Tuesday, February 13, 2018

वाडा चिरेबंदी

"आमच्या सात पिढ्यानी बसून खाल्लं तरी काय कमी पडायचं नाय! माज्या सुबरावला कुठं बँरीस्टर करायचा हाय!" असं जेव्हा मिशांना पीळ देत बापू म्हणायचा तेव्हा मला सात पिढ्या हि काय भानगड असावी ते नक्की कळायचं नाय. आमच्या लहानपणी बघावं तेव्हा रिकामं टेकड्या लोकांचा बापूच्या तीस खणी वाडयात राबता असायचा. बापू पान खाऊन पिंकदाणीत पिचकाऱ्या मारत अनेक पराक्रमाच्या गोष्टी सांगायचे. गांधीवधानंतर खेड्यापाड्यात अनेक ब्राम्हणांचे वाडे जाळले. त्यात बापूच्या शेजारचा भाऊ ब्राम्हणाचा वाडा पण जळाला. भाऊ ब्राह्मण गाव सोडून जाताना ह्यो जळका वाडा बापूनं विकत घेतला आणि त्याची पुन्हा नव्याने उभारणी केली. बापूचा वाडा गावाच्या मध्यभागी. वाड्याला भली मोठी दगडी चौकट. तितकाच उंचीचा कोरीव दरवाजा. जुन्या तटवजा भिंती. गावाच्या मध्यभागी उंचीवर हा दिमाखात वाडा उभा. वाड्याच्या बाहेरून घसरणीला लागलेलं सगळं गाव दिसायचं. एका महापुरात याच तीस खणी वाड्यानं साऱ्या गावाला आसरा दिलेला. वाड्याच्या बाहेर मोठा दगडी कडेपाट बांधलेला. या कडीपाटाला कधीकाळी बापूचा घोडा बांधलेला असायचा. बापू तरुणपणात शेता शिवारात या घोड्यावरून फिरायचे. अश्या एक ना अनेक गोष्टी बापू दिवसभर तरण्या पोरांना सांगत बसायचे. जग, माणसे कितीही काळासोबत पुढं गेली तरी बापू अजूनही त्याच इतिहास काळात.

बापू हे जन्मताच इरसाल व्यक्तिमत्व. अस्सल देशी बियाणंच म्हणा. रंगेलपणा तर बापूच्या नसानसात भिनलेला. पण गडी तापट. आता खेड्यात असा इरसाल माणूस म्हंटल कि त्याच्या अनेक करामती लोकांच्या तोंडी. बापूच्या अंगावर कायम पांढरा पोशाख, झुबकेदार पांढऱ्या मिशा आणि दोन्ही कानावर पिंजारलेला केसांचा पुंजका. तर अश्या या बापूच्या दोन बायका. शकुंतला आणि बकुळा. पहिल्या बायकोला काहीच मुलबाळ झालं नाही म्हणून बापूनं बकुळाला केली. बापू पिंक टाकत म्हणायचा, "आरं आमच्या शकुंतलीचं सारं खानदानच रोगाट तर तिला कशी पोरं बाळं व्हूयाची.” बकुळाला मात्र चार पोरी आणि अन सगळ्यात धाकटा संभाजीराव पोटाला आलेला. अन याच संभाजीरावाच्या पोटी जन्माला आलेलं बापुसारखंच इरसाल बियाणं म्हणजे एकुलता एक सुबराव.

वाड्यात एकुलता एक नातू जन्माला आल्यानं बापुचा या सुबराववर जीव बसलेला. सुबराव म्हणजे बापूच्या काळजाचा तुकडा. जेव्हा बघावं तेव्हा सुबराव बापूच्या खांद्यावर बसलेला दिसायचा. यात्रा जत्रा असू, कुणाचं लग्न असो, कुठल्या पाव्हण्याकडं जायाचं असो, बापू सुबरावला घेऊन हजर. सुबराव मोठा होऊ लागला तरी बापूची काय पाठ सोडायचा नाही. सुबराव माझ्यापेक्षा वयानं मोठा. गुरुजी आम्हांला सुबरावच्या घरी जाऊन त्याला शाळेला उचलून आणा म्हणाले कि आम्ही चार पाच पोरं बापूच्या वाड्याच्या दिशेने पळतच जायचो. वाड्यातल्या साखळीने बांधलेल्या लाकडी झोक्यावर बसून पिंकदाणीत लालभडक पानाची पिंक टाकीत बापू म्हणायचा, "आरं फुकणीच्यानो शिकून माणूस कवा सुधारलाय व्हय? शिकलेला माणूस कापल्या करंगळीवर पण मुतायचा नाय! मास्तरला म्हणावं त्यो गुऱ्हाळावर गेलाय काकवी आणाय! आज काय याचा नाय!" आम्ही माना हलवून माघारी वळालो कि पुन्हा मागून बापूचा आवाज. "मास्तरला म्हणावं जाताना वाड्यावरनं जरा काकवी घिऊन जावा सांच्याला! सांगशीला नवका!" आम्ही शाळेत येऊन मास्तरला बापूचा निरोप दिला की मास्तर बी खुश व्हायचे.

सुबराव नावाचं मला विशेष कौतुक वाटायचं. त्याच्या आख्या घराण्यात सगळे “राव” कसे काय जन्माला आले असतील हा मला नेहमी प्रश्न पडायचा. सुबरावच्या वाड्यात आणि मळ्यात खाण्याची कायम चंगळ असायची. त्यामुळे सुबराव सोबत आमचा हळूहळू चांगलाच दोस्ताना जमला. सुबराव खोडी काढण्यात आणि चोऱ्या करण्यात पटाईत. हळूहळू तो बापूच्या चंचीतले बिडीचे बंडल चोरून आणू लागला. ओढ्याला जाऊन अख्खा बिडीचा बंडल हा धूर सोडत एकटा संपवायचा. आम्हाला म्हणायचा, "शरीराला चांगलं असतया हे! तब्बेत आमच्या बापूगत हुतीया यानं!" असं काय बाय सांगून नुसती उरलेली थोटकं हा आम्हाला फुकायला द्यायचा. खेळात पण साऱ्या गल्लीत हाच राजा. गोठ्या खेळताना ह्यो गडी कायम नर. आम्ही मात्र सतत मादी. 

एखदा आम्ही वाड्यात गेलो तर बापू कुठेच नव्हते. सुबरावनं आईला विचारलं तर म्हणाली, "गेलं असत्याली रोजच्या ठिकाणावर!" मग सुबराव सोबत एका बोळातनं सुंदराबाईच्या घरापाशी गेलो. आत डोकावून पाहिलं तर बापूचं दोन्ही गुडघं उघडं करून सुंदराबाई तेल लावून चोळत बसलेली. सुबराव अचानक आलेला बघून सुंदराबाई म्हणाली, "मुडद्या ऐन वक्ताला आलास का रं घाण करायला!" तसा बापू जागचा उठला अन दातओठ खाऊन सुंदराबाईला म्हणाला, "टवळेss कुणाला गं मुडद्या म्हणालीस! अगं तुज्यासारख्या पन्नास रांडा ठेवीन अजून! आजपासनं लिपान लावलं तुला!" ताडकन उठून बापू सुबरावला घेऊन वाड्याकडं गेला. बापूच्या असल्या कितीतरी गोष्टी वाढत्या वयासोबत समजत गेल्या.

सुबरावच्या नादाला लागून आम्ही अनेक उद्योग करतोय हे बापाला समजलं. एखदा शाळत जाताना सुबराव रस्त्यात भेटला. म्हणाला चला मळ्यात. आम्ही तडक सुबरावच्या मळ्यावर. पोरगं शाळेत आलं नाही म्हणून मास्तरनं घरी पोरं पाठवली आणि बापाला सगळा उलगडा झाला. बाप थेट सुबरावच्या मळ्यावर आला. बाप जेव्हा मळ्यात आला तेव्हा आमचा पत्याचा डाव रंगात आलेला. बाप हळूच आला अन मागूनच पेकाटात चार पाच लाथा घातल्या. म्हणाला. "आय घाल्या मागच्या सात पिढ्यात कोण शिकलं नाय! अन तू बी ह्यो दिवटा जन्माला आलास व्हय! आता गावात ठिवित नाय तुला! परत गावाचं तोंड बघायचं नाय नायतर तंगड तोडून हातात दिन!" त्या दिवशी गाव तुटलं अन गावासोबत सुबराव मागं पडला.

काळानुसार पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. आता सुबरावच्या गाव आठवणी फिकट होत गेलेल्या. जुने सारे संवगडी काळजापासून दूर गेले. शिक्षणामुळे नव्या जाणिवा आल्या. नोकरी मिळाली. पुढं लग्न झालं. अधे मधे कधी गावच्या वाऱ्या व्हायच्या. तेव्हा कधी सुबराव पुढारी झालेचं समजलं. नंतरच्या फेरीत सुबरावनं आक्खं गाव झाडून खाल्लेचं समजलं. एका पावसात बापूचा काळानुसार जीर्ण झालेला वाडाही पडलेचं समजलं. कधी येता जाता एखांदा मित्र रस्त्यात भेटला तर सुबरावचे अनेक पराक्रम सांगायचा. एखदा आईला सुबराव विषयी विचारलं तर म्हणाली, बापू मेल्यावर भाड्यानं सारं ईकून खाल्लं! मळा गेला, शेतं गेली, बायका पोरं सुद्धा त्याला सोडून गेली!” 

एखदा जत्रा संपवून शहराकडे बायका पोरांना घेऊन, आमची सर्कस गावाबाहेरच्या फाट्याच्या दिशेने चाललेली. रस्त्यात किसानानी भेटली. तिच्याशी चार दोन गोष्टी बोलून झाल्यावर म्हणाली. "सुबरावनं पडक्या वाड्याचा दगुड बी ठेवला नाय! दगाड सुद्धा भाड्यानं ईकलं! आज्ज्यावर गेलं गाबडं!” मी सुन्न झालो. त्याचे आईवडील कुठे राहतात विचारल्यावर म्हणाली, "आय बा राहिलाय मळ्यात छपार घालून! घर लयाला गेलं बघ समदं!" मी किसानानीचा निरोप घेऊन वाट चालू लागलो. तर डोळ्यासमोरून सुबराव जायला तयार नाही. फाट्यावर पोहचलो. तर एका वडापमधून सुबराव भेलकंडत खाली उतरताना दिसला. दारू पिऊन फुल्ल टाईट. इच्छा असूनही मी त्याला आवाज देण्याचं टाळलं. पण त्याची सैरभर नजर माझ्यावर पडली आणि तो माझ्या दिशेने वळाला. बायका पोरांना गावाची जास्त सवय नाही. पण वाटा चालू ठेवण्यासाठी अशी अधी मधी घेऊन जावी लागतात. त्यात दारुडी दिसली की लांब घाबरून पळत्यात. म्हणून तो येण्याआधी मीच त्याच्या पुढं गेलो. म्हणालो. "काय हि अवस्था सुभा!" तर म्हणाला, "आssहाss राव म्हणायचं राव! दारू पेलो म्हणून काय झालं! या सुबरावाला तू ईसरलास!" मी म्हंटल, "सुबराव मी तुला कसा विसरलं! जुना दोस्त तू माझा!" तर म्हणाला "मग दोस्ताला शंभर रुपये दे! माहेरासनं बायका पोरांना आणायचं हाय!" मी पटकन जागचा हललो. म्हणजे बुडीतच कि पैसे. मी बायकोकडे पाहीलं तर तिनं नको म्हणून मान हलवली. मी त्याच्याकडं पहात म्हणालो, "सुबराव! तू खोटं बोलून दारूसाठी पैसे मागतोस! मी दारूला पैसे देणार नाही!"

माझ्या नकारावर तो चिडला. त्यानं माझ्या नजरेत नजर रोखली. म्हणाला, "आमचा बापू म्हणायचा, शिकलेला माणूस कापल्या कंरगळीवर पण मुतायचा नाय!" मी काहीच बोललो नाही. तो लटपटत खाली वाकला. खालचा एक दगड उचलला. उचलताना त्यानं माझ्याकडं पाहिलं. माझ्या बायकोकडं पाहिलं. माझ्या घाबरलेल्या चिमुकल्या पोरांच्याकडं पाहिलं. बायकोच्या काळजाचं क्षणात पाणी पाणी झालं. तिनं पोरांना जवळ ओढलं. पण त्याने तो दगड मला मारला नाही. माझ्या बायकोला मारला नाही. माझ्या चिमुकल्यानाही मारला नाही. उचललेला दगड त्याने उंच आकाशात भिरकावला आणि ओरडला, "बापूsss म्हणाला हुतास कि आमच्या सात पिढ्यानी बसून खाल्लं तरी काय कमी पडायचं नाय! आरं बघ वाकून खाली! वाड्याचा दगूड बी उरला नाय तुज्या!" त्याने पुन्हा दुसरा दगड उचलला. असेल नसेल तेवढ्या ताकतीने भेलकंडत पुन्हा आकाशात भिरकावला आणि मोठ्याने किंकाळला. "बापूsss बरबादी केलीस लका घरादाराची! नुसत्या गावच्या रांडा नासीवल्यास! तुझ्याss आयलाsss लावलाsss...!!!"

#ज्ञानदेवपोळ
प्रातिनिधिक फोटो, Credit Indian Frame

No comments:

Post a Comment