Sunday, September 10, 2017

हिरवा चुडा

गावावर पसरलेल्या सावल्या लांब जाऊन एकमेकात जाऊन मिसळल्या. गुरं माणसं गावाकडं परतु लागली. दिवसभर भकास पडलेल्या गावाला जागेपणाची कळा आली. काही वेळात कडूसं मावळून गेलं. हलक्या पावलानं गावात अंधार शिरला. रस्त्यावर लागलेले दिवे वगळता नजरेच्या टप्प्यातलं दिसायचं बंद झालं. गावातल्या सगळ्या गाड्या परतल्या तरी बापलेक रानातून अजून गाडी घेऊन कशी काय आली नाहीत म्हणून भागवत अण्णाची चंद्रभागा ओसरीला येऊन रस्त्याकड नजर लावून बसली होती. तर चार दिवसापूर्वी ठरलेलं आपलं लग्न या महिन्यात होणार या आनंदात पंधरावी शकलेली सुगंधा चुलीपुढं भाकऱ्या थापत बसली होती. वैलावर आमटी रटरटत होती. मधीच आईबाप खर्चाचा मेळ कसा घालणार या काळजीनं ती तव्याकडं पचणाऱ्या भाकरीकड नुसतीच बघत होती. इतक्यात खाल्लीकडच्या गाडीरस्त्यानं बैलांच्या गळ्यातल्या घंटीचा आवाज होऊ लागला. घराच्या ओढीनं चवळ्या पवळ्या गाडी गोठ्याला घेऊन आले. सुभाषनं गाडी सोडली अन बैलं दावणीला बांधली. "इतका येळ का वं लागला आज! अण्णाच्या हातात पेंडीची घमेली देत चंद्रभागा म्हणाली. "अगं सगळा येडा काढला आज! फकस्त वरची ताल कुळवायची राहत व्हती म्हणलं पुन्हा बैलं मिळायची नाहीती! म्हणून उशीर लागला आज!"

सुभाष वैरणकाडी करून आणि बैलावरून हात फिरवून सोफ्याला बसलेल्या आयबापाच्या जवळ येऊन बसला. कुणीच कुणाशी बोलेना. इतक्यात पवाराची गजराबाई आली अन भीतीला टेकून बसली. अण्णाकड बघत म्हणाली, "मग कसं करायचं ठरविलय! सुगंधाचं लगीन तर पंधरा दिसावर आलंय! कर्ज नायच मिळायचं म्हणताय कुठं!" अण्णा मान वर करून म्हणाले, "अंग सगळं प्रयत्न करून झालं! पाव्हणं रावळ बी करून बघितलं! हिचं डाग मोडून पोरीला नवं करता येतय! पण हुंडा, धडूतं, भांडीकुंडी कशानं करायची!" इतक्यात चंद्रभागा म्हणाली, "मी म्हणतेय बैलं यिकुया! या साली भाडयानं करू शेती! अन सालभर राबून पुढच्या सुगीला नवी जोडी घिव!" शेवटी अण्णा म्हणाले, “जमीन ईकून बी परत आपल्याला मिळायची न्हाई! पण बैलं यिकायला मनच धजवंना झालंय बघ!" पण मन मोठ्ठ करायला पाहिजेल. असं नोकरीवालं स्थळ पोरीला परत मिळायचं नाय! बैलं आज ना उद्या येतील दावणीला! पण लगीन पार पडाय पाहिजेल!” असं घरातली सगळीच म्हणल्यावर शेवटी खरसुंडीच्या भरलेल्या यात्रेत बैलं विकायचं फायनल ठरलं. 

जेवण खाणं झाली. पण टोपल्यातल्या अर्ध्या भाकरी तशाच शिल्लक राहिल्या. अण्णा रातभर या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत राहिले. शेतात राबताना बैलं सारखी डोळ्यापुढं येऊ लागली. मातीत शिंगानं उकऱ्या काढताना दिसायला लागली. दिवसभराच्या कामानं मध्यान रातीला कधीतरी अण्णाचा डोळा लागला. 

पहाट झाली. गजराबाईचा कोंबडा ओरडला. भागवत अण्णाच्या घराला जाग आली. अण्णानं उठून बैलासनी अंधारातच कडबा घातला. सुभाषनं गोठा झाडून शेण उकिरड्यावर टाकलं. सुंगधाना स्टो पेटवून गडबडीनं कणिक मळून चपत्याला तवा ठेवला. चंद्रभागानं बाहेरच्या चुलवानावर बापलेकास्नी अंघोळीला पाणी ठेवलं. बापलेकानी अंघोळा उरकल्या. सुभाषनं चहा चपाती खाल्ली. पण अण्णाला घास उतरेना म्हणून नुसताच घशात चहा ओतला. सुगंधानं दोन दिवस पुरतील इतक्या चपात्या अन भजी एका गठुळ्यात बांधून दिली. रांजणातली एक मोठी पाण्याची बाटली भरून सोबत दिली. अण्णांनी गोठ्यातल्या बैलांच्या मेका पिशवीत घातल्या. पण चवळ्या पवळ्याचं कासरं सोडताना अण्णाचं हात पाय कापायला लागलं. शेवटी अण्णांना बाजूला करत सुभाषनं बैलांचं कासरं सोडलं. चवळ्या गोठ्यातनं लगीच बाहेर आला. पण पवळ्या बाहेर येईना. पवळ्यावर अण्णाचा पहिल्यापासून लई जीव. घरच्या गाईचं वासरू. जन्मापासून संभाळलेलं. घरच्या पोरास्नी रतीब न लावता पवळ्याला दुधाचा रतीब घातलेला. गाईची चारी थानं पवळ्यासाठीच ठेवलेली. अण्णाचं डोळे पहाटेच्या अंधारात भरून आलं. अखेर चवळ्या पवळ्या घरापुढच्या अंगणात आले. शेवटचं शेणाचे पव अंगणात सोडले. चंद्रभागानं तांब्यातून आणलेलं पाणी बैलांच्या पायावर ओतलं. आणि चपातीचं दोन दोन घास बैलासनी भरीवलं. अण्णानं सुगंधाच्या हातातला गुलालाचा डबा हातात घेऊन चवळ्या पवळ्याच्या वशिंडाला आणि कपाळाला लावला. पुढं उभा राहिलेल्या सुभाषनं कासऱ्यानां जोर दिला. बैलं जागची हलली. चंद्रभागा ड्बडबल्या डोळ्यांनी अंधारात बैलांच्या पुढं हात जोडून म्हणाली, "आम्हाला माणसात आणलत बाबांनो तुम्ही! पोटाला काय बी कमी पडू दिलं नाय आमच्या! चांगल्या खात्या पित्या घरात जावा बाबा!" चवळ्या पवळ्याला नेहमी बैलगाडीची सवय असल्यानं रिकामं चालायला बैल पाय उचलत नव्हते. पण बाजाराच्या गडबडीनं सुभाष रस्त्याला लागल्यावर बैलांना दामटू लागला. अजून पुरतं उजाडलं नव्हतं. पायखालचा गाडीरस्तादेखील नीट दिसत नव्हता. अण्णा डोक्यात चाललेल्या विचाराच्या कल्लोळानं वाटेचं भान विसरत होते. एखाद्या जागेवर ठेचकाळत होते. क्षणात स्वतःला सावरीत होते.

दिवस उगवायला बालवाडीची शिव लागली. सूर्य लाल गोळा घेऊन वर आला. एखांद्या ठिकाणी दिसणाऱ्या रानातल्या पिकावरून भोरड्यांचे थवेच्या थवे उडू लागले. एखांद्या राखण्याने हाकलले कि पुन्हा दुसऱ्या पिकावर जाऊन उतरताना दिसत होते. खरसुंडीचा बैलबाजार अजून चार पाच कोस दूर होता. सूर्य वर वर सरकू लागला. पायाखालची वाट मागे पडत होती. ऊन जोरकस तापायला लागलं. रस्त्यावरचा फुफाटा अण्णाच्या पायात शिरून चटके बसते होते. दुपार झाली. वारं विसावलं. उन्हानं अंग नुसतं शिजून निघत होतं. उन्हाखाली शिवार तापून निघत होता. नजर जाईल तिकडं नुसत्या उन्हाच्या झळा दिसत होत्या. सुभाष बैलासनी काय थांबवायचं नाव घेईना म्हंटल्यावर मागं चालता चालता अण्णा म्हणाले, "गड्या या ओढ्यावर थांबूया आता! कॅनालचं पाणी बी हाय वड्याला! बैलांसनी बी विश्रांती मिळल! पाणी बी पित्याली!" सुभाषनं ओढ्यात चवळ्या पवळ्यासनी पाणी पाजलं अन करंजीच्या झाडासनी गवत बघून बांधलं. डगरटीवर जांभळीच्या झाडाखाली सावलीत बापलेक येऊन बसले. सुभाषनं चपात्याचं गठुळ सोडलं. उन्हानं चपात्या आखडून गेल्या होत्या. दोघांनी घास घास खाल्ला. पाण्याचा एक घोट पिऊन ओढ्यात बांधलेल्या चवळ्याकड बघत अण्णा म्हणाले, "गड्या चवळ्या किती पर्यंत विकल रं!" अण्णाचं वाक्य पुढं रेटीत सुभाष म्हणाला, "चाळीस हजारापर्यंत तरी जाईल कि वं!" “अजून वाढला तर मी म्हणतुया पवळ्याला ठेवावा! गड्या अशी बैलं मिळायची न्हायती परत! दावणीला एक बैल असला मजी आपोआप दुसरा बी ईल!" "अण्णा समदं खरं हाय पण लाखभर खर्च हाय आपल्याला लग्नाचा!" सुभाषच्या या बोलण्यावर अण्णा पुन्हा हताश झाले आणि शून्यात हरवून गेले. 

खरसुंडीच्या बाजारात पोहचायला चार वाजले. बाजारात बैल चिक्कार आलेले. जिकडे तिकडे बैलांची गर्दी. सगळीकडे दलाल अन व्यापारी फिरत होते. माळरानावरच्या एका मोकळ्या जागेवर अण्णांनी पिशवीतल्या लोखंडी मेका बाहेर काढल्या. जवळ पडलेल्या दगडानं त्या जमिनीत खोलवर ठोकल्या. सुभाषनं मेकास्नी बैल बांधले. मागच्या अंगाला एका शेतकऱ्यानं बैलगाडी भरून ओली मका विकायला आणली होती. अण्णानी कवळा भरून मका विकत आणली. सुभाषनं ती बैलाभोवती टाकली. भुकेच्या तडाख्याने चवळ्या ओल्या मकेवर तुटून पडला. पण पवळ्या तोंडात ताटं धरून पायानं नुसतीच माती उकरीत बसला. बाजारात बैल खरेदी करणारे शेतकरी कमी अन व्यापरीच जास्त फिरत होते. अण्णा मागच्या बाजूला एका रिकाम्या बैगाडीला टेकून बसले होते. गिऱ्हायके येत होती. बैलाभोवती फिरत होती. काहीवेळ थांबत होती. सुभाष गिऱ्हाईकांना बैलांच्या गुणाविषयी तोंडभरून सांगत होता. नांगरणी, कुळवट, पेरणी, रासणीला जोडी कुठे पण कशीही जुंपली तरी चालते हे पुन्हा पुन्हा नव्याने सांगत होता. पवळयाच्या पाठीवर हात फिरवून "ह्यो आपल्या घरच्या गाईचा खोंड हाय बरका!" म्हणून सांगायचा. पण बेरकी व्यापारी लोकं रुपात जोडी मार खातेय म्हणायचे अन पुढे जायचे. 

हळू हळू अंधार पडू लागला. व्यापारी फिरायचे बंद झाले. ताडपदरी टाकून तयार केलेल्या हॉटेलच्या भट्ट्या पेटू लागल्या. सुभाष अण्णांच्या मागच्या बाजूला येऊन जवळ बसला अन म्हणला, "काय बी करून उद्या बैल यिकायला पाहिजेल! परवा सुगंधाची धडूतं घायची हायत! मुहूर्त चुकवून चालायचा नाय!" अण्णा क्षणभर गप्प बसले अन म्हणाले, "व्हय पण मर्दाच्या बघतुयास न्हवं किती पाडून मागत्याती ती! सोन्यासारखी बैलं हायती आपली! सत्तर हजार तरी याला पाहिजेल बघ! वरच्या तीस हजाराचा किडूक मिडूक विकून कसातरी मेळ घालू! अन हे बघ काय बी झालं तरी व्यापाऱ्याला आपली बैलं यिकायची नायत!" शेतकऱ्याच्या दवणीलाच यिकायची!". काळोख चांगलाच पसरू लागला. सुभाषनं शेजारच्या शेतकऱ्याकडून घमेलं अन घागर घेऊन यात्रा कमिटीने ठेवलेल्या टाक्यातलं पाणी आणून बैलं पाणी पाजून घेतली. कडब्याच्या पेंढ्या विकत आणून चवळ्या चवळ्या पुढं टाकल्या. शेणाचे पऊ मागे सारले. पाठीवरून हात फिरवला. बैलांनी शेपूट हलविले. माणसं शिदोऱ्या सोडून जेवू खाऊ लागली. कोणी विकतचं पिठलं भाकरी आणून खाऊ लागलं. सुभाषनं सकाळचं गठुळ पुन्हा सोडलं. अण्णा वाळलेल्या चपतीचं तुकडे मोडून खाऊ लागले. मघापासून बैलबाजाराच्या मध्यभागी असलेल्या तंबूतील लाऊड स्पीकरवर पुकारणाऱ्या पोरानं पडद्यावर तंबूत "हिरवा चुडा" सिनेमा अखेर सुरु केला. काहीजण कणातीकड तिकीट काढायला गेली. उरलेली माणसं बैलांच्या मागे पुढे, बैलगाडीच्या खाली फाटकं तुटकं अंथरून कलंडू लागली. सुभाष एका बैगाडीखाली निजला. अण्णा बैलांच्या मागं अंधारात लेकीच्या हातावर "हिरवा चुडा" चढणार या विचारात डोळे उघडे ठेवून पडले. 

दिवस उगवून चांगलाच वर आला. शेणघाण आणि वैरणकाडी उरकून अण्णा मागच्या बाजूला बैलगाडीच्या चाकाला टेकून बसले. गिऱ्हायके फिरू लागली. व्यापारी जवळ आले कि सुभाष ठरल्याप्रमाणे लाखाच्या आत जोडी द्यायचीच नाय म्हणून सांगू लागला. मग व्यापारी झाकून ठेवा जोडी म्हणून पुढच्या बैलांकडे निघून जायचे. इतक्यात दोन शेतकरी आले आणि बराच वेळ बैलांच्या अवती भोवती फिरत राहिले. सुभाष औत वढायला जोडी कशी तरबेज आहे ते सांगू लागला. अखेर गिऱ्हाईक खाली बसले. जोडी पसंत पडली. फायनल बोलणी सुरु झाली. गिऱ्हाईक साठ हजारावर ठाम राहिलं. पण ठरल्याप्रमाणे अण्णा पंच्याहत्तरच्या आत जोडी द्यायची नाही असे म्हणाले. शेवटी सत्तरला व्यवहार पक्का झाला अन सदऱ्याच्या आतल्या बंडीत हात घालून अण्णानी तंबाखूचा बटवा काढला. बैल विकलेल्या शेतकऱ्याकडे बटवा पुढं सरकावीत अण्णा म्हणाले, "खावा पाव्हणं आता तंबाखू चिमट चिमट!" पण खरेदीदार म्हणाला, "आव मला कसलच व्यसन नाय बघा! सगळं गाव मला नावाजतय!" मग दुसऱ्या शेतकऱ्याकडे बघत अण्णा म्हणाले, " तुम्ही कुठलं वं! कि यांचं दोस्त म्हणायचं!" तर तो दुसरा म्हणाला, "आमी यांचं पैरकरी हाय जी!" "असं व्हय! मग तुम्ही तरी खावा!" म्हणत अण्णानी तंबाखूचा बटवा इकडून तिकडे सारला तर तो दुसरा पैरकरी पण म्हणाला, "तंबाखू सोडा पण साधं सुपारीचं खांड सुदीक तोंडात घालीत नाय आपण!" अचानक भरून येऊन वळवाचा ढग बरसावा तसा अण्णा एकदम बरसले, "आपला सौदा मोडला! आरं माणस हाय का भुतं! तंबाखू नाय का पान सुपारी खात नाय तुमी! म्हणजी तुमी एखदा औत जुंपलं म्हंजी माझी बैलं मेली तरी थांबवायचा नाहीसा! तंबाखू खायच्या नादानं का होईना माणूस घटकाभर चालू औत थांबीवतं! मग बैलासनी बी आराम मिळतु का नाय सांगा बरं! उठा अन तुमचा रस्ता धरा बाबानू!" 

दुपार उलटली तरी दुसरं गिऱ्हाईक काही येईना. सगळी व्यापारी लोकंच मागू लागली. अखेर पाच वाजायला एक शेतकरी गिऱ्हाईक आलं. अण्णांनी बरीच त्याच्या शेतीची माहिती घेतली. त्याला थोडीच शेती होती. शेतात ओली वैरण पण होती. आणि बैलांवर प्रेम असणारा शेतकरी असल्यानं बराच वेळ बोलाचाली करून पासष्ट हजाराला व्यवहार ठरला. सकाळच्या व्यवहारापेक्षा पाच हजार कमी येऊन सुद्धा अण्णांनी चवळ्या पवळ्याला अखेर विकले. पावत्या होईपर्यंत अंधार पडू लागला. दोघांनी चवळ्या चवळ्याच्या अंगावर गोंजारत हात फिरवले. सुभाषनं पैसे मोजून घेऊन अण्णांच्या समोर ठेवले. पण अण्णा शून्यात हरवले. सुभाषला ते तुझ्याजवळच असुंदे म्हणाले. आजची रात कोसभर अंतरावर असलेल्या वाडीच्या बहिणीकडे थांबू अन सकाळ पहिल्या गाडीने आपल्या गावाला निघू असे अण्णा सुभाषला म्हणाले. सुभाषने होकार दिला आणि नोटांचे बंडल घेऊन चालू लागला. अण्णांनी रिकामं कासरं हातात घेतलं. शेवटचं चवळ्या पवळ्याकड मागं वळून बघितलं. बैलं मागं मागं पडू लागली आणि अण्णा वळून पुन्हा पुन्हा बघू लागले. पवळ्या हंबरून शिंगानं माती उकरू लागला. 

...अंधार चांगलाच दाटला. पायवाटेवरचे रातकीडे ओरडू लागले. दूरवर चमकणाऱ्या वाडीच्या लाईटा दिसू लागल्या. सुभाष पुढे आणि अण्णा मागे चालत रस्ता कापीत होते. दोघेही वाडीच्या ओढ्याजवळ आले. सुभाषनं पुन्हा एखदा खिशातील नोटांच्या बंडलावरून हात फिरवला. सुगंधाच्या लग्नाचा ब्यांड दारात वाजल्याचा त्याला भास होऊ लागला. इतक्यात मागे अण्णा धप्पदिशी पडल्याचा आवाज झाला. झाडावरची पाखरं भर्रकन उडाली. पायाखालची वाट थांबली. सुभाष "काय झालं वं!" म्हणत उठवू लागला तर अण्णा फक्त एवढंच म्हणाले, "आरं पवळ्यानं हातातल्या रिकाम्या कासऱ्याला हिसडा मारला!"
फोटो सौजन्य: एस.आर फोटो कुस्ती मल्ल विद्या

No comments:

Post a Comment