Showing posts with label साहित्यिक. Show all posts
Showing posts with label साहित्यिक. Show all posts

Monday, October 1, 2018

गोष्ट एका कुहूची...

माझे फायदे सगळे करून घेतले त्यानं. आजही करून घेतोय. माझं ऑफिस म्हणजे प्रसिद्धीखातं. तिथं सरसकट माझं नाव वापरून कामं करून घ्यायची. पुन्हा तुमच्या खात्यातल्या लोकांना दारू पाजावी लागते म्हणून ऐकवायचं. कधीकधी इतका संताप होतो ना…खूप शिव्या घालाव्या वाटतात. माझी आजी द्यायची तशा इरसाल शिव्या. पण जमत नाही. वाटतं, की जर अडाणीच राहिले असते अन् नवर्‍यानं असं वागवलं असतं ना, तर सरळ फारकत घेऊन मोकळी झाली असते. सुखानं एकटी राहिले असते, नाहीतर दुसर्याशी पाट लावला असता. पण आता ? आता असं करून कसं चालेल ? मी शिकलेली आहे. सुसंस्कृत आहे. मध्यमवर्गीय नोकरदार बाई आहे. आज माझी प्रतिष्ठा निराळी आहे. मला असं काही कसं करता येईल ? शिकणं, सुसंस्कृत होणं; या गोष्टीचे परिणाम असे होणार असतील…आपण अधिक भेकड, अधिक भाकड होणार असू…तर खरंच पुनर्विचार केला पाहिजे ना अशा गोष्टींचा…

हा प्यारेग्राफ आहे एका प्रसिद्ध लेखिकेच्या ब्र या कादंबरीतील. एक महिला सरपंच आणि तिच्या आयुष्यवर भाष्य करणारा. जेव्हा जेव्हा हा वाचला जाईल तेव्हा तेव्हा तो चेहरा डोळ्यासमोर येईल. आणि तो चेहरा असेल ब्र, भिन्न, कुहू, रजईच्या लेखिका Kavita Mahajan ताई यांचा. ताईंची अशी अकाली एक्झिट? विश्वासच बसत नाही अजून. अजून वाटतं हे स्वप्न असावं. खोटं खोटं पडलेलं. सारं आयुष्य साहित्य क्षेत्राला वाहून घेतलेली ही लेखिका अशी कशी काय सोडून जाऊ शकते? त्या पुण्यात आल्यानंतर त्यांना भेटायचं मनोमन ठरवलं होतं.

काही दिवसांपूर्वीच त्या कर्वे नगरला वसईहुन नव्या घरी शिफ्ट झाल्या होत्या. जणू काळच त्यांना वैकुंट भूमीत घेऊन येत असेल याची कल्पनाहि त्यांना नसावी. या काळात झालेली दगदग, त्रास त्यांच्या तब्बेतीला सहन झाला नाही असेच म्हणावे लागेल. किरकोळ दुखण्याने त्या अशा अकाली जातील असे कोणालाही वाटले नाही. वसईहून निघताना त्यांना कोणीतरी म्हणालं होतं तिकडे आता परमनंटच जाणार का? तेव्हा त्या म्हणाल्या होत्या. काय असतं हे परमनंट जाणं? मला तर अख्ख्या पृथ्वीवरच उपरं उपरं वाटत आलंय. सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या ताई सप्टेंबर महिन्यातच गेल्या. त्यांचा जन्म आणि मृत्यू हा एकाच महिन्यात नियतीने का लिहिला असेल?

त्यांनी संपादित केलेल्या आदिवासी लोकगीतांना साहित्य अकादमी सुद्धा मिळाला. ग्राफिटी वॉल, ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम, ब्र हि कादंबरी रसिकांनी उचलून डोक्यावर घेतली. त्यांनी अनेक पुस्तकांच्या संपादना बरोबरच बकरीचं पिल्लू, जंगल गोष्टी इत्यादी बाल कथासंग्रह, लेखसंग्रह, मृगजळीचा मासा, धुळीचा आवाज इत्यादी कविता लेखन आणि जोयनाचे रंग, पूल नसलेली नदी इत्यादी कथासंग्रह लेखनही केलं. त्यांचा घुमक्कडी हा ब्लॉग विशेष वाचनीय ठरला. मराठी साहित्याला साता समुद्रापार पोहचवणाऱ्या या लढवय्या लेखिकीच्या अशा अकाली जाण्याने साहित्य क्षेत्राचं खूप मोठं नुकसान झालय. त्यांचे कित्येक संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर होते.

एबीपी माझाचा ब्लॉग माझा पुरस्कार मिळाला तेव्हा कविताताई परीक्षक म्हणून होत्या. त्यांनी लिखाणाबाबत अनेक सूचना केल्या होत्या. त्या सातत्याने लेखनात आणण्याचा मनोमन प्रयत्न चालू होता. या साऱ्यांच्या आता फक्त आठवणी झाल्यात.

त्यांच्यात भाषेत सांगायचं तर मुसळधार पावसाचे आवाज ऐकत मी शांत बसून आहे. मन अशावेळी रिकामं असावं आणि एकही अक्षर ऐकू येऊ नये असं वाटतं. दरड कोसळत राहावी कितीतरी वेळ आणि राडा व्हावा जे खाली सापडेल त्याचा. एक उबदार कुस हवी वाटतेय. माझ्या मऊ टेडीबीअरला जवळ घेऊन मी खिडकीबाहेरचा काळोख बघत बसतेय. प्रत्येक झाडावर वेगळा वाजतोय पाऊस, दगडावर-खडकावर वेगळा, घराच्या प्रत्येक छतावर वेगळा, समुद्राच्या अथांग पाण्यावर वेगळा आणि माझ्या पापण्यांवर वेगळा.

खरंय ताई सगळ्यांच्या पापण्यांवर असा वेगळा पाऊस पाडून तुम्ही निघून गेलात. दूरच्या प्रवासाला. कधीही न परतण्यासाठी. काही दिवसापूर्वीच तुम्ही म्हणाला होतात, "माणसं गेली की, उत्सुकतेने ढीगभर काव्यात्मक श्रद्धांजल्या वाहणारे आपण. हयात असलेल्या व्यक्तींसाठी आपल्याला वेळ असतो का?’ खरंय ताई.

शेवटी क्षणाचाही भरोसा नसलेल्या भयाण जगात वावरत असताना एका वळणावर आज नियतीने तुमचा श्वास थांबवला. मराठी साहित्यातील एक लढवय्या बंड शमलं. अखेर स्त्री साहित्याला नवी दिशा दाखवून स्वतःच्या दिशाला (लेकीला) तुम्ही घरात एकटी एकटी मागे ठेवून गेलात. नाहीतर कामवाल्या बाईला वसईहून निघताना तुम्ही म्हणाला होतातच. मी मेले की दिशाला पुस्तकांचा पसारा आवरायला किती त्रास होईल गं. तो त्रास इतक्या लवकर तुम्ही तिला द्याला असं स्वप्नातही वाटलं नव्हतं...

©ज्ञानदेव पोळ


Monday, December 19, 2016

आनंद यादव

तुम्ही जर "झोंबी, नांगरणी, घरभिंती आणि काचवेल" ही आत्मचरित्रात्मक पुस्तके वाचली असतील तर आनंद यादव यांना बालपणापासून किती कष्ट, दुःख, हालपेष्टा सहन कराव्या लागल्या याची कल्पना येईल. आनंद यादव हे नाव मिळवण्यासाठी त्यांना कितीतरी दिव्यातून जावं लागलं. तरीही त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन कोल्हापूर आणि नंतर पुणे येथून आपले शिक्षण पूर्ण केले. आकाशवाणीवरही ते काही काळ होते. पुणे विद्यापीठात ते मराठी विभाग प्रमुख असताना निवृत्त झाले. लिखानातूनही त्यांनी मागच्या दोन तीन वर्षापासून माघार घेतली होती. साहित्य अकादमी सारखा पुरस्कार त्यांच्या "झोंबीस" मिळाला, त्यांच्या आयुष्यातला शिक्षणासाठी त्यांनी केलेला संघर्ष म्हणजे ही आत्मचरित्रात्मक कादंबरी.
त्यांनी "खळाळ, घरजावई, माळावरची मैना" असे कथासंग्रह लिहिले तर "गोतावळा,नटरंग" यासारख्या प्रसिद्ध कादंबऱ्याही लिहिल्या. त्यांच्या नटरंग वर निघालेला चित्रपटही खुप गाजला.
दरिद्री, अज्ञानी, ग्रामीण कुटुंबाचे, भीषण दारिद्र्याचे वास्तव दर्शन त्यांच्या साहित्यातून दिसून येते. आपला गाव, गावातील रितीरिवाज, निसर्ग, तिथल्या माणसांचे स्वभाव, तर्हा, गावातले उरूस, जत्रा, गांधीवधानंतर झालेली स्थिती. अशा अनेक गोष्टींचे वास्तव चित्रण त्यांनी आपल्या पुस्तकातून उभे केले आहे.
व्यक्तिचित्रे, काव्यसंग्रह, ललित, वैचारिक लेख, समीक्षा ग्रंथ अशी सुमारे ४०हून अधिक पुस्तके त्यांनी लिहिली. संत तुकाराम हे त्यांचे पुस्तक वादग्रस्त ठरले पुढे येथुनच त्यांची लेखनी थांबली.
आमचे भाग्य की आम्हाला या लेखकाचा सहवास लाभला त्यांच्यापासून काही अंतरावरच राहत असल्यामुळे खुप वेळा ते सकाळी फिरायला जाताना दिसायचे. मैदानात क्रिकेट खेळणाऱ्या मुलांकडे कोपर्यात उभे राहून एकटक कसलेतरी निरीक्षण करतानाही दिसायचे. एक दोन वेळ त्यांच्याशी चहा पिणे सुद्धा घडून आले. अपुलकिने विचारपुस करायचे. ना गर्व होता ना साहित्यिक असल्याचा अभिमान. अत्यंत साधी राहणी. चेहऱ्यावर सतत हास्य. असे हे कागल मधून पूण्यनगरीत स्थायिक झालेले, जन्मजात ग्रामीण वारसा मिळालेले व्यक्तीमत्व होते. त्यांच्या निधनाची बातमी येताच धावत त्यांच्या "भूमी" बंगल्यावर जावून शेवटचं दर्शनही घेवून आलो.
शेवटी,
ज्या साहित्यिकामुळेच आम्ही लिहायला, वाचायला आणि साहित्य जगायलाही शिकलो. तो "झोंबी"कार आपल्यातून 30 नोव्हेंबरचा वाढदिवस साजरा करण्यासाठी काही तासच शिल्लक असताना काळाच्या पडदयाआड कायमचा निघून गेला...