Monday, December 4, 2017

माहेर

माहेर हा शब्द कळायला स्त्रीचाच जन्म घ्यावा लागेल. माहेर आणि स्त्रीचं नातं हे अनादि अनंत काळापासून कधीही न संपणारं. युगाने युगे चालत आलेलं. खेड्यात तर माहेर या शब्दाला विशेष वलय. लग्नसराई संपली कि पावसाळा सुरु होतो. खेड्यात शेतातील कामांना मग प्रचंड जोर. काही काळातच पिकं टरारून वर येतात. अशातच नवीन लग्न होऊन सासरी गेलेल्या पोरींना वेध लागतात ते माहेराचे. लग्नानंतर स्त्रीचे सारे जीवनच बदलते. उठ सुठ कधीही तिला माहेराला जाता येत नाही. मग ते कितीही जवळ असेना. खेड्यात त्यासाठी रीतीरिवाज ठरलेले. कृषीजनांच्या संस्कृतीत रीतीरीवाजाना  विशेष महत्व. ते सर्वांनी पाळायचेच. श्रावणापासून ते पंचीमीच्या सणापर्यंत. आणि पुढे गौरी गणपती, दिवाळीपर्यंत या नव्या सासुरवाशिणीना ओढ लागते ती माहेरांची.

माहेरात येताना रिकाम्या हाती येता येत नाही. त्यासाठी रिती ठरलेल्या. त्या पाळायच्याच. पहिल्यांद्या माहेरात येणाऱ्या सासुरवाशिनी सोबत दुरड्या घेऊन माहेराकडे जायला निघतात. पूर्वी बैलगाड्यांनी या सासुरवाशिनी माहेराला येत. या बैलगाड्या बांबूच्या काब्यांनी गोलाकार आकार देऊन झाकलेल्या असायच्या. गावांच्या वेशी त्यांच्या स्वागताला सदैव तत्पर. बैलगाडी घरापुढे थांबली कि पहिली खाली उतरणार ती सासुरवाशिन. मग दुरड्या उतरणार. बंधूची गाडी गोठ्याला सुटणार. तोपर्यंत दाराला उभी असलेली कर्ती म्हातारी नातीची दृष्ट काढणार. निदान भाकरीचा तुकडा तरी ओवाळून टाकणारच. यात अंधश्रद्धा नाही. असणार ती श्रध्दाच. मग सासुरवाशिनीच्या गालावरून जुन्या हातांची बोटे मोडली जाणार. एव्हाना साऱ्या गल्लो गल्लीत बातमी. मग लहान पोरासहित भावकीतल्या बायकांची पळापळ. “अमक्या तमक्याची लेक आली गं!” तोंडी एकच वाक्य.

सासुरवाशिनींची पावलं माहेरच्या उंबऱ्याला लागली कि साऱ्या खेड्यात असच स्वागत. गावची लेक ती आपलीच लेक. तिचं सुख ते आपलं सुख. तिचं दु:ख ते आपले दु:ख. हीच खेड्याची संस्कृती. रीत. परंपरासुद्धा. त्यात आपलेपणा. मायेचा ओलावा काठोकाठ भरलेला. मग दुरड्या सोडण्याची धावपळ. दुरड्या सोडण्यास इतर स्त्रियांना बोलविण्यासाठी भावकीतील खास बाईची नेमणूक. ती चार पाऊलात एका वेळी पाच घरात निरोप देणार. खेड्यात अशी वेळेत कामं करणाऱ्या काही खास स्त्रीया. मग सगळीकडे हळदीकुंकवासाठी पळापळ. सासर माहेरच्या परिस्थितीनुसार या दुरड्यांची संख्या ठरलेली. अगदी एका दुरडीपासून ते पाच पंचीवीस पर्यंत ही वाढत जाणारी संख्या. हळदी कुंकू, पान, सुपारी, पीस नारळ हे मात्र ठरलेलंच. एखांद्या दुरडीत पुरण पोळी, तर दुसरीत करंज्या लाडू. आम्ही याला कानवले म्हणत असू. म्हणजे अजूनही तसेच म्हणतो. आपल्या माणसात. मात्र खेड्यात नावं घेतल्याशिवाय या दुरड्या सुटत नाहीत. काळानुसार दुरडीचा “डबा” झाला. पण हीच रीत अजूनही. नांव घेणं या शब्दाला “माहेर” या शब्दा इतकच वलय. तितकच वलय एखांद्या लुगडे चोळीतल्या म्हातारीने घेतलेल्या अंलकारीक लांबलचक नावाला. तिच्या शैलीला. आणि तिच्या खणखणीत आवाजाला. यात जुन्या स्त्रिया पारंगत. एकीकडून दुसरीकडे काळानुसार चालत आलेला हा पारंपारिक लाखमौलाचा ऐवज. जुन्या संस्कृतीकडून पुढ्च्या पिढ्यांना मिळालेला. मग एकमेकींच्या “रावांचं” नांव घेण्याची प्रचंड स्पर्धा. मग एखांदीचा “राव” भांडखोर का असेना. पण नाव घेताना जपायची ती संस्कृती. बाकी कैक गोष्टींना इथे थारा नाही. अगदी एका ओळीपासून ते दहा ओळीपर्यंत ह्या वाढत जाणारी शब्दांच्या लयबद्ध राशी. पण सर्वांना उत्सुकता एकच. नव्या सासुरवाशिनीच्या नावाची. तिचं लाजत मुरडत नांव घेणं हा कित्येक डोळ्यांचा कौतुकाचा विषय...

माहेरी या सासुरवाशिणीचं किती कोड कौतुक. त्यांच्यासाठी खास पुरणपोळीचं गोड जेवण. तुटलेल्या मैत्रिणी जवळ आल्या कि गप्पागोष्टी, चेष्टामस्करी सुरु. त्यात  मंगळागौरीची गाणी चालत.  फुगडयाचा फेर धरला जाई.  पंचमीला वडाच्या झाडाला झोके बांधले जात. त्या झुल्यावर झुलणं होई. झोक्यावरून सासर माहेरच्या सुख दुःखाची गाणे चालत. अखेर सासुरवाशिणी सासरला जायला निघतात. त्यावळी दाटून आलेले कितीतरी कंठ खेड्यांनी उघड्या डोळ्यांनी पहिले असतील. बहिणाबाईनी तर “लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते!” असं उगीच नाही म्हंटलं.

काळ बदलला. खेडी बदलली. संस्कृती बदलली. जुनं पिकत गेलं. तसं नवं उगवत गेलं. स्त्री साठी सारं काही बदललं. पण बदललं नाही तिच्या काळजातलं “माहेर”. माहेराविषयीचं स्थान. प्रेम. जिव्हाळा. आपुलकी. आणि ओढ सुद्धा. पण पूर्वीसारख्या सासुरवाशिनी आता बैलगाडीने येत नाहीत. वेशीतून आत येताना पूर्वी येणारा बैलांच्या गळ्यातील घुंगराचा आवाज आता रस्त्या रस्त्यातूवरून होत नाही. काळानुसार बदल अपरिहार्यच. बैलगाड्यांच्या धावांच्या “कर कर” आवाजाची जागा आता “अपोलो, सीयाट” सारख्या रबरी टायरांनी घेतलीय. माहेरांच्या भेटीसाठी लागणारा वेळ या रबरी टायरांनी आता जवळ आणलाय. आता सासुरवाशिनी आल्यावर गल्लीतले इतके लोक गोळा होत नाहीत. जितके ते पूर्वी व्हायचे. पण माहेरची ओढ स्त्री साठी अजून तितकीच टिकून आहे.

तीच ओढ शहरांतही. नव्या शिक्षणाने आणि सुधारणांनी शहरांकडे लोंढा वाढला. परिणामी नव्या स्त्रीचं सासर आणि माहेर दोन्ही आता शहरातच. या नव्या स्त्रीने जुन्या परंपरा मोडून काढल्या. नव्या डोक्यात घातल्या. रुद्राक्ष संस्कृतीतून द्राक्ष संस्कृतीकडे तिचा प्रवास झाला. पण माहेरी जाण्याची ओढ? अजूनही तितकीच. मग एखांद्या शहरात सासर ईस्टला आणि माहेर वेस्टला का असेना. नव्या काळातही स्त्री साठी माहेरची ओढ तशीच राहिली. म्हणून दूर एखांद्या जत्रेतून देवाचा गुलाल बुक्का आणि मुठभर चिरमुरे बत्ताशे गाठीला बांधून आई बापाकडे माहेराला घेऊन निघालेली खेड्यातली अशिक्षित स्त्री असो कि, युरोप अमेरीकीतून इथल्या शहरात परतल्यावर आलिशान टॉवर मध्ये राहणाऱ्या आई बापांकडे नवनवीन वस्तू घेऊन सिमेंटच्या रस्त्यावरून निघालेली आधुनिक स्त्री असो. दोघी आजही तितकच माहेरावर प्रेम करतात. म्हणूनच काळ कितीही बदलेल. जग बदलेल. सारी दुनिया बदलेल. स्त्रीच्या दृष्टीने सारे काही बदलेल. पण बदलणार नाही ते फक्त आणि फक्त “माहेर...”No comments:

Post a Comment