानं नायकीन ठेवली ती दहा गावात माहिती हाय! तेच टेन्शन पोरीला! बरच काय काय घडलं बघ! गुदस्ता पोरीच्या आयुष्यात!” 

दिवस मावळतीकडे निघालेला. मी वाड्यापाशी गेलो. साऱ्या अंगणाची आता रया निघून गेलेली. वत्सलाबाई दळण निवडत दिवाणखाण्यात बसल्या होत्या. मला बघताच लगबगीने उठल्या. मी जुन्या लाकडी माचव्यावर बसलो. पाणी प्यायल्यावर इकडचे तिकडचे बोलत राहिलो. पलीकडे दमयंती झोपलेली. आमच्या बोलण्याच्या आवाजाने पस्तीशी ओलांडून गेलेली दमयंती डोळे चोळत उठली. मला पाहून तिने हसण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पण ते हास्य मला जुन्या दमयंतीचं वाटलं नाही. लहानपणी लपाछपीच्या डावात खेळताना राज्य जिंकल्यावर वाड्यात बेभान होऊन केलेले ते हास्य वाटलं नाही. आयुष्यात मी कधीच हरणार नाही हे लहानपणी ओरडून सांगणाऱ्या दमयंतीचं ते हास्य वाटलं नाही. आहो जाहो करत "कधी आलात?" एवढंच म्हणत ती आतल्या खोलीत निघून गेली. 

सायंकाळ होत आलेली. डोक्यात साठलेलं बरच काही मी बोलता बोलता बाहेर काढलेलं. मी चहा घेतला. वत्सलाबाईंची आतल्या आत चाललेली घालमेल मला जाणवत होती. जायला निघालो. वत्सलाबाईनी आतून गुंडाळी केलेला एक कागद आणला. माझ्या हातात देत त्या म्हणाल्या, "मी या घरात आल्यावर उमाजीरावांशी बायकोसारखी राहिले. त्यांचा संसार केला. त्यांच्याकडून मला दमयंती मिळाली. त्यांची मुलगी म्हणून ती वाढली. शिकली. पण खाणदानी कुळातल्या माणसाची बायको म्हणून राहूनसुद्धा शहान्नव कुळीवाळी अजून आम्हाला स्वीकारत नाहीत. तू शिकला सवरला आहेस! सांग यात माझ्या पोरीची काय चुकी? या सगळ्याला वैतागून ती आता लगीनच करायचं नाय म्हणतेय! पण आपल्या लेकीचं असं वाळवण झालेलं कुठल्या आईला सोसल. निराशेत तिने औषध पिण्याचं प्रयत्न केलाय. बघ! आता तूच आमची शेवटची आशा उरलास! 

वत्सलाबाई तिच्या जागी बरोबर होती. तिचा उमाजीरावावर जीव जडला असेल. ती त्यांच्यासोबत राहिली. तिला या वाड्यात स्वतःचा वंश वाढवायचा होता. तिने तो वाढवला. तिला दमयंतीच्या नावापुढे उमाजीरावांचं नाव लावायचं असेल. तिने ते लावलं. तिला उमाजीरावांच्या प्रॉपर्टीत कसलाही रस नसेल. तिने त्यांच्या दोन्ही मुलांना ती देऊनही टाकली. तरीही नात्यांच्या बाजारातली हि नवीन दुःखे यांच्याच नशीबी का? मी डोळे मिटले. तर डोळ्यात वाडाच कोसळतोय असा भास. पाठमोरा झालो. चालू लागलो. आतून वत्सलाबाईंच्या बोलण्याचा आवाज कानी पडला. त्या दमयंतीला म्हणत होत्या, "उठ बाळा! रडू नकोस! ते बघ तुझा लहानपणीचा दोस्त शहराकडे निघालाय! तुझ्या लग्नाचा बायोडाटा घेऊन...! 

#ज्ञानदेवपोळ
Photo: thealternative.

No comments:

Post a Comment