Tuesday, February 27, 2018

सखू म्हातारी

आमच्या लहानपणी सखू म्हातारी आठ बैलांचा नांगर धरायची. मारकी बैलं दोन कासरं लावून एकटी कुळवाला जुंपायची. स्वत: बैलगाडीत कडबा रचून गाडी चालवायची. ती गाडीत कडबा रचायची अन नवरा अधू हातानं खालून पेंड्या वर टाकायचा. सोळा हाताची कडब्याची गंज एखाद्या गड्याला लाजवेल अशी रचायची. सखू म्हातारीचा नवरा उजव्या हातानं अधू होता. त्याला जास्त कष्टाची काम जमायची नाहीत. सखू म्हातारीची दोन बैलं होती. बैलं मारकी असूनही ती दोन कासरं लावून नांगरटीत घालायची. गड्यागत चाबकाचे फटके टाकायची अन म्हणायची, “आता तुझी मस्ती जिरल बघ चांगली! माझ्यावर शिंग उगारतुयास व्ह्य रं!.” नऊवारी लुगड्याचा कासोटा घातलेली सखू म्हातारी आठ बैलांचा किर्लोस्कर नांगर असा भेगाळलेल्या जमिनीत घुसवायची कि तिनं नांगर धरलेल्या रानाला गवत - काशी पुन्हा चिकटणार नाही. तिचा माळावर चाललेला नांगर बघून येणा जाणारा वाटसरू रस्त्यात थांबून बघतच बसायचा. नांगर तासातनं पुढ जाईना कि सखू म्हातारी दुसऱ्या गड्याकडे बघून ओरडायची, “ आरं त्या मधल्या सर्ज्यावर ढेकुळ फेका! खरी खोड तिथच हाय बघा!” येणारा जाणारा वाटसरू तंबाखू मळत बघतच बसायचा. म्हणायचा, “गड्या याला म्हणायची बाय! अशी बाय जेच्या प्रपंचाला हाय त्येची जनमभर मजा हाय!”

सखू म्हातारीचा नवरा वारकरी. सदा न कदा त्याच्या “जय हरी विठ्ठल” करीत वाऱ्या सुरूच. सखू म्हातारीला लोकं गमतीनं म्हणायची, “अग कशाला एवढ गड्यागत राबतीस! तुझ्या पोटाला काय पोरबाळ तरी हाय का? मग कशासाठी एवढं करून ठीवतीयास?” सखू म्हातारी म्हणायची, “ आरं वरच्याच्या मनात आलं म्हंजी या वयात बी हुईल कि मला! मी का म्हातारी झाली व्ह्य!” तिच्या असल्या इरसाल उत्तरानं ऐकणारा हसत हसत वाटनं पुढं बघून निघून जायचा.

आमची म्हैस आटली कि आम्ही सखू म्हातारीच्या म्हशीच्या दुधाचा रतीब लावायचो. रोज एक पितळेचा तांब्या घेऊन सखू म्हातारीकडं उठल्या उठल्या दुध आणायला जावं लागायचं. सकाळी लवकर गेलं कि चरवीत “चूळss चूळss” म्हशीची थानं पिळत धार काढीत ती बसलेली दिसायची. जवळ जाऊन तांब्यात दुध घेतलं कि म्हणायची, “थांब कि जरा! त्यो गलास आण हिकडं! तुझ्या घरात कुठं वाटणीला याचं तुझ्या!" एक पेला भरून दुध प्यायला द्यायची. पिवून झालं कि वर म्हणायची, “कसली रं तुमची शरीरं! अवघड हाय बाबानो तुमचं!” मी हसायचो. म्हणायचो, “आम्ही नाय तुज्यासारखं शेतात राबत बसणार!” तर त्यावर ती म्हणायची, “ भिकंची रं लक्षणं तुमची!’
सखू म्हातारीच्या म्हशीनं पांडू आबाच्या कमळीची सात पोरं जगविली. कमळीच्या दोन्ही मांड्याना पोट थटलेलं बघून सखू म्हातारी म्हणायची, “कमळे आता कितव्यांदा गं राहिलीस?” कमळी लाजून म्हणायची, “आवं ते पोटात मेल्यालं धरून सातवं कि वं हे!” मग इरसालपणा दाखवत सखू म्हातारी म्हणायची, “तुज्या नवऱ्याला चाफात घालून बैलागत बडिवला पाहिजेल! त्याशिवाय वंशावळ थांबायची नाय बघा तुमची!.” सखू म्हातारी जितकी इरसाल बाई तितकीच ति मायाळू. आपलं पोट पाणी पिकलं नाही, आपल्या पदराला देवानं पोर बाळ घातलं नाही म्हणून कमळी सारख्यांच्या कित्येक लहान पोरास्नी तिनं फुकट दुध पाजलं.
सखू म्हातारी जशी एखाद्या गड्यागत सगळी कामं करायची तसा एखांदया गड्यागत तिच्या नसानसात इरसाल पणा भिनलेला. गावात कोणाचंही लग्न असो. सखू म्हातारी कुरवली सारखी लगीन घरात हजर. तिच्याशिवाय लगीन घरातलं सोवळं आवळं पूर्ण व्हायचंच नाही. लोटांगणा पासून वराती पर्यंत सगळ्या कार्यक्रमात सखू म्हातारी पुढं पुढं हमखास दिसणारच. एखांदी नवरा नवरी आपल्या झालेल्या लग्नाची तारीख विसरतील पण सखू म्हातारीला विसरणार नाहीत. नवरा नवरीची गाठ सोडताना चांगला मोठ्या लांबीचा उखाणा घेतल्याशिवाय ती गाठ कधीच सोडणार नाही. लाजणाऱ्या नवरीकडं बघून ही हळूच म्हणेल, “बाई! तुज्या बापानं जरा चांगलं तरी बघायचं नाय का? ह्यो धोंडा बांधला व्ह्य तुज्या गळ्यात!” एखदी नवी नवरी असलं काही ऐकून गंभीर व्हयाची. पण बाजूच्या लोकात मात्र हशा पिकायचा.
गावात एखादी व्यक्ती मयत झाली कि सखू म्हातारी हातातलं काम सोडून सगळ्यात पुढं हजर. “आवं काल कि वं मला बुड्कीच्या रानात भेटलं! कसं वं असं झालं!” असं काय बाय म्हणत मयताच्या घरात गहिवर घालून क्षणात सारं गाव जागं करणार. तिच्या डोळ्यांना इतकं घळा घळा कसं काय पाणी येत असावं असा मला नेहमी प्रश्न पडायचा. एखाद्या मयताचे नातेवाईक पुण्या मुंबईहून लांबून येणार असले तर रातभर मयत तसच ठेवायला लागायचं. माणसं रातभर वाट बघून बघून पेंगळून जायची. रस्त्यांनं एखाद्या कंदिलाचा उजेड जरी दिसला कि नातेवाईक आले वाटते म्हणून लगीच जागी व्हायची. सखू म्हातारी मात्र अधून मधून त्या मेलेल्या म्हाताऱ्याची एखादी आठवण काढून चुलीवरच्या कालवणाला अचानक उसळी फुटावी, तशी मध्येच गहिवर घालायची आणि मेलेलं मढं पुन्हा काही काळासाठी जिवंत करून सोडायची. अशा प्रसंगी सखू म्हातारीचा खरा इरसालपणा दिसून यायचा. मेलेल्या म्हाताऱ्याची एखांदी मुंबईत राहणारी सून नुसतीच मड्या भोवती रडावलेला चेहरा करून बसलेली दिसली कि सखू म्हातारी तिच्या गळ्यात जाऊन पडलीच म्हणून समजा. तिच्या गालावरून हात फिरवत ही हमखास म्हणणार, “तुझं सारखं उठता बसता म्हातारा नाव काढायचा बघ! म्हणायचा आमच्या संपतची बायकू बघ लाख गुणाची हाय!” तिच्या गळ्यात पडून हिनं असा गहिवर घातला कि त्या बिचारीला सुद्धा कधी नव्हे ते हमखास रडू फुटणार. एखादं नवीन जोडपं शहरातून गावात शिरताना दिसलं आणि त्याच्या कडेवर तान्हुलं दिसलं कि हि आडवी जाऊन त्यांना म्हणणार, "आरं तुमच्या गाठी सोडून अजून वरीस तरी उलाटलं का? तवर हि बिलामत बी झाली व्हय तुम्हास्नी!". अशा एक ना हजार गंमती सखू म्हातारीच्या जगण्याच्या.
आमच्या लहानपणापासून जेव्हा बघावं तेव्हा सखू म्हातारी आहे तशीच दिसायची. हाडापीडानं दणकट. गुटगुटीत. पण एका आखाडाच्या वारीत पंढरीला “जय हरी विठ्ठल” करीत वारीला गेलेला तिचा धनी घरी परतलाच नाही. तेथूनच तिच्या संसाराला उतरती कळा लागली. सखू म्हातारीनं पुढं कित्येक वर्षे सारं पंढरपूर पालथं घातलं. पण तिचा धनी काय सापडला नाही. कोण म्हणायचं, “नदीतल्या वाळवंटात दिसला!” कोण म्हणायचं, “गोपाळपुरात भेटला!” कोण म्हणायचं, “पुढच्या महिन्यात येतो म्हणालाय!” अनेकजण शकडो गोष्टी सांगायचे. त्याच्यावर विश्वास ठेवून ती दुसऱ्याचं दिवशी एस. टीला बसायची. एखादी समंजस व्यक्ती तिला म्हणायची, “आगं आता कुठला यितुया त्यो परत! देवाच्या भेटीला गेला असं समजायचं अन आपल्या काळजावर दगड ठिवून दिवस ढकलायचं!”

पण गायब झालेला नवरा कधीतरी परत येईल या आशेवर सखू म्हातारी जगत राहिली. त्याच्या नावानं कपाळावर भलं मोठं रुपायाच्या आकाराचं कुंकू लावत जगली. काळमानानुसार ती थकत गेली. पुढे पुढे दिवस रात्र एकटी एकटी राहू लागली. रानावनात तिचं हातपाय जायचं थांबलं. गोठ्यातली बैलं गेली. म्हशी गेल्या. दावण रिकामी पडली. जीवापाड राबून जपलेलं शेताचं तुकडं आता राबायलाच कोणी नाही तर ठेवून तरी काय करायचं म्हणून सखू म्हातारीनं बहिणीच्या पोराला दिलं. आणि एका दुपारी एकेकाळी गड्यागत शेता शिवारात राबणाऱ्या सखू म्हातारीला तिच्या बहिणीचा मुलगा कायमचा मुंबईला घेऊन गेला.

बरीच वर्षे उलटून गेली. सखू म्हातारीच्या वयाची माणसं कधीच काळानं उचललेली. त्यांची स्मशानात माती होऊन गेलेली. गड्यागत राबणारी अशी कोण आपल्या गावात बाई होती यावर नव्या पिढ्यांचा विश्वास बसणार नाही इतका आता गावात बदल झालेला. एका सुट्टीत गावी असताना शहरात जीव गुदमरून गेलेली सखू म्हातारी अखेरच्या काळात गावी परत आलेचं समजलं. एका संध्याकाळी मी बायकोला घेऊन कित्येक वर्षात नजरेला न पडलेल्या सखू म्हातारीला भेटायला गेलो. आता तिच्या वयाची नव्वदी पार झालेली. पण हाताला अजूनही काठी न लागलेली. पण शरीरानं थकून गेलेली. हाडामासानी रचलेला सांगाडा कधीही ढासळेल या अवस्थेला येऊन ती आता पोहचलेली. बरीच वर्षे तिच्या घरात कोणीच रहात नसल्यानं तिच्या घराची काळानुसार पडझड झालेली. तिच्या सारखच तिचं घरही आता मोडकळीस आलेलं. संध्याकाळची वेळी होती. सखू म्हातारी चुलीपुढं मिणमिणत्या दिव्याच्या उजेडात बसलेली. मला बघून “बाबा कसा वाट चुकलास!’ म्हणाली. ती उठण्याअगोदर मी तिच्या जवळ जाऊन भुईवर बसलो. नको नको म्हणत असतांनाही एका काळपट पडलेल्या पातेल्यात तिनं चहाला पाणी ठेवलंच. मी अध्ये मध्ये तिला जुन्या आठवणी काढून बोलतं करण्याचा प्रयत्न करत होतो. पण तिला त्या आठवणी आता नकोशा वाटत होत्या. नवरा गायब होऊन चार तपं झाली तरी अजूनही तिच्या कपाळावर रुपायाच्या आकाराचं कुंकू तसंचं होतं. तिच्या बोलण्यावरुन ती आता जीवनाला प्रचंड कंटाळलेली दिसत होती. आपल्या मातीतच आपला शेवट व्हावा म्हणून ती गावाला आलेचं तिच्या बोलण्यातून समजलं. तिनं उकळी आलेला काळा चहा दोन थाळ्यामध्ये ओतला. थरथर कापणाऱ्या हाताने त्या थाळ्या तिने आमच्याकडे सरकवल्या. मी चहाची थाळी तोंडाला लावली. बायकोनं माझ्याकडे पहात थाळीला कसातरी हात लावला. बायकोला माहित होतंच कुठे? एकेकाळी तिच्या नवऱ्याच्या पोटात फेसाळलेल्या ताज्या दुधांचे ग्लास याच सखू म्हातारीने बळजबरीने नरड्यात ओतले होते. काही वेळ विचारपूस करून मी जायला उठलो. “आता परत भेट नाय बाबा हुयाची! म्हणत तिने दोघांच्याही गालावरून हात फिरवले. बाहेर पडलो. बायकोला म्हणालो, “खोट्या हाडामासांचे यांत्रिक रोबोट तयार करणाऱ्या दुनियेत आता अशी माणसं तुला पुढच्या आयुष्यात कधीच भेटायची नाहीत.”

होय! सखू म्हातारीची ती शेवटचीच भेट ठरली. एकेकाळी जगण्याची प्रचंड उमेद असणारी आणि अखेरच्या काळात जगण्यालाच हरवून बसलेला सखू म्हातारीचा भक्कम बुरुज दीड महिन्यातच ढासळला. प्रचंड हळहळलो. अनेक प्रश्न डोक्यात गरगर फिरू लागले. सखू म्हातारीच्या घरातून त्या संध्याकाळी बाहेर पडताना तिनं गालावरून फिरवलेले खरबडीत हात हे साधे सुधे हात होते कि उन्हा तान्हात आठ बैलांचा नांगर धरलेले, दगडांच्या देशातील ते खरे खुरे राकट हात होते? तिनं दूध पाजून जगवलेल्या कमळीच्या सात पोरासारखी असंख्य तंत्रज्ञानानं काठोकाठ भरलेली नवी पोरं, तिच्या मयता भोवती गर्दी करून उभी राहिली असतील का? अख्या गावातल्या मेलेल्या मयतापुढे रात्रभर गहिवर घालून मडं जिवंत ठेवण्याचा आभास निर्माण करणाऱ्या सखू म्हातारीच्या मड्यापुढे शेवटी काळजातून कोण कोण रडलं असेल? अनेक प्रश्नांची डोक्यात गर्दी झालेली...पण उत्तरे होती कुठे??? ...

#ज्ञानदेवपोळ


No comments:

Post a Comment