Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

Monday, January 29, 2018

“मध्यरात्री पेटवलेली प्रेयसी…”

कित्येक वर्षानंतरही तुझ्या आठवणी
बंद खिडक्यांच्या फटीमधून शिरून
भयान रात्री माझ्या मेंदूला
छळू लागल्या तेव्हा मात्र
मी पेटून उठलो...

अखेर तुझ्या आठवणींचा खून करायचा
मी कठोर निर्णय घेतला.
मग तुला कोंबून बसवलेली अडगळीतली
जुनी ट्रंक मी बाहेर काढली
मध्यरात्री सुनसान झालेल्या रस्त्यावर आलो
तर लुटून नेल्यागत शहर गप्पगार पडलेलं...

आकाशाकडे पाहिलं तर
चांदण्यांनी चक्क डोळे ओठारले
पळणाऱ्या झिपऱ्या ढगांना
मला पाहून हसू फुटलं
मी पुन्हा प्रचंड चिडलो...

काठोकाट भरलेली तुझ्या आठवणींची ट्रंक
रस्त्यावर एका क्षणात मी विस्कटून दिली
तू दिलेली प्रेमपत्रं, भेटवस्तू आणि
तुझ्या कवितांचे विखुरलेले कागद
या साऱ्यांची मिळून एक चिता रचली रस्त्यावर.

होळीच्या ढिगात ऊसाचे कांडके उभे करावे
तशी तुझ्या तसबिरीला त्या चितेवर मध्यभागी उभी केली
काडेपेटी काढली आणि त्या मध्यरात्री
मी तुला भर रस्त्यावर धडाधडा पेटवून दिली...

तडातडा जळणाऱ्या तुझ्या चितेची उब घेता-घेता
अर्धवट जळालेल्या कागदाच्या एका तुकड्यावर
नजर येऊन पडली
आणि तेथेच मी अडकलो...
त्यात तू लिहलं होतंस,
"निदान आता जाळलेल्या आठवणींचं श्राद्धतरी
पुन्हा घालू नकोस
नाहीतर आणखी गुंतून जाशील,
आणि नव्याने जळत राहशील

वर्षानुवर्षे....पुन्हा पुन्हा..."

© ज्ञानदेव पोळ


Monday, January 1, 2018

जात्यात भरडलेला खंडेराव

खंडेराव खरं सांग...
तू ज्या उन्मादात रात्री दारूचे चार घोट
नरड्यात ओतून शहरातल्या रस्त्या रस्त्यांवरुन
नाचत होतास, बैलासारखा उधळत होतास
ते नाच गानं खरोखरचं होतं का?
खरं सांग खंडेराव...
रात्री पॅन्ट गळेपर्यंत पोरा पोरीत नाचताना
दूर गावाकडे तुझ्या माळरानातल्या शेताला
तुरीच्या शेंगाच लागल्या नाहीत
हि वेदना तुला आतून छळत होती कि नाही?
खंडेराव खरं सांग...
रात्री एफ सी रोडवर फुगे हवेत सोडताना
एखांद्या क्षणी शेतातला बोंड आळ्यानी
चिंध्यासारखा जागोजागी पोखरलेला कापूस
तुला मध्येच उडताना दिसला कि नाही?
खरं सांग खंडेराव...
रात्री व्हिस्कीचा ठसका लागल्यावर
दम्याने दिवसरात्र खोकणारा गावाकडचा मोडका बाप
आणि वेफर्स घशात विरघळताना,
वाळक्या भाकरी फोडणारी तुझी तुटकी आई
तुला शहरातल्या भर गर्दीत अंधारात दिसली कि नाही?
लपवू नकोस आतलं खंडेराव, खरं सांग...
तू जे देहभान हरवून नागासारखा रात्री फणा काढून डुलत होतास
उधळत होतास, उसना आव आणून मध्येच गर्जत होतास,
तेव्हा पस्तीशी गाठूनही
दुनियेतला एकही बाप तुझ्या गळ्यात पोरगी बांधेना,
हि आतली वेदना अंगावर घेऊनच
तू खोट्या उड्या मारल्यास कि नाहीस?
खंडेराव...
हि वर्षे बिर्षे तुझ्यासाठी कधीच बदलत नसतात
इथल्या व्यवस्थेचा आर्थिक गाडा चालवण्यासाठी
पळविलेली हि नुसती कॅलेंडरवरची पाने असतात.
मात्र तू,
वरीसभर साठणारी तुझ्या मेंदूतली “समृद्ध दु:खांची अडगळ”
अशी वर्षाच्या अखेरीस इथल्या रस्त्या रस्त्यांवर
सांडून रिकामा होत जातोस,
आणि जुन्यातून पुन्हा नव्यात घुसत राहतोस
इतकच...

#ज्ञानदेवपोळ

Tuesday, May 16, 2017

पावसा पावसा...

पावसा पावसा... 
नुसताच गरजू नकोस 
हंडग्यासारखा... 
येणारच असशील तर पूर्वीसारखा आरडत ये 
विजांचा कडकडाट करीत ये 
झाडं पाडीत ये 
माती उडवीत ये 
थांबू नकोस एवढ्यावरच 
उडवून टाक घरावरचा पत्रा 
चुलीवरच्या आमटीत ढासळ 
चुलीपुढच्या म्हातारीच्या डोसक्यात 
उडालेली दगडं पाड 
बाहेरच्या गोट्यावर ढासळ 
विजा पाडून म्हसरं मार 
भिताडाना बंदिस्त ठेवू नकोस आता 
तुझ्या मुताच्या प्रचंड धारा सोडून दे 
करून टाक भिंतींची डिलिव्हरी 
होऊदे एखादाचं मोकळं त्यांना 
तुला हात जोडणारी 
आतली म्हातारी संपव 
खंगलेला म्हातारा विझव 
ओली बाळंतीण गाडून टाक 
तिच्या तान्हुल्याला पुरून जा 
पावसा पावसा... नुसताच गरजू नकोस 
हंडग्यासारखा... 
चांगला आरडत ये 
विजांचा कडकडाट करीत ये 
येणारच असशील 
तर पूर्वीसारखा ये...

Friday, May 5, 2017

अतृप्त आत्मे

कावळ्याला कधी पहिलय का?
चिमणीवर बलात्कार करताना
 “नाही?’
गरुडानं लांडोरीला भोगताना पाहिलंय का?
“नाही?’
मग बैलाला तरी
म्हशीवर उडताना पाहिलय का?
का ते ही नाही?
निदान रेड्याला शेळीवर चढताना तरी
पहिले असेलच की?
काय म्हणालात!
“नाही पाहिलं?”
....आहो,
जनावरांना सुद्धा असत
संभोगाचं भान
म्हणूनच राहतात एकनिष्ठ
आपल्याशी मंडवळ्या बांधलेल्या मादीशी
पण,
कावळा चिमणीची गोष्ट न शिकलेल्या
चिमुकल्या पोरीपासून ते
म्हाताऱ्या बाया पर्यंत
रेप करत सुटलेल्या
माणसातल्या वासनांध अतृप्त आत्म्यांना
का कळत नसावं
संभोगाचं गणित?




Monday, April 17, 2017

प्रिये...

मी सरकारी दवाखाण्यात नवसाने जन्मलेला गोंडस बाळ प्रिये...
तू आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या गोट्यात
त्याच्या कुत्र्या मांजरासोबत व्यालेल्या बायकोच्या लुगड्यात लपेटलेली अभागी लेक तू प्रिये...
मी डांबरी रस्त्यावरच्या शाळेत शिकलेला स्मार्ट बॉय प्रिये...
तू वस्तीवरच्या एक शिक्षकी शाळेत उघड्या बंब भावंडाना खेळवत
खोटी स्वप्ने पाहिलेली करंटी तू प्रिये...
मी शहरातल्या कॉलेजात चमकलेला हिरो मी प्रिये...
तू गावाकडच्या बिनरंगाच्या ईमारतीत साध्या कपड्यात अंग लपेटून
पाळीचं पाणी चिंध्या बांधून अडवलेल्या दरिद्री घरची तू प्रिये...
मी सहावा आयोग भोगून सातवा येत नाही म्हणून
दुनियेला लुबाडणारा आदर्श एप्लॉयी मी प्रिये...
तू वर्षानुवर्षे कांदे पोह्याच्या प्लेटा धुवून हुंड्यासाठी विहिरीत झोकून देणारी
एका अभागी आई बापाचं काळीज तू प्रिये...
तुझ्या दारिद्र्यावर शब्दांचे खेळ खेळून
गांडीला लेखक नावाचं लेबल लावू पाहणारा पांढरपेशी मी प्रिये...
तू इथल्या माध्यमांना आणि विद्वानांना आठ दिवसांचं खाद्य पुरवून
स्मशानात विझून गेलेल्या चितेची राख तू प्रिये... 


फोटो सौजन्य: देशदूत

Saturday, April 15, 2017

पान गळती



जुन्यातला खाशा म्हातारा मेला तेव्हा
स्मशानात फसफस करून
काही क्षणात जळून गेलेला
त्याचा मेंदू पाहून
त्या रात्री मी प्रचंड अस्वस्थ झालो
लाकडाच्या ढिगाखाली
कित्येक नव्या जुन्या आठवणी सोबत
जळणारा त्याचा मेंदू पाहून
निषेध केला मी
सबंध पृथ्वीतलावरच्या
भिकार तंत्रज्ञानाचा.
त्याच्या मेंदूचं मेमरी कार्ड बनवून
जुन्या आठवणी विकणारं दुकान
या देशात अजून कुणी उघडलंच नाही.
न्हवे,
डोक्यावर बांधलेल्या मंडवळ्या
सुटायच्या आधीच नवरा मेल्यावर
त्याच्या अश्या कोणत्या आठवणीवर
हौसा म्हातारी सत्तर वर्षे नांदली
मला माहित नाही
इथल्या गावगाडयातल्या पिढ्यानाही
ते माहित नाही
पण आयुष्यभर पुरुष स्पर्श न झालेला
तिचा देह तडतड जळाला
तेव्हा तिचं म्हातारपणा पर्यंत
तरुण राहिलेलं जिवंत गर्भाशय काढून
एखादया चौकात
कोल्ड स्टोरेज उभारून
नव्या वासनांध पिढ्याना
त्याची सोशिकता दाखवता आली असती तर...
अरे,
क्षणा क्षणाला आता इथल्या स्क्रीनवर
बाईला मुतताना, भोगताना, कापताना दाखवणाऱ्या
समस्त विश्वातल्या भिकारचोट तंत्रज्ञानानो
तुम्हाला खरी झेप अजून
घेता आलीच नाही
धिक्कार करतो मी तुमचा...

Friday, January 20, 2017

कस्तुरीचा सुगंध.........


कस्तुरीचा  सुगंध शोधणा-या
त्या हरिणीसारखी माझी अवस्था झालीय !
कस्तुरी आपल्याच जवळ आहे,
हे तिला तरी कुठे माहित असते,
मी जीवनाच्या सरहद्दीवर
डोळे मिटून पडले आहे,
ह्दयाचा दगड बनविते आहे,
पण................
माझं कुणीतरी आहे
माझ्या बरोबर " तू " आहेस
माझ्या दुखाची तुला जाणीव आहे
हा एवढा विश्वास ठेवला ना ?
तरी बरीच दुखे कमी होतात बघ.
कधी कधी वाटतं........... 
तु माझ्यावरती सावली धरून उभा आहेस !
स्वत: उन्हात तळपत !
संभाळून राहा ?
आभ्यास कर ?
वाचन कर ?
.....घाई करू नकोस ?
एक ना दोन हजार सूचना देतोस ?
त्या आनंदात मी आभाळभर पसरते,
पाना फुलातून पुन्हा फुलते,
ढग होऊन पुन्हा बरसते.
किती आवडतात म्हणून सांगू तुझ्या कविता ?
पण,
त्या समजून घ्यायच्या तर,
धरती आकाशाशी आपलं नातं असावं लागतं !!
तु आता तनामनात,
आचार विचारात,
घट्ट रुजला आहेस !
खरच !
तु माझा होशील ?
बघ ! तीनच शब्द
पण,
सुंदरतेची साक्ष देणारे
किती ताकद असते नाही शब्दात ?
" हो विसरलेच ...........
परवा तू स्वप्नात आलास ..........
म्हणालास....... 
चल माझ्याबरोबर.........
मी तुझा आहे कि नाही दाखवितो !!
दूर आकाशात घेवून गेलास,
अगदी चांदण्याच्या जवळ........
आणि पटकन माझं एक चुंबन............"
खरी होतात का रे ! स्वप्ने ?
उतरतात का रे ! सत्यात ?
की अखेर ती स्वप्नेच ठरतात ?
कधी कधी असं सुद्धा वाटतं रे !
तू जीवनातून कायमचा निघून गेलास तर.......
पण,
अशी कल्पना सुद्धा करवत नाही रे !!
खरं सांगू ,
अशीच बालपणापासून मी वाढत आले...........
नातेबंध काय असू शकतात
मला माहीतच नव्हते रे !
अशीच एक बालपणीची गम्मत आठवतेय...


" अंगणात खेळायची मी

पावसात भिजायची मी,

मातीत खेळले की,

आई तेव्हा रागवायची,

संपले बालपण माझे.....

गेले दूर तेव्हाचे सवंगडी..........."


अशीच मी मोठी झाले !!!

आता ,

तुझ्या येण्यानं खरं अर्थ समजला.

आठवतय,

" अलीकडे खूप हुशार झालीस,

ज्ञान वाढतंय ! " तू म्हणालास.

" का नाही ? तूच तर देतोस,

भरभरून.......
पण,
अजून खूप कळले नाही रे ! " मी म्हणाले.
खरच !
तुला कसे सुचतात रे ! असले शब्द ?
मनाला वेड लावणारे !
काळजाचा छेद घेणारे !
धुंद बाग फुलविणारे !
आत्ता,
तुझ्या शब्दांनीच मला,
वेड लागण्याची वेळ आलीय !
वेडी होईन रे मी ?
तुझे शब्द माझ्यापासून दूर गेल्यावर.........
" हो ,
तुला कळतंय का बघ ?
बहुतेक कळणार नाहीच ?
पुरुष ना तू ?
काही अनुभव फक्त स्त्रियांचे असतात ?
.......जवळ येणं किती सोपं असतं....
पण दूर जाणं..........
त्यासारखं दुसरं दु:ख नाही जगात,
म्हणून ,
त्या दिवशी माझ्या आश्रुना बांध........"
मनुष्य प्रेम लाथाडील,
पण, विसरू शकेल का ?
माणूस आशेवर जगतो नाही का ?
मग,
ती कितीही निराधार असो !
माणूस स्वप्नावर जगतो
मग,
ती कितीही असंभवनीय असो !
सुगंध नसूनही अबोली,
सदा हसतमुखच राहते ना ?
धुके कितीही सुंदर असले तरी
ते विरून जातेच ना ?
खरं सांगू ,
वेलीला काही,
फुललेलं फुल लागत नाही !
पहिल्यांदा कळी येते..........
पानाआड लपणारी.......
कुणाला न दिसणारी........
लाजेनं मनातल्या मनात चूर होणारी......!!
म्हणून,
" प्रेम हे यौवनाच्या वेलीवरच फुल आहे "
समुद्र शिंपल्यात घालून,
कुणाला दाखविता येईल का ?
फुलांचे चित्र काढून,
त्याचा सुगंध कुणाला देता येईल का ?
माझी प्रीती अशीच आहे रे !
पण.......
तुझ्याशिवाय मी अपुरी आहे,
वेलींची पाने सुंदर असली तरी,
फुलांशिवाय शोभा नाही तिला ?
खरं सांगू ,
जीवनात दिरंगाई नको,
घाईच बरी ?
प्रेमाच्या राज्यात घाईच बरी !!
प्रेमाची फुले,
पटकन टिपावी,
वेचावी,
पुन्हा मिळतील न मिळतील ?
" वसंत ऋतू " का नेहमी राहतो ?
तू जवळ आहेस तरी मी फारशी बोलत नाही,
पण,
" चंद्राचा प्रकाश सूर्यावर अवलंबून .....
समुद्राचं उंचबाळन चंद्रावर अवलंबून .....
तसं,
माझं सारं आयुष्य तुझ्यावर........."
कधी कधी वाटतं,
" तू " एक आहेस का दोन ?
 दिवसा जो " तू " समोर असतोस,
त्याच्यात विशेष काही वाटत नाही रे !
अगदी साधा असतोस !
बोलतोस साधाच !
पण...........
शब्दातून जेव्हा तु भेठतोस ना ?
रात्रीच्या एकांतात....!
तेव्हा,
तुझे शब्दच जवळचे वाटतात,
तुझ्यापेक्षाही......!!!
छे रे ! किती वेडी आहे बघ मी !
शेवटी,
तुझं अस्तित्व एकच ना ?
पण, एक मात्र नक्की सांगेन .....
".......केवळ उपभोग म्हणजे जीवन ?
छे !  जीवनात समर्पण हवे,
कुणासाठी तरी त्याग हवा,
घेण्यापेक्षाही,
देण्याचा आनंद अधिक असावा,
काय घ्यायचे आपण ?
काय घेवून आलोय आपण ?
म्हणून,
देण्यात एक पावित्र आहे,
देणे म्हणजे कस्तुरीचा सुगंध आहे......."
आता खरेच सांगते,
निशब्ध होवून आपले विचार
समोरच्याला कळतील का ?
सूर्यात आग आहे,
चंद्राला डाग आहे,
समुद्राचं पाणी खार आहे,
पण................
नवे डोळे घेवून,
पुढच्या आयुष्याकडे,
पाहता येत नाही अजून ?
तुझी मागे उरणारी सोबत,
म्हणजे " तु "  होऊ शकत नाहीस ?
आपलं नातं फक्त जुळलंय.........!
वाढेल का रे ! कधी.............!
आता,
त्याला फुले यावीत !
असच काहीसं वाटतंय.......
माझ्या आठवणीच्या स्मरणकेंद्रातून,
तु कधीच जाणार नाहीस...
मी जावूसुद्धा देणार नाही.......?
शेवटी.........,
तुझ्यासाठी मनाची दारे,
आता उघडी केलीत,
काही चोरवाटासुद्धा ठेवल्याहेत,
फक्त तुलाच पोहचण्यासाठी......!
तु यावस म्हणून,
माझे श्वास थांबलेत.........!
तुझ्याच वाटेकडे डोळे लागलेत........!
निघशील ना रे ! प्रवासाला ......
न संपणा-या ...........!!!
अजूनही तु जवळ येशील ?
एवढीच आशा जिवंत आहे............!!! "



-------------*------------*---------------