Showing posts with label लघुकथा. Show all posts
Showing posts with label लघुकथा. Show all posts

Monday, October 1, 2018

नाना देसाई

सारी दुनिया पुढं गेली तरी नाना देसाई अजून जुन्या काळातच जगतोय. नानाला भेटलं कि कधी कधी वाटतं. एकेकाळी नांगरटीसाठी त्यानं आणलेला घरातील एक जुनाट दोरखंड बाहेर काढावा. तो नानाच्या कमरेला घट्ट बांधावा. आणि अलगद त्याला त्या जुन्या काळातून या नव्या जगात ओढून घ्यावा. पण नानाला असं अलगद ओढून नव्या जगाशी जोडणं तितकं सोपं नाही. का नाही ते पुढं सांगत जाईलच तुम्हाला. पहाट संपून गावावर तांबडं फुटावं. दिवस उगवावा. पाखरं घरट्यातून उंच आकाशी उडावी. गुरं ढोरं चरायच्या ओढीनं पांदिला लागावी. अजून कडाक्याची थंडी गावावर पसरलेली असावी. अशा अंगाला चावणाऱ्या थंडीत माणसं घरोघरी शेकोट्या करून बसलेली असावी. आणि दाट धुक्यातून वाट काढत अचाकन अंथरुणावर येऊन कुणीतरी आवाज द्यावा. " उठा कि वं उजाडलं आता! तेवढी कुळवट करून घेतली पाहिजेल! शाळवाचं रान पेरायला लागलं!" होय! हा आवाज देऊन सकाळी झोपेतून उठवायला आलेली आणि मळ्यात कुळवावर बसायला चला म्हणून सांगणारी व्यक्ती नाना देसाईंच असायची. 

पूर्ण कथा वाचा पुस्तक रुपात.....


©ज्ञानदेव पोळ



Tuesday, September 11, 2018

सोनाबाई

धनगर वाड्याच्या बोळातनं वळसा घालून थोडंसं पुढं गेलं की एका उंचवट्यावर एक पडकं घर दिसतं. घराचं निम्मंअर्ध आडं आता खाली निसटलय. भिंतींनी केव्हाच धर सोडलीय. भिंतीतल्या चार-दोन तुळ्या मात्र अजून तग धरून आहेत. एकेकाळी त्या तुळ्यावर लिहिलेली ठळक अक्षरे आता पुसून गेलीत. घराच्या पडक्या भिंतीवर पावसाळ्यात हिरव्यागार गवतांचे झुपकेच्या झुबके उगवलेले दिसतात. गार वारं सुटलं कि वाऱ्यासोबत तेही डुलू लागतात. त्यावर धनगर वाड्यातली शेरडं करडं कधी कधी उड्या मारत हिंडताना दिसतात. आत पडक्या भिंतीचा आडोसा धरून एक व्यालेली फिरस्ती कुत्री तिच्या चार पाच काळ्या पांढऱ्या पिलांना थानाला लावून डोळे मिठून सुस्त पडलेली दिसते. एकेकाळी हे घर धन धान्याने आणि सुबत्तेने भरलेले असायचे. त्या घरात राहणारी खमकी बाई आयुष्यभर टेचात जगली. 

पूर्ण कथा वाचा पुस्तक रुपात.....


©ज्ञानदेव पोळ


Tuesday, July 24, 2018

चंदू नाईक


सारं गाव म्हणायचं त्याच्याएवढा धाडसी माणूस अजून पंचक्रोशीत जन्माला आला नाही. तो होताच तसा. अंगानं पिळदार यष्टीचा. डाव्या हातात पितळेचे एक कडं. गळ्यात काळ्या दोऱ्याला लोंबकळणारी कुठल्या तरी देवीची मळकटलेली मूर्ती. झुबकेदार मिशा. रंगाने म्हणाल तर काळाकुट्ट गडी. पण एका दमाला पाच सात भाकरी मुरगळायचा. होय! चंदू नाईक त्याचं नाव. गावाच्या बाहेर असलेल्या मातंगवाड्यात स्वातंत्र्याच्या आधी कधीतरी एका पावसाळ्यात तो जन्मला. तिथल्याच दाटीवाटीने दबलेल्या बोळात तो वाढला. 

पूर्ण कथा वाचा पुस्तक रुपात.....





Wednesday, April 11, 2018

दमयंती

एका सकाळी पेपरची पाने चाळताना मधल्या पानावर एक छोटीशी बातमी दिसली, "विष पिऊन तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न." एकदम हादरलोच. आता तुम्ही म्हणाल यात नवल वाटण्यासारखं काहीच नाही. मरण स्वस्त झालेल्या देशात अशा बातम्यांनी रोज वर्तमानपत्रांची कितीतरी पाने काठोकाठ भरलेली असतात. पण मी मात्र तीच बातमी पुन्हा पुन्हा वाचू लागलो. हवं तर तुम्ही मला वेडा माणूस म्हणा. नाहीतर आणखी काहीही म्हणा. पण त्या तरुणीच्या नावाजवळच मी पुन्हा पुन्हा फिरू लागलो. गावाचं नाव वाचू लागलो. गावही तेच होतं. पळसगाव. झर्रकण मेंदूच्या पोटात शिरून तळात गेलो. त्यातील त्या व्यक्तीला शोधू लागलो. अखेर एका कोपऱ्यात पोहचल्यावर माझा शोध थांबला. तळात सापडलेली आणि पेपरमध्ये उमटलेली ती व्यक्ती होती, "दमयंती उमाजीराव जहागीदार". पहिल्यांदा आयुष्यात कधी भेटली? नेमकी केव्हा भेटली? कि मीच तिला भेटलो? यातलं मला काहीच आठवत नाही. पण माझ्या सबंध बालपणाच्या आयुष्यावर तिच्या आठवणींचं पांढरं फिकट धुकं पांघरलेलं आहे हे मात्र खरं आहे. मी पुन्हा तिच्या आठवणींच्या धुक्यात हरवलो. 

पूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....

Photo: thealternative.
#ज्ञानदेवपोळ

Tuesday, March 27, 2018

दोन जगे

दिवस उगवायला नाना परळ एस.टी तून गावाबाहेरच्या फाट्यावर उतरले अन गठुळं घेऊन चालू लागले. फाट्यापासून मैलभर चालत गेलं की डोंगराच्या उताराला हजारभर लोकवस्तीची आपली सुळेवाडी येणार या आनंदात ते झपा झपा पावले टाकत चालू लागले. मुरुमाड रस्ता असल्यानं पायाला ठेचा लागत होत्या. विचाराच्या तंद्रीत वाडीबाहेरचा ओढा ओलांडून नाना गावात शिरले. गल्लीबोळातून सकाळी माणसांची कामधंद्यासाठी लगभग चाललेली. दुधाची गाडी गावतलं दुध गोळा करून गावाबाहेर पडत होती. नानाच्या डोक्यावरचं गठुळं बघून येणा जाणारा एखादा विचारायचा, "नाना लेकाकडून एवढं मोठं कशाचं गठुळं घेऊन आलासा. नाना खोटंच कायतरी सांगून वेळ मारत होते. अखेर नाना घराजवळ आले. नानाची बायको फुलाबाई बाहेरच्या चुलवाणावर पाण्याची तवली ठेवून जाळ लावत बसली होती. सगळ्या अंगणात धूर पसरला होता. आत थोरली सून स्वयंपाकाला लागली होती. नानानी खांद्यावरचं गठुळं सोफ्याला खाली ठेवलं आणि भिंतीला टेकून बसले. मागोमाग फुलाबाई जवळ आली आणि खाली बसत म्हणाली, 

पूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....
#ज्ञानदेवपोळ
Photo Credit: AdarshGramGramodyog

Tuesday, February 27, 2018

सखू म्हातारी

आमच्या लहानपणी सखू म्हातारी आठ बैलांचा नांगर धरायची. मारकी बैलं दोन कासरं लावून एकटी कुळवाला जुंपायची. स्वत: बैलगाडीत कडबा रचून गाडी चालवायची. ती गाडीत कडबा रचायची अन नवरा अधू हातानं खालून पेंड्या वर टाकायचा. सोळा हाताची कडब्याची गंज एखाद्या गड्याला लाजवेल अशी रचायची. सखू म्हातारीचा नवरा उजव्या हातानं अधू होता. त्याला जास्त कष्टाची काम जमायची नाहीत. सखू म्हातारीची दोन बैलं होती. बैलं मारकी असूनही ती दोन कासरं लावून नांगरटीत घालायची. गड्यागत चाबकाचे फटके टाकायची अन म्हणायची, “आता तुझी मस्ती जिरल बघ चांगली! माझ्यावर शिंग उगारतुयास व्ह्य रं!.” 

पूर्ण कथा वाचा पुस्तक रुपात.....


#ज्ञानदेवपोळ


Tuesday, February 13, 2018

वाडा चिरेबंदी

"आमच्या सात पिढ्यानी बसून खाल्लं तरी काय कमी पडायचं नाय! माज्या सुबरावला कुठं बँरीस्टर करायचा हाय!" असं जेव्हा मिशांना पीळ देत बापू म्हणायचा तेव्हा मला सात पिढ्या हि काय भानगड असावी ते नक्की कळायचं नाय. आमच्या लहानपणी बघावं तेव्हा रिकामं टेकड्या लोकांचा बापूच्या तीस खणी वाडयात राबता असायचा. बापू पान खाऊन पिंकदाणीत पिचकाऱ्या मारत अनेक पराक्रमाच्या गोष्टी सांगायचे. बापूचा वाडा गावाच्या मध्यभागी. वाड्याला भली मोठी दगडी चौकट. तितकाच उंचीचा कोरीव दरवाजा. जुन्या तटवजा भिंती. गावाच्या मध्यभागी उंचीवर हा दिमाखात वाडा उभा. वाड्याच्या बाहेरून घसरणीला लागलेलं सगळं गाव दिसायचं. एका महापुरात याच तीस खणी वाड्यानं साऱ्या गावाला आसरा दिलेला. वाड्याच्या बाहेर मोठा दगडी कडेपाट बांधलेला. या कडीपाटाला कधीकाळी बापूचा घोडा बांधलेला असायचा. जग, माणसे कितीही काळासोबत पुढं गेली तरी बापू अजूनही त्याच इतिहास काळात.

पूर्ण कथा वाचा पुस्तक रुपात.....


©ज्ञानदेव पोळ
प्रातिनिधिक फोटो, Credit Indian Frame

Sunday, September 10, 2017

हिरवा चुडा

गावावर पसरलेल्या सावल्या लांब जाऊन एकमेकात जाऊन मिसळल्या. गुरं माणसं गावाकडं परतु लागली. दिवसभर भकास पडलेल्या गावाला जागेपणाची कळा आली. काही वेळात कडूसं मावळून गेलं. हलक्या पावलानं गावात अंधार शिरला. रस्त्यावर लागलेले दिवे वगळता नजरेच्या टप्प्यातलं दिसायचं बंद झालं. गावातल्या सगळ्या गाड्या परतल्या तरी बापलेक रानातून अजून गाडी घेऊन कशी काय आली नाहीत म्हणून भागवत अण्णाची चंद्रभागा ओसरीला येऊन रस्त्याकड नजर लावून बसली होती. तर चार दिवसापूर्वी ठरलेलं आपलं लग्न या महिन्यात होणार या आनंदात पंधरावी शकलेली सुगंधा चुलीपुढं भाकऱ्या थापत बसली होती. वैलावर आमटी रटरटत होती. मधीच आईबाप खर्चाचा मेळ कसा घालणार या काळजीनं ती तव्याकडं पचणाऱ्या भाकरीकड नुसतीच बघत होती. इतक्यात खाल्लीकडच्या गाडीरस्त्यानं बैलांच्या गळ्यातल्या घंटीचा आवाज होऊ लागला. घराच्या ओढीनं चवळ्या पवळ्या गाडी गोठ्याला घेऊन आले. सुभाषनं गाडी सोडली अन बैलं दावणीला बांधली. "इतका येळ का वं लागला आज! अण्णाच्या हातात पेंडीची घमेली देत चंद्रभागा म्हणाली. "अगं सगळा येडा काढला आज! फकस्त वरची ताल कुळवायची राहत व्हती म्हणलं पुन्हा बैलं मिळायची नाहीती! म्हणून उशीर लागला आज!"

पूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....
फोटो सौजन्य: एस.आर फोटो कुस्ती मल्ल विद्या

Tuesday, August 22, 2017

जखमी झालेला अंधार

गावावर सावलीसारखा अंधार पसरत निघाला होता. रानातनं गुरं ढोरं गावाकडं परतू लागली होती. देसायाची म्हातारी सारखी घरातनं आत बाहेर करीत होती. दोन तीन वेळा घरामागच्या रस्त्यावर येऊन डोकावून गेली. पोरगं मुंबईसनं येणार म्हणून आज तिचं कशातच चित्त नव्हतं. तसं सून मागच्या महिन्यात माहेरी गेल्यापासूनच तिचं कशातच लक्ष लागत नव्हतं. सून परत नांदायला आली नाही तर डोळ्यादेखत पोराचा संसार मोडल या काळजीनं म्हातारी खंगू लागली होती. इतक्यात मामा आलाss मामा आलाss म्हणत दोनी पोरांनी तात्या मुंबईसनं आल्या आल्या आजोळच्या घरात नुसता गलका केला. चुलीपुढं भाकरी थापत बसलेली तात्याची बहिण लगबगीनं तसाच पिठाचा हात घेऊन उठली. धाकटं पोरगं देवापुढं माळेचे मनी मोजत बसलेल्या म्हातारी जवळ गेलं अन हलवून म्हणालं, “म्हातारे आये मामा आलं मुंबईसनं!” तात्या बसतोय न बसतोय तोच पोरानी हातातली बॅग ओढली. म्हातारी लेकीकडं बघून म्हणाली, “पोरंग कवा सकाळी निघालं असलं! दमला असल प्रवासानं! जेवणाचं बघ बया लवकर!” तोपर्यंत पोरांनी बॅग उघडली. एक एक करून चाळू लागली. अखेर तळातून एक मिठाईचा पुडा घेऊन सोफ्याला जाऊन खात बसली. बहिणीनं पाण्याचा तांब्या तात्याच्या हातात दिला. “तू कवा आलीस गं! हातात तांब्या घेत तात्या म्हणाला. “तू येणार म्हणून आम्ही दुपारीच आलोय! असं म्हणत ती गडबडीनं चुलिकडं वळली. तात्या तोंड धुवून मधल्या घरात येऊन बसला. म्हातारी येऊन जवळ बसली अन म्हणाली, सकाळी पहिल्या गाडीनं धामणगावला जावूया बघ! सुगीचं दिस हायती! सुंदरीचा सासू अन सासरा रानात जायच्या आत गाठलं पाहिजेल त्यास्नी!” तात्या बराच वेळ गप्प राहिला अन म्हणाला, “ उद्या काय ते साक्ष मोक्ष लावूनच येऊ!...

पूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....
सौजन्य:सोशल मीडिया 

Sunday, July 9, 2017

श्वास थांबलेला वाडा



त्या वेळी वैतागून मी स्वतःला वाड्यात कोंडून घेतले. अंधारात प्रचंड रडून घेतले. अगदी डोळे सुजेपर्यंत. मग मोठ्याने हसून घेतले. अगदी जोरजोरात. इतके मोठ्याने हसून घेतले कि वाड्याच्या भिंती सुद्धा बुडापासून हलल्या असतील. अगदीच सांगायचं तर वाड्याच्या जन्मापासून इतकं कोण हसलं नसेल. पण हे हसणं रडणं शेवटचं. येथून पुढं भागूबाई सारखं कधीही रडायचं नाही. असा मनाचा अगदी ठाम निर्णय घेतला. 

पूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....



Thursday, May 11, 2017

घुसमट



माणूस करपून जाईल असं भयान ऊन. नजर जाईल तिकडं नुसत्याच दिसणाऱ्या उन्हाच्या झळा. डोंगराच्या खालच्या अंगाला उन्हांत चाऱ्यासाठी सैरावैरा पळणारा मेंढराचा एक कळप. काळ्या पांढऱ्या मेंढरांना अडवणारे कोस्या पटक्यातले म्हातारे माणदेशी धनगर. सुकलेली झाडं आणि माळरानावर पसरलेली तरवडची हिरवी झुडपं. अशा आग पाखडणाऱ्या उन्हाच्या झळा हळुवार वाऱ्यासोबत माळरानातल्या पांढरीच्या वस्तीवरल्या घरास्नी येवून धड़कत होत्या. जागोजागच्या मोडक्या छप्परातली गुरे माना टाकून रवंथ करीत निपचिप पडली होती. उकीरंडयाच्या काठाला असलेल्या वाळक्या झुडपांच्या सावलीत झुरणी लागून कोबंड्या निवांत पेंगताना दिसत होत्या... 

पूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....




Friday, March 3, 2017

वादळवारा

कुळवट झालेल्या वावरातल्या सड-काशीच्या दोन पाती कडंला लावून पुतळा म्हातारी आंब्याच्या बुडाला सावलीत येवून टेकली. उन्हाची दुरपर्यंत नुसती खाई पसरली होती. बिरोबाच्या माळाकडचा डोंगर उघडा बोडका दिसत होता. त्याच्या डोक्यावर असलेली पवन चक्क्याची पाती हळूच घोंगावणाऱ्या वाऱ्याच्या झुळकेनं हलताना दिसत होती. डोंगराच्या खालच्या अंगाला एक मेंढरांचा कळप उन्हांत चाऱ्यासाठी सैरावैरा पळत होता. खालच्या गाडं रस्त्यानं एक बाईमाणूस डोक्यावर पाटी घेवून वाट तुडवीत जवळ येताना दिसत होतं. वाहत येणाऱ्या उन्हाच्या गरम झळा हळुवार वाऱ्यासोबत म्हातारीच्या अंगावर येऊन धड़कत होत्या. ऊन वरन नुसतं आग पाखड़त होतं. बसल्याजागी म्हातारीचं अंग भट्टीगत आतून शिजून निघत होतं. ती अंगावरच्या पदरानं काही काळ अंगावर वारा घेत तशीच बसून राहिली. घामानं सार अंगच पाझरुन निघत होतं. चैन पड़ेना म्हणून आंब्याच्या बुडातनं ती उठली. अन तालीच्या पलीकडे असलेल्या खोपटात शिरली. खोपीच्या वाशाला लोंबकणाऱ्या फडक्यानं तिनं तोंडावरचा घाम पुसला. आणि कोपऱ्यातला डेरा वाकडा करून पाणी मडक्यात ओतून घटा घटा प्याली. इतक्यात मघाशी दूर डोंगरकडच्या रस्त्यानं डोक्यावर पाटी घेवून पळशीचा बाजार करून आलेली धनगराची कांता तालीवरून खाली उतरत म्हणाली,

पूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....



 

Thursday, December 15, 2016

वंश

पश्चिमेकडे सूर्याचा गोळा डोंगराआड झाला तशी शेतातली कामं आवरून बाया माणसं घराकड परतु लागली. आकाशातून पाखरांचे उंच थवे धावू लागले. डोंगराकडच्या बाजुने गुराखी गुरं घेऊन घराकडे उतरु लागले. वैरणीचा भारा घेवून खालीमानेनं एखांदा वयस्क घराची वाट कमी करू लागला. पांदीतून बैलगाडयांचा आवाज होऊ लागला. बैलांच्या गळ्यातले चाळ खणखणू लागले. अंधार चढू लागला तसा पांदीतल्या बैलगाडयांचा आवाज थांबला. दिवेलागण झाली. कुलकर्ण्याचा ट्रॅक्टर दारावरून गेला. घराघरातल्या चुली पेटू लागल्या. दूरच्या रस्त्याने कुठूनतरी एखांदे वाहन उजेड पडत जाऊ लागले.

पूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....

फोटो सौजन्य: गोष्टी गावाकडच्या

Monday, September 26, 2016

जत्रा


गोठ्यातल्या खुराडातला कोंबडा ओरडला तशी तोंडावरची वाकाळ काढून बारक्या नान्यानं थोरल्या सुमीला रात्री ठरल्याप्रमाणे वाडीच्या जत्रेला जायचं म्हणून गड़बडीनं उठिवलं. जात्याला उसं करुन घोरत पडलेल्या शेवंताबाईला जागी झालेल्या सुमीनं, "आयं उठ की बाहिर उजाडलय!" म्हणत हलवून जागी केली. शेवंताबाई उठून बाहेर अंगणापुढच्या गोठ्याकडं आली. नुकतंच तांबडं फुटलं होत. आकाशात पूसट पुसट चांदण्या दिसत होत्या. गोठ्याच्या कुडाला अड़कवलेला तुरकाटीचा खराटा काढून घराच्या दारापासून गोठ्यापर्यंत सारं आंगण झाडून काढलं. गोठ्यातली शाणघान काढ़ली. नान्यानं गंजीच्या चार कडब्याच्या पेंढ़या उपसुन कचा कचा तोडल्या. दोन गंजीपुढं ठेवून त्यावर कुराड आडवी ठेवली. दोन पेंढ़या म्हशीपुढं नेवून दावणीत विस्कटल्या. सुमीनं आटायला लागलेल्या म्हशीची थानं हातातल्या तांब्यात पिळली. सोप्यातनं उठून आलेल्या म्हातारीनं गोठ्यात रचलेली शेणकुटे चुलीतकोंबून बाहेरच्या चुलीवर पाणी तापत ठेवलं...

पूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....

Wednesday, August 24, 2016

किश्या नाना

भाऊबंदकीच्या वादाला कंटाळून अखेर गावाकडची सारी शेती खंडाने देऊन किश्या नानाला अन म्हातारीला लेकाने मुंबईत आणलय. पण जन्मभर गावाकडं रानचा मोकळा वारा प्यायची सवय लागल्यानं नानाला अन म्हातारीला शहराची हवा काय मानवत नाही. सतत बंद घरात बसून बसून म्हातारीचं पाय तर आखाडल्यासारखं होतात. म्हणून म्हातारीला घेऊन नाना भांडुप स्टेशनच्या कडेनं सकाळी इकडून तिकडं चकरा मारताना दिसतो. सकाळी घमाजलेली माणसं पोटात कोंबून सी.एस.टीच्या दिशेने धडधड वाजत जाणार्या कडब्यानं खच्चून भरलेल्या बैलगाड़ीसारख्या दिसणार्या लोकलच्या गाड्या बघून इतकी सगळी माणसं वरच्या बाजूला कशाला जात असावीत? तिकडं जावून काय काम करीत असतील. या विचारात रस्त्याच्या बाजूंला असलेल्या सिमेंटच्या ठोकळ्यावर बसून बराच वेळ दोघं बोलत राहतात. पूर्वेकडच्या बाजूला रस्त्याकडेनं अस्ताव्यस्त पसरलेल्या झोपडपट्टीतल्या उघड्या नागड्या लोकांचं जगणं बघत बराच वेळ घालवतात. तेथील काळवंडून गेलेली बारकी उघडी बंब पोरं बघून, "गावाकडं दारात आलेल्या भिकार्याच्या पोरास्नी फळीवरच्या जर्मनच्या डब्यातला बुंदीचा लाडू काढून दिल्याचा म्हातारीला आठवत राहतो.” म्हातारीच्या आग्रहाखातर नाना त्या पोरास्नी हाताने खुणावुन जवळ बोलावतो पण त्यांची भाषा दोघांनाही नीटशी समजत नाही. मग त्यांच्या आईबापांचा कामधंदा जाणून घेण्याचा नानाचा केविलवाणा प्रयत्न काही तडीस जात नाही. झोपड्या बघत बघत शाळेच्या पुढच्या बाजूला सकाळी भाजीपाला विकत बसलेल्या भैय्याजवळ येऊन दोघ थांबतात. भैय्या त्यांच्याकडे बघत हसत हसत बोलण्याचा प्रयत्न करतो पण त्याचं हिंदी बोलणं काही म्हातारा म्हातारीच्या गळी उतरत नाही. मग नाना नुसत्या खुणा करून बोलत राहतो अन खाली वाकून पुढं मांडलेलं एक सुकलेलं वांग हातात घेऊन "कैसा दिला" असं एका दमात चाचपडत विचारत राहतो. पण शंभर रुपये प्रति किलो असलेल्या वांग्याच्या दराचं हे गणित काही दोघांनाही कळत नाही. म्हातारीचा समज तर समोर मांडलेली समदी वांगी भैय्या शंभरात देत असावा असा होऊन जातो. पण तालुक्याचा आठवडी बाजार न चुकविलेला नाना शेतातनं दहा रुपये किलोचं लेबल लावून टेम्पोत चढविलेलं वांगं शहराकडं धावताना प्रत्येक किलोमीटरला स्वताची किंमत वाढवत मुंबईत स्वताचा दर शंभर रुपये करूनच खाली उतरतं हे इथलं गणित त्याला आता काहीसं कळू लागतं...
...म्हातारी चालत चालत मध्येच कधीतरी डोकवणाऱ्या सूर्याकडे वर डोकावते पण गावाकडं जसा सकाळी पूर्वेकडून सूर्याचा लाल गोळा उगवताना दिसतो तसा इथे का दिसत नसावा या विचारात एकटीच दंग होवून जाते पण काही केल्या इथल्या दिशांचं गुपीत काही तिला समजत नाही. मध्येच काचेसाख्या चकाचक दिसणाऱ्या कपडयाच्या शोरूममध्ये म्हातारी नानाला घेवून बिचकत बिचकत आत शिरते. पण क्षणात दोघांचाही भ्रमनिरास होतो आणि इतक्या मोठ्या शहरातल्या दुकानात धोतराची एखादी तरी जोड़ी विकायला का ठेवत नसावीत या विचारात नाना गावाकडच्या धोतरानी आणि चोळीच्या खणानी भरलेल्या आठवडी बाजारातून क्षणात फेरफटका मारून येतो. पुढे कांजुर मार्गला वेढा काढून पण म्हातारीच्या मिसरीसाठी तंबाखुची पानं मिळत नाहीत तेव्हा वस्तीवरच्या छप्परात सुकत घातलेली तंबाखुची पानं एखान्दा मुंबई सेंट्रलच्या एस.टी डिपोत कामाला असलेला ड्राइव्हर - गाववाला घेवून येईल का? या विचारात थकलेल्या म्हातारी सोबत नाना पुन्हा दिवसभरासाठी पूर्वेच्या रॉकी मेंडोंसा चाळीत स्वताला बंद करुण घेतो. आणि मुलगा, सुन, नातवंडे टीवी बघण्यात दंग असताना वरच्या तालीतल्या ऊसाला खंडकऱ्यानं लागवडीची पोती विस्कटली असतील का? या विचारात भिंतीवरच्या कॅलेंडरकडे पहात राहतो. ई.टीव्ही वर लागलेला अलका कुबलचा "दर्शन" कार्यक्रम बघताना मध्येच कुठेतरी हरवून, "श्रावणात गावाकडं माहेरातल्या देवासनी नारळ द्यायला आलेली एकुलती एक लेक आता कुणाच्या दारात थांबली असेल या विचारानं म्हातारी आतून तीळ तीळ तुटत राहते. आणि बाजूच्या भिंतीला टेकून बसलेला नाना जगुन झालेल्या आयुष्यावर विचार करत कुठेतरी दूर हरवत राहतो...



Thursday, July 28, 2016

मोरे वस्तीवरचा नाना


...गावाच्या वरच्या अंगाला ओढ़ा ओलांडून थोडे पुढे गेलं की माळावर मोरे वस्ती लागते. वस्तीपासून एका बाजूला नानानं मागच्या वर्षी दोन खण विटांचं बांधकाम करुण घर बांधलेल आहे. लोखंड महाग झालं म्हणून गोट्या भोवतीचं लिम्बाऱ्याचं सोट कापून त्यावर पत्रा ठोकून फिट्ट बसवलेला. पण अजून गिलावा अन वरचा लोड्या टाकायचं काम गरीबीमूळं राहून गेलेलं. घरात बायको, म्हातारी अन तीन पोर. जमीन नुसती माळाची ती पण कोरडभाव. घरचं भागत नाही म्हणून नाना गणू मोकाशीच्या विहिरिवर कामाला जातो. शुक्रवारी तालुक्याला मोठा आठवडी बाजार भरतो म्हणून नानानं सकाळी जाताना उद्याच्या सामानाची यादी आजच बनवून ठेवा म्हणून घरात सांगितलेलं. पोरांच्या शाळा सुरु होणार म्हणून यावेळी अखेर म्हातारी "नाय" म्हणत असतानाही एकुलती एक गाभण शेळी विकायची रात्री जेवताना ठरली होती...

पूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....

फोटो सौजन्य: गोष्टी गावाकडच्या