Wednesday, November 22, 2017

समाजातला बळी

लीना अचानकच स्टेशनवर भेटली. तीही तब्बल पंधरा वर्षानंतर. तिनंच मला प्रथम ओळखलं आणि जवळ आली. सत्य स्वप्नापेक्षा किती कठोर असतं हे त्या दिवशी मला समजलं. तिच्याबरोबर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. “तू कुठे असतोस, मी कुठे असते” याची चौकशी झाली. ती मुंबईतच नोकरी करीत असल्याचं समजलं. मला या अनपेक्षित भेटीचं आश्यर्यच वाटत होतं. कारण ती आणि मी प्राथमिक शाळेपासून एकत्र शिकत होतो. पुढे कॉलेजमध्येही काही काळ एकत्र होतो. तेव्हापासूनच आमच्यात मैत्री बनली. पण मैत्रीचं आणि प्रेमाचं नातं जवळ-जवळ असतं ना. ते कधी आणि केव्हा निर्माण झालं ते दोघांनाही कळलं सुद्धा नव्हतं.

लीना मानेबाईंची मुलगी. मानेबाई माणदेशातल्या. पण मुख्याध्यापक म्हणून बरीच वर्षे गावच्या प्राथमिक शाळेत नोकरीस होत्या. लीना एका श्रीमंत प्रतिष्ठित घरातली एकुलती एक मुलगी. तर मी दलित जातीतील गरीब घरचा मुलगा. माझे आईवडील लहानपणीच देवाघरी गेल्यामुळे माझा शालेय जीवनाचा सर्व खर्च मानेबाईनीच केलेला. त्यांनीच मला शिकवलं. वाढविलं. पुढे प्राथमिक शिक्षण संपलं. लीना तालुक्याच्या गावी माझ्यासोबत कॉलेजात येऊ लागली. पण लहानपणापासूनच एकत्र वाढल्याने पुढे पुढे सहवासातून तिचं आणि माझं एकमेकांविषयीचं आकर्षण खूपच वाढत गेलं. परुंतु माणसाला प्रेम सुद्धा एका मर्यादेपलीकडे करता येऊ नये असाच या जीवनाचा नियम असावा. कारण मला आता उमजलं होतं कि आमच्या प्रेमात जाती धर्माची बंधने आ वासून उभी राहणार. आमचं शिक्षण संपलं. मानेबाई मला नोकरी मिळाव्यात म्हणून धरपडत होत्या. तर लीना मी मिळावा म्हणून अनेक क्लुप्त्या लढवत होती. मी मात्र जीवन मरणाच्या कात्रीत सापडलो होतो. मानेबाई आमच्या लग्नास होकार देतील याची मुळीच खात्री नव्हती. शिवाय जरी दिली असती तरी त्याचं समाजातील स्थान, त्यांची प्रतिष्ठा या सर्व गोष्टीना समाजाच्या दृष्टीने कलंक लागणार होता. 

एका सायंकाळी लीना अचानकच मला भेटली. म्हणाली, “आपण येथून दूर जाऊन लग्न करू! जेथे धर्म रूढी या गोष्टीना आजीबात थारा नसेल तेथे जाऊ! पण तू मला कधीही सोडून जाऊ नकोस! मी कधीही तुझ्याविना सुखी होणार नाही!” मी त्या दिवशी तिची कशीतरी समजूत घातली. पण मानेबाईसमोर विषय काढण्याचं धाडस माझ्यात नव्हतं. अखेर लीनानच हे प्रकरण बाईपर्यंत पोहचविलं. बाईनी मला घरी बोलविले. लीनालाही सोबत बसविलं. आमच्याकडे पहात म्हणाल्या, “सुगरण आपल्या पिलांसाठी एक काडी काडी गोळा करून खोपा विणते. प्रसंगी उपाशी राहून ती कण कण चारा आणून त्यांना भरवते. कारण तिलाही वाटत असतं. आपल्यासारखच यांनाही उडता यावे. पण तिच पिल्ले जर मोठी झाल्यावर सुगरणीस टोच्या मारून जखमी करू लागली. घायाळ करू लागली. लांब लांब उडू लागली तर सुगरणीच्या अंतरंगाला होणाऱ्या वेदना खूप भयानक असतात. तुम्हाला नाहीत त्या सांगता येणार? त्यांचे डोळे पाण्याने भरले होते.

स्वप्नाचं जग आणि वास्तवातील जग खूप निराळं असतं. म्हणून तर हि दोन जगे कधीच एक होऊ शकत नाहीत. माझ्या दृष्टीने लीना म्हणजे आकाशाला लागलेलं एक फुल होतं. कितीही उंच भरारी घेऊनही त्या फुलाचा गंध मला मिळणार नव्हता. पुढे चार आठ दिवसातच बाईंची दूर कुठेतरी बदली झालेचं समजलं. लीना मला भेटायला आली. म्हणाली, “जुन्या आठवणीना सुद्धा खूप वास असतो रे! त्या आठवणीही काही कमी समजू नकोस!” हेच तिचे अखेरचे शब्द ठरले. लीना कायमची नजरेआड झाली. अन मी शहरांकडे वळलो. 

आज अचानकच इतक्या वर्षांनी ती समोर आली. खरं तर अगदी आजपर्यंत मला तिच्या नसण्याची आणि या जगाच्या असण्याची सवयच होऊन गेली होती. कारण कॉलेजची प्रेमे म्हणजे तात्पुरती ऐट असते. तात्पुरता डामडौल असतो. पुढे प्रेमे उडून जातात. कोणाची कोठे तरी लग्ने होतात. आणि तिकडे विसरून गेलेल्या आपल्याच प्रेयसीला दुसऱ्याच कोणाकडून तरी, तितकीच गोजिरवाणी पोरंबाळं होत राहतात.” अशा कित्येक समजुतीनी या साऱ्या गोष्टी आता अंगवळणी पडत गेलेल्या. पण “प्रीती म्हणजे काही निर्जीव वस्तू नव्हे कि जी सोडली कि संपली. तिचे धागे कुठेतरी खोल अंतरंगात गुंफलेले असतातच.” लीना सुखी असेल. सारं काही विसरली असेल. तिचा संसार तिने आता उभा केला असेल. असे मला अगदी त्या क्षणापर्यंत वाटत होते. पण यातले काहीच खरे नव्हते. वयाची चाळीशी गाठल्यानंतरही तिने लग्नच केले नसल्याचे समजले. पण का नाही केले याचे उत्तर मला तिने दिलेच नाही. पुन्हा पुन्हा याच विचारल्या गेलेल्या प्रश्नाने ती अधिकच अस्वस्थ होत गेली. अबोल झाली...

मला मानेबाईंची आठवण झाली. जरी त्यांनी आमच्या लग्नास विरोध केला असला तरी त्यांच्यामुळेच मी आज पांढरपेशा समाजात वावरत होतो. मानेबाई तसं थोर आदर्श व्यक्तिमत्व. गोरगरीब लोकांबद्दल त्यांना नेहमीच खूप जिव्हाळा. आपुलकी. आणि प्रेम. त्या केवळ शाळेतच शिकवत नसत. तर आजूबाजूच्या इतर स्त्री पुरुषांनाही त्या संसाराविषयीचे सल्ले देत. त्यामुळे समाज आणि त्यांच्यात एक वेगळ्याच प्रकारचे नाते निर्माण झाले होते. त्या जिल्हास्तरीय एड्स जनजागरण मोहिमेतही काम करत होत्या. गावात त्यांच्याच प्रयत्नाने प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती झालेली. स्त्रियांनी शिक्षण घेऊन स्वावलंबी बनले पाहिजे हि त्यांची प्रामाणिक इच्छा. गरिबीमुळे एखांदे मुल शिक्षण घेत नसेल तर त्या स्वखर्चाने त्यांना शाळेत पाठवीत. 

मी लीनाला बाईविषयी विचारले. त्यांच्या तब्बेतीविषयी विचारले. बाई आता रिटायरमेंट नंतरचं आयुष्य सुखात जगत असतील. या विचारात मी होतो. तर लीना रडायलाच लागली. मी अवाक होऊन तिच्याकडे पाहू लागलो. अखेर बऱ्याच वेळाने तिच्याकडून बाई आता तुरुंगात असल्याचे समजले. मला एकदम धक्काच बसला. ती सांगू लागली, “आईचा समाजाने बळी घेतला रे! आयुष्यभर ती खूप प्रामाणिक राहिली! आयुष्यात वाईट विचार असा कधी तिने केलाच नाही रे! आईची बदली झाल्यानंतर आम्ही ज्या गावात रहात होतो. त्या शाळेमध्ये तिने लहान मुलांना स्वखर्चाने मोफत दुध वाटण्याची योजना सुरु केली. गावातलेच दुध विकत घेऊन ती शाळेत मुलांना वाटत असे. एकदा असेच वाटेत कुणीतरी दुधामध्ये कीटकनाशक ओतले. ते दुध पिल्याने शाळेतील दोन मुले दगावली. गावातील काही लोकांनी आईनेच दुधामध्ये कीटकनाशक ओतल्याची पोलीस केस दिली. पोलीस आईला घेऊन गेले. न्यायालाने तिला दहा वर्षांची शिक्षा दिली.

मला फारच वाईट वाटले. माझे डोळे भरून आले. इतक्यात स्टेशनवर लोकलचा हॉर्न वाजला. तिने माझा निरोप घेतला. पण जाता जाता रविवारी घरी येण्याचा आग्रह केला. म्हणाली, “मला तुझ्याशी खूप बोलायचय! मी वाट पाहीन!” ती क्षणात पाठमोरी झाली. खट खट आवाज करणाऱ्या त्या लोकलकडे मी कितीतरी वेळ तसाच पहात उभा होतो. सफल न होणाऱ्या प्रेमाचे दु:ख किती असह्य असते याची प्रचीती मला त्या क्षणी झाली.

पण खरच तिने सांगितल्याप्रमाणे मी तिला भेटायला जाणार होतो का? मला भेटायला बोलावून तिला नेमके काय सांगायचे असेल? तिला भेटून तिच्या तळात गेलेल्या आठवणीना मी पुन्हा वर काढणार होतो का? तिने आजपर्यंत का लग्न केले नसेल या भविष्यात मला छळणाऱ्या प्रश्नाचं उत्तर मी तिच्याकडून घेणार होतो का?... मला यातलं काहीच माहित नव्हतं... 

मी घरी आलो. एकीकडे लीना आणि दुसरीकडे मानेबाई काही केल्या दोघीही मेंदूतून जाईनात. मला बाईबद्दल तर खूपच दु:ख झाले. आपल्या बाई या सर्व सामान्यांच्या बाई आज कारण नसताना तुरुगांत शिक्षा भोगत आहेत. ज्यांनी आपल्याला शिकवले. वाढविले. आपण त्यांनाच कसे काय विसरू शकलो? नंतरच्या कित्येक वर्षात आपण कधीच मानेबाईंची साधी चौकशीही का केली नसावी? माने बाई जन्मालाच आल्या नसत्या तर? आपण आज कुठे असतो? आपण प्रेमात इतके कसे काय आंधळे झालो? कि सारा दोष आपण बाईनांच द्यावा? माणूस इतका कसा निष्ठुर असू शकतो? अनेक प्रश्न माझ्या मेंदूत गरगर फिरू लागले. 

नंतरच्या मंगळवारी मी बाईंची भेट घ्यावी. त्यांना आपुलकीने चार शब्द सांगावेत. त्यांना तेवढेच बरे वाटेल म्हणून सर्व पोलीसी औपचारिकता पूर्ण करून मी तुरुंगात गेलो. मला मिळालेल्या वेळेत मी गडबडीने त्यांच्या अंधाऱ्या खोलीजवळ पोहचलो. पण समोरचे दृष्य पाहून बाई ऐवजी मलाच कसे त्यावेळी वेड लागले नाही हेच मला आज कळत नाही. मानेबाईनी आपले केस गळ्यात मोकळे सोडले होते. आणि रिकाम्या भिंतीकडे पहात मोठ्याने “हाss हाss” करीत त्या हसत होत्या. मध्येच इतर अपराधी स्त्रियांना हाताची बोटे मोजत काहीतरी शिकवत होत्या. मी लोखंडी जाळीजवळ गेलो. चकित होऊन बाईना हाक दिली, “बाईss! मी आलो आहे, तुमचा विद्यार्थी! इकडे. इकडे. माझ्या आवाजाने बाई लोखंडी खिडकीजवळ आल्या. माझ्याकडे निरखून पाहिलं. क्षणभर थांबल्या आणि म्हणाल्या. “बाळा आज दुध संपले आहे, उद्या ये! आणि येताना माझ्या लीनाला घेऊन ये! मी तुमचा ‘आंतरजातीय विवाह’ लावून देणार आहे.” मी आवक झालो. नुकतीच मान हलविली आणि माघारी फिरलो. विचार करीत... समाजात हकनाक बळी गेलेल्या मानेबाईंचा? 

#ज्ञानदेवपोळ

No comments:

Post a Comment