Showing posts with label व्यक्तिचित्रे. Show all posts
Showing posts with label व्यक्तिचित्रे. Show all posts

Tuesday, January 8, 2019

एका कोयत्याची गोष्ट

परवा वर्धनगडाचा घाट उतरताना डावीकडं सहज नजर गेली आणि एका साखर कारखान्याची चिमणी आभाळात धूर ओकताना दिसली. अशा जुन्या डोंगरांच्या पायथ्याला महाराष्ट्रात आता कितीतरी चिमण्या दिवस रात्र ऊसाच्या चुया पिऊन धुराडी जाळत राहताना दिसतात. पण यावेळी त्या उंच आभाळातल्या ढगात काळ्याभोर धुरांची वर्तुळे मिसळत जाताना त्यात अचानकच एक मानवी चेहरा तयार होताना दिसला. काही क्षणात त्या चेहऱ्याला अंग फुटलं. हातात कोयता घेतलेला एक मानवी सांगाडा क्षणात नजरेला दिसू लागला. मला खुणावू लागला. हाका मारू लागला. हसू लागला. तो चेहरा होता मुर्गाप्पा मुकादमाचा. होय! मुर्गाप्पा मुकादम. पूर्ण कथा वाचा पुस्तक रुपात.....


Thursday, November 22, 2018

हौसा आक्का

दिवस उगवायच्या आधीच मारुतीला पाणी घालायला गेलेली पवाराची शांता गल्लीतनं ओरडतच आली, "हौसा म्हातारी कवा रातचीच अंथरुणात मरून पडलीया! बघा कि कसलं मराण म्हणायचं हि!" माझे कान गल्लीच्या दिशेने. शरीर अंथरुणात. डोळे नुसतेच सताड उघडे. क्षणात घड्याळ्याचे काटे जुन्या काळाकडे उलटे सरकू लागले. डोळ्यांच्या उघड्या स्क्रीनवर हौसा म्हातारीचा जीवनपट सुरू झाला. हौसा म्हातारी होतीच तशी. भले जिजाबाई सारखी ती आदर्श माता नसेलही. झाशीच्या राणीसारखी तलवार घेऊन रणांगणावर ती कधी लढली नसेलही. सावित्रीबाई सारखं संघर्ष करून तिनं शिक्षण घेतलं नसेलही. तरीही ती त्यांच्याइतकीच लढाऊ होती. जिद्दी होती. करारी होती. तिचं संपूर्ण नाही पण अर्धं संघर्षमय आयुष्य या डोळ्यांना पाहता आलं. क्षणात या साऱ्या गोष्टींच्या आठवणी बनून मेंदूच्या वाटेने खाली सरकत डोळ्याभोवती जमू लागल्या. हौसा म्हातारीच्या शेकडो आठवणी डोक्यात. लिहायला बसलो तर दिवस पुरणार नाही. पण सांगायलाच हवी तिची गोष्ट.

पूर्ण कथा वाचा पुस्तक रुपात.....


©ज्ञानदेव पोळ
प्रातिनिधिक फोटो 

Monday, October 29, 2018

भवितव्य नसलेल्या झुंडी

फाट्यावरून डाव्या बाजूनं गावाकडे वळसा घेतला कि माळावरच्या टेकडीवर दहा-पंधरा घरांची कुंभार वस्ती लागते. या वस्तीवरच्या चार पाच घरातली तरुण पोरं शिकून शहराकडे गेल्यानं त्यांची घरं आता सिमेंट काँक्रीटची बनलीत. बाकीची घरं तशीच जुन्या वळणाची. आत वावरणाऱ्या जुन्या माणसासारखीच. आपलं जुनं पण टिकवून धरलेली. या वस्तीत मध्यभागी मंगलोरी कौलांचं अर्ध कच्च एक पडकं घर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं. बदलाचा कुठलाच वारा अंगावर न पांघरलेल्या त्या घरात पारुबाईचा 'लुकडा शिवा' राहतो. पारुबाई त्याची आई. मोठी धीराची बाई. एकेकाळी नवऱ्याच्या माघारी लहान शिवाला सोबत घेऊन, कुंभाराच्या गरगर फिरणाऱ्या चाकावर मातीच्या भांड्याना ती कोरीव आकार देत बसलेली दिसायची. तिच्या घरापुढच्या मातीच्या चाका भोवती सदैव गाडग्या मडक्यांची रांग लागलेली असायची.

पूर्ण कथा वाचा पुस्तक रुपात.....


©ज्ञानदेव पोळ

Thursday, August 16, 2018

रत्नप्रभा

रत्नप्रभा होतीच तशी. एका क्षणात कुणालाही आकर्षित करून घेईल. नुसतीच लग्न करून नांदायला आलेली. इतकी सुंदर बाई हणमंताला कशी काय मिळाली याची साऱ्या गावभर चर्चा रंगायची. लांबसडक नाक. पाणीदार डोळे, गोलाकार रेखीव चेहरा, चौकटीला टेकेल एवढी उंची आणि मागे पाठीवर सोडलेल्या लांबसडक केसांचा नाजूक भार. ती हसली म्हणजे प्राजक्ताची फुलं सांडल्याचा भास व्हायचा. इतकं देखणं रूप तिला लाभलेलं. जवानीत शिरलेली तरणीबांड पोरं गावाबाहेरच्या तिच्या घरापुढं दिवसभर घुटमळत राहायची. 

पूर्ण कथा वाचा पुस्तक रुपात.....


©ज्ञानदेव पोळ


Friday, June 15, 2018

गोदानानीची बकुळा

पावसाळा आला की सणगराच्या आळीतली गोदानानी आठवते. पदराला चिकटलेल्या चार पोरी आणि सोफ्यातल्या कुडाला बीडी ओढत बसलेला उघडा दारुडा नवरा घेऊन, गळक्या घरावर कोसळणारा अक्खा पाऊस गोदानानी दिवस रात्र घरात झेलायची. बकुळा, जाई, जुई आणि शेवंता अशा फुलासारख्या चार लहान पोरींचं पावसाळ्यात खाण्या पिण्याचं प्रचंड हाल व्हायचं. हाताला काम नसायचं आणि ओल आलेल्या चुलीच्या कोपऱ्यात जळणाचं काटूकसुद्धा नसायचं. दिवस रात्र पाऊस रपरप आणि सोफ्याच्या तुटक्या पत्र्यावर तडतड वाजत राहायचा. दारात पाण्याचा डोह साठायचा. त्यातून वाट शोधता यावी म्हणून पाण्यात दगडाच्या चीफा टाकलेल्या असायच्या. दगडावर पाय टाकायला चुकलाच तर खाली गुडघाभर पाण्यात पाय जायचा. घरा पुढचा उकिरंडा पाण्यात गडप व्हायचा. त्यात रात्रभर डराव डराव बेडकांचा आवाज चाले. रात्र झाली की तिच्या घराच्या उंबऱ्यावर एक सुतळी वातीचा दिवा लुकलुकताना हमखास दिसायचा. अन दिव्याच्या उजेडात आजूबाजूला तिच्या पोरी पाट्या दप्तरे घेऊन बसलेल्या दिसायच्या. बकुळी थोरली असल्यानं सगळ्यांना शिकवायची.

पूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....

मास्तर

मास्तर आता कायमचे शहराकडे आलेत. पण सारी हयात वाड्या वस्त्यांवर तालुका मास्तर म्हणून घालवलेल्या मास्तरांचा जीव काही इकडे रमत नाही. वयाने आता थकलेत. "पण माज्या माघारी हातानं करून खाऊ नका! तुमचं सगळं आयुष्य उपासमारीतच गेलंय! आपल्या पोरांच्याकडं जाऊन रहावा!" असं अखेरचा श्वास घेताना मास्तरीनबाईनी सांगिल्यामुळे मास्तर शहरवाशी झालेत. मास्तरांची दोन्ही मुलं जवळ जवळच राहतात. थोरला ईस्टला तर धाकटा वेस्टला. पण रेल्वेलाईनवरचा तो लोखंडी ब्रिज ओलांडताना काळानुसार मास्तरांचे गुडघे आता भरून येतात. चढताना त्यांना धाप लागते. भर गर्दीत एखाद्या पायरीवर बसून राहतात. शहरात आल्यावर मास्तर धाकट्याकडे होते. नंतर नंतर त्या किचन मधली भांडी वाजल्यावर मास्तर आता सकाळचे थोरल्याकडे जेवतात. संध्याकाळी धाकट्याकडे. थोरला मुलगा मास्तरांशी जास्त बोलत नाही. पण त्याची बायको मास्तरांशी चांगलं वागते. धाकटा पोरगा चांगला आहे पण बायको नाही. तिला आल्या गेलेली घरी नको असतात. सतत धुसपुस करीत राहते. पण मास्तरांचा लेका सुनापेक्षा नातवंडातच जीव रमतो. आता तीच त्यांच्या जगण्याची आधार केंद्रे बनलीत...

पूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....

#ज्ञानदेवपोळ

Friday, December 15, 2017

किसानानी

"आज जायाचा म्हणतुयास तर तेवढं वस्तीवरच्या किसानानीला भेटून ये! तू गावाला आल्यावर घरी पाठवून दे म्हणालीय! थकलीया आता बिचारी!" आईने असे सांगितल्या सांगितल्या मी पायात चप्पला घातल्या अन नानीच्या वस्तीची वाट चालू लागलो. वाट चालता चालता तरुणपणापासून  म्हातारपणापर्यंत जगलेली आख्खी किसानानी डोळ्यापुढे दिसू लागली. मला खुणावू लागली. तिच्यावर आता वाईट दिवस आलेत असं आईनं निघताना सांगितल्यामुळे तर मी अधिकच अस्वस्थ झालो. चालता चालता दोन ठिकाणी ठेचकाळलो. कित्येकवेळा मी लहान असताना आई मला या किसानानीकडे अंडी आणायला पाठवायची. गावात कुठे नाही पण या नानीकडे अंडी नक्की सापडायची.
नानीच्या दारात नेहमी चार म्हशी, दोन रेडकं, एक शेरडी, चांगल्या पन्नासभर कोंबड्या दिसायच्याच. या नानीला सहा पोरी. अन सहा पोरींच्या पाठीवर नवसाने जन्माला आलेला मारुती. आणि या मारुतीच्या जन्मानंतर काळाने उचललेला नवरा. एवढीच काय ती इस्टेट अंगावर घेऊन टेचात जगणारी किसा नानी मी लहानपणापासून पहात आलेलो. आता तुम्ही म्हणाल, “पदराला सात पोरं घेऊन बाई कशी जगली असल.” तर किसा नानी जगली. अन पोरं सुद्धा जगवली. नुसत्या पोरीच पोटाला आल्यावर घराला दिवटा पाहिजेल. या नवऱ्याच्या हट्टापायी किसा नानीनं काय काय केलं नसल.

पूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....

#ज्ञानदेवपोळ 

फोटो सौजन्य: shutterstock.com




Thursday, September 28, 2017

नाना मास्तर

नाना मास्तर म्हणजे एकेकाळी गावची शान. निदान आमच्यासाठी तरी. नाना मास्तरचा केवढा दरारा. स्वातंत्र्याची पहाट व्हायच्या आसपास नाना मास्तरचा सूर्य आमच्या गावात उगवलेला. गरिबीत जन्मला. गरिबीत वाढला. शिकलासुद्धा गरिबीतच. निस्वार्थी माणूस. दिलदार मनाचा. गरिबांची पोरं मास्तरनं पदरमोड करून शिकवली. न शिकणारी सुद्धा ओढून नेऊन शाळेत बसवली. आडल्या नडल्याला मदत करावी तर मास्तरानच. आखाडात पावसाची उभी धार सुरु असावी. नदीचं पाणी पुलाला लागलेलं असावं आणि अशावेळी गरीबाघरच्या अवघडलेल्या बाईला कळा सुरु व्हाव्यात. कुणीतरी मास्तरचं दार वाजवावं. आणि मास्तरनं क्षणात गाडी जुंपून तालुक्याचा दवाखाना गाठावा. कुणाचा भांडण तंटा मिटवावा तर मास्तरानीच.

पूर्ण कथा वाचा पुस्तक रुपात.....

#ज्ञानदेवपोळ
प्रतीकात्मक फोटो

Thursday, August 3, 2017

आभाळातली परी

तेव्हा आमच्या ज्युनिअर कॉलेज्यात जीन्स पॅन्ट घालून डोळ्यावर काळा गॉगल लावणारी पहिली पोरगी म्हणजे “परी”. सगळी पोरं पोरी सायकलवरून नाहीतर फारफार एस.टीला लोंबकळत कॉलेज्यात यायची. जायची. तर ही बया यामहा मोटरसायकलवरून सायलेन्सरचा जोरात आवाज काढीतच गेटमधनं आत शिरायची. अशा या परीवर आख्खं कॉलेज मरायचं. मग आम्ही तरी मागं कसं असू बरं. वाटायचं अशी पोरगी पटली तर आपलं भाग्य उजळणार. आम्ही उगीच काय बाय स्वप्नं पण बघायचो. पण व्हायचं काय परीच्या जवळ जायचं म्हणजे हात पाय आधीच गळायचं. तिच्याशी बोलायचं म्हणजे लवकर जिभच वळायची नाय. ह्रदयाची नुसती धडधड व्हायची. बरीच जण जवळीक करायचे. या ना त्या कारणाने बोलायला बघायचे. पण परी काय कुणाच्या हाताला लागायची नाही. शेवटी आपली अभ्यासात प्रगती बरी असल्याने ही बयाच बोलायला लागली. नुसत्या तिच्या बोलण्यानंच वाटायचं जुळलं...

पूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....


Friday, July 21, 2017

गिरणगावातला जॅबर

सहा महिने उलटलं तरी वरच्या आळीतल्या म्हाताऱ्या जॅबरच्या पोटात दुखायचं काय थांबत नव्हतं. अगोदर गावातला डॉक्टर झाला. मग तालुक्याचा झाला. शेवटी जिल्ह्याच्या डॉक्टरकडे तपासल्यावर पोटात गाठ झालेचं कळालं. तेव्हापासून तर म्हाताऱ्यानं जास्तच हाय खाल्लेली. ऑपरेशन करायचं तर गाठीला पैका नाही. होता तो पोरांच्या स्वाधीन केलेला. दोन पोरं. ती पण बायका पोरं घेऊन मुंबईला. कधी उन्हाळ्यात आली तर चार दिवस आई बापाची भेट. नुसती वर वरची विचारपूस. पण या आजारपणाची जॅबरनं चांगलीच धास्ती घेतलेली. आता तुम्ही म्हणाल जॅबर कधी नाव असतं का? तर असतं. तसं गावातल्या पंचायतीच्या जन्म मृत्यू रजिस्टरवर त्याचं खर नाव दत्तूबा.

पूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....
फोटो सौजन्य: प्रहार

Monday, June 19, 2017

शंकऱ्या घिसाडी




शंकऱ्या घिसाडी पावसाळा सुरु झाला कि बिऱ्हाड घेऊन गावात उतरायचा. त्याच्या तीन पिढ्यांनी जपलेली हि परंपरा. त्याचा झुबकेदार मिशिवाला म्हातारा बाप आधी पूर्वजांची परंपरा चालवायचा. त्याला सारा गाव ओळखायचा. पण तो थकल्यानं आता ही परंपरा शंकऱ्या चालवायचा. अश्या या शंकऱ्या घिसाड्याचं बिऱ्हाड गावात शिरलं कि पहिला कल्लोळ व्हायचा तो कुत्र्यांचा. नक्षीकाम केलेल्या त्याच्या छकडा गाडीवर गोलाकार ताडपत्री टाकलेली असायची. पुढच्या बाजूला “हय हय” करीत शंकऱ्या जोरात गाडी हकलायचा. त्याच्या हडकुळ्या एका-घोड्याच्या गाडीत मागच्या बाजूला डुलणारी कोंबडयाची डालगी, त्याला चिकटून पेंगाळलेली मळक्या देहाची उघडी पोरं, दोन बायका, गाडीच्या मागून काठी खांद्यावर टाकून, रस्त्यानं निघालेल्या जुन्या माणसाना हात दाखवत राम राम घालत चालणारं म्हातारं. अन गाडीखालून पळणारी दोन चवळ्या पवळ्या नावाची तांबडी कुत्री. 

पूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....


 

Monday, May 29, 2017

शामराव

बायको बाळंत झाली अन शामराव गायब झाला. कुणी म्हणायचं सोन्या चांदीची दुकानदारी शिकायला परराज्यात गेलाय. कुणी म्हणायचं राजस्थानात दिसला. आता शेठ झालाय. कुणी म्हणायचं त्यानं आता तिकडच बाई ठेवलीय. पण शामराव काय गावाला कधी नजरं पडला नाही. बायकोनं मात्र नुसत्या आठवणीवर पोटाची खळगी भरण्यासाठी गावाचा रोजगार करून पोरगा वाढवला. पुढ कधीतरी त्याच्या पोराचं लग्न पण झालं. शामरावला नातवंडे झाली. एव्हाना काळाच्या ओघात गाव शामरावला विसरून गेला. पण लेकानं न पाहिलेल्या बापाला शोधायसाठी सारी दुनिया पालथी घातली. बाप पाहिलेली भावकीतली लोकं घेऊन मैलोन मैल रल्वेने प्रवास केला. अन अखेर शामराव जवळ जवळ ५० वर्षानी अजमेरमध्ये सापडला...
...शामराव आता गावात चांगलाच रूळलाय. थकून गेलाय. आतून आटून गेलाय. पाटीनं वाकून गेलाय. परवा छप्पराला कुड घेताना दिसला. अबोल असतो. पण शेवटी बोलता केला. म्हंणला, “सोन्या चांदीची दुकानदारी करणाऱ्यानी घात केला! शेठ करतो म्हणून नुसतच कोळसं फुकायला लावलं. साऱ्या आयुष्याचाच विस्कुट झाला बघ! चाळीस वर्षे तिकड तीन चाकाच्या सायकलीवरून बैलासारखी माणसं ओढायचं काम करून, आतड्यांची भूक भागवली! गुरा ढोरावाणी जनम लाभला बघ!...

Thursday, May 4, 2017

शिवा

तर वयात आल्यापासून ते पन्नाशी गाठेपर्यंत कधीतरी लग्न होईल या आशेवर माळावरच्या तुकाआबाचा शिवा माणदेशापर्यंत सायकलवरून स्थळे हुडकत जायचा. पण अलीकडे गावातल्या तरण्या पोरांचीच लग्ने जमत नाहीत म्हणटल्यावर त्याने हा लग्नाचा जुगार खेळण्याचा नाद सोडून दिलाय. आता दिवसा तो सहसा कोणाच्या नजरेला पडत नाही..

... पण रात्री गावात कुणाच्या लग्नाची वरात वाजली की त्याला प्रचंड बेभान होऊन नाचताना, हसताना, रडताना बघून “त्याला आता वेड लागलय!” असं लोक म्हणतात.

फोटो सौजन्य : दादासाहेब क्सबे








Sunday, March 26, 2017

पांडू पाटील

4 पोरं, 3 पोरी, 21 नातवंडे, 16 परतुंड आणि अजून काही दिवस जगला असता तर खापर परतुंड बघण्याचं भाग्य लाभलेला चालता फिरता माझा आज्जा पांडू पाटील रात्री साडे दहा वाजता मातीत मिसळून गेला. 98 वर्षे जगलेला आणि जुनी चवथी शाळा शिकलेला गावातला शेवटचा दणकट म्हातारा. पण या वयापर्यंत कधी दाताला कीड लागली नाही कि डोळ्याला चष्मा लागला नाही. स्वातंत्र मिळायच्या आधी जन्माला आला तेव्हा राबायला शेताचा एक तुकडा होता आणि राहायला खणभर घर. पण दिवस रात्र राबून पंचवीस एकर जमीन केली. दोन विहिरी पाडल्या. सगळया वावरांचा कोपरा न कोपरा भिजवून काढला, आणि शहरात नोकरी करणाऱ्या पोरांना गावात चार घरे सुद्धा बांधली. म्हाताऱ्यानं प्रचंड गरिबी पाहिली, पारतंत्र पाहिलं, स्वातंत्र पाहिलं, तसं गरिबीनंतर कष्टानं मिळालेलं वैभव सुद्धा पाहिलं. पण खांद्याला खांदा लावून उन्हातान्हातून संसाराची बैलगाडी ओढणारी आणि मध्येच एका वळणावर साथ सोडून गेलेली म्हातारी म्हाताऱ्याला आतून व्याकुळ करत राहिली. पण तरीही म्हातारा वाकला नाही कि मोडला नाही. पण नियतीच्या क्रूर खेळात दोन तरणी ताटी मुलं गेली आणि भुंड कपाळ झालेल्या सुना बघून म्हातारा कोसळला. आपल्या आधीच स्मशानात जळणाऱ्या आपल्या पोरांच्या चिता पाहून म्हाताऱ्यानं केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता...

...पण म्हातारा खचणारा न्हवताच. व्हराडाचा टेम्पो उलटून खाली सापडलेला म्हातारा तुटलेल्या बरगडया छातीला जोडून जीवघेण्या दुःखातून सुद्धा उठला आणि पुन्हा मातीत राबला. खचला नाही की रुतला नाही. न्हवे रुतन्यासाठी तो पृथ्वीवर जन्माला आलेलाच न्हवताच. कित्येक उन्हाळे पावसाळे पाहिलेला म्हातारा साऱ्या दुनियेच्या सुख दुःखात सामील झाला. रोज सकाळी पेपरात मान घालून सारी दुनिया म्हातारा वाचून काढायचा. यात्रा जत्रा करत काल परवा पर्यंत एकटा फिरत राहिला. ना कुणाचा जगण्यासाठी आधार घेतला, ना कुणाकडून सेवा करण्याची अपेक्षा. कधी अंगाला सुई टोचली नाही कि पोटाला औषध गोळ्या लागल्या नाहीत. कि शरीराला व्यसन लागलं नाही. मला शंभर वर्षे काय होणार नाही अशी जगण्याची इच्छाशक्ती असलेला म्हातारा काल नियतीने पाठवलेला पहिला आणि शेवटचा हार्ट आट्याक मात्र पचवू शकला नाही. आजूबाजूला प्रचंड वारा खेळत असतानासुद्धा शेवटी म्हातारा पांडू पाटील एका श्वासाला महाग झाला...


Thursday, December 22, 2016

आशाताई

खालच्या बाजूच्या डोंगराआड दिवसभर थकलेला सूर्य सायंकाळी बुडाला. तशी चांदणी उगवायला शेतात धावलेली माणसं लगबगीनं घराच्या वाटंला लागली. ओढयातलं वाहणारं पाणी पिवून माळावरच्या कुरणात दिवसभर चरायला गेलेली गुरंढोरं गळ्यातल्या घंटा वाजवीत घराच्या ओढीनं, शेपटया हलवित आपापल्या गोठ्याकडं पळत सुटली होती. पांदीतून निघालेल्या बैलांच्या हंबरण्याचा आणि बैलगाडयांच्या चाकातील धावाचा दगड धोंड्यावर आपटून खडाखड़ आवाज निघत होता. पाखरांचे उंच उंच थवे गगनचुंबी झोके घेत नदीकडं उड़त चालले होते. चाल न उरकलेल्या म्हाताऱ्या कोताऱ्या बायका लुगड्याच्या ओटयात तांदळीची भाजी घेवून रानातल्या बांधावरुन आणवाणी पायानी चिखल तुडवित घराकडे चालत निघाल्या होत्या. मळ्याची पायवाट तुडवत डोक्यावरुन आणलेला ओल्या वैरणीचा बिंडा मी अंगणात गोठयाच्या कुडाला लागून फेकला. परसात कीडे टिपणाऱ्या कोंबड्या अंधार शिरलेल्या खुरुड्याकडे धावायला लागल्या होत्या.

पूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....

Monday, September 19, 2016

लव्हाराचा शिवा


ऐन थंडीचे दिवस असायचे. धुक्यानं पांदीतली झाडं झुडपं, कौलारु घरं आणि नागमोडी वळणाच्या रस्त्यानी दवबिंदूची पांढरी झालर पांघरलेली असायची. घराघरातली चुलवानं पेटून त्यातून उठलेले धुराचे लोळ कौलारु पाक्यातनं उसळत बाहेरच्या धुक्यात मिसळून जायचे. हिरव्यागार झालेल्या शिवारातल्या पिकावर पडलेले दव खाली सांडायला सुरवात झालेली असायची. अशा पौषातल्या जीव खाणाऱ्या थंडीत लव्हाराचा शिवा भल्या सकाळी माणूस गोठवणाऱ्या नदीत अंघोळ करायला उतरायचा. अंघोळ करुन पिळलेली चड्डी डोक्यावर टाकून खांद्यावर पाण्याची पितळेची कळशी घेवून नदीची डगरट चढून घराकडं येताना दिसायचा.

पूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....

फोटो सौजन्य  maayboli - आशूचँप


चंदू

आजही कधी कधी ते बालपणीचे खेळ आठवले की मी सुन्न होतो. डोळे मिठून पुन्हा त्यात दंग होवून भराऱ्या घेत राहतो. क्षणात शेकडो मैल दूर असणाऱ्या गावच्या बोळाबोळातुन, माळरानावरून, नदीवरून, अन साऱ्या शिवारातून फेरफरका मारून येतो. कधी काळी त्या गावच्या इंच इंच जमिनीच्या अंगाखांद्यावर खेळणारे, आटापाट्यांचा खेळ खेळत बागडणारे असंख्य जीव आता खऱ्या जीवनाच्या आटया पाटयांचा खेळ खेळायला पृथ्वीच्या चारी दिशांना दूर निघून गेलेत. मिटलेल्या डोळ्याभोवती असंख्य जीव मला पुन्हा साद घालू लागतात.

पूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....

फोटो सौजन्य: प्रहार

Monday, August 15, 2016

माळावरची काशीबाई

गावापासून हायस्कूलच्या शाळेत रोज मी चार किलोमीटर कच्या रस्त्यानं अणवाणी पायानं चिखल तुडवत, नाहीतर फुफाटा उडवत चालत जायचो. ओढ़ा ओलांडून पुढं गेलं की सारा हिरवागार माळ लागायचा. या माळावर नेहमी खाली मुंड्या घालून गुरं ढोरं चरताना दिसायची. त्यांच्या पाठीवर बगळे नाहीतर कावळे डुलत बसलेले हमखास दिसायचे. रस्त्यावर माणसांची अशी वर्दळ आजीबात नाहीच. अश्या या हिरव्यागार माळाकडं बघत एका हातात कापड़ी पिशवीत दप्तर घेवून एखांदा विचार डोक्यात घेवून मी शाळेची वाट चालू लागायचो. तिथच माळावर रस्त्याच्या कडेला आठ दहा घरांची एक वस्ती लागायची. वस्तीच्या भोवती झाडांची बरीच गर्दी होती. तेथून जाताना बरं वाटायचं. कधी कधी त्या झाडांच्या सावलीत बसल्यावर पुढे जावूच वाटायचं नाही. रस्त्याशेजारी तिथल्याच एका खणभर घरात गाडग्या मडक्यांचा संसार करीत साठी ओलांडुन गेलेली एक बाई एकटीच राहयची. काशीबाई तिचं नाव.

पूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....



Thursday, July 28, 2016

छप्परातला दिन्या



घरात तीन बारकी पोरं. एकटयाच्या मजुरीवर त्याचा छप्परातला प्रपंच कसातरी रडत कुढत चालायचा. पावसाळ्यात हाताला काम मिळायचं नाही. मग दिन्याच्या पोटासकट बायका पोरांचं प्रचंड हाल व्हायचं. पावसाळ्यात नुसताच माडगं पिवून दिस ढकलायचा. पण जगायचा. रडायचा नाही. हलत राह्यचा. कुणी "जेवलास का रं दिना" विचारलं की मोठ्यांनं खोटाच ढेकर देवून वातावरणात जेवल्याचा आभास निर्माण करायचा. पावसाळ्यात कुणी हाक दिली की दिन्या कुणाच्या घरावरची काैलं बसवून द्यायचा. कुणाचं छप्पर शेकरायचा. कुणाच्या गोठ्याला कूड बांधून द्यायचा. तर कुणाच्या घरासमोर जळनासाठी लाकडं फोडून ढीग मारायचा. कधी नुसत्या चहावर नाहीतर एकवेळच्या जेवणावर असली कामं करुण द्यायचा. कुणाच्या कामाला कधी नाही म्हणायचा नाही. नदीला पुराचं पाणी चढ़लं की सारं गाव खालच्या अंगाला असलेल्या नदीकडं सरकायचं. पण दिन्या उलटा ओढ़याकडं सरकायचा. त्याच्या मागं मी पण पळायचो. हा ओढ्याकडं गेला की बायको छप्परातल्या कोपर्यात पाटयावर मसाला वाटत बासायची. खांद्यावर एक जाळी अन हातात मोड़की छत्री घेवून ओढ्याच्या पुलावर उडणारं मासं पकडायचा. पुरात शिरून करंजीच्या झाडाचा आसरा घेवून जाळं लावायचा नदीला पूर चढला की नदीचा मासा ओढयाला चढ़ायचा. कधी कधी पुरात वाहत आलेला एखान्दा साप येवून दिन्याला धड़कायचा. पण दिन्या पृथ्वीवर असलेल्या कुठल्याच सजीव जीवाला घाबराचा नाही. सापाला हातात धरून गरगर फिरवून गढुळलेल्या पुराच्या पाण्यात अलगद फेकायचा. धोतराच्या फडक्यात पकडलेलं मासं गुंडाळून वर्षानुवर्षे अंधार बाळगून बसलेल्या त्याच्या छप्परात नेवून बायकापोरांना शिजवून घालायचा. भूक शांत झाल्यावर बाहेरच्या पावसाळी अंधारात रस्त्यावर येवून कुणी माणूस दिसलं की कधीतरी खरा ढेकर पण द्यायचा...
...गावाला आलोय. रात्रीपासून प्रचंड पावूस कोसळतोय.ओढ्याच्या काठावर एकटाच बसलोय. वेडयासारखा कालपासून दिन्याला शोधतोय. ओढ़याला प्रचंड पूर आलाय. मासा चढलाय. पण दिन्या कुठाय? खरच कुठाय दिन्या? कुठं गेला असेल? अख्या पृथ्वीवर कुठल्याच सजीव जीवाला न घाबरणाऱ्या दिन्याला या ओढ्यानं का पोटात घेतला असल. दिन्या तू पट्टीचा पोहणारा होतास! मग असा कसा बुडून मेलास? छे! छे! तू मेला नाहीस दिन्या! तो बघ समोरच्या करंजीच्या झाडात जाळं टाकताना तू मला अजुन स्पष्ट दिसतोस. तो बघ! तो बघ! पलिकडून हिरवा साप वाहत येतोय. पकड़ पकड़ दिन्या चावल तुला!! घे झेप त्याच्यावर अन दे भिरकावून गरगर याच पुरातल्या पाण्यात. साऱ्या गावासाठी तू मेला असचिल. कदाचीत तुझ्या आजही गळणाऱ्या त्या छप्परातील तुझ्या बायका पोरांसानठीसुद्धा तू आता मेला असचिल. पण तू माझ्यासाठी अजुन जिवंत आहेस. तुझ्या धोतराच्या फडक्यात मासं गुंडाळून झालं की सांग मला दिना. तुझ्या हातचं मासं आज मी खाणार आहे. मी जिवंत करणार आहे आज दिन्या तुला. लोकं मला शिव्या घालताहेत रे! तुमच्या रंगवलेल्या नाटकांचा शेवट कधीतरी गोड करा म्हणून? माफ कर मला दिन्या ? तू अजुन जिवंत आहेस म्हणून खोटच सांगू का रे या आभासी जगात जगणाऱ्या फेसबुकवरील लोकांना...

फोटो सौजन्य:प्रहार