Showing posts with label ललित. Show all posts
Showing posts with label ललित. Show all posts

Friday, June 30, 2017

पुण्यनगरी

पुण्यात नद्या आहेत पण त्या नद्यांना वाहणारे पाणी नाही, काठावरुन उड्या मारणारी नागडी पोरं नाहीत कि पहाटे पेठापेठातून बाग देणारा खुरुड्यातला कोंबडा नाही. इथल्या घाटांवर धुणी आपटणाऱ्या बायका नाहीत, उन्हात धुऊन वाळत टाकलेल्या वाकळा नाहीत कि सकाळी सकाळी अंघोळा करायला निघालेली पेठांतली गडी माणसं सुद्धा नाहीत. न्ह्यारी उरकून पेरणी करायला निघालेल्या बैलगाड्या नाहीत, बैलांच्या गळ्यात घुमणारा घुंगरांचा आवाज नाही कि अंगणातल्या उन्हात तडतड फुटणाऱ्या मुगाच्या शेंगासुद्धा नाहीत. पर्वतीवर हिंडायला निघालेल्या म्हशी नाहीत कि पोत्याची खोळ पांघरून आडव्या काठीवर भाकरीचं गाठुळ बांधून डोंगर चढणारा गुराखी नाही. बेंदराला चिखलाची बैलं बनवायला चिकटणारा चिखल नाही, येथल्या पार्किंग मध्ये सर्ज्या राजाची बैलजोडी नाही कि म्हशीच्या धारा काढून आय. टी पार्कात कामाला जाणाऱ्या पोरीसुद्धा नाहीत. इथल्या घराघरातल्या ग्यालरीत हजारो वेलींच्या कुंड्या आहेत, फुलणारी फुलं आहेत, पण उकिरंड्यातून उगवून मागच्या बाजूनं छप्परावर चढलेला दुधी भोपळ्याचा वेल नाही, माळावर उगवणारी हिरव्या गवताची पाती नाहीत कि पावसाळ्यात निवडुंग शेराच्या कुपाडीत उगवणारा चॉकलेटी रंगाचा आंबा सुद्धा नाही. वैशाखात नांदायला जाऊन पंचिमीला नटून थटून सुखाच्या हिंदोळ्यावर झुलत झुलत वैशीतून गावा गावात परतणाऱ्या लेकी नाहीत, शाळेच्या पटांगणावर बायकांनी धरलेला रात्रीचा गाण्यांचा फेरा नाही कि अवघ्या शंभर रुपयात अख्या सालभराची दळनं दळून देणारा गावाकडचा गिरणवाला सुध्दा नाही.

पुण्यात जुने वाडे आहेत, पेठा आहेत, माड्या आहेत, झोपड्या आहेत, पांढरीच्या मातीची घरं आहेत, बिळातून बाहेर पडून पोटाच्या मागं उंदरासारखी सैरावैरा पळणारी गर्भातल्या रक्ता मासांपासून बनलेली ओली माणसं आहेत, बदललेल्या पुण्याकडे हताश पाहणारे स्वातंत्र्य वीरांचे पुतळे आहेत, इतिहासाच्या खुणा आहेत, खुणा मिटवणारी डोकी आहेत, विद्या विकणारी दुकाने आहेत, मठ आहेत, मंदिरे आहेत, हौद आहेत, गल्ल्या, बोळ, आळ्या सुद्धा आहेत, उंबर्‍या गणपती आहे, डुल्या मारुती आहे, सोट्या म्हसोबा आहे तसा उपाशी विठोबा सुद्धा इथल्या देवळात आहे. ताडीवाला रोड आहे, दारूवाला पूल आहे आणि माडीवाले कॉलनी सुद्धा इथे आहे. काळाच्या ओघात विझू पाहणाऱ्या गावगाड्याच्या भग्न खुणा आहेत आणि शनिवार वाड्यात विझलेला आक्रोश सुद्धा आहे. राजकर्त्यांच्या गंमती जमती आहेत, बापटांची पांढऱ्याची पुन्हा काळी झालेली दाढी आहे, तशी कलमाडींची पांढरी झालेली दाढी सुद्धा येथेच आहे. झेड ब्रिजच्या पुलावरून रात्रीचा अंधार पांघरून रोमांस करत फुलत निघालेली जोडपी आहेत, तर त्याच पुलाच्या खाली पोटाच्या लढाईत आकंड दारूत बुडून रोमांस हरवलेली झोपड्यातली माणसंसुद्धा आहेत. सकाळच्या प्रहरी ब्रिटिश बनावटीच्या कुत्र्याला रिकामं करायला निघालेल्या गुळगुळीत पायांच्या हाफ प्यांट घातलेल्या हेडफोनवाल्या तरुण महिला आहेत, बंदिस्त नाजूक कुत्रीवर डोळा ठेवून टपून बसलेले तुंबलेले मोकाट कुत्रे आहेत. तर एखांद्या गार्डन मध्ये टी शर्ट बर्मुड्यावर बॉबकट केलेल्या स्पोर्ट शूजवाल्या म्हातारी सोबत सकाळी थंड हवेत फिरणारा पेन्शनर सुद्धा येथेच आहे. तोंडाला स्कार्फ गुंडाळून वाऱ्याच्या वेगानं सुसाट जाणाऱ्या तरुण पोरी आहेत, तर पोटाच्या धावपळीत पायाला चाकं बांधून डोक्यावर पाट्या खोरी घेऊन निघालेल्या परकर पोलक्यातल्या रापलेल्या देहाच्या तरुण पोरी सुद्धा इथेच आहेत...

अंगावरून नाजूक पाऊलांच्या तरुणी चालत गेल्यानंतर अंग शहारून घेणाऱ्या डांबरी सडका आहेत, प्रेमभंगांना सामावून घेणारे बियर बार आहेत, मेंदुना साथ देणाऱ्या जळत्या सिगारेटी आहेत. 4जी मोबाईलवरुन डील ठरवून 4जी ऍक्टिव्हा वरून 4जी च्या स्पीड ने घरोघरी जाऊन पुरूषांना विकतच्या रोमांसची सफर घडवणाऱ्या मॉडर्न ललना आहेत, तर कुंटनखान्यातल्या चिखलात कोवळेपणीच रुतून बसून वासनांध नरांना दिवसरात्र अंगावर झेलणाऱ्या यूपी बिहारमधल्या विकल्या गेलेल्या तरुणपोरी सुद्धा येथेच आहेत.



Saturday, April 8, 2017

आड (बावडी)


...गावात आड होता. आडावर रहाट होता. रहाटाला मोठी साखळी होती. साखळीला बादली अडकवून भल्या पहाटे पाणी ओढणारी माणसं होती. आडाचं पाणी पोटात साठवणारे मातीचे रांजण होते. रहाटाला करकरणारा आवाज होता. बाजूला धुणी धोपटणाऱ्या कासोट्यातल्या बायका होत्या. खाली घरंगळत वाहणाऱ्या पाण्यात खोटी शेती पिकवणारी लहान पोरं होती. "नांदायला नांदायला आडाचं पाणी शेंदायला!" गाणी गाणारे आवाज होते. पण काळाचा पक्षी उंच उडतो. गावासोबत आडही आटून जातो. आड रिता रिता होत जातो...

...आड आजही असतो. वरती मोडलेला रहाटही असतो. गंजलेली साखळीही असते. पण पाण्यात तरंगणारं कासव कधीच मेलेलं असतं. गावाच्या लग्नाच्या द्रोण, पत्रावळ्या पोटात घेऊन आड अर्धा मुजलेला असतो. आता रात्रीच्या अंधारात अंगावर पडणाऱ्या फुटक्या दारूच्या बाटल्याना झेलत आड रात्रभर रडत राहतो...
फोटो सौजन्य flickr

Sunday, April 2, 2017

तमाशा...

चैत्र निघाला की गावागावात यात्रांचा हंगाम सुरू व्हायचा. खेड्यातील या यात्रांमध्ये तमाशा हेच मुख्य आकर्षण. संगीतबारीचा आणि ढोलकीफडाच्या तमाशांचे फड गावोगावी दिवस रात्र रंगू लागायचे. तमाशा खेड्याची लोककला, परंपरा आणि संस्कृती. पठ्ठे बापूराव, विठाबाई भाऊ नारायणगावकर, मालती इनामदार, काळू-बाळू, रघुवीर खेडकरसह कांताबाई सातारकर, मंगला बनसोडे, दत्ता महाडिक, माया तासगावकर अशी अनेक मंडळी या लोककलेचे शिलेदार. तर काही वारसदार. तमाशा सम्राट अमूक अमूक यांच्यासह लेखणीसम्राट तमुक तमुक यांचा “बहिणीची माया अर्थात भाऊ माझा पाठीराखा” हा वग उद्या रात्री ठीक दहा वाजता सादर होणार आहे, अशी हाळी गावागावातल्या लाऊडस्पीकर दणाणून जायची. तमाशाचा टेम्पो गावात शिरला की लाउडस्पीकर वरुन पुकारणाऱ्या माणसाला जास्तच जोर चढायचा. आणि खरा यात्रेचा बहर येथूनच सुरु व्हायचा. तमाशाचा फड गावात उतरतोय तोपर्यंत साऱ्या गावात बातमी पसरलेली असायची. तमासगीरा भोवती पहिली पडायची ती गर्दी लहान पोरांची... 

तमासगीरांची जेवणावळ झाली की पारावर तमाशा भरायचा. दुपारी व्हायचा तसा रात्रीही प्रचंड गर्दीने भरलेल्या पटांगणात तमाशा भरायचा. तमाशाच्या या खेळामध्ये गण-गौळण, बतावणी, रंगबाजी, फार्स आणि वग असे पाच प्रकारचे नाट्य असते. त्यातील गण म्हणजे विशेषता शाहीर गण गायचा. आणि त्याचे साथीदार चढ्या आवाजात ध्रुपद आळवायचे. गण संपला ढोलकी घुमु लागायची. ढोलक्या घामाघूम झाला की पायात चाळ बांधून आणि स्टेजच्या पाया पडून नर्तकिंचा नाच सुरू व्हायचा. मग सुरु व्हायची गौळण. आणि बाजूला कृष्णाच्या लीला. मग सोंगाड्या स्त्री वेशात मावशी बनून आला की तमाशाला खरा रंग चढायचा. गोपीका दूध, दही, लोण्याचे हंडे घेवून मथुरेला निघू लागल्या की वाटेत पेंद्या त्यांना आडवा आलाच म्हणून समजा. हा पेंद्या म्हणजे तमाशाचा मुख्य आधारच. हसवून हसवून पोट दुखायला लावणे हे याचे प्रमुख काम. त्यानंतर सवालजवाब होत. शृंगारिक लावण्या व्हायच्या. आणि शेवटी तमाशाचा आत्मा म्हणजे वग सुरु व्हायचा. सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक कथा नाट्य रूपाने सादर केली जायची. मघाचा सोंगाड्या आता चढलेल्या रात्रीसोबत वगामध्ये महाराजांचा शिपाई झालेला असायचा. आणि लोकांना हसवत हसवत वग पुढे सरकवत न्यायचा. पहाटेपर्यंत चालणाऱ्या वगाचा शेवट गावकऱ्यानां काहीतरी संदेश देऊन द्यायचा. तमाशा संपलेला असायचा. लोक तमाशातील पात्रांच्या चर्चा करत पान्हावल्या डोळ्यांनी घराकडे निघायचे. आणि तमासगीरांचे बिऱ्हाड पुढच्या यात्रेकडे धावायचे... 

तमाशा आजही आहे. पण काळानुसार आता तो खूप बदललाय. एक काळ होता. जेव्हा तमाशा ही फक्त एक लोककला होती. लावणी हा प्राण होता. तर वग हा त्याचा आत्मा होता. तमाशा पाहणारी जशी लोकं होती. तशी तमाशा जगणारी कलाकार मंडळी होती. ही कला जिवंत ठेवण्यासाठी उपाशी पोटांच्या खालची कंबर हलवणाऱ्या नर्तकी होत्या. छम छम वाजणारे घुंगरु होते. त्यांना दिवस रात्र खेळवणारे स्त्री नर्तकिंचे भक्कम पाय होते. फुगलेले पोट घेऊन बोर्डावर नाचणारी विठाबाई होती. आयुष्यभर वगात राजा बनून दिवसा भाकरीला महाग असूनसुद्धा कला जिवंत ठेवण्यासाठी धरपडणारे सोंगाडे होते. पण काळानुसार तमाशाचा ओर्केस्ट्रा झाला. छे! छे! प्रेक्षकानीच त्याचा ओर्केस्ट्रा बनवला. यात्रे दिवशी तो आता गावागावातल्या राजकीय पुढार्यांच्या हातातले बाहुले बनू पाहतोय. नऊवारी साडीत लावणीवर नाचणाऱ्या आणि खरी तमाशाची कला अंगात जोपासलेल्या जेमतेम दिसणाऱ्या स्त्रिया आता तरुण पोरांना समोर बोर्डावर नको वाटतात. अंगावर तोकडी कपडे घालून “अजून बारीक बारीक बारीक” कंबर आणि छाती हलवणाऱ्या तरुण पोरी आज तमाशाचा आत्मा बनू पाहताहेत. एकेकाळी तमाशातील “वग” पाहून त्याची सुपारी ठरायची. आज तमाशात तरूण पोरी किती, त्या दिसतात कश्या आणि त्या ढुंगण हलवतात कशा? त्यावर आता तमाशाची सुपारी ठरतेय. सगळी पंचक्रोशी दणाणून पहाटेपर्यत चालणारा “वग” आता नामशेष होतोय. त्याची जागा आता धिंगाणा घालणाऱ्या आक्राळ विक्राळ गाण्यांनी घेतलीय. वग सादर करणारे वयस्क कलावंत आता मागे बसून प्रेक्षकामधून कोणी “वग सरू करा” असा आवाज देतय कि नाही याची वाट पाहत राहतात. आणि गावागावातील वग पाहणारी जुनी जाणती मंडळी मागच्या रांगेत बसून पुढच्या नवीन पिढ्यांना “वग होवू द्या की आता सुरु” म्हणून आवाज देत राहतात. ढोलकी, डफ, चौंडक, टाळ, तुणतुणे, कडे, झांज, बाजाची पेटी आणि ट्रँगल ही वाद्ये आता तमाशाची सुरवात करण्यापुरतीच राहतील की काय अशी भीती वाटतेय. काळानुसार तमाशा बदलतोय पण तो इतकाही बदलायला नको की त्याचा आत्माच हरवून जावा. आणि खरा खुरा तमाशा जन्माला येणाऱ्या नवीन पिढ्यांना पुस्तकात भेटावा... 

घराघरात शिरू लागलेले टीव्ही, मल्टीप्लेक्स्, इंटरनेट यांच्या पुढे अजून किती दिवस तमाशा तग धरेल नाही सांगता येत. पण मातीतून जन्म झालेल्या आणि कित्येक पिढ्यांनी सांभाळ केलेल्या या लोककलांची आपण बदलांच्या आणि नवीन सुधारणांच्या नावाखाली अक्षरशा माती बनवू पाहतोय. कित्येक फडमालकांना सुपारी नाही म्हणून तंबूत बसून रहावे लागतेय. एक सिझन पार पाडायला लागणाऱ्या 25 ते 30 लाखांचा ताळमेळ घालताना फडमालकांच्या नाकी नऊ येतेय. काळानुसार बदलून सुद्धा कित्येक तमाशा मंडळांच्या राहुट्या कायमच्या बंद पडू लागल्यात. त्या तंबूच्या आतील पोटे कुटुंबासहित उपाशी पडत आहेत. आयुष्यभर या कलेची सेवा करून तमाशा जगलेला खरा कलावंत आज एखान्द्या पडक्या घरात बीड़ीचा धूर हवेत सोडून आपण पाहिलेली स्वप्ने जाळून घेत आहे. शेवटी गायन, वादन, नृत्य आणि विनोद यांनी युक्त असलेला हा लोकनाट्याचा समृध्द आविष्कार आज खेड्यापाड्यातून शेवटच्या घटका मोजतोय हे मात्र नक्की...

Sunday, March 19, 2017

मायानगरी

मुंबईतल्या घरांना पत्र्याचा सोफा नाही कि सोफ्यात चूल नाही. चूल असली तरी त्या चुलीत विस्तवाचा फुललेला आर नाही कि चुलीत भाजलेल्या शेंगा नाहीत. इथल्या घरांना आंगण नाही कि अंगणात तुळस नाही. दारात कुरड्या सांडग्याची वाळवण नाहीत कि वाळवणाला काठी हलवत राखण बसलेली म्हातारी नाही. मुंबईतल्या घरासमोर गुरांचा गोठा नाही कि "गोठ्यात चिळ चिळ वाजणारा धारेचा आवाज नाही. दाराला राखण करीत आडवा पडलेला राजा कुत्रा नाही कि उकिरंडयावर पायानं उकरणाऱ्या कोंबडया नाहीत. नातवडांना जत्रेला घेऊन निघालेला धोतर पटक्यातला म्हातारा इथल्या रस्त्यावर नाही कि मधल्या लेकीकडं साखरचं गठुळ घेऊन निघालेली लुगडया चोळीतली म्हातारी नाही. मुंबईत वाहणारी नदी नाही की पदराला माकडागत चिकटलेल्या पोरांसोबत धुण्याची बदली डोक्यावर घेऊन नदीला निघालेल्या बायका नाहीत. मुंबईत डोंगर आहे पण डोंगरावर गुरं घेऊन निघालेले मळक्या कपड्यातले गुराखी नाहीत कि मावळतीला दिवस कलल्यावर वैरणीचा बिंडा घेऊन घराच्या ओढीने निघालेली बिना चप्पलांची माणसं नाहीत. मुंबईत बैलगाड्या नाहीत कि चाकांच्या धावेचा करकर वाजणारा आवाज नाही. वासुदेव नाही, पिंगळा नाही, कि इथल्या रेडिओवर साधा पोवाडा सुद्धा नाही. इथे देवळे आहेत, पण त्या देवळात भजन, कीर्तनाचा घुमणारा नादमधुर आवाज नाही कि पहाटे पर्यंत चालणारा काकडा नाही. देवाच्या सोबतीला देवळात सिगारेट फुंकणारा शेंडीवाला भैय्या आहे, पण घराची चौकट पुजायचा मुहूर्त सांगणारा "सदा बामण" इथे नाही. मुंबईला पार नाही कि त्या पारावर रंगणारा जत्रेतला तमाशाचा फड नाही..

...इथे फक्त प्रचंड गर्दीतून वाटा काढत जिवाच्या आकांताने सैरावैरा धावणारी हडामासाची सुरकुतलेली माणसं आहेत. त्यांच्या अंगावरून गळणारे घामाचे थेंब पिऊन जगणारे समिंटचे रस्ते आहेत. इथे एखादया उपनगरातल्या चाळीत बोंबील विकणारी काळ्या ठिपक्यांचा गाऊन घातलेली म्हातारी आहे. तर तिच्या मागं बसलेला बर्मुड्यातला म्हातारा सुद्धा आहे. कोंबड्या आहेत पण त्या एखादया चिकन सेंटर मध्ये सोलून ठेवलेल्या आहेत. इथे सुसाट बाईकवरून गॉगल घातलेल्या ढोल्या गर्लफ्रेंडला पाठीला चिकटवून वेडी वाकडी वळणे घेत रस्त्यावरून धावणारी किडमिडी पोरं आहेत. तर मरीन ड्राईव्हच्या कठड्यावर स्क्वेअर फुटांच्या जगन्यातली घुसमट रिकामी करायला आलेली उपनगरातली तरुण जोडपी आहेत. आणि पलीकडच्या वाळूत ज्युनिअर कॉलेजच्या पोरासोबत छातीला स्तनं फुटलेली कोवळी शाळकरी मुलगी सुद्धा आहे. इथल्या वाऱ्यासोबत धावणाऱ्या अंबानीच्या मेट्रोतल्या थंडगार डब्यात, "सोबत आपले सामान घेऊन उतरा!" म्हणून साऊंडबॉक्स मध्ये ओरडणारी मंजुळ आवाजाची तरुणी आहे. तर तिचा आदेश प्रमाण माणून हेडफोनवाल्या गर्लफ्रेंडच्या खांद्यावर हात टाकून "जिवंत सामान" घेऊन उतरणारी तरुण पोरंसुद्धा आहेत. इथे सी.एस.टीच्या बिळातून निघुन सापासारखी वेडी वाकडे वळणे घेत उपनगराकडे जिवंत देहांचे सापळे घेऊन धावणाऱ्या लोकल्स आहेत. तर दादर ईस्टच्या एखादया घरात गॅसवर कुकर लावून वाऱ्याच्या वेगानं स्कुटीवरून वेस्टला पोरांना शाळेत सोडन्यासाठी धावणाऱ्या मॉडर्न मम्मा सुद्धा आहेत. तसाच एखान्द्या चाळीत आतून विस्कटलेला पप्पा सुद्धा इथेच आहे. इथे माड्या आहेत पण त्या माड्यावर शेकडो नरांना ओटी पोटावर दिवस रात्र झेलून त्याच पोटातली आग शांत करणारे कामाठीपुऱ्यातले नरकयातना भोगणारे स्त्री देहांचे उद्धवस्त झालेले सापळे सुद्धा आहेत...


Tuesday, February 14, 2017

प्रेमावर बोलू काही....



 रत होते आणि  त्पन्न २२०० कोडॉलर्सच्या घरात होतं।
प्रेम म्हणजे तो. प्रेम म्हणजे ती. प्रेम म्हणजे सर्वस्व. प्रेम म्हणजे ह्रदय. प्रेम म्हणजे विश्वास. प्रेम म्हणजे त्याग. प्रेम म्हणजे जबाबदार्या. प्रेम म्हणजे गुंता इत्यादी. इत्यादी. इत्यादी. प्रत्येक मेंदुनुसार व्याख्या बदलत जाते. पण खरे प्रेम आत साठून राहते. क्षणिक प्रेम उडून जाते. प्रेम म्हणजे सदाचीच टवटवीत राहणारी फुले. प्रसन्नता, बहर, उत्कटता हे प्रेमाचे सामर्थ्य. प्रेमाचे वेड प्रेमिकांच्या हदयात असते. प्रेमाने फुले दिली जातात तेव्हा मन उत्कटतेने काठोकाठ भरून येते. तिने साद देताच तो गाव-शहर ओलांडत, संकटावर मात करीत तिच्या भेटीसाठी निघतो. त्याला ऊन, वारा, पाऊस, रूढी परंपरा  या कशाचेच भय वाटत नाही. मिलनगंध हा प्रेमाच्या विश्वातील उत्कटगंध असतो. विरहाच्या वनव्यानंतर हे मिलन झाले तर उत्कटतेची पौर्णिमाच बहरते. म्हणूनच प्रेमवीर काहीही करायला तयार असतात.   
पण प्रेमाच्या आजूबाजूला एक समाज वावरत असतो. आणि तो समाज जगत असतो काही संकेतानुसार.  कसे जगायचे ते जगाने ठरविलेले असते. तर प्रेमिकांचे जग वेगळे असते. त्या जगाचे आणि या जगाचे संकेत वेगळे असतात. म्हणून ही दोन जगे कधीच एक होऊ शकत नाहीत. कारण प्रेम म्हणजे ऊन - सावलीचा खेळ असतो. पाहता पाहता दोघात अंतर येते. बोलता बोलता चुका होतात. मग एकमेकांचा छळही सुरु होतो. दोघांचे हे नाते पुरुषाला सामर्थ्य देत असते. पण प्रीतीच्या तारकेने आपल्या सौंदर्याने भुलवावे, फुलवावे, आणि मग मात्र टाकून जावे असले जीवन एखाद्या कमनशिबी प्रियकराच्या वाट्याला येते आणि मग सुरु होते असह्य वेदनांची एक यात्रा. ती क्षणभर हसते आहे, क्षणात रुसते आहे, तिची चंचलता कमालीची निष्ठुर आहे. त्यामुळे जीव व्याकूळ होतो. तशाच तिच्या चेह-यावरचे निष्ठुर भाव आणि मौन यामुळे प्रियकराला काही कळेनासे होते. तो तिला विनवणी करत राहतो.
तिने त्याच्या जीवनाचे काही धागे सोबत आणलेले असतात. त्यानेही तिच्या जीवनाचे काही धागे सोबत जोडलेले असतात. दोघांनी हसत - खेळत प्रेमाचा गोफ गुंफलेला असतो. तो कधी आणि कसा गुंफला गेला ते दोघांनाही कळलेले नसते.  पण अखेर तो दिवस उजाडतो. ती त्याला सोडून जाते. आणि मग उरतो तो फक्त वेदनांचा डोह. त्याचा संशय खरा ठरतो. प्रेयसी म्हणजे प्रेमाचे एक सोंग आहे हे त्याला कळते.  मग त्याचे ह्दय स्वतःलाच बोल लावते. कमअस्सल जातीचे सौंदर्य आणि त्याविषयीचे प्रेम म्हणजे "पाण्यावरच्या रेषा" होत. त्या रेषा रेखाटून अखेरीस दु:खच लाभणार. याची खात्री त्याला पटते. मनोहर रूपवती, तीव्र, बुध्वती आपली व्हावी म्हणून तो तिला होते नव्हते ते सारे देतो. तिचा प्रत्येक शब्द जीवाच्या जाळ्यात झेलतो. त्याने आपले अंत:करण तिच्या पावलाखाली अंथरले असते. पण ती मात्र नटवा थाट, वैभव, याकडे निघून जाते. उध्वस्त झालेला तो तळमळत राहतो. पण प्रेम म्हणजे काही निर्जीव वस्तू नसते की जी सोडले की संपली. प्रेमाचे धागे अंतरंगात खोलवर गुंफलेले असतात. त्यांच्यावर ताण पडला वा ते धागे तुटले तर वेदना अटळ असतात....


Tuesday, January 24, 2017

दवंडी



ऐका हो ऐका SSSS...... ढुम ढुम ढुमाक ढुम ढुम ढुमाक होSSS…. असा हालगीचा आवाज काढीत दवंड्या बोळात शिरून दवंडी द्यायचा. त्याच्या आवाजाची चाहूल लागताच घराघरातली डोकी कान देऊन आणि श्वासाला थांबवून दवंडीचा अंदाज घ्यायची. अरुंद बोळातल्या अंधारातून वाट काढत दवंड्या दुसऱ्या बोळात पुढे निघून जायचा. सोबत मागे फिरणाऱ्या चिलीपिलीना घेवूनच. दवंड्या एखांद्या खिंडाराजळ पाचट पेटवून हलगीला गरम करायचा. मग हलगी पुन्हा घुमू लागायची. सोबत ऐका हो ऐका SSSS.. ही त्याची आरोळी घेऊनच. जाहीर माहिती देण्यासाठी दवंडीची आरोळी सोडली जाई. जनावरांना लसीकरण, चावडीवरीच्या मिटींगा, कर वसुली, सामुदायिक काम, भांडण तंटा, इत्यादीसाठी दवंडी सोडली जायची. या निमित्ताने लोक एकत्र जमायचे. मग चावडी माणसांनी फ़ुलायची. चावडीसमोरची दीपमाळ तेल पीत मध्यरात्रीपर्यंत तेवत राहयची. तिच्या उजेडात गावाच्या भल्याबुऱ्याच्या चर्चा व्हायच्या. अडल्या नडल्याला मदत व्हायची...
पण माहिती तंत्रज्ञानाचं वारं गावात शिरलं आणि रात्रीच्या अंधारात घुमणारी दंवडीची आरोळी थांबली. सोबत हलगीवरची थापही विसावली. ती कायमची विझली. दंवडी कालबाह्य झाली. गावागावातील दवंडीचा आवाज बंद झाला. चावडीवरच्या गप्पा थांबल्या. गावाच्या भल्याबुऱ्याचे विषय आटले. त्यांना राजकारणाच्या चर्चाचे स्वरूप आले. स्मार्टफोन आणि सोशल नेटवर्किंगवरल्या आभासी जगातल्या विषयांनी आता ही जागा घेतलीय. आता दवंडी देणे आणि ऐकणे कमीपणाचे मानले जात आहे. चोहीकडे ब्रेकिंग न्यूजचा भडिमार होत असताना आता गाव दवंडीला सामावून घ्यायला तयार नाही. बदलत्या काळासोबत दवंड्याने दंवडी देण्यात काही बदल घडवून आणले नाहीत. गावानेही त्याला ते करू दिले नाहीत. दवंडी देत देतच गावातला नाऱ्या वाढला. जगला. थकला. आता त्याची हालगी काळासोबत भिंतीवरच्या खुंटीला अडकून पडलीय. आणि खुंटीखालच्या पोफडे उडालेल्या भुईवर दवंड्या हालगीकडे हताशपणे बघत दिवसभर गरीबीला झेलत डोळे मिचमिच करत पडून राहतो. अंधार झाला की धरपडत उठावे आणि गावातील पाराकडे तोंड करत ‘ऐका हो ऐका.....’ ची आरोळी हलगी बडवीत अजून सोडावी असे त्याला काळजातून वाटत राहते. पण ती साद ऐकणारी जुनी माणसं आता माती होऊन गेलेली असतात. हलगीची आरोळी ऐकणारे कान आता बहिरे झालेले असतात. गावाच्या बोळाबोळात आता डिजिटल पोस्टर लागलेले असतात. नवी पिढी त्यांचा आदर्श घेत आता मेंदू वाढवत राहते. आणि दवंडीला विझवून गावही त्यांना पोसत राहतो. 



Tuesday, January 17, 2017

संक्रात

संक्रातीच्या आगमनापूर्वीच बोचरी थंडी शिवारातून धावू लागायची. मग शेकोट्याभोवती सकाळ संध्याकाळ माणसांची गर्दी व्हायची. गप्पांचा फड रात्री उशिरापर्यंत रंगत जायचा. शेतातला हरभरा घाटयाला आलेला असायचा. काळ्याभोर गव्हाच्या शेतातील चिकानं भरलेल्या लोंब्या वाऱ्यासोबत डुलत राहायच्या. शाळवाच्या शेतात माचव्यावर उभे राहून गडीमाणसं कणसांनी भरलेलं दाणं टिपणाऱ्या पाखरावर गोफणीने दगड भिरकावू लागत. डबे वाजवून आणि माणसांच्या हाकांनी शिवार दणाणून जायचा. बांधावरची बोरीची झुडपे लालभड़क बोरांनी भरलेली असत. शेताच्या कडेला मोगण घातलेल्या पावट्याच्या जाळ्या शेंगाच्या घसानी भरून गेलेल्या असायच्या. मळ्यात हुरडा पार्ट्याना जोर चढायचा. आरावर भाजलेली शाळवाची कोवळी कणसं म्हणजे राणमेवाच जणू. सोबत लालभड़क गाजरं लज्जत वाढवायची. तिकडे गावाबाहेर कुंभारवाडयात रानामाळातून आणलेल्या मातीला कुंभाराचं गोल चाक आकार देवू लागायचं. त्या आकार घेतलेल्या संस्कृतीचं पूजन म्हणजे संक्रात. संक्रात म्हणजे संस्कृती. परंपरा. त्यातून फुलणारा आनंद. मातीतून वर आलेल्या बिजांची पूजा आणि तिळाचा गोडवा म्हणजे संक्रात. संक्रातीला लग्न होवून वेस ओलांडून गेलेल्या गावच्या लेकी मायेच्या ओढीने वेशीतून आत यायच्या. गावाबाहेरुन उडणारे पतंग त्यांचे स्वागत करायचे. पतंगांना आकाशात उंच जाण्याची ओढ़. तर लेकींना घरी पोहचण्याची ओढ. मग कित्येक उन्हाळे पावसाळे खालेल्या थरथरत्या हातांचे आशीर्वाद घेत या लेकी घराचा उंबरा ओलांडून आत शिरायच्या. गालावर कडकडून बोटं मोडली जायची. गिरणीत बाजरीचे डबे पीठ बनून घरी पोहचण्यासाठी रांग लावून बसायचे. भोगीला तीळ लावून बाजरीच्या भाकरी पहाटेपासूनच चुलीवर थापल्या जायच्या. भाकरीच्या "थप्प थप्प" आवाजाने घराघरात काठवठ घुमून जायची. तीळ भाकरीला आलिंगन द्यायचे. वैलावर मोठ्या जर्मनच्या पातेलात शेतातून आणलेल्या पावट्याच्या शेंगा, वाटाणा, गाजर, हरभरा, तुरीचे दाणे, वांगी अशा अनेक भाज्या एकत्र करुण भोगीची भाजी शिजत राहायची. मग कुंभारवाड्यातून सुगडं आणि बारकी बोळकी हळदी कुंकू लावून आणली जात. त्याबदली त्यांना पायली दोन पायली ज्वारी घातली जायची. त्यांना संक्राती म्हणत. मातीची झाकणे लावून सुगड्या देवघरात मांडल्या जात. त्यामध्ये बोरं, ऊसाच्या कांडीचे छोटे गरे, गव्हाच्या लोंब्या, हरभऱ्याचे घाटे भरले जात. पान सुपारी विडा मांडला जायचा. सोबत खारीक, खोबरे, बदाम असायचे. मग हळदी कुंकू लावण्यासाठी बायका एकत्र जमायच्या. त्यानंतर ओवस्याचा कार्यक्रम. नाकातील नथ मिरवत आणि कपाळावरचे लालभड़क कुंकू लेवून सायंकाळी देवळाभोवती नऊ वारी शालू नेसून सावरलेला शालूचा घोळ म्हणजे संक्रात. तीळ आणि उतरंडीला ठेवलेल्या गुळाच्या ढेपतला गुळ फोडून तयार केलेलं तिळगुळ साऱ्या गावाला बेभान होवून वाटत सुटणं म्हणजे संक्रांत. एक तीळ सात जणांनी खाल्ला होता हा वसा सांगणाऱ्या या भूमीवरचा हा सण म्हणजे संक्रात...

...संक्रातीला अगदी आजही खेड्यापाड्यांने टिकवून ठेवली असली तरी काळासोबत तिचे रूप बदलत चालले आहे. पूर्वीचा उत्साह आणि संस्कृती आता जाणवत नाही. देवळाभोवती महिलांचा रात्री उशिरापर्यंत चालणारा तीळगूळाचा कार्यक्रम काही ठिकाणी तर केवळ औपचारिकता म्हणून टिकून आहे. रुपायाच्या आकाराचं कुंकू लावून मिरवणाऱ्या स्त्रियांची शेवटची पिढी मावळतीला गेलीय. नव्या शिकलेल्या सुना जुन्या पिढीकढून हा वारसा उचलताना दिसत नाहीत. काळानुसार कुंकवाची जागा आता टिकल्यानी घेतलीय. नऊवारी प्रकार नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. कुंभारवाड्यातून मातीचं सुगडं, बोळकी, माट बनविणारी पिढी तर शेवटच्या घटका मोजतेय. पिढीजात व्यवसाय म्हणून काही जुनी जाणती लोकं अजून टिकून आहेत. पण नवी पिढी असली कामे करायला आता तयार नाही. कुंभारवाड्यातली पोरं आता आजूबाजूच्या कारखान्यात छोटी मोठी नोकरी धरुन पोटाला जिंवत ठेवण्याची अखंड धरपड करताना दिसतात. शहरातून तर कुंभार कधीच हद्दपार झालाय. त्याची जागा बळकावून युपी बिहारीवाला भैय्याच संक्राती विकताना दिसतो. आता लोकल ते ग्लोबल असा संक्रातीचा प्रवास झालाय. म्हणूनच संक्रातीला काचांच्या एच.डी स्क्रीनवरून दिवस रात्र शुभेच्छाचा नुसता पूर ओसंडून वाहतो. पण त्यात अस्सल तिळाचा गोडवा नसतो. की मायेचा ओलावा नसतो. संस्कृतीचा नुसता सगळीकडे आभास होत राहतो. वेस ओलांडून संक्रातीसाठी एखादी गावची लेक खेड्यात आता दुपारी कारने शिरते अन दोन तासात सक्रांत आटोपून भर्रकन गाडी उडवत निघून जाते. तर शहरात संक्रातीपासून रथसप्तमीपर्यंत महिला एकमेकींना हळदीकुंकवासाठी बोलावून भेटवस्तू देण्याची परंपरा आजही जपतात. पण कुठेतरी अस्सल तिळाचा गोडवा संपून त्यात मोठेपणाचा थाटमाटच पहायला मिळतो. जागतिकीकरणात सगळच बदलू पाहतय. मग संक्रात तरी मागे कशी राहील. काळानुसार बदल अपरिहार्यच. म्हणूनच येत्या काळात कुंभारवाड्यातल्या मातीला आकार देत फिरणाऱ्या चाकांची घरघर थांबून चीनवरून सुगडं, बोळकी विक्रीला आली तर नवल वाटायला नको. कारण संक्राती सोबत आता सारी संस्कृतीच आपण ग्लोबल बनवलीय...

Tuesday, January 3, 2017

नदी

डोंगरदऱ्यातून नागमोडी वळणे घेत गावाबाहेरून एका वळणावर डोह करुन वाहणारी नदी होती. झुंजू मुंजू झालं की नदीत पोहणारी माणसं होती. नदीत झरे होते. झऱ्यातून घागरी भरून पाणी भरणारे मजबूत देहाचे खांदे होते. घाटावर सकाळी कपड्यांचा "फट् फट्" घुमणारा धुण्याचा आवाज होता. बायका माणसांचा किलबिलाट होता. पक्षांचा चिवचिवाट होता. नदीतल्या डोहात "पुक् पुक्" आवाज करीत पाणी ओढणारं पिस्टनचं इंजन होत. त्यावर भिजणारे पानमळे होते. वरच्या अंगानं खळखळत येवून नदीला मिठी घालणारा ओढा होता. पावसाळ्यात नदी फुगल्यावर ओढयाला चढणारा मासा होता. रात्री टायर पेटवून त्यांना पकडणारी माणसं होती. दगडात लपणारे खेकडे होते. पाण्यावर खेळणारे विरुळे होते. "डराव डराव" ओरडणाऱ्या बेडक्या होत्या. उन्हं अंगावर झेलत डोळे मिटून नदीत डुंबणाऱ्या गाई म्हशी होत्या. म्हशी बुडल्यावर पाण्यावर तरंगणाऱ्या त्यांच्या अंगावरच्या गोमाश्याही होत्या. पलिकडच्या काठाला बैलगाड़ी पार होताना चाकांच्या लोखंडी धावेतून "कुर कुर" निघणारा वाळूचा नादमधुर आवाज होता. नदी होती गावाची संस्कृती. माता. भगीरथी. अन्नदाती. तिनेच विणल्या निसर्ग आणि मानवाच्या नात्यातील कित्येक गोष्टी. तिनेच अंगाखांद्यावर खेळवले गावचे कित्येक चिमुकले जीव. तिनेच वाढविल्या आणि जगविल्या गावच्या कित्येक पिढया...
...नदी आजही असते. पण पहिल्यासारखी आता पावसाळ्यात फुगत नसते. नदीवर आता धरण असते. त्यातून सोडलेलं काळे पाणी सोबत घेऊन ती आता वाहत राहते. नदीतून आता "पुक् पुक्" घुमणाऱ्या पिस्टनच्या इंजनचा आवाज होत नसतो. यांत्रिक मोटारी आता नदीच्या पाण्यासाहित तिची आतडी दिवस रात्र ओरबाडत राहतात. तिच्या काठावरचे पानमळे कधीच गळून पडलेले असतात. तिथे आता ऊसाची मळी पसरलेली असते. नदीत कधी कधी छोटे मासेही दिसतात. शहरातून सुट्टीला गावी आलेली मुलं आणि त्यांच्या मम्मा त्यांना आता “फिश” म्हणून ओळखतात. नदी उन्हाळ्यात उघडी पडते. बोडकी दिसते. तिच्या पोटातले सांगाडे उघडया पडलेल्या खडकवाटे दिवस रात्र अश्रू सोडत राहतात. नदीतले झरे आटलेले असतात. तिथली जागा झाडा झुडपांनी व्यापलेली असते. नदीला मिठी मारण्यासाठी गावाबाहेचा ओढा व्याकूळ झालेला दिसतो. पण माणसानी त्याला मध्येच कापलेला असतो. नदीचे पोटही आता फुटलेले असते. तिच्या पोटातील वाळू दूर शहरातल्या उंच इमारतींच्या भिंतीत विसावलेली असते. लहानपणी आपल्याच अंगाखांद्यावर खेळलेल्या, माणसांच्या प्रणयक्रीडाकडे ती आता विषन्न नजरेने पहात भिंतीत बंदिस्त असते. आणि एकेकाळी "फट् फट्" धुण्याच्या आवाजाने आसमंत दणाणून सोडणारा नदीचा घाट आता रात्रीच्या अंधारात बाटल्यांच्या काचांचा आवाज घुमवीत राहतो. 

फोटो सौजन्य:mahanewslive

Tuesday, December 20, 2016

शिवार

वैशाखाच्या महिन्यातलं ऊन अंग अंग जाळत जायचं. रापलेल्या जीवांची घालमेल व्हायची. मग शेतात राबणारी माणसं बांधावरच्या झाडाखाली कलंडलेली दिसायची. कुठूनतरी अचानक आकाशात ढगांची वेल जमू लागायची. वाऱ्याचा वेग शिवरातनं धावू लागायचा. आकाशात धुळीचे लोट पसरत जायचे. विजांचा प्रचंड कडकडाट करीत वळीव यायचा. माणसं गुराढोरासकट घराच्या ओढीनं गावाकडं धावत सुटायची. मातीचा सुगंध वाऱ्याच्या झुळकेसोबत पळत यायचा. ओढ्या वगळीना आलेलं गढूळ पाणी उतारानं सुसाट खळखळाट करीत वाहत जायचं. पांदीत चिखल व्हायचा. पाऊस ओसरायचा. पुन्हा रात्र झाली की विजांचा गडगडाट करीत पाऊस कोसळायचा. गावाबाहेरून वाहणारी नदी वाढणाऱ्या पाण्यासोबत फुगत जायची.
मग शेतीच्या कामांना जोर चढायचा. शिवारातनं माणसं दिसू लागायची. कुळव फिरू लागायचे. बायामाणसं मागं सड-काशी वेचायची. अन बगळे किडे टिपत राहायचे. बैलांना उद्देशून म्हंटली गेलेली गाणी सारा आसमंत दणाणून सोडायची. घराघरात गाडग्या मडक्यात भरून ठेवलेलं बी-बियानं बाहेर काढलं जायचं. तोपर्यंत मृग नक्षत्र निघालेलं असायचं. मग मागचा पाऊस सुरु व्हायचा. माती गारेगार होऊन जायची. ओलसर मातीला घात आली की शेतात पेरणीच्या कामांना वेग चढायचा. चाढ्यावर मूठ धरली जायची. कुरीच्या मागं कासोटा घातलेल्या बायका मोगण घालत चालत रहायच्या. मधूनच पावसाचा शिडकावा होत राहायचा. मग डोक्यावर बारदाने पांघरली जायची. भिजुन गेलेले बैलाचे जू फडक्यानं पुसलं जायचं. पुन्हा मोठ्यानं बैलांची नावं घेतली जायची. गाणी सुरु व्हायची. बघता बघता साऱ्या गावाची पेरणी झालेली असायची. मग एखांद्या आडल्या नडल्या दावणीला जनावर नसलेल्या शेतकर्याची सगळे मिळून पेरणी करून द्यायचे.
मग काही काळानं मातीतून कोवळे अलगद कोंब शिवारातून तोंड वर काढू लागले की शेतकर्याच्या आनंदाला पारावर उरायचा नाही. बघता बघता सारी रानं हिरवीवार होऊन जायची. कोवळ्या पिकावरून थंडगार वारा वाहत राहायचा. मग बराच काळ गायब झालेल्या किड्या मुंग्या जाग्या झालेल्या असायच्या. त्या वाढण्याऱ्या पिकावरून खेळत राहायच्या. तुडतुडे, भुंगे, टोळ उडत राहायचे. भुईमुगाच्या शेतातून फिरणारा पैसा किडा हातात घेतला की गोल पैशासारखा ओंजळीत चिकटून बसायचा. माळावर पिवळी धमक सूर्यफूलं दिसू लागली की त्या शेतातून हमखास गोगलगाई फिरताना दिसायची. तिला स्पर्श करताच ती अंग आकसून घ्यायची.
पावसानं गावाबाहेची नदी दुथडी भरून वाहत जायची. ओढ्या वगळीना आता खळखळ करीत संथ पाणी वाहत राहायचं. मग त्या पाण्यात मासे खेकडे पकडायला वेग यायचा. पांदीतली घाणेरी मातलेली असायची. सोबत माळावर रंगबिरंगी फुले उमललेली असायची. त्यावरून बागडणारी रंग बिरंगी फुलपाखरे चिमटीत पकडली की अलगद निसटून जायची. भोपळ्याच्या, गुळवेलीच्या, दोडक्याच्या, काकडीच्या वेली जागोजागी लगडलेल्या असायच्या. कुरणात गायी म्हशी चरायच्या. तिकडे शेतात भुईमुगाची फुले झडून, आरा सुटून त्यांना शेंगा लागलेल्या असायच्या. पोटऱ्यातनं हिरवी गार जोंधळ्याची कणसं फुटू लागायची. त्याच्यावरचा फुलोरा जाऊन गच्च भरलेल्या दाण्याचं कणीस मोत्यासारखं दिसायचं.
दिवाळीच्या आधी सुगी सुरु व्हायची. मग बाया माणसांची तारांबळ उडायची. म्हातार्या कोताऱ्या माणसासहित भल्या पहाटे चांदणी उगवायला शेताकडं झुंबड उडायची. दसऱ्याला पुजलेली हत्यारे नव्या दमानं रानातनं खेळू लागायची. कापलेल्या बोटांना फडकी गुंडाळली जायची. एकमेकांना मदत करीत सुगी पुढे सरकत राहायची. मग शेतातल्या वस्तीवर खळी केली जायची. पाणी मारून रोळ फिरवून तुडवून तुडवून जमीन घट्ट केली जायची. मग शेणानं सारवलेल्या खळ्यावर जोंधळ्याची कणसं पसरली जायची. बैलांची जोडी दगडी रोळ खळ्याभोवती गोल गोल फिरवून टपोर्या कणसाच्या पिश्या करायचे. बायका उरलेल्या पिश्या बडावण्याने बडवयाच्या. गडीमाणसं माचव्यावर उभे राहून बुट्टी घेऊन वाऱ्यावर उफणनी करायचे. पांढऱ्या शुभ्र मोत्यासारखा दिसणारा जुंधळ्याचा ढीग मग पोत्यात भरला जायचा. उभी केलेली पोत्याची ठेल बैलगाडीची वाट पाहात घराच्या ओढीनं खळ्यात सांज होईपर्यंत उभी असायची. घर धन धान्यांनी भरून जायचे. तोपर्यंत थंडीची चाहूल आलेली असायची. शेकोट्या पेटल्या जायच्या. सारा गाव धुक्याची झालर पांघरूण घ्यायचा. दिवाळी दारात आलेली असायची आणि मातीचा सुगंध संपून आता घरा घरातल्या चुलीवर कढई चढायची. अन वाफाळणाऱ्या कढईतुन खमंग सुवास घरा घरातील दारातून बाहेर पसरायचा...
...आता माणसासारखीच शेतीही बदलली आहे. पौष्टिक बियाणे जाऊन त्याजागी संकरीत सुधारित जातीची कमी कालावधीत येणारी नवीन बियाणे आलीत. नैसर्गिक खते जाऊन रासायनिक खते आलीत. सोबत नवीन तण घेऊनही आलीत. औषधांच्या मारल्या जाणार्या फवाऱ्यामुळे आता तुडतुडे, भुंगे, टोळ, वाणीकिडे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ते आता शेतातून पाहिल्यासारखे उडताना दिसत नाहीत. आधुनिक शेतीच्या नावाखाली आम्ही या नैसर्गिक वैभवाला कायमचं गाढून टाकलंय. आता पूर्वीसारखा म्हातारा, मघा, रोहिणीतला पाऊस बरसत नाही. तो ही बेभरवशी झालाय. इथल्या माणसासारखाच. आता इथल्या पाऊसाने गावाबाहेरून वाहणारी नदी रात्रीची कधीच फुगत नाही. एकेकाळी ज्यांच्या जीवावर शेती चालायची ती लाकडी औजारे कधीच सांगाडे बनून गोठ्यात अडवळनी जागेत पडलीत. पूर्वीसारखे बैल आता घारापुढच्या गोठ्यात दिसत नाहीत. त्यांच्या गळ्यातून निघणारा घुंगरांचा मंजुळ स्वर राहिला नाही की चाबकांचा फट फट निघणारा आवाजही उरला नाही. आता खळ्यात मळणी होत नाही की माचव्यावर उभे राहून वाऱ्याच्या दिशेने जुंधळं सोडत डोकं बांधलेल्या बायकाही उरल्या नाहीत. आता गोफणीतून दगड सुटत नाही की पहाटेपासून हाक्यानी रान दणाणून सोडलं जात नाही. शेतातली सरमाडानं शेकारलेली खोप उरली नाही की आत उन्हाला विसावा घेणारी माणसंही उरली नाहीत.
बदल बदल आणि बदल छे! छे! मातीतून आलेलं सृष्टीचं वैभव आम्ही मातीतच गाडून बसलोय...


फोटो सौजन्य:गोष्टी गावाकडच्या