Friday, September 1, 2017

माणसं गिळणारा डिजिटल अजगर

पूर्वी खेड्यात लग्न झाल्यानंतर बायकांना नवऱ्याचं वर्षभर तरी दर्शन होत नसे. त्यामुळे लगेच नवऱ्याशी बोलणं, त्याच्याशी लगट वगेरे करणं या खूप दूरच्या गोष्टी होत्या. एक दोन वर्षानंतर कधीतरी नवरा बायको एकत्र येत असत. एकत्र कुटुंबपद्धती असल्याने एका एका जोडप्याच्या पोटी पुढे चार ते पाच मुले तरी सहज जन्माला येत असत. घरातला रेडीओ हे प्रमुख करमणुकीचे साधन होते. पुढे स्वातंत्र्यानंतरची पहिली चार दशके इथल्या सामान्य गरजा भागविण्यावरच खर्च झाली. त्यामुळे तंत्रज्ञानाची तशी फारशी प्रगती झाली नाही. मात्र काळ बदलला. नव्वदच्या दशकानंतर संगणक, इंटरनेट, मोबाईल, खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्या इत्यादी अनेक क्षेत्रात अफाट प्रगती होत गेली. मोबाईल आणि त्यासोबत आलेलं इंटरनेट तर नव्या तंत्रज्ञानाचा अविष्कार ठरत गेलं. अगदी लहानापासून थोरापर्यंत सर्वांनीच हे तंत्रज्ञान आता सर्वत्र स्वीकारले आहे. कोणतेही तंत्रज्ञान जन्माला येताना ते चांगली आणि वाईट अशा दोन बाजू घेऊन जन्माला येते. मात्र सध्या या तंत्रज्ञानाचा गैरवापरच जास्त होताना दिसतोय. ते कशा प्रकारे हाताळावे याचे कुठेही क्लास भरत नाहीत. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या आहारी एखादा का माणूस गेला कि मनावरचे नियंत्रण सुटते. आणि माणूस सभ्यता आणि विवेक गमावून बसतो.

याचे उत्तम उदाहरण द्यायचे तर व्हाटसआप वर सध्या "सगाई से लेकर चुदाई तक का सेल्फी ज़माना" या नावाने मागील काही दिवसापासून एका चांगल्या घरातील जोडप्याचे बरेच फोटो फिरताहेत. यातील काही फोटोमध्ये त्या जोडप्याचे लग्नाचे आणि कुटुंबिया सोबतचे सेल्फी फोटोही आहेत. नंतरच्या काही फोटोमध्ये कामक्रीडा करतानाचे नग्न सेल्फी आहेत. काही फोटोत त्या बाईने अंघोळ करताना स्वतःच तिने तिचे नग्न सेल्फी घेतलेचंही दिसतय. अर्थात नवीन लग्न झालेली कोणतीही स्त्री नवऱ्याने सांगितल्याखेरीज असले उद्योग करणार नाहीच. कदाचित त्यांनी हे नवखे पणाची गंमत म्हणूनही केले असावे. या मध्ये ज्या मोबाईलमध्ये त्यांनी हे सेल्फी फोटो घेतले गेले असतील, एकतर तो फोन हरवला असेल किंवा नवरा बायको काही काळाने विभक्त वगेरे झाल्यानंतर नवऱ्याने ते फोटो जाणून बुजून व्हायरल केले असतील. असे काही तर्क बांधता येतील. यावरून हातात आलेल्या तंत्रज्ञानाचा वापर आपण किती डोळेझाक पणे भान हरवून करतोय हेच दिसून येतय.

तरुण तरुणी तर हातात आलेल्या या स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर अलीकडे खेळणासारखा करताना दिसताहेत. आपल्या मुलांचं हे तंत्रज्ञान पेलण्याचं आणि हाताळण्याचं वय नसतानाही पालक आपल्या मुलांना अधिक स्मार्ट बनवताना दिसतात. प्रेम प्रकरणातून तर हमखास मुली आपल्या प्रियकराला स्व:ताचे नग्न फोटो अथवा भावनेच्या भरात आंधळे होऊन विश्वासाच्या नावाखाली रोमान्स करतानाचे विडीओ तयार करण्यास मदतच करतात. नंतर ब्रेकअप झाले की, यामधून एक तर मुलींना ब्लॅकमेल केले जाते अथवा जाणून बुजून ते नग्न फोटो अथवा विडीओ एखांद्या पोर्न साईटवर अपलोड केले जातात. बऱ्याच पोर्न साईटवरती असे तरुण तरुणींचे नग्न फोटो अथवा विडीओ सध्या सरासपणे दिसू लागलेत. याचे परिणाम अर्थातच पुढील काही दिवसात समोर येतील. त्यात भरीस भर म्हणून आपल्याकडेही आता वयात न आलेल्या पोरापासून ते म्हाताऱ्या झालेल्या बरण्या पर्यंत असले काही हाती लागले कि ते पुढे दहा वीस जणांना फॉरवर्ड करण्याच्या सवयी चांगल्याच अंगात भिनलेल्या आहेत. 

तंत्रज्ञानाने डिजिटल जगण्यातली घुसमट इतकी वाढवली आहे की, परवा फॅमिली कोर्टाच्या परिसरात गेलो असता काही विभक्त झालेल्या जोडप्यांना भेटलो. बऱ्याच विभक्त झालेल्या जोडप्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या मनाचा तळ काही गाठता येईना. शेवटी आपलंही असच काहीसं झालं आहे. आणि आपण पण तुमच्यासारखेच समदु:खी आहोत असे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला तेव्हा कुठे काहीजण बोलके झाले. त्यापैकी एक सुशिक्षित जोडपं नुकतच विभक्त झालय. दोघेही नोकरी करतात. लग्न होऊन अजून दोन वर्षे पण पूर्ण व्हायची आहेत. वेगळे का झाले तर एकमेकावर संशय. अगोदर नवऱ्याने त्याच्या फोनला पासवर्ड टाकला. मग तेच नंतर बायकोनेही केले. दोघांनाही एकमेकांवरच संशय. मग रोजच खटके उडायला लागले. ज्या विश्वासावर हे नाते टिकून राहते तो संपला आणि प्रकरण येथपर्यंत येऊन पोहचलं.

अजून दुसऱ्या घटनेतला नवरा पुण्यात गेल्या दहा वर्षापासून एका आय.टी पार्क मध्ये नोकरी करतोय. बायको बेंगलोर मध्ये. बेंगलोर मध्येच एक कोटींचा फ्लैट. पार्किंगमध्ये पंचवीस लाखांची धूळ खात पडलेली कार. पण फ्लैटमध्ये सध्या कोणी रहात नाही. कारण नवरा नसल्यामुळे बायको तिच्या आईकडे तिथेच राहते. ती ही नोकरी करते. तिला तिची नोकरी सोडायची नाही. आणि याला याची. दोघेही आपल्या करिअर वर ठाम. दोन मुले चांगल्या शाळेत शिक्षण घेतात. याची बदली तिकडे होत नाही. आणि बायकोची इकडे. हा महिन्याला दोन दिवस तिकडे जातो. मग तेवढ्यापुरते दोघे स्व:ताच्या डिजिटल घरात येतात. महिन्यातील दोन दिवस काय ते कौटुंबिक सुख घेतात. पुन्हा आपआपल्या ठिकाणी जातात. ही डिजिटल घुसमट गेल्या दहा वर्षापासून सुरु आहे. मात्र मागील काही दिवसापासून दोघात अशाच एका मेसेज वरून खटके उडू लागलेत. मानवाने निर्माण केलेले तंत्रज्ञान आता मानवालाच हरवू लागले आहे. वेगाने माणसाना गिळत निघालेला हा डिजिटल अजगर अजून किती जणांना गिळंकृत करेल हा येणारा काळच सांगेल.
फोटो सौजन्य: भास्कर

No comments:

Post a Comment