Showing posts with label विनोदी. Show all posts
Showing posts with label विनोदी. Show all posts

Friday, February 10, 2017

ट्रम्प तात्या निघाले प्रचाराला....


व्हाईट हाऊसच्या दारावर पोस्टमनने बेल वाजवली तसं मेलानिया ट्रम्प बाईनी भाकरी थापता थापता कडी काढून दार उघडलं. पोस्टमन कडून घेतलेलं पत्र चुलीपुढं बनियन लुंगी लावून गरम भाकरी अन पिटलं खात बसलेल्या डोनाल्ड तात्यांच्या हातात दिलं. डोळे मिचमिच करीत आणि तोंडातला भाकरीचा घास गिळत गिळत ट्रम्प तात्यानी एका दमात ते वाचून काढलं.
“काय वं काय लिवलय! जरा मोठ्यानं वाचून दाखवा की?” मेलानिया बाईनी परातीत थापलेली भाकरी तव्यात टाकत प्रश्न केला.
“मुंबई मधून पत्र आलय! निवडणुकीच्या प्रचाराला या म्हणून!” ताटात हात धुवून लुंगीला हात पुसत पुसत ट्रम्प तात्या बायकोकडं बघून म्हणाले. तसं सकाळी सकाळी मेलानिया बाईनी व्हाईट हाऊसमध्ये तोंडाचा पट्टा चालू केला, “तुमी तिकडं नको जायाला! काय बी बोलून बसाल तुमी! शहाणी नाहीत तेथली लोकं!” बरीच बाचाबाची झाल्यावर अखेर मेलानिया बाई तात्यांना भारतात पाठवायला तयार झाल्या...

“कुकुक कुss...” करीत व्हाईट हाऊसमध्ये दुसऱ्या दिवशी पहाटे कोंबड्याने बाग दिली. तशी जागं झालेल्या मेलानिया बाईनी गडबडीनं घोरत पडलेल्या ट्रम्प तात्यांना हलवून जागं केलं. पोरगं अजून झोपलेलच होतं. बाहेर गोठ्यात झोपलेला गडी केव्हाच उठला होता. गुरांचं शेणघाण करून रात्री मालकीणबाईनी सांगितल्याप्रमाणे तो लवकर उठून पाण्याच्या बंबाला जाळ घालीत बसला होता. तात्या बाहेर येताच गड्यानं न्हाणीत गरम पाण्याची बादली नेवून ठेवली. ट्रम्प तात्यांनी व्हाईट हाऊसच्या बाहेरच्या हिरवळीवर एक मस्तपैकी धावत धावत राऊंड मारला. गोट्यातल्या डालग्यात कोकाणाऱ्या कोंबड्या सोडल्या. आणि न्हाणीत जाऊन अंघोळ उरकली. गड्याला भारतात प्रचाराला निघालोय म्हणून सांगितलं. आणि वरच्या तालीतल्या ऊसाचं पाणी संपलं की खालच्या मळ्यात मकंला पाणी धरायला विसरू नकोस असंही सांगितलं. घरात शिरत शिरत मागं वळून व्हाईट हाऊसवर पण लक्ष ठेवायला सांगितलं.
मेलानिया वहिनीनी तोपर्यंत चहाला कड आणलेलाच होता. गडबडीनं लुंगी अन बनियन घालून स्वयंपाक खोलीत आलेल्या ट्रम्प तात्यांना कप भरून चहा अन सोबत दोन पावबटर खायला दिले. “किती करतेस तू माझ्यासाठी? थकून जातेस! कामाला एखांदी बाई का नाहीस ठेवत!” असं चुलीपुढं बसलेल्या बायकोला ट्रम्प तात्या म्हणाले. अन परत मेलानिया बाईंचा तोंडाचा पट्टा सुरु झाला, “त्या मोनिका लेविंस्कीनं पांग फेडलाय की या वाड्याचा एखदा! आता या वाड्यात दुसरी बाई म्हणून मी तुमच्या नजरंला पडू देणार नाही! नाहीतर त्या क्लिंटनचा वाण नाहीतर गुण यायचा तुमच्याच!” ट्रम्प तात्यांनी डोळे मिचमिच करीत गपगुमान चहा बटर संपविला अन भारतात निघण्याची तयारी सुरु केली...
दिवस कासराभर उगवून वर आला होता. व्हाईट हाऊसवर सूर्याची कोवळी किरणे पसरत चालली होती. लोकं कामधंद्यासाठी हिंडू फिरू लागली. काहीजण वॉशिंग्टनच्या मळ्याकडं धारंच्या किटल्या घेवून निघाले. गाई गुरे न्युयार्कच्या डोंगरावर हिंडायला निघाली. व्हाईट हाउसच्या पुढच्या राशन दुकानावर लोकांनी गर्दी केली. मेलानिया वहिनीनी न्युयार्कच्या आठवडी बाजारात घेतलेल्या दोन नव्या कोऱ्या लुंग्या, दोन बनियन, अंडरप्यांटा, पाच सहा ढगळ्या प्यांटा, पट्या पट्याचे दहा बारा शर्ट, दाढीचे सामान आणि चार ब्लेझर सुटकेसमध्ये कोंबले. पण सुटकेसचं दार काय बसेना. “आवं नुसतं बघत काय बसलायसा! बसा की हिच्यावर?” ट्रम्प तात्यांच्याकडे बघत वहिनीनी आवाज टाकला तसं ट्रम्प तात्यांनी सुटकेसवर आपला बुड टेकलं अन खटदिशी सुटकेसचं दार बंद झालं. आणि “बाहेरचं लई कायबाय खाऊ नका! तिकडं मंबईत भय्यं उघड्यावर काय बी विकत्याती! त्येन्ची पानीपुरी तरी आज्याबात खावू नका! एका बी बाईकड वर तोंड करून बघू नका! अन ही धन्याची पुडी हे लिंबू या वरच्या ब्यागत टाकतीया! लक्षात असुंद्या!!” मेलानिया बाईच्या शंभर प्रश्नाना झेलत अखेर ट्रम्प तात्या व्हाईट हाऊसच्या बाहेर आले. गड्याने बैलगाडी जुंपुन तयार ठेवलीच होती. त्याने ब्यागा गाडीत चढविल्या. ट्रम्प तात्यांनी मेलानिया बाईंचा आणि आपल्या छोट्या बैरन ट्रम्पचा कचकून मुका घेतला. अन वॉशिंग्टन मधल्या व्हाईट हाऊसला मागे टाकत रस्त्याने धुरळा उडवीत आणि गळ्यातल्या घुंगरांचा आवाज करीत बैलं बंदराच्या दिशेने धावत सुसाट सुटली. ट्रम्पसाहेबांचा कुत्रा वाकडं शेपुट हलवत गाडीच्या खालून चालू लागला. आणि मागे गाडीच्या बावकांडाला धरून रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा नमस्कार स्वीकारत ट्रम्प तात्यांचा प्रवास सुरु झाला...

अखेर बऱ्याच दिवसांचा प्रवास करुन ट्रम्प तात्यांची बोट मुंबईत गेट वे च्या बंदरावर पोहचली. सगळ्याच पक्षांचे नेते बैलगाड्या घेवून ट्रम्प तात्यांना आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी न्यायला आलेले. जो तो पुढे होवून ट्रम्प तात्यांना ओढू लागला. पण पवार साहेब जवळ गेले अन हळूच कानात कायतरी पुटपुटले. तसं ट्रम्प तात्या ब्यागा घेवून पवार साहेबांच्या गाडीत जावून बसले. पवार साहेबानी ट्रम्प तात्यांच्या डोक्यावर लाल फेटा बांधला. कपाळावर गुलाल लावला. अन बैलगाडी धुरळा उडवत पांदीतुन मुंबई ग्रामपंचायतीच्या दिशेने सुसाट सुटली. पुढं हलगीवाले अन पिपाणीवाले सुर धरून वाजवू लागले. बाजूला समुद्रावर कोळी माशासाठी जाळं टाकायला निघालेले दिसत होते. पुढं बाजूंनी हिरवेगार ऊसाचे फुललेले मळे दिसत होते. व्हिक्टोरिया स्टेशनच्या मळीला गाई गुरे चरत होती. नरीमन पोईंटच्या रिकाम्या माळरानातल्या बाभळीच्या झुडपावर शेरडं तुटून पडली होती. मुंबईत सुगीचं दिवस असल्यानं गडीमाणसं रानात राबताना दिसत होती. कापड गिरण्यात काम करणारे रात्रपाळीचे लोक घराकडे परतत होते. अन उन्हानं लालबूंद झालेले ट्रम्प तात्या डोळे भरून सगळा नजारा मिचमिचत्या डोळ्यांनी टिपत होते. अखेर बैलगाडी मुंबई ग्रामपंचायतीच्या समोर येवून थांबली. पारावर खच्यून गर्दी जमलेली. वडाच्या पारावर स्टेज बनविलेलं. दोन मोठे कर्णे गावाच्या दिशेने जोडलेले. पवार साहेबानी पाव्हण्याची ओळख करुन दिली. अन पाव्हण्यानं झाडून भाषण ठोकलं. सगळी माणसं भारावून गेली. त्यात्यांचे देखणे रूप आपल्या नजरेत साठवू लागली.
भाषण संपल्यावर बैलगाड़ी पवार साहेबांच्या मळ्याकडं निघाली. गाड़ी सुसाट गोटयाला आली. तात्यांना बसायसाठी पवार साहेबांनी गोट्यातलं बाजलं बाहेर काढलं. पवार साहेबांचं ऊसाचं गु-हाळ चालू होतं. ट्रम्प पाव्हण्याना दणकून भूक लागलेली. पवार साहेबानी तांब्या भरून ट्रम्प पाव्हण्याना रस पाजला. गरम गरम काकवी पाजली. अन गरम गुळात ऊसाची एक कांडी भरवून तोंडाला दिली. ट्रम्प पाव्हण्यानी बघता बघता चिक्कीचा फडशा पाडला. पवार साहेबानी पाव्हण्याना मसाला पान बनवून दिले. आणि गोट्यात गुरांची वैरणकाडी करू लागले. ट्रम्प तात्या बांधावर पिचकारी मारत फिरू लागले. इतक्यात ऊसात कायतरी हलू लागलं. पाव्हण्यानं पवार साहेबांना घाबरुन हाका मारायला सुरवात केली. तसं पवार साहेबांनी गोट्याला आड़वं पडलेलं कुत्रं "छो छो" करुन ऊसात सोडलं. अन आतून रस पिवून पोट बिघाडलं म्हणून हागायला बसलेलं निरुपम बोंबलत बाहेर आलं. अन एकच हशा पिकला...

निवडणुक उद्यावर आली होती. ट्रम्प तात्यांचा प्रचार संपला. आणि दुसऱ्याच दिवशी मुंबई ग्रामपंचायतीच्या दहा वार्डातली निवडणुक सुरळीत पार पडली. कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नाही. पण पवार साहेबानी आपल्या पक्षाचाच सरपंच मुंबई ग्रामपंचायतीच्या गादीवर बसविला. मग मुंबईच्या आठवडी बाजारातून ट्रम्प तात्यानी मेलानिया बाईसाठी दोन "लुगडी अन चोळी" खरेदी केली. छोट्या बैरनसाठी एक छानसा "संग्राम ड्रेस" घेतला. अन पवार साहेबानी ट्रम्प तात्यांना संपूर्ण पोशाख करुन अखेरचा निरोप दिला. आणि ट्रम्प तात्यांची बोट समुद्राचं पाणी कापीत अमेरिकेच्या दिशेने धावू लागली.



Tuesday, December 20, 2016

मेपलदादाची घरे

अंधार पडायला लागला तश्या पुण्याच्या वेशीतनं मेपलदादाच्या बैलगाड्या आत शिरल्या. गाडीतून कोणतरी मोठ्यानं ओरडत होता,
"खुशखबर खुशखबर खुशखबर
घ्याल तर हसाल न घ्याल तर फसाल भविष्यात शेजाऱ्याला विचारत बसाल. कुठं पण घ्या वर हड़पसरच्या माळावर घ्या नाहीतर खाली कर्वे नगरच्या पांदीत घ्या. हे पण नाहीच जमलं तर कात्रजच्या डोंगरात घ्या. पण घरं घ्या घरं. स्वस्तात घरं". तशी पुण्याच्या पेठा पेठातली माणसं खाली मुठा नदीच्या दिशेने पळत सूटली. तुडूंब भरलेल्या मुठा नदीच्या काठावर मेपलदादान बैलगाड्या सोडल्या. नदीत बैलास्नी पाणी पाजलं. आणि मेका ठोकुन् कासऱ्यानी गाठी आवळून बैलं गवतात बांधली. लकड़ी पुलाच्या खाली वडाच्या झाडाला मोठी बत्ती बांधली हुती. तिच्या उजेडात समदी माणसं मांड्या घालून माना वर करुण पुढं घोंगड्यावर बसलेल्या गोऱ्यापान तरण्याबांड मेपल दादाकडं बघत हुती. शेजारी पुण्याचे पाटील बसले होते. पाटलानं हात वर करताच मघापासून चाललेली सगळी कुजबूज थांबली. तसा मेपलदादा उठून बोलायला लागला," लोक होे, तुम्ही आता मातीच्या घरात आणि मोडकळीस आलेल्या जुन्या वाड्यात राहून राहून कंटाळला आहात हे आम्हाला माहीत आहे. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी एक चांगली योजना घेवून आलो आहोत. फक्त 50 हजार रुपयात आम्ही तुम्हाला पुणे गावाच्या चारी बाजुनी सिमेंटची घरे बांधून देणार आहोत. तर उदया संध्याकाळ पर्यंत जे लोक रोख 5 हजार आणि सोबत अर्ज जमा करतील त्यांना दिवाळी पर्यंत नक्की घरे बांधून मिळतील हे आमचे वचन आहे. हवे तर पाटलांना विचारा", तसं पाटलानं परत एखदा तोंडातील पान चघळत समोरच्या गर्दिकडं बघुन हात वर केला तश्या लोकांनी आनंदान माना हलवल्या...
...दुसऱ्या दिवशी सकाळी शनिवार वाडयासमोर मोठा आठवडी बाजार भरला होता. पुण्यात नुस्ताच सुगिचा हंगाम संपला होता. अर्ध्या पुणेकरानी घरातील सर्व किडूक मिडूक बाजारात विकून अंधार पडायच्या आत नदीत पालं ठोकुन बसलेल्या मेपलदादाकडं पैसे नेवून जमा केलं. मेपल दादाच्या पत्र्याच्या पेटया पैशांनी खच्चून भरल्या होत्या. आता चांगलाच अंधार पडू लागला होता. कामगारांनी नदीत बांधलेली बैलं सोडून गाड्या जुंपल्या. पैशांनी भरलेल्या पेठया मजुरानी गाडीच्या बावकांडाला आवळून घट्ट बांधल्या. मेपलदादान वाकून सगळ्यासनी हात जोडून रामराम केला. आणि गाड्या अंधारातून खड़ खड़ करत धुरळा उडवित मुंबईच्या दिशेने सुसाट सुटल्या. अन पुढच्या दिवाळीत स्वस्तात घर बांधून मिळणार म्हणून माणसं आनंदान आपापल्या घराकडं वळली.....
....दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गाड्या मुंबईत पोहचल्या. गेट वे ऑफ इंडीया जवळ रात्रीच्या शांत काळोखात गाड्यां खाड़ खाड आवाज करीत थांबल्या. तसा "डॉन का इंतजार तो ग्यारा मुलकोंकी पुलिस कर रही है, लेकिन डॉन को पकडना मुश्किलही नही नामुमकिन है" अशी ख्याती असलेला आणि मेपल दादाला पैसे कमविण्याची ही सगळी आयडीया देणारा मल्यांचा विजयदादा, कोळ्यांच्या वेशात लपून बसलेल्या बोटीतुन हसत हसत बाहेर आला. पैशांनी खचा खच भरलेल्या पत्र्याच्या पेटया बोटीत चढवल्या. आणि पुण्याच्या दिशेला तोंड करुण हाताच्या मुठी गुढघ्या पर्यंत वाकवून वर उचलत मोठ्यांन ओरडला," पहिलं बी पैसं घ्या काढून, अन आता ही बी पैसं घ्या काढून."
आणि समुद्र कापीत बोट लंडनच्या दिशेने अंधारातून धावत सुठली…….


Monday, December 19, 2016

माल्या उडाला भुर्रर्र

त्येला बायको म्हनली... "घरात तेल, मीठ, राशन सगळ संपलया. डोक्यावर कर्जाचा बोजा करुण ठिवलायसा. देणंकरी रोज दारापुढं यिवुन ठान मांडत्यातीय. त्या आकाशात उड़वायच्या खेळनाच्या नादाला लागू नका म्हणत हुती.पण माझ ऐकल नाय. दारु यिकुन बायका नाचवल्या. लाकडाच्या फळीनं चेंडू उडवून कुठं कर्ज फिटलेल ऐकलय का? पैसा हुता तवर त्या तरण्या सटव्यांचं मुकं घेत सुटला हुतासा. आता सावकार लोक तुम्हासनी कोर्टात खेचत्याली तवा तुमच डोळं उघड़त्याली.
मग बसा खड़ी फोडत."
बायकोच गुराळ ऐकून मग हेला चांगलाच राग आला. हातात कुदळ घेतली. घरात पुरुन ठेवल्यालं 9 हजार रूपये यानं उकरुंन काढल. पिकलेली दाढ़ी खाजवत ईचार करायला लागलं. हेच्या डोळ्यापुढं लाल केसाच्या भोऱ्या बायका दिसाय लागल्या. त्येच्या मारी ह्या कटकटीतंन कायमचच बाहिर पडूया म्हणल. पैसं गटूळयात बांधल. सायकलवर टांग टाकली. अन बायकोला म्हणल. ज़रा तालुक्याच्या गावासन जावुन यितु. आठवडी बाजार हाय. तिकडं नविन माल स्वस्त मिळतु. मग ह्या बहादरानं मम्बई गाठली. अन तिकडून आकाशात उड़वायच्या खेळनात बसून भुर्रर्रर्रर्रर करत लंडनला उतरलं. तिकडून भारताकड त्वांन्ड केलं. अन हाताची मुठ वाकडी करुन देनंकऱ्यासणी मोठ्यानी म्हंनल, "घ्या काढून पैसं आता".