Showing posts with label शहरातल्या गोष्टी. Show all posts
Showing posts with label शहरातल्या गोष्टी. Show all posts

Tuesday, June 6, 2017

भेट


गावचा वाडा विकल्यापासून तू कधी दिसलीच नाहीस. मात्र बऱ्याच वर्षांनंतर काल स्टेशनवर दिसलीस. नुसतीच हताशपणे पहात होतीस. कदाचित तुला ओळख लपवायची असावी आता. मीच तुझ्या जवळ आलो. कुठे असतेस म्हंटल्यावर तू म्हणालीस, “अंगण नसलेल्या घरात बंदीस्त असते!” मी म्हंटलं, “गेला नाही का राग अजून!” मला थांबवत माझ्या नजरेत नजर देऊन तू म्हणालीस, “तुला फक्त नाती जुळवनं जमलं! ते वाढवनं नाही जमलं रे! मी शांत राहिलो. तुझ्या नजरेला नजर देणं मला जमत नव्हतं. पण तू आतून पार ढवळून निघत होतीस. सरणासारखी जळत होतीस. मला स्पष्ट कळत होतं. तुलाही तो प्रसंग टाळायचा असावा कदाचित. तू पुन्हा म्हणालीस, “तुला पोहचण्यासाठी ठेवलेल्या काळजातील चोरवाटासुद्धा आता मी लिपून टाकल्यात!...

...तुझी गाडी यायच्या आधीच तू उठलीस. जाताना तू पर्समधील एक कार्ड फेकत म्हणालीस, “शेवटच्या वेळी तरी जवळ असशील एवढी एकच आशा अजून जिवंत आहे!" तुझ्या शेवटच्या वाक्याचा अर्थ जुळवत मी कितीतरी वेळ तसाच तुला पाठमोरी जाताना पाहत उभा होतो. पुन्हा भेटशील की नाही मला माहित नाही. पण नवे डोळे घेऊन पुढच्या आयुष्याकडे मलाही पहाता येत नाही अजून! मला खूप काही सांगायचं होतं! आणि तुला थांबायचं न्हवतं!.. 




Friday, January 20, 2017

सिमेंटची शहरे...

खचाखच भरून फुगून चाललीत सिमेंटची शहरे इथल्याच माणसा माणसानी. रस्ते ओलांडेनेही मुश्किल झालय. मोटारींच्या चाकाखाली धड़ाधड़ फुटाहेत कवटीसहित डोकी, फुटलेल्या कित्येक मेंदूच्या आतल्या जीवघेण्या आठवणीसहीत रक्तामासांचा सडा वाहतोय इथल्याच रस्त्या रस्त्यांनमधुन स्वप्नांना उध्वस्त करत करत….
इथल्या इंचा इंचाच्या फूटपाथवर अंथरले आहेत हजारो निर्जीव बोगस पदार्थांचे हातगाडे आणि निघताहेत आवाज पोटातून बाहेर सुटणाऱ्या कृत्रिम हवांचे, जगताहेत अनेक उपाशी पोटे, मांडून रस्त्यांवर उघडा संसार. मरताहेत उपाशी कित्येक जीव इथल्याच शहरामधून....
वारुळातील मुंग्यासारखी भसाभसा बाहेर निघताहेत चिंबून गेलेल्या देहाची ओली माणसे मिनिटभर थांबलेल्या ईथल्याच लोकलच्या डब्या डब्यांमधुन....
भर उन्हा तान्हाचे फुलून जाताहेत इथलेच लॉज वासनेनी बरबटलेल्या लाखो प्रेम प्रकरणांनी.आणि उमलण्या आधीच मारल्या जात आहेत वासनेच्या रेघोट्या इथल्याच कित्येक छोट्या छोट्या कळ्यांनवर...
द्राक्ष संस्कृतीतुन रातोरात सोडलेले फकमी फकमीचे आवाज आता केले जात आहेत इकडून क्याप्चर हातात आलेल्या एचडी स्क्रीन मधून इथल्याच शहरातुन. रुद्राक्ष संस्कृतीला सुरुंग लावत लावत...
इथल्या चौका चौकातल्या रस्त्यांवर थांबलेल्या गाड्याभोवती खेळणी विकणारे लहान जीव संपूर्ण देहाच्या सापळ्यासहित करपून चालले आहेत अस्वस्थ वर्तमानात जगणाऱ्या इथल्याच शहरामधून. कधीही होवू लागलेत येथे आता कोपऱ्या कोपऱ्यातून स्फोठ आणि फुटताहेत शेकडो माणसं चुलीच्या विस्तवात भाजायला पुरलेल्या रताळा सारखीच....

पुन्हा तुझ्या शहरात...

पुन्हा तुझ्या शहरात आलोय. खुप वर्षानंतर... तसा मी पण इथलाच होतो. कधीतरी. इथे येताना मी पण बरोबर घेवून आलो होतो सोबत स्वप्नाना. पण आतल्या लाटांनी मला बाहेर फेकलं. तुला आत घेतलं. बाहेर सुकत राहीलो मी. कित्येक हेलकावे खात वाहत राहिली असशील तू आत. तुझ्या शहरा सोबत पळणं नाही जमलं मला. मध्यरात्र झालीय..तुझ्या शहराच्या मध्यभागी असलेल्या एका चाळीस मजल्यांच्या टॉवरच्या टेरेस वरुन मी पाहतोय. तुझ्या फुगून गेलेल्या, अस्ताव्यस्त पसरलेल्या महाकाय रंगीन शहराकडं. दूर कोपऱ्यात तुझ्या शहरावर अंधाराची चादर धरुन उभा असेल काळ पुरुष तिकडे. त्याच पांघरलेल्या चादरेच्या आतमधुन चालले असतील कित्येक काळे धंदे तुझ्या शहरात. मला फक्त दिसताहेत दूर दूर पर्यंत पसलेल्या दिव्यांच्या रंगबेरंगी माळा. कुठून तरी खड़ खड़ करत येणारे लोकलचे आवाज. लांब पर्यंत पसरत गेलेली सिमेंटची जीवघेणी बेटं. आकाशाचे चुंबन घ्यायला आसुसलेल्या गगनचुंबी इमारती. खाली फुटपाथवर मांडलेले कित्येक उघड्यावरचे संसार. वरती लूडबुड करायला उगवलेली एक चंद्राची कोर. फक्त रात्रीलाच दिवस समजून जन्म घेतलेले कित्येक नर मादी असलेले लोक. लाखो प्रणयक्रीड़ा सुरु असतील या क्षणी तुझ्या निपचिप पडलेल्या शहरातील बंद दरवाजांच्या आत. तर हजारो तरुण माद्या विकल्या जात असतील संपूर्ण शरीरासहित तुझ्याच या शहरात... पसरलेल्या या गगनचुंबी इमारत्यामधुन... एवढ्या मोठ्या शहरात दहा बाय दहाच्या एखांद्या कोपऱ्यातील घरात तू निपचिप पडली असशील. चिलीपिली सोबत घेवून. कदाचित तुझ्या नराला झेलत..."खरच तू विटली असशील का आता संसाराला? माहीत नाही..." "गर्दीनी भरून गेलेल्या या तुझ्या शहरात ह्रदयाने जिवंत राहिली असशील का तू अजुन? माहीत नाही..." पहाटे 5.40 च्या लोकलमागं धावताना अजूनही तेच सळसळतं रक्त उरलं असेल का तुझ्या देहाच्या धमन्यामधून? का गेली असशील आटून, इथे स्वप्न घेवून आलेल्या इतर नर माद्या सारखीच? माहीत नाही..." पण कधीकाळी याच शहरात तू नात्याचं असं कोणतं 'वस्त्र' चढवुन गेलीस माझ्या अंगावर? माहित नाही..." फक्त ते उतरवू शकलो नाही अजुन मी. एवढेच मला माहीत आहे...
...तुला कवेत घेतलेल्या या शहरात परत तुलाच शोधणं आता या जन्मी तरी शक्य नाही...
म्हणून अखेरचा हा दंडवत मला बाहेर फेकुन तुला पोटात घेतलेल्या तुझ्या या शहराला...

तुझ्या शहरात

तुझ्या शहरात आलोय, वेड्यासारखा फिरतोय, हरवलेले काहीतरी शोधतोय, तू सोडून काय नाही आहे इथल्या तुझ्या शहरात... इथे कामाला सकाळी धरपडत जाणारी माणसं आहेत, राबणाऱ्या बायका आहेत, थकून सायंकाळी घराच्या ओढीने परतणारी माणसंही आहेत. गिरण्यांचे भोंगे आहेत, वाहनांचे कर्णकर्कश आवाज आहेत, लोकलचे हॉर्न आहेत, तसे धावत सुटलेल्या अँम्बुलन्सचे सायरनही आहेत. इथे जगणारी माणसं आहेत, जगून झालेली माणसं आहेत, किड्यामुंगीसारखी मरणारी माणसं आहेत, तशी नवीन जन्माला येणारी माणसंही आहेत. इथला दिवस भकास आहे, रात्री रंगीन आहेत, झगमगत्या आहेत, स्वप्नं दाखवणाऱ्या आहेत, तशा स्वप्नं मोडणाऱ्याही आहेत. इथल्या रस्त्यांवर डोळे दिपवणारा नवनवीन वस्तूंचा बाजार आहे, दुकानात मांडलेली सोन्या चांदीची झुंबरे आहेत, उघडा माणूस बाहेरून सजवायला बसलेली सुंदर सुंदर कपड्यांची दुकाने आहेत, तसाच नर माद्यांच्या विक्रीचा बाजारही इथेच आहे. इथे बाहेरच्या माणसांच्या सापळ्यांना पोटात कोंबून घेऊन खड खड धावत सापांसारख्या सुटलेल्या लोकल आहेत, आयुष्यातील जीवघेण्या समस्यांशी संघर्ष करीत चार नंबरची सीट मिळाल्यानंतर घामेघूम होऊन विसावणारी थकलेली शांत अबोल डोळ्यांची अकाली वठलेली माणसं आहेत, तशा वखवखलेल्या वासनांनी आग ओकणाऱ्या जीवघेण्या नजरानी गर्दीत वाकलेल्या एखांद्या स्त्रीचे अर्धवट दिसलेले स्तन टिपणारी वासनांध नजरही इथेच आहेत. इथे आकाशाच्या चुंबनासाठी आसुसलेल्या गगनचुंबी इमारती आहेत, खालच्या इंच इंच जमिनीवर वेड्या वाकड्या वेलीसारख्या अस्ताव्यस्त पसरलेल्या भकास झोपडपट्या आहेत, त्याच्या आत... बागडणारा शकील आहे, खेळणारी अफसाना आहे, यशोदापण आहे अन तिच्या मांडीवर खेळणारा कृष्णही आहे, पाईपलाईनवर बसून पलिकडे आंघोळ करणाऱ्या बाईवर लाईन मारणारा वाढलेल्या केसांचा जॉनीही इथेच आहे. इथे अस्ताव्यस्त पसरलेले निर्जीव कचऱ्याचे प्रचंड ढिग आहेत, काळ्या पाण्यांनी तुडुंब भरून समुद्राकडे निघालेली गटारे आहेत, मुंगी शिरायलाही जागा नाही अशी फाईव्ह स्टार गगनचुंबी हॉटेल्सही इथेच आहेत. इथे भीक मागायला निघालेली उघड्या देहाची काळीबंब पोरं आहेत, काळपटलेले निरागस जीव आहेत, पाटीवर दप्तर बांधून डोऱेमॅनची बैग घेऊन निघालेले सुंदर कापडल्यातले चिमुकले जीवही इथेच आहेत. इथल्या सिग्नलवर सुवासिक फुलांचे गजरे विकत पोटासाठी झगडणाऱ्या करपलेल्या देहाच्या महिला आहेत, खेळणी विकणारे छोटे छोटे जीव आहेत, आतल्या कार मध्ये बसून केसात गजरे माळणाऱ्या सुंदर देहाच्या बायकाही इथेच आहेत. इथल्या शहराच्या शेवटच्या टोकावरल्या कठड्यावर फेसाळ सागराकडे पहात जीवनाच्या आणाभाका घेत मिठीत विसावलेली तरुण जोडपी आहेत, प्रेमाच्या शपथा आहेत, वचने आहेत, स्वप्ने पाहणारी तरुण ह्रदर्ये आहेत, तशीच खाडीवरल्या पुलावरून उडी मारून तरंगणारी माणसांची प्रेतेही इथेच आहेत. इथे भात खाऊन जगणारी आई आहे, पिझ्झा खाणारी मम्मा आहे, दारू पिऊन तर्रर्र झालेला मळकट कपड्यातला हताश बाप आहे, तर डार्लिंग सोबत व्हिस्कीचा पेग मारून जळती सिगारेट झाडणारा सुटाबुटातला डॅड सुद्धा इथेच आहे. इथे सिक्स पॅक बॉडी बनवून हिरोसारखा उघडा फिरणारा हशरत आहे, देहावरच्या छातीचे उघडे प्रदर्शन मांडून हिंडणाऱ्या अप्सरा आहेत, नाकात नथ पायात पैंजण घालून एखांद्या उपनगरातल्या चाळीत नऊवारी साडीत वावरणारी मऱ्हाटमोळी लावण्यवती पण तुझ्याच या शहरात आहे.....