Showing posts with label लेख. Show all posts
Showing posts with label लेख. Show all posts

Sunday, April 15, 2018

कश्मीर की कली

आसिफा बद्दलच्या पोस्ट वाचल्यानंतर तिच्या विषयीचा पुढचा घटनाक्रम वाचणे माझ्या सहन शक्तीच्या पलीकडे गेलेले. काय हे भयानक चालूय आजूबाजूला या प्रचंड निराशेत रात्री बेडवर पडलेलो. अगदी तिच्याच सेम वयाची माझी मुलगी माझ्या जवळ आली. नेहमीप्रमाणे माझ्या बाजूला असलेला मोबाईल तिने हातात घेतला. बऱ्याच वेळा ती फेसबुकवरचे फोटो पहात राहते. जिथं जिथं लहान मुलांचे वाढदिवसाचे वगेरे फोटो दिसतात तेथे ती नेहमी लाईक करत राहते. खरे तर माझ्या फ्रेंड लिस्टमधील लहान मुलांच्या फोटोवरचे असे बरेच लाईक हे तिनेच केलेले असतात. ते चिंटू नावाचे पेज तिला प्रचंड आवडते. ते तिच्यासाठी मी फेवरेट लिस्टमध्ये ‘सी फर्स्ट’ केल्याने सतत तो चिंटू माझ्या वालवर फिरत राहतो.

पण रात्री तो चिंटू स्क्रोल करूनही तिला वालवर कुठेच दिसत नव्हता. अधे मध्ये ती गंभीरपणे काहीतरी वाचताना दिसत होती. मी काही बोलण्याआधीच तिने विचारले, “पप्पा हि मुलगी कोण आहे? मी हादरलोच. पुन्हा तेच डोळ्यासमोर. म्हंटलं, “का रे! असेल कोणतरी!” पप्पा सगळीकडे हिचेच फोटो दिसताहेत! हिला मारलय का कोणी? मी अडखळलो. शब्दच फुटेना. रक्ताळलेल्या एका फोटोवर लाईक करताना तिचा हात आज अडखळा होता. “सांगा ना पप्पा?” पुन्हा तिचा तोच प्रश्न. अखेर मी धाडस केलं. म्हणालो. “हो बाळा मारलय तिला!” पण का पप्पा? का मारलं तिला? तिला नेमके कसं समजून सांगावं या विचारात डोकं बधीर होऊन गेलेलं. आपण एखादी गोष्ट लहान मुलांपासून लपविण्याचा प्रयत्न केला कि त्यांची उत्कंठा जास्तच ताणली जाते. तिचं असच काहीसं झालेलं. अखेर मी आसिफावर रेप झाल्याचं सांगून टाकलं. पुन्हा तिचा तोच प्रश्न. “रेप म्हणजे काय हो पप्पा?” आसिफच्याच वयाची माझी मुलगी. मला विचारतेय. रेप म्हणजे काय असतं. आणि मी पालक असून तिच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देऊ शकत नाही. या साऱ्या गोष्ठी अजून समजून घेण्याचं या लहान मुलांचं वय नसताना आसिफा हकनाक कुस्करली गेली. अनेकांकडून... 

मी जागेवरून उठणार इतक्यात तिचा पुन्हा प्रश्न. “पप्पा तिला मारून या नालायक लोकांना काय मिळतं हो? ती कुठं राहते? मला तिची स्टोरी सांगा ना?” मी जागेवरून उठलो तिच्या जवळ गेलो. तिच्या नजरेला नजर दिली. म्हणालो, 
“बाळा! आसिफा शेळ्या मेंढ्या पाळणाऱ्या काश्मीरातल्या गरीब बकरवाल समाजात जन्माला आली. पण तिला इथल्या धर्म रक्षकांनी जातीधर्माच्या सुळावर उभी केली? तिचं अपहरण करून तिला तिला मंदिरात जनावरासारखी बांधून घातली. विकृत नराधमांनी तिचं गुप्तांग उध्वस्त करून टाकलं. इतकं सारं सोसूनही आसिफा जिवंत राहिली. लुळ पडत चाललेलं शरीर घेऊन झुंजत राहिली. वेदनांनी आणि उपाशी पोटाने गहिवरत राहिली. पण तिची दया येणार कोणाला? अखेर नराधमांनी डोक्यात दगड घालून तिला काश्मीरच्या दऱ्या खोऱ्यातून कायमची मुक्त केली”. मी हे सगळं सगळं तिला सांगितलं. पण.... ओठ मिठून... मनातल्या मनात.... नुसतच भरल्या डोळ्यांनी... 

आसिफाच्या प्रश्नातून मला मुक्ती घ्यायची होती. माझी सोडवणूक करायची होती. हा विषय थांबविण्यासाठी उठून मी बाहेर निघालो तर माझ्या मागे येत पुन्हा ती म्हणाली, “मग तुम्ही का लिहित नाही तिच्यावर आर्टिकल! हे बघा! सगळे तिचेच फोटो दिसताहेत! तुम्ही पण लिहा ना?” मी माघारी वळलो आणि तिच्याकडे पहात म्हणालो, “बाळा! स्फोटात उडालेली शब्दांची दगडे आज माझ्याच डोक्यावर येऊन धडाधडा आपटताहेत! माझ्याकडे शब्द नाहीत. काय लिहणार मी तुझ्यासारख्याच निरागस आसिफावर....!


photo credit:newscode



Sunday, March 18, 2018

एका व्हीलचेअरचा प्रवास...

जगावर दुसऱ्या महायुद्धाचे ढग गळत असताना फ्रेंक आणि इझाबेल या मध्यम वर्गीय उच्च शिक्षित आई वडिलांच्या पोटी एक चुणचुणीत पोरगा जन्माला आला त्याचं नाव होतं स्टीफन हॉकिंग. या स्टीफनच्या जन्माची तारीख होती ८ जानेवारी १९४२. त्यांची घरची आर्थिक परिस्थिती बेतातीच होती. गणित आणि विज्ञानाच्या प्रतिभेने जन्मताच काठोकाठ भरलेल्या या मुलाला लहान पणापासूनच संगीत आणि वाचनाची विशेष आवड होती. गणित आणि भौतिकशास्त्र तर त्यांच्या आवडीचे विषय होते. शाळेत असताना स्टीफनला ‘आइनस्टाइन’ या टोपन नावानं ओळखलं जाऊ लागलं. त्यांनी लहानपणी शाळेत आपल्या मित्रांच्या मदतीने टाकाऊ वस्तूंचा वापर करून कॉम्प्युटर तयार केला होता. लंडनच्या सेंन्ट अल्बान्स या शाळेतील शिक्षणानंतर ब्रिटन मधील ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्यांने पदवी संपादन केली. पुढे उच्च शिक्षणासाठी हा तरुण केंब्रिज विद्यापीठाच्या दारापर्यंत दाखल झाला.

वाढणाऱ्या वयासोबत स्टीफन एकवीस वर्षाचा झाला. सर्व काही सुरळीत चालू असताना एका सुट्टीच्या दिवशी स्टीफन आपल्या घरी परतला. एका रिकाम्या वेळेत तो शिडीवरून उतरत असताना घसरला आणि तेथेच बेहोष झाला. तेथूनच स्टीफन हॉकिंग या नावाचा झंझावात सुरु झाला. अनेक डॉक्टरांना दाखवूनही त्याच्या आजाराचे निदान काही लवकर झालेच नाही. त्याचा एकविसावा वाढदिवस सुरु असतानाच नियतीने त्याला एका दुर्मिळ नव्या आजाराचे गिफ्ट कायमस्वरूपी बहाल केले. त्या दुर्मिळ गिफ्ट दिलेल्या आजाराचे नाव होते “मोटर न्यूरॉन डिसीज.” याच आजाराने अफाट बुद्धिमता लाभलेला इंग्लड मधला हा तरूण कायमस्वरूपी अंथरुणाला लपेटून बसला. आता जगण्याला अर्थच उरला नव्हता. प्रचंड निराशेत स्टीफन दिवस ढकलू लागला. त्याच्याच शेजारी असंख्य आजारांनी ग्रासलेल्या एका रोग्याची जगण्यासाठी अखंड चाललेली धरपड पाहून त्याला जीवनाविषयी, या जगाविषयी पुन्हा आशेचे किरण दिसू लागले. डॉक्टरांनी सांगितल्या नुसार दोन वर्षात आता आपला मरण आता अटळ आहे हे माहित असून हि या तरुणाने जगण्याची उमेद सोडली नाही. काही कालावधीच हा तरुण जगाचा निरोप घेणार हे माहित असतानाही त्याच्या जेन वाईल्ड नावाच्या प्रेयसीने त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. स्टीफन विवाहबद्ध झाले. आता जेन नावाची जादू तर त्यांच्या जगण्याचा नवा आधार बनली.

व्हीलचेअरचा आधार घेत स्टीफन नंतर केंब्रिज विद्यापीठात प्रोफेसर बनले. त्या तरुणाचे रुपांतर आता एका प्रोफेसरमध्ये झाले होते. अंथरुणाला चिकलेला आणि प्रचंड विज्ञानाने भरलेल्या मेंदूचा हा माणूस नव्या जगण्यासाठी जागेवरून उठून व्हील चेअरचा आधार घेऊन जगू लागला. नव्हे नुकताच जगला नाही तर त्या काळात त्यांची वैज्ञानिक म्हणून साऱ्या जगात कीर्ती पसरली. गणित, विज्ञान, भौतिकशास्त्रात त्यांनी अनेक संशोधने केली. विश्वाच्या निर्मितीचे रहस्य उलगडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आण्विक शक्ती, आणि सतत होणाऱ्या पृथ्वीवरच्या रासायनिक हल्ल्यांमुळे एक दिवस पृथ्वीचा विनाश अटळ असेल इथपर्यंत त्यांचे संशोधन पोहचले.

याच काळात हळू हळू शरीर त्यांची साथ सोडू लागले. अशा परिस्थितीत वेळोवेळी त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया होत गेल्या. श्वास नलिकेला छिद्र पाडून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली. त्यांना गिळताना प्रचंड त्रास होऊ लागला. अखेर एक दिवस नियतीने डाव टाकून त्यांचा आवाजही त्यांच्यापासून हिरावून नेला. या आजाराने त्यांच्या शरीरिक हालचाली बंद पडल्या. एका हाताच्या बोटांची काहीशी हालचाल करता होत असे. त्या बोटांचा वापर करून ते संगणकावर काम करत असत. संगणतज्ज्ञ डेव्हिड मेसन या त्यांच्या मित्राने त्यांच्या व्हील चेअरलाच एक संगणक जोडला. त्यांच्या संगणकासाठी एक नवी आज्ञावली लिहून कार्यरत करण्यात आली. याच तंत्रज्ञानाच्या आणि संगणकाच्या आवाजाच्या माध्यमातून स्टीफन यांना गळ्यातून बोलणे शक्य झाले. व्हाईस सिंथेसायझरच्या माध्यमातून ते पुढे बोलत राहिले. गंमत म्हणजे स्टीफन ब्रिटीश असूनही त्यांच्या सिंथेसायझरमधील त्यांचा आवाज हा पूर्णपणे अमेरिकन धाटणीचा होता. 

व्हीलचेअर समोरच्या बसवलेल्या याच माईकच्या ऐतिहासिक जागेवरून पुढे त्यांच्या जगण्याचे आणि संशोधनाचे शेकडो नवे अध्याय जगाने आजपर्यंत पाहिले. अनुभवले. लुळे पडलेले शरीर अंगावर घेऊन आणि मेंदूत असलेला ‘एकशे साठ आय.कू’ चा वापर करून स्टीफन यांनी काय नाही केले. त्यांनी अनेक नवे शोध लावले. बिग बॅंग थेअरीचा सिद्धांत त्यांनी मांडला. क्वांटम मेकॅनिक्स आणि सापेक्षतावाद एकाच सिद्धांतामध्ये मांडण्याचा पर्यंत केला. सैद्धांतीक भौतिकशास्त्रात त्यांनी जगाला मोलाचे योगदान दिले. विश्वाच्या निर्मिती पासून ते आकाशातील कृष्णविवरे कशी तयार होत असतील इत्यादी अनेक गोष्टींचा त्यांनी शोध घेतला. मानवाला न उकलणाऱ्या ब्रह्मांडातल्या गूढ रहस्यांचाही शोध घेण्याचा आणि चिंतनाचा त्यांनी आयुष्यभर ध्यासच घेतला होता. ब्रह्मांडाच्या उत्पतीबाबतचे त्यांचे शोध आणि विचार बऱ्याचशास्त्रज्ञानी स्वीकारलेले आहेत. 

अंतरिक्ष आणि पदार्थ विज्ञानाच्या क्षेत्रात तर त्यांनी वैश्विक मान्यताच मिळवली. जगातील पहिल्या दहा सर्वोत्तम वैज्ञानिकांमध्येही त्यांची गणना होत होती. 1988 साली “ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम” या त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या जगभरात लाखो आवृत्या रातोरात खपल्या. यामध्ये त्यांनी बिग बँग आणि कृष्णविवरासंदर्भात सविस्तर विवेचन केले होते. तर दुसरीकडे या पुस्तकातून त्यांनी ईश्वराचं अस्तित्वच नाकारल्याने त्यांच्यावर त्या काळी प्रचंड टीकाही झाली. “लाईफ इन द युनिव्हर्स” या पुस्तकात परग्रहावरचे एलियन आणि मानव यांची भविष्यात भेट होईल असेही भाकीत केले आहे. त्यांनी विज्ञानाविषयीची जशी अनेक पुस्तके लिहिली तशीच त्यांनी लहान मुलांसाठीही पुस्तके लिहली. विशेषता ‘जॉर्जस सिक्रेट की टू युनिव्हर्स' , 'जॉर्जस कॉस्मिक ट्रेझर हंट' ही या त्यांच्या पुस्तकातील लेखन लोकप्रिय ठरले.

स्टीफन यांच्या वैवाहिक आयुष्यातील अनेक दु:खद प्रंसग जगाने आजपर्यंत अनुभवले. १९९५ मध्ये त्यांच्या जगण्याचा आधार असलेली जेन वाईल्ड या त्यांच्या पत्नीने त्यांच्यापासून कायमची फारकत घेतली. स्टीफन आणि जेन यांचा दोन तपाहून जास्त चाललेला संसार मोडला. नंतर इलियाना मेसन स्टीफन त्यांच्या आयुष्यात आली. पण २००६ च्या आसपास ती हि त्यांना सोडून गेली. पण स्टीफन जगत राहिले. नंतर तर ते नासाच्या स्टेशन मधून उंचही उडाले. २००७ मध्ये त्यांनी शून्य गुरूत्त्वाकर्षण शक्तीचा अनुभव घेतला. जवळ जवळ चार तपाहून अधिक काळानी ते प्रथमच व्हिलचेअरवरून उठून हवेत तरंगण्याचा अनुभव घेत होते.

2011 मध्ये 'गार्डियन'ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते, “गेली पन्नास वर्षे रोज मृत्यूच्या छायेत असूनही मी अजून जिद्दीने जगतो आहे. मी कधीही मृत्यूला घाबरत नाही. आणि मला अजून मरणाची घाईही नाही. कारण या जगातून निघून जाण्यापूर्वी मला अनेक कामं करायची आहेत”. म्हणूनच व्हीलचेअरच्या एका जागेवर आयुष्यभर ज्ञान विज्ञानाचा ध्यास घेऊन बसून राहिलेली त्यांची जिवंत मूर्ती ही जगात कौतुकाचा विषय ठरली.

आजारानंतर दोन वर्षापर्यंतच आयुष्य लाभलेला असा हा न्यूटन चा वारसदार अखेर ‘मोटर न्यूरॉन डिसीज’ नामक आजाराची ‘मेलेली लाश’ अंगावर घेऊन पुढे पन्नास वर्षे जगला आणि अखेरीस नियतीच्या यानातून हा झंजावात पृथ्वीच्या कक्षेबाहेर कायमचा निघून गेला...

#ज्ञानदेवपोळ


Monday, December 4, 2017

माहेर

माहेर हा शब्द कळायला स्त्रीचाच जन्म घ्यावा लागेल. माहेर आणि स्त्रीचं नातं हे अनादि अनंत काळापासून कधीही न संपणारं. युगाने युगे चालत आलेलं. खेड्यात तर माहेर या शब्दाला विशेष वलय. लग्नसराई संपली कि पावसाळा सुरु होतो. खेड्यात शेतातील कामांना मग प्रचंड जोर. काही काळातच पिकं टरारून वर येतात. अशातच नवीन लग्न होऊन सासरी गेलेल्या पोरींना वेध लागतात ते माहेराचे. लग्नानंतर स्त्रीचे सारे जीवनच बदलते. उठ सुठ कधीही तिला माहेराला जाता येत नाही. मग ते कितीही जवळ असेना. खेड्यात त्यासाठी रीतीरिवाज ठरलेले. कृषीजनांच्या संस्कृतीत रीतीरीवाजाना  विशेष महत्व. ते सर्वांनी पाळायचेच. श्रावणापासून ते पंचीमीच्या सणापर्यंत. आणि पुढे गौरी गणपती, दिवाळीपर्यंत या नव्या सासुरवाशिणीना ओढ लागते ती माहेरांची.

माहेरात येताना रिकाम्या हाती येता येत नाही. त्यासाठी रिती ठरलेल्या. त्या पाळायच्याच. पहिल्यांद्या माहेरात येणाऱ्या सासुरवाशिनी सोबत दुरड्या घेऊन माहेराकडे जायला निघतात. पूर्वी बैलगाड्यांनी या सासुरवाशिनी माहेराला येत. या बैलगाड्या बांबूच्या काब्यांनी गोलाकार आकार देऊन झाकलेल्या असायच्या. गावांच्या वेशी त्यांच्या स्वागताला सदैव तत्पर. बैलगाडी घरापुढे थांबली कि पहिली खाली उतरणार ती सासुरवाशिन. मग दुरड्या उतरणार. बंधूची गाडी गोठ्याला सुटणार. तोपर्यंत दाराला उभी असलेली कर्ती म्हातारी नातीची दृष्ट काढणार. निदान भाकरीचा तुकडा तरी ओवाळून टाकणारच. यात अंधश्रद्धा नाही. असणार ती श्रध्दाच. मग सासुरवाशिनीच्या गालावरून जुन्या हातांची बोटे मोडली जाणार. एव्हाना साऱ्या गल्लो गल्लीत बातमी. मग लहान पोरासहित भावकीतल्या बायकांची पळापळ. “अमक्या तमक्याची लेक आली गं!” तोंडी एकच वाक्य.

सासुरवाशिनींची पावलं माहेरच्या उंबऱ्याला लागली कि साऱ्या खेड्यात असच स्वागत. गावची लेक ती आपलीच लेक. तिचं सुख ते आपलं सुख. तिचं दु:ख ते आपले दु:ख. हीच खेड्याची संस्कृती. रीत. परंपरासुद्धा. त्यात आपलेपणा. मायेचा ओलावा काठोकाठ भरलेला. मग दुरड्या सोडण्याची धावपळ. दुरड्या सोडण्यास इतर स्त्रियांना बोलविण्यासाठी भावकीतील खास बाईची नेमणूक. ती चार पाऊलात एका वेळी पाच घरात निरोप देणार. खेड्यात अशी वेळेत कामं करणाऱ्या काही खास स्त्रीया. मग सगळीकडे हळदीकुंकवासाठी पळापळ. सासर माहेरच्या परिस्थितीनुसार या दुरड्यांची संख्या ठरलेली. अगदी एका दुरडीपासून ते पाच पंचीवीस पर्यंत ही वाढत जाणारी संख्या. हळदी कुंकू, पान, सुपारी, पीस नारळ हे मात्र ठरलेलंच. एखांद्या दुरडीत पुरण पोळी, तर दुसरीत करंज्या लाडू. आम्ही याला कानवले म्हणत असू. म्हणजे अजूनही तसेच म्हणतो. आपल्या माणसात. मात्र खेड्यात नावं घेतल्याशिवाय या दुरड्या सुटत नाहीत. काळानुसार दुरडीचा “डबा” झाला. पण हीच रीत अजूनही. नांव घेणं या शब्दाला “माहेर” या शब्दा इतकच वलय. तितकच वलय एखांद्या लुगडे चोळीतल्या म्हातारीने घेतलेल्या अंलकारीक लांबलचक नावाला. तिच्या शैलीला. आणि तिच्या खणखणीत आवाजाला. यात जुन्या स्त्रिया पारंगत. एकीकडून दुसरीकडे काळानुसार चालत आलेला हा पारंपारिक लाखमौलाचा ऐवज. जुन्या संस्कृतीकडून पुढ्च्या पिढ्यांना मिळालेला. मग एकमेकींच्या “रावांचं” नांव घेण्याची प्रचंड स्पर्धा. मग एखांदीचा “राव” भांडखोर का असेना. पण नाव घेताना जपायची ती संस्कृती. बाकी कैक गोष्टींना इथे थारा नाही. अगदी एका ओळीपासून ते दहा ओळीपर्यंत ह्या वाढत जाणारी शब्दांच्या लयबद्ध राशी. पण सर्वांना उत्सुकता एकच. नव्या सासुरवाशिनीच्या नावाची. तिचं लाजत मुरडत नांव घेणं हा कित्येक डोळ्यांचा कौतुकाचा विषय...

माहेरी या सासुरवाशिणीचं किती कोड कौतुक. त्यांच्यासाठी खास पुरणपोळीचं गोड जेवण. तुटलेल्या मैत्रिणी जवळ आल्या कि गप्पागोष्टी, चेष्टामस्करी सुरु. त्यात  मंगळागौरीची गाणी चालत.  फुगडयाचा फेर धरला जाई.  पंचमीला वडाच्या झाडाला झोके बांधले जात. त्या झुल्यावर झुलणं होई. झोक्यावरून सासर माहेरच्या सुख दुःखाची गाणे चालत. अखेर सासुरवाशिणी सासरला जायला निघतात. त्यावळी दाटून आलेले कितीतरी कंठ खेड्यांनी उघड्या डोळ्यांनी पहिले असतील. बहिणाबाईनी तर “लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते!” असं उगीच नाही म्हंटलं.

काळ बदलला. खेडी बदलली. संस्कृती बदलली. जुनं पिकत गेलं. तसं नवं उगवत गेलं. स्त्री साठी सारं काही बदललं. पण बदललं नाही तिच्या काळजातलं “माहेर”. माहेराविषयीचं स्थान. प्रेम. जिव्हाळा. आपुलकी. आणि ओढ सुद्धा. पण पूर्वीसारख्या सासुरवाशिनी आता बैलगाडीने येत नाहीत. वेशीतून आत येताना पूर्वी येणारा बैलांच्या गळ्यातील घुंगराचा आवाज आता रस्त्या रस्त्यातूवरून होत नाही. काळानुसार बदल अपरिहार्यच. बैलगाड्यांच्या धावांच्या “कर कर” आवाजाची जागा आता “अपोलो, सीयाट” सारख्या रबरी टायरांनी घेतलीय. माहेरांच्या भेटीसाठी लागणारा वेळ या रबरी टायरांनी आता जवळ आणलाय. आता सासुरवाशिनी आल्यावर गल्लीतले इतके लोक गोळा होत नाहीत. जितके ते पूर्वी व्हायचे. पण माहेरची ओढ स्त्री साठी अजून तितकीच टिकून आहे.

तीच ओढ शहरांतही. नव्या शिक्षणाने आणि सुधारणांनी शहरांकडे लोंढा वाढला. परिणामी नव्या स्त्रीचं सासर आणि माहेर दोन्ही आता शहरातच. या नव्या स्त्रीने जुन्या परंपरा मोडून काढल्या. नव्या डोक्यात घातल्या. रुद्राक्ष संस्कृतीतून द्राक्ष संस्कृतीकडे तिचा प्रवास झाला. पण माहेरी जाण्याची ओढ? अजूनही तितकीच. मग एखांद्या शहरात सासर ईस्टला आणि माहेर वेस्टला का असेना. नव्या काळातही स्त्री साठी माहेरची ओढ तशीच राहिली. म्हणून दूर एखांद्या जत्रेतून देवाचा गुलाल बुक्का आणि मुठभर चिरमुरे बत्ताशे गाठीला बांधून आई बापाकडे माहेराला घेऊन निघालेली खेड्यातली अशिक्षित स्त्री असो कि, युरोप अमेरीकीतून इथल्या शहरात परतल्यावर आलिशान टॉवर मध्ये राहणाऱ्या आई बापांकडे नवनवीन वस्तू घेऊन सिमेंटच्या रस्त्यावरून निघालेली आधुनिक स्त्री असो. दोघी आजही तितकच माहेरावर प्रेम करतात. म्हणूनच काळ कितीही बदलेल. जग बदलेल. सारी दुनिया बदलेल. स्त्रीच्या दृष्टीने सारे काही बदलेल. पण बदलणार नाही ते फक्त आणि फक्त “माहेर...”



Tuesday, November 7, 2017

इथे दुध विकलं जात नाही


सांगली जिल्ह्यातील कडेगाव पासून 10 किलोमीटरवर असलेले आणि नांदणी नदीकाठी वसलेले सासपडे हे पोळ भावकी मोठ्या प्रमाणात असणारे गाव. गावात हजाराच्या वर लोकसंख्या. पण हे गाव नेहमीच चर्चेत राहिले आहे ते वेगळ्याच कारणामुळे. कारण कित्येक पिढ्यापासून गावात दूध विकलं जातच नाही. त्यामुळे हे गाव गोकुळच बनले आहे. नदीवर धरण आणि टेंभू योजनेचे पाणी आल्याने इथली शेती आता बऱ्यापैकी पाण्याखाली येऊ लागली आहे. त्यामुळे हिरवा चारा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालाय. गावात जनावरांचीही संख्या चारशे ते पाचशे इतकी आहे. दुभत्या जनावरांची संख्याही मोठी असल्याने रोज शेकडो लिटर दूध गावात तयार होते. पण हे दूध विक्री न करता घरीच वापरले जाते किंवा गावातच उसनवारीने दिले जाते. काही पिढ्यांपासून घरातील जनावरांच्या दुधाची विक्रीच केली जात नसल्याने, सध्या हे गाव पंचक्रोशीत गोकुळनगरी म्हणून ओळखले जातेय. दुधापासून तयार होणारे दही, लोणी, ताक, तूप यासह अन्य दुग्धजन्य पदार्थ घरीच खाण्यासाठी वापरले जातात किंवा ते पै-पाहुणे, शेजाऱ्यांना दिले जातात. एक लिटर तूप देऊन त्याबदली तीन लिटर गोडेतेलही घेतले जाते. पण त्यांची विक्री केली जात नाही. अर्थात हे सर्व घडण्यामागे तशा बऱ्याच दंथकथा गावात ऐकायला मिळतात.

गावापासून काही अंतरावर एका डोंगरावर डोंगराई देवीचे मंदिर आहे. पंचक्रोशीत हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. मात्र हि देवी या गावची असल्या कारणाने व देवी दुधविक्रीस कौल देत नसल्याने, काहीतरी वाईट घडेल या भीतीने गावात आजही दुध विकले जात नाही. काही जणांनी तसा प्रयत्नही केला पण जनावरे आजारी पडणे, मृत्यू होणे, वांझ राहणे असे प्रकार घडल्याने घाबरून पुन्हा गावात दुधविक्री बंद झाली.

सासपडे गावाला पूर्वीपासून मल्लांची परंपरा आहे. पूर्वी गावात पैलवानांची संख्या मोठी होती. खाशाबा पैलवान, गणपत पैलवान, गजेराव पैलवान इत्यादी अनेक पैलवानांच्या नावाने हे गाव अगदी आजही ओळखले जाते. यातील खाशाबा पैलवान म्हणजे अगडबंब ताकतीचा पैलवान या गावात होऊन गेला. दोन बैलांची मोट हा पैलवान एकटा विहिरीतून वर वढायचा. इतका मोठा पैलवान आख्या जिल्ह्यात जन्मला नाही. पण जुन्या काळात प्रसार माध्यमांची कमी असल्याने प्रसिद्धी पासून झाकला गेला. तरीही पैलवानांचे गाव म्हणून सासपडे आजही ओळखले जाते. गावाच्या जत्रेत कुस्त्यांचे जंगी फड भरायचे. गावाच्या पारासमोर भली मोठी तालीम होती. त्या तालमीत अगदी मरेपर्यंत हे पैलवान बसलेले असायचे. गावची पोरं पैलवान झाली पाहिजे म्हणून गावातले दूध गावातच कसे खपवायचो आणि प्यायचो त्या गोष्टी हे पैलवान पुढच्या पिढ्यांना सांगायचे. गणपत पैलवान जुन्या काळी डोक्यावर पितळेची भांडी घेऊन, आजूबाजूच्या गावात इथले लोक दूध,दही,तूप विकायला कसे जायचे हे सांगायचे. त्यावेळी रस्ते न्हवते. पूल न्हवते आजूबाजूला दूध, तूप घेऊन गेलेली लोकं चार चार दिवस नदीचा पूर ओसरेपर्यंत पल्याड थांबायची. मग हे दूध,तूप गावातच वाटून गावची पोरं पैलवान झाली पाहिजेत यासाठी दवंडी देऊन बाहेर दूध,तूप न्यायचे बंद केले. मात्र काहीजण विकायचे थांबेनात. मग एका श्रावणात गावाच्या बैलगाड्या डोंगराई देवीला गेल्यावर तेथे या पैलवान लोकांनी देवीला कौल/नवस केले. त्यात गावचे दूध, तूप गावातच वाटले जाईल. जे बाहेर नेतील त्यांच्यावर देवीचा कोप होईल असे कौल/वचन देवीकडून गावाला घेतले. तेव्हापासून ती भीती गावात राहिली ती अगदी आजपर्यंत. अशी दंतकथाही गावात आज सांगितले जाते.

पुढे काळानुसार गावाचे यांत्रिकीकरण झाले. शिक्षणाचे वारे गावात आले. सहकारी संस्थाचा उदय झाला. त्यानुसार गावोगावी दूधसंघ निघाले. १९९५ च्या दरम्यान काही राजकीय नेत्यांनी गावात येऊन दुग्ध विक्रीला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. दूध विक्रीबाबतचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. विशेषतः पोळ भावकीमध्ये देवीचा कोप होईल या भीतीने कोण तयार झाले नाही. बाकी यादव, जाधव या गावच्या पाव्हणं मंडळी असणाऱ्या छोटया भावक्या नव्वदच्या दशकापासून दूध विकू लागल्या. त्यावेळी माजी आमदार संपतराव देशमुखानी शेतकऱ्यांना बॅँकेकडून कर्ज उपलब्ध करून देऊन ५० जर्सी व होस्टन गाई खरेदी करून दिल्या. गावात दूध संकलन केंद्र सुरू झाले. त्यावेळी प्रतिदिन सुमारे २५० ते ३०० लिटर दूध संकलन होऊ लागले मात्र, काही दिवसातच यातील काही गार्इंचा आजारी पडून अथवा हवामान लागू न झाल्याने मृत्यू झाला, तर बऱ्याच गाई वांझ राहिल्या. दुधाची विक्री केल्यानेच देवीचा कोप झाल्याचा गावकऱ्यांचा समज झाला. काही दूध विकणारांचे गोठे पेट घेऊ लागले. त्यामुळे लोकांनी पुन्हा दूध विक्रीचा नादच सोडला. आणि गावची डेरी बंद पडली. परंपरागत चालत आलेल्या या रूढी परंपरेमुळेच गावच्या अर्थकारणावर त्याचा थेट परिणाम झालेचं सध्या दिसतय. एकीकडे डिजिटल महाराष्ट्र घडत असताना श्रद्धा, अंधश्रद्धाच्या गाळात अजूनही अशी कित्येक खेडी अडकून बसलीत. ती नक्की कधी विकासाच्या दिशेने झेप घेतील हे येणारा काळच ठरवेल.

#ज्ञानदेवपोळ


Friday, September 1, 2017

माणसं गिळणारा डिजिटल अजगर

पूर्वी खेड्यात लग्न झाल्यानंतर बायकांना नवऱ्याचं वर्षभर तरी दर्शन होत नसे. त्यामुळे लगेच नवऱ्याशी बोलणं, त्याच्याशी लगट वगेरे करणं या खूप दूरच्या गोष्टी होत्या. एक दोन वर्षानंतर कधीतरी नवरा बायको एकत्र येत असत. एकत्र कुटुंबपद्धती असल्याने एका एका जोडप्याच्या पोटी पुढे चार ते पाच मुले तरी सहज जन्माला येत असत. घरातला रेडीओ हे प्रमुख करमणुकीचे साधन होते. पुढे स्वातंत्र्यानंतरची पहिली चार दशके इथल्या सामान्य गरजा भागविण्यावरच खर्च झाली. त्यामुळे तंत्रज्ञानाची तशी फारशी प्रगती झाली नाही. मात्र काळ बदलला. नव्वदच्या दशकानंतर संगणक, इंटरनेट, मोबाईल, खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्या इत्यादी अनेक क्षेत्रात अफाट प्रगती होत गेली. मोबाईल आणि त्यासोबत आलेलं इंटरनेट तर नव्या तंत्रज्ञानाचा अविष्कार ठरत गेलं. अगदी लहानापासून थोरापर्यंत सर्वांनीच हे तंत्रज्ञान आता सर्वत्र स्वीकारले आहे. कोणतेही तंत्रज्ञान जन्माला येताना ते चांगली आणि वाईट अशा दोन बाजू घेऊन जन्माला येते. मात्र सध्या या तंत्रज्ञानाचा गैरवापरच जास्त होताना दिसतोय. ते कशा प्रकारे हाताळावे याचे कुठेही क्लास भरत नाहीत. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या आहारी एखादा का माणूस गेला कि मनावरचे नियंत्रण सुटते. आणि माणूस सभ्यता आणि विवेक गमावून बसतो.

याचे उत्तम उदाहरण द्यायचे तर व्हाटसआप वर सध्या "सगाई से लेकर चुदाई तक का सेल्फी ज़माना" या नावाने मागील काही दिवसापासून एका चांगल्या घरातील जोडप्याचे बरेच फोटो फिरताहेत. यातील काही फोटोमध्ये त्या जोडप्याचे लग्नाचे आणि कुटुंबिया सोबतचे सेल्फी फोटोही आहेत. नंतरच्या काही फोटोमध्ये कामक्रीडा करतानाचे नग्न सेल्फी आहेत. काही फोटोत त्या बाईने अंघोळ करताना स्वतःच तिने तिचे नग्न सेल्फी घेतलेचंही दिसतय. अर्थात नवीन लग्न झालेली कोणतीही स्त्री नवऱ्याने सांगितल्याखेरीज असले उद्योग करणार नाहीच. कदाचित त्यांनी हे नवखे पणाची गंमत म्हणूनही केले असावे. या मध्ये ज्या मोबाईलमध्ये त्यांनी हे सेल्फी फोटो घेतले गेले असतील, एकतर तो फोन हरवला असेल किंवा नवरा बायको काही काळाने विभक्त वगेरे झाल्यानंतर नवऱ्याने ते फोटो जाणून बुजून व्हायरल केले असतील. असे काही तर्क बांधता येतील. यावरून हातात आलेल्या तंत्रज्ञानाचा वापर आपण किती डोळेझाक पणे भान हरवून करतोय हेच दिसून येतय.

तरुण तरुणी तर हातात आलेल्या या स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर अलीकडे खेळणासारखा करताना दिसताहेत. आपल्या मुलांचं हे तंत्रज्ञान पेलण्याचं आणि हाताळण्याचं वय नसतानाही पालक आपल्या मुलांना अधिक स्मार्ट बनवताना दिसतात. प्रेम प्रकरणातून तर हमखास मुली आपल्या प्रियकराला स्व:ताचे नग्न फोटो अथवा भावनेच्या भरात आंधळे होऊन विश्वासाच्या नावाखाली रोमान्स करतानाचे विडीओ तयार करण्यास मदतच करतात. नंतर ब्रेकअप झाले की, यामधून एक तर मुलींना ब्लॅकमेल केले जाते अथवा जाणून बुजून ते नग्न फोटो अथवा विडीओ एखांद्या पोर्न साईटवर अपलोड केले जातात. बऱ्याच पोर्न साईटवरती असे तरुण तरुणींचे नग्न फोटो अथवा विडीओ सध्या सरासपणे दिसू लागलेत. याचे परिणाम अर्थातच पुढील काही दिवसात समोर येतील. त्यात भरीस भर म्हणून आपल्याकडेही आता वयात न आलेल्या पोरापासून ते म्हाताऱ्या झालेल्या बरण्या पर्यंत असले काही हाती लागले कि ते पुढे दहा वीस जणांना फॉरवर्ड करण्याच्या सवयी चांगल्याच अंगात भिनलेल्या आहेत. 

तंत्रज्ञानाने डिजिटल जगण्यातली घुसमट इतकी वाढवली आहे की, परवा फॅमिली कोर्टाच्या परिसरात गेलो असता काही विभक्त झालेल्या जोडप्यांना भेटलो. बऱ्याच विभक्त झालेल्या जोडप्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या मनाचा तळ काही गाठता येईना. शेवटी आपलंही असच काहीसं झालं आहे. आणि आपण पण तुमच्यासारखेच समदु:खी आहोत असे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला तेव्हा कुठे काहीजण बोलके झाले. त्यापैकी एक सुशिक्षित जोडपं नुकतच विभक्त झालय. दोघेही नोकरी करतात. लग्न होऊन अजून दोन वर्षे पण पूर्ण व्हायची आहेत. वेगळे का झाले तर एकमेकावर संशय. अगोदर नवऱ्याने त्याच्या फोनला पासवर्ड टाकला. मग तेच नंतर बायकोनेही केले. दोघांनाही एकमेकांवरच संशय. मग रोजच खटके उडायला लागले. ज्या विश्वासावर हे नाते टिकून राहते तो संपला आणि प्रकरण येथपर्यंत येऊन पोहचलं.

अजून दुसऱ्या घटनेतला नवरा पुण्यात गेल्या दहा वर्षापासून एका आय.टी पार्क मध्ये नोकरी करतोय. बायको बेंगलोर मध्ये. बेंगलोर मध्येच एक कोटींचा फ्लैट. पार्किंगमध्ये पंचवीस लाखांची धूळ खात पडलेली कार. पण फ्लैटमध्ये सध्या कोणी रहात नाही. कारण नवरा नसल्यामुळे बायको तिच्या आईकडे तिथेच राहते. ती ही नोकरी करते. तिला तिची नोकरी सोडायची नाही. आणि याला याची. दोघेही आपल्या करिअर वर ठाम. दोन मुले चांगल्या शाळेत शिक्षण घेतात. याची बदली तिकडे होत नाही. आणि बायकोची इकडे. हा महिन्याला दोन दिवस तिकडे जातो. मग तेवढ्यापुरते दोघे स्व:ताच्या डिजिटल घरात येतात. महिन्यातील दोन दिवस काय ते कौटुंबिक सुख घेतात. पुन्हा आपआपल्या ठिकाणी जातात. ही डिजिटल घुसमट गेल्या दहा वर्षापासून सुरु आहे. मात्र मागील काही दिवसापासून दोघात अशाच एका मेसेज वरून खटके उडू लागलेत. मानवाने निर्माण केलेले तंत्रज्ञान आता मानवालाच हरवू लागले आहे. वेगाने माणसाना गिळत निघालेला हा डिजिटल अजगर अजून किती जणांना गिळंकृत करेल हा येणारा काळच सांगेल.
फोटो सौजन्य: भास्कर

Thursday, July 28, 2016

ग्रामसंस्कृतीतून हद्दपार झालेल्या लोककला



पूर्वी साऱ्या गावाला पहाटे वासुदेवाची स्वारी येवून जागं करायची. डोक्यावर मोर पिसांची टोपी असलेला वासुदेव हातात चिपळ्या आणि टाळ वाजवत गाणी गात गावात शिरायचा. त्याच्या भजन भूपाळ्याचे स्वर गावागातून घुमू लागायचे. याची चाहूल लागताच काही जेष्ठ मंडळी उठून घागरी घेऊन नदीवर पाणी भरायला जायची. चांगला उजेड पडला की वासुदेवाला घरा घरातील लवकर उठलेल्या म्हाताऱ्या आज्ज्या सुपातुन ज्वारी बाजरी वाढायच्या. वासुदेवाचा मान पान केला जायचा. दिवस उगवून वर आला की हे वासुदेव मिळालेली शिदोरी घेऊन गावातून गायब व्हायचे. मग नंदी बैलवाला झूल पांघरलेल्या बैलासाहित गावात हजर व्हायचा. अडल्या नडल्या लोकांची भविष्ये त्याचा  नंदी  मान डूलवून सांगायचा. नंदी शंकराचं वाहन. पण नंदीचा  बैल इतका गरीब कसा काय असू शकतो हा प्रश्न कित्येक लोकांना पडायचा. गावभर हिंडून झालं कि नंदी वेशीतून बाहेर पडायचा. तोपर्यंत एखाद्या गल्लीतून चाबकाचे “फाट फाट” आवाज काढीत कडकलक्ष्मी गावात यायची. तिच्या गाड्यातील देवीला पूजले जायचे. तिला धान्य अथवा ओटी भरून भाकरी तुकडा दिला जायचा.
     
मग कधीतरी दुपारच्या पारी गावच्या वेशीतनं मरतुगंडया घोड्याचा टांगा घेवून डोंबारी त्याच्या समस्त बिराडा सहीत गावात शिरायचा. घोड्याच्या गळ्यातील घंटीच्या आवाजाने भर उन्हाची लहान पोरं त्याच्या मागे मागे धावायची. केसांचा पार चेंदा मेंदा झालेली त्याची चिलिपिली टांग्यात एकमेकांना चिकटून बसलेली असायची. संसाराच्या बोचक्यात बांधलेल्या रंग बिरंगी कोंबड्या भरस्त्यात गचका बसला की वाऱ्यावर डुलायच्या. टांग्याच्या मागे मागे गळ्यात चामड्याचा पट्टा बांधलेला आणि बारा गावचं पाणी प्यालेला त्यांचा कुत्रा शेपूट हलवत मागे मागे धावायचा. गावातली वळु कुत्री त्याच्यावर धावायची. पण हि कुत्री दुसऱ्यांच्या गावात शांत अबोल राह्यची. अंधार पडायला लागला की गावच्या पारासमोर डोंबाऱ्याच्या खेळाचा सेट उभा राह्यचा. तान्हुल्या बाळाला गळ्यात बांधून त्याची धनीण हातात ढोल सदृश्य वाद्ये धरून "बुग्वूss बुग्वूss बुग्वूss” मोठ्याने वाजवायची. वाजणाऱ्या आवाजाने दिवसभर शेतात दमुन् आलेली गडी माणसे जेवणं उरकुन गावाकडे सरकायची.  मोडके खरखर वाजणारे अँलुमिनिअमचे जर्मन सारखे दिसणारे दोन चेपके लाऊड स्पीकर गावाच्या दोन्ही बाजूला लावलेले असायचे. त्याचा स्व:ताच "इलेक्ट्रिकल इंजिनिअर" बनलेला थोरला पोरगा आवाजचं सेटिंग करताना कोपऱ्यात दिसायचा. बारकी बाळी दोरीवरून उड्या मारायची. दोरीवरून चालणारी डोंबारीन बाई म्हणजे लोकांना ती जगातील सर्वात शूर स्त्री वाटायची. रिंगेत शिरायची. कुणी उभ्या आडव्या उडया मारायचं. कुत्रा बारक्या चार पायांचे चंपे एकत्र जमवुन डब्यावर एखांद्या स्थितप्रदण्या सारखा उभा राह्यचा. तिची केस विस्कटलेली आई मगाच्या लेकराला आता गुडग्यात धरून "टान टान " मोठ्याने वाद्ये वाजवायची. वाट्याला आलेल्या कित्येक सुख दु:खांना बाजूला सारत. त्यांचा खेळ बघता बघता बापाच्या खिश्यातून चोरून नेलेली दौलत लहान पोरं या बिऱ्हाडावर उधळायची. मध्यरात्री खेळ संपला कि लोक आप आपल्या घराकडे पांगायचे.

काळ बदलला. खेड्यापाड्यात तंत्रज्ञानाची अफाट प्रगती झाली. घराघरातल्या भिंतीवर एल.सी.डी. टी.व्ही. आले. मोबाईल आले. अशा कार्यक्रमांकडे लोकं फिरकेनाशी झाली. परिणामी वासुदेव, माकडवाला, नंदीबैलवाले, डोंबारी खेड्यातून हळू हळू गायब होत गेले. कुठे लुप्त झाली असतील हि बिऱ्हाडे. खेड्यातून शहराकडे कि आणखी कुठे? एकेकाळी खेड्यातल्या दारो दारी सकाळी फिरणारा नंदी बैलवाला राहिला असेल का अजून जिवंत? गेला असेल का थकुन? चुकून राहिलाच असेल जिवंत तर त्याचा तो व्रतस्थ मान डोलवणारा बैल आणि त्याच्यावरची रुबाबदार बेगड लावलेली शिंगे? काय झालं असेल पुढे त्याचं? की शहरातल्या एखांद्या कत्तलखाण्यात त्याच्या कधी काळी डुलणाऱ्या मानेवर फिरवली गेली असेल सुरी? माणसातल्या हिंस्त्र पशूनी. कुठे हरवली असतील आता ती साऱ्या गावाला रात्रभर उपाशी पोटाने जागून खेळ दाखवणारी डोंबाऱ्याची ती पोरं? आणि रात्रीच्या  अस्पष्ठ अंधारात कर्र कर्र वाजणाऱ्या साऊंड सिस्टिमचे सेंटिंग करणारा तो मळकट कपडयातला चिमुकला पोरगा? जगाच्या बाजारात कुठे तरी आता श्वास घेत असेल का?  कधीकाळी पहाटे गावाला जाग आणणारे वासुदेव आता खेड्यात कधीच येत नाही. कुठे हरवले असतील? वार्धक्याने थकले असतील कि झाली असेल त्यांच्या रापलेल्या देहाच्या सापळ्याची माती? निदान कुठल्यातरी स्मशानभुमीत त्यांच्या हाड़काचा एखांदा तुकड़ा राहिला असेल का शिल्लक? पृथ्वीवर अजुन जगण्याची आस शिल्लक ठेवत..…