Tuesday, August 22, 2017

जखमी झालेला अंधार

गावावर सावलीसारखा अंधार पसरत निघाला होता. रानातनं गुरं ढोरं गावाकडं परतू लागली होती. देसायाची म्हातारी सारखी घरातनं आत बाहेर करीत होती. दोन तीन वेळा घरामागच्या रस्त्यावर येऊन डोकावून गेली. पोरगं मुंबईसनं येणार म्हणून आज तिचं कशातच चित्त नव्हतं. तसं सून मागच्या महिन्यात माहेरी गेल्यापासूनच तिचं कशातच लक्ष लागत नव्हतं. सून परत नांदायला आली नाही तर डोळ्यादेखत पोराचा संसार मोडल या काळजीनं म्हातारी खंगू लागली होती. इतक्यात मामा आलाss मामा आलाss म्हणत दोनी पोरांनी तात्या मुंबईसनं आल्या आल्या आजोळच्या घरात नुसता गलका केला. चुलीपुढं भाकरी थापत बसलेली तात्याची बहिण लगबगीनं तसाच पिठाचा हात घेऊन उठली. धाकटं पोरगं देवापुढं माळेचे मनी मोजत बसलेल्या म्हातारी जवळ गेलं अन हलवून म्हणालं, “म्हातारे आये मामा आलं मुंबईसनं!” तात्या बसतोय न बसतोय तोच पोरानी हातातली बॅग ओढली. म्हातारी लेकीकडं बघून म्हणाली, “पोरंग कवा सकाळी निघालं असलं! दमला असल प्रवासानं! जेवणाचं बघ बया लवकर!” तोपर्यंत पोरांनी बॅग उघडली. एक एक करून चाळू लागली. अखेर तळातून एक मिठाईचा पुडा घेऊन सोफ्याला जाऊन खात बसली. बहिणीनं पाण्याचा तांब्या तात्याच्या हातात दिला. “तू कवा आलीस गं! हातात तांब्या घेत तात्या म्हणाला. “तू येणार म्हणून आम्ही दुपारीच आलोय! असं म्हणत ती गडबडीनं चुलिकडं वळली. तात्या तोंड धुवून मधल्या घरात येऊन बसला. म्हातारी येऊन जवळ बसली अन म्हणाली, सकाळी पहिल्या गाडीनं धामणगावला जावूया बघ! सुगीचं दिस हायती! सुंदरीचा सासू अन सासरा रानात जायच्या आत गाठलं पाहिजेल त्यास्नी!” तात्या बराच वेळ गप्प राहिला अन म्हणाला, “ उद्या काय ते साक्ष मोक्ष लावूनच येऊ!...

दिवस उगवायला पहिल्या गाडीनं तात्या, म्हातारी, बहिण अन शेजारचा नाना धामणगावला जाण्यासाठी पाराजवळच्या पिंपळाच्या थांब्यावर एस.टीत चढले. गाडी धामणगावात पोहचली तेव्हा उन्हं चांगलीच वर आली होती. सुगीचं दिवस असल्यानं बाया माणसांची शेताकडं जाण्यासाठी गडबड चाललेली. गुरं ढोरं हिंडायच्या ओढीनं रस्त्याला लागलेली. बारकी रेडकं हंबरत जनावरांच्या पायात चालत होती. धामनगावच्या खालच्या अंगाच्या थांब्यावर उतरून सगळेजण घराजवळ आले. ईतक्या सकाळी सकाळी जावई सारं घरदार घेऊन आलेला बघून सासू अंगणात वाळवण घालता घातला आत गेली. सुंदरीनं बसायला चटई टाकली अन पाण्याचं तांबे भरून आणून पुढं ठेवलं. बायकोचं देखणं रूप बघून तात्याच्या मनात एक सुखाची लहर चमकून गेली. पण क्षणभरच. थोड्या वेळानं तात्याचा सासरा घरी आला. समोर सगळी बघून सुवातीला थोडा गांगरला. राम राम घातला अन जवळ येऊन बसला. थोडा वेळ कोणीच बोललं नाही. चहा झाला. मग तात्याच्या सासऱ्यानं बंडीत हात घालून बटवा काढला. नानापुढं सरकवत म्हणाला, “पाव्हणं खावा तंबाखू! नाना तंबाखूचा बटवा जवळ घेत म्हणाला, “बरं मुद्द्याचं बोला आता!” सारं काही माहित असूनही "आता मुद्द्याच आणखी काय बोलायचं वं! असं सासरा म्हणाला. मग नाना म्हणाला, "पंचीमिला चार दिस घेऊन जातो म्हणून तुम्ही लेकीला घेऊन आलात! आता दिवाळी झाली तरी तुम्ही धाडली नाही! काय समजावं आमी! नानाचं वाक्य पुढं रेटीत तात्याची म्हातारी लगेच म्हणाली, “आम्हाला सगळं गाव नावं ठिवतया की! चार वर्षे नांदली अन आताच हिला का नवरा नको झालाय म्हणून!” हे सगळं मघापासून दाराआडून ऐकत बसलेली तात्याची सासू ठणकतच बाहेर आली अन म्हणाली, “माझी सुंदरी काय तुमच्यात नुसतीच कामाला पाठवलीय होय! तिच्या बरोबरच्या पोरींसनी दोन दोन पोरं होवून आपरीशनं झाली! तरी माझ्या लेकीची कूस आजून फुलली नाय!” तिचं संपतय न संपतय तोच तात्याचा सासरा म्हणाला, “पोरगा मुंबईला कामाला हाय म्हणून आम्ही तुमच्या घरात पोरगी दिली! चार वर्षात तुम्ही तिला मुंबई पण दावली नाय अन पदराला पोरं बाळ पण झालं नाय! आता ह्यो दोष तुमच्या पोराचाच म्हणायचा की!” आता आपल्या मर्दानकीलाकच सासू सासऱ्यानं हात घातलेला बघून तात्याचं मस्तक खवळलं आणि सासऱ्याकडं हात करून म्हणाला, "तुम्ही तिला पाठवणार हाय का नाही! तेवढच सांगा!" जावायाला मध्येच थांबवत इरसाल सासरा म्हणाला, "ते काय जमायचं नाही! मी माझ्या लेकीचं दुसरं लगीन करीन पण नांदायला काय पाठवणार नाय!" शब्दाने शब्द वाढतच निघाला म्हणल्यावर आता नाना मध्ये पडला, “हे बघा ईवाय पाव्हनं! ह्यो तात्या हि थोरली पोरगी जन्मल्यावर आठ वर्षानं म्हातारीच्या पोटाला आला! अन चार वर्षाचं काय खूळ घिवून बसलायसा! वरच्याच्या मनात आलं म्हंजी या साली बी हुईल! तुम्ही सुंदरीला धाडा! लेकरांचा संसार नका उगी मोडू!" पण काही केल्या तात्याचं सासू सासरं ऐकायला तयार होईनात. उन्हं डोक्यावर यायची वेळ झाली. काहीच मार्ग निघत नाही म्हंटल्यावर सगळे जायला उठले. बाहेर पडता पडता सकाळ पासून दाराआडून वाकून बघणाऱ्या सुंदरीकडे बघत नाना म्हणाला, "बघ हे काय चांगलं नाय घडत नाय पोरी!”... 

सगळे गावत परतले तेव्हा अंधार चांगलाच पडला होता. तात्याच्या डोक्यात नुसता विचारांचा गोंधळ चाललेला. आपलं भागत असतं तर सुंदरीला मुंबईला नेऊ शकलो असतो. तिला सोबत नेली असती तर ही वेळ आलीच नसती. पण आपल्यालाच आज काम हाय तर उद्या नाय! शेतीत राबावं तर दोन तुकडा जमिनीत पोटापुरतं पण पिकनां झालय. अनेक विचारांनी डोकं नुसतं गरगरायला लागलेलं. त्या रात्री तात्या देसायाचं सगळं घर अंधार करून राहिलं. कोण सुद्धा जेवलं नाही. नाही म्हणायला तात्याच्या बहिणेने सकाळचं शिल्लक जेवण तेवढं पोरास्नी खायला घातलं....

दुसऱ्या दिवशी भावाचा कोलमडलेला संसार जोडायला आलेली थोरली बहिण आईच्या गळ्यात पडून रड रड रडली. पण म्हातारीचं अन तात्याचं कशातच लक्ष लागेना. ज्वारी खुडायची असल्यानं म्हातारी दिवस उगवायला लेकीला एस.टीला बसवून रानात निघून गेली. आता इथे थांबून पण काय उपयोग होणार नाही. सासरा काय बायकोला पाठवणार नाहीच. आपल्याच नशिबाला ह्यो का भोग यावा. आजचा दिवस ज्वारीची कणसं खुडून संध्याकाळी मुंबईच्या गाडीला बसू असं मनात ठरवून तात्या पांदीनं मळ्याकडच्या वाटला लागला. ईनामदाराच्या मळ्यापाशी आल्यावर ऊसाला पाणी सोडून सूर्याजी चेरमन बुलेटवरून गावाकडं निघाला होता. तात्या दिसताच त्यानं बुलेट थांबवली. तात्याची बायको सोडून गेलीय हि खबर खबर सूर्याजी चेरमनला आधीच होती. गाडीची चावी बंद करून तात्याकडं बघत सूर्याजी म्हणाला, “ आरं तू राती आलास मला कळालं! तुझी बायको काय नांदायला येत नाही! मला सांगायचस तरी!" पण तात्या पडला सरळ मार्गी माणूस. गरिबीत वाढलेला. त्यात असल्या पुढार्यांना उगीच कशाला मध्यस्थी घाला म्हणून तात्या म्हणाला, “आपल्या नशिबाचा ह्यो भोग म्हणायचा!” हे बघ! असलं नशीब बिशिब काय नसतया! तू संध्याकाळी घरी ये! माझी जीप काढतो! सोबत पाच दहा पोरं बी घेऊ! आली नाही तर उचलून आणू! ये मी वाट बघतो!” म्हणत सूर्याजी गावाच्या दिशेने निघून गेला. तसे गावातले सगळे तंटे सोडवायला सूर्याजी चेरमन एक नंबरी माणूस. अगदी साम दाम दंड या तत्वावर आधारीत गेली कित्येक वर्षे सूर्याजी चेरमनचं राजकारण चाललेलं. त्याचा थोरला भाऊ पोलिसात होता. मधला शेतीत. शेती सगळी बागायती केलेली. आमदाराच्या मागं लागून याने कॅनालचा पाट आपल्या मळ्यावरून नेलेला. त्यामुळे दिवसभर असले पुढारपण करण्यात सूर्याजीचं आयुष्य चाललेलं. त्यात तात्या आणि दोघं शाळेत एकाच वर्गातलं जोडीदार....

दिवस मावळायला तात्या मळ्याकडून गावाकडे परतला. आजचा मुंबईला निघण्याचा बेत त्यानं उद्यावर ढकलला. जणू त्याचा गेलेला जीव सूर्याजीनं परत आणला होता. शेजारी ओसरीवर मिसरी लावत नाना बसला होता. सकाळची घटना त्यानं नानाला सांगितली. पण नाना म्हणाला, “सूर्याजी चेरमन, आरं म्हंटल कि कारं करणारा माणूस हाय! सगळं गाव म्हणतय त्याची बायको पाय घसरून हिरीत पडली नाय! तर त्यानच काटा काढलाय तिचा! तवा सांभाळून बाबा! एखान्द्याच्या जीवावर आलं तर आपल्या दातावर मास नाय! सबुरीनं घ्या!” मान हलवून तात्या सूर्याजीच्या घराकडं लगबगीनं वळला. सूर्याजीनं जीपगाडी पुसून तयार ठेवलीच होती. नेहमी पुढारपणात गुंडगिरी करणारी देवळापुढं बसलेली पाच सात पोरं सुर्याजीनं गाडीत घेतली. अंधाराच्या पोटात शिरून जीपगाडी धामणगावच्या दिशेने सुसाट सुटली...

गावाबाहेरचा ओढा चढून गाडी धामणगावत शिरली तेव्हा अर्धे गाव झोपलं होतं. काही घरापुढं जेवणखाण आटोपून बायका भांडी घासत बसल्या होत्या. गाडी तात्याच्या सासऱ्याच्या घरापुढं येऊन थांबली. घरात सामसूम होऊन सगळी झोपलेली. सगळीकडं अंधार पसरलेला. वाड्या वस्त्यांवर भुंकणाऱ्या कुत्र्यांचा आवाज गाव भेदून पुढं सरकत होता. तात्या अन सूर्याजी गाडीतून खाली उतरले. बाकी सगळ्यांना गाडीतच बसायची सूचना सुर्याजीनं उतरतानाच केलेली. दोन पायऱ्या चढून तिसऱ्या पायरीवर आल्यावर तात्यानं दार वाजीवलं. आतून कसलाही प्रतिसाद येईना. पुन्हा दोन तीन वेळा वाजवलं तरीही प्रतिसाद येत नाही म्हंटल्यावर, सूर्याजीनं दोन तीन मोठ्यानं धडका मारल्या. काही क्षणात आतून पाऊलांचा आवाज झाला. बाहेरची लाईट लागली आणि दरवाजा उघडला गेला. जावई असा रात्र धरून आलेला बघितल्यावर सासरा दचकला अन म्हणाला, "इतक्या अंधारच का येणं केलं!" तात्या बोलायच्या आतच सूर्याजी म्हणाला, "जावायाला आधी आत तर बोलवाल का नाय! का चाल नाही धामनगावत असली!" सुरवातीलाच असं वाकड्यातलं बोलणं कानावर पडल्यावर सासरा भेदरतच “या कि आत!” म्हणाला. आत जाईपर्यंत सुंदरी आणि तिची आई पण उठली होती. सोफ्यात टाकलेल्या सासऱ्याच्या अंथरुणावर बसतच सूर्याजी म्हणाला, "लेकीला आवरा म्हणावं! मुराळी न्यायला आल्याती!" असा मुद्यालाच हात घातलेला बघून सासरा म्हणाला, "हे बघा आम्हाला त्या घरात काय पोरगी नांदवायची नाय! काय बी झालं तरी!" "आवं पण असं कारण तरी काय न नांदवायला!". "हे बघा पाव्हणं ते तुम्हाला बी माहित हाईच! पोरीला म्हमईला नेतील म्हणून त्या घरात दिली! म्हमई नाय ती नाय पण तिच्या पोटाला मूल तरी जन्माला घालावं कि ते बी नाय!" मग सूर्याजी पिसाळला अन म्हणाला पण तुमच्या पोरीत दोष नसल कशावरनं! टाळी कधी एका हातानं वाजतीय का? अन चार दोन महिन्यात तुमच्या पोरीला मुंबईला न्यायला लावतो! मग तरी बास ना! " तोपर्यंत सासू मध्ये आली अन म्हणाली, "आम्ही सुंदरीचं दुसरं लगीन लावू पण त्या घरात काय पाठवायची नाय!" असं म्हणल्या म्हणल्या सुर्याजीनं बाहेर बघत "यारं आत!" म्हणून आवाज दिला. गाडीतली पोरं हातात तलवारी, सुरे घेऊन आत आली तशी सगळी घाबरली. पोरं म्हणाली कोण लगीन करतोय बघतोच तुमच्या पोरीशी! रक्ताचं पाट वाहत्याली लक्षात घ्या! पोरानी असला दम भरल्यावर सासरा नरमला. तेवढ्यात सुंदरी बाहेर आली अन म्हणाली, "आये मी जाते नांदायला! उगीच तमाशा नको!" आता पोरगीच अशी म्हणायला लागल्यावर आई बापाची दातखिळीच बसली. मग सुर्याजीला जास्तच ताव चढला अन म्हणाला, "आई बापाच्या अंगातच लई खोड दिसतीया!" अशी संधी समोर आल्यावर तात्या सुंदरीला, "आवर लवकर! भर जा सामान!" म्हणाला. सुंदरी गडबडीनं आत शिरली. सूर्याजीनं असल्या केसेस अगोदर कितीतरी हैण्डल केलेल्या. त्यामुळे त्याला काहीच वाटलं नाही. तो पोरांना घेऊन गाडीत जाऊन बसला. काही शेजारी पाजारी अंगणात गोळा झाले होते. सुंदरी निघताना आई तिच्या गळ्यात पडून रडली. तात्यानं पिशव्या हातात घेतल्या. इतक्यातनं पण जावायाच्या जवळ येऊन सासरा हळूच म्हणाला, "बघा आता हि शेवटची संधी देतोय!" तात्या मान हलवत बाहेर पडला. सुंदरी पण मागोमाग येऊन गाडीत बसली. गाडी पुन्हा एखादा अंधाराच्या पोटात शिरून धावू लागली...

कितीतरी दिवसांनी तात्याच्या घरातली सकाळ आनंदाने उजाडली. सकाळी सकाळीच चुली म्होरं भाकऱ्या थापण्याचा आवाज येत होता. बाजूला तात्या अन म्हातारी बसलेली. शेंगाच्या पोत्याच्या ठेलीला टेकून नाना चार समजुतीच्या गोष्टी सांगत होते. तालुक्याला नवी डॉकटर बाई आलीया! एक दिवस दोघं बी जाऊन दाखवून या! म्हणत सांगत होते. सुंदरी पण आता मी माहेराला जाणार नाही असं म्हणाली...

चार पाच दिवस गेलं. घरातलं सगळं पैसं संपले होते. म्हातारी तात्याला म्हणाली, "तेवढी ज्वारीची मळणी कर! अन तू जा बाबा! नुसत्या पोतं दोन पोतं ज्वारीवर आपलं पोटपाणी नाय भागायाचं बाबा!" तात्यानं दुसऱ्या दिवशीच मळणी मशीन मळ्यात आणलं. अडीच पोती ज्वारी झाली. नानाच्या गाडीत पोती भरून घरी यायला अंधार पडला. आज संध्याकाळी मुंबईला निघायचं म्हणून तात्या तयारीला लागला. सुंदरीनं चपात्या करून भजी तळून घेतलं. म्हातारी हात पाय धुऊन आत आली अन ज्वारीच्या पोत्याला येऊन टेकली. सुंदरीनं वैलावर चहा टाकला. इतक्यात "अगं बघ की सुंदरा मला कसं हुतया!" म्हणत म्हातारी बसल्या जागेवरच खाली कलांडली. सगळ्या अंगाला दरदरुन घाम फुटला. छातीत कळा सुटलेल्या. तात्या अन दोघ काय झालं म्हणून म्हातारीला उठवू लागले. तर घामानं भिजून सगळं अंग थंड पडत चाललं. त्यानं गडबडीनं गावातल्या डॉक्टरला फोन लावला. शेजारी पाजारी काय झालं म्हणून हातातली कामं सोडून जमू लागले. अन डॉक्टर याच्या आधीच तात्यानं "आयं अशी मधीच कशी गं सोडून गेलीसss! आता मी आय म्हणून कुणाला गं हाक मारूss!" म्हणत जोरात हंबरडा फोडला. सगळी माणसं तात्याच्या घराकडं अंधारातून पळू लागली. घराघरातल्या पेट घेतलेल्या चुली विझल्या. गोठ्यातले धारांचे आवाज थांबले. देवळातलं उभं राहणारं भजन थांबलं. गिरणीतल्या पट्टयाचा आवाज बंद झाला. पवारवाडीसनं बहीण येईपर्यंत रात्रीचे साडे दहा वाजून गेले. बहीण आल्यावर आईच्या अंगावर पडून रडली. तात्याच्या गळ्यात पडून रडली. नानीच्या पदराला धरून रडली. भावकीतल्या माणसांनी नदीला सगळी तयारी करून ठेवलेली. म्हातारीला शेवटची आंघोळ घातली. जाणत्या लोकांनी उचलून ताटीवर ठेवली. बहीण भावासह जवळच्या नातेवाईकांनी ओवाळून दर्शन घेतलं. अन देसायाच्या म्हातारीचा स्मशानाकडे अखेरचा प्रवास सुरु झाला...

गावाचं सुतक लांबवायला नको म्हणून माती सावडली कि पाचव्या दिवशीच कार्य अन धावा उरकून घेतला. चौदावा सरल्यावर नाना घरी आला आणि तात्याला म्हणाला, "पुढं कसं करायचं रं आता! सगळंच गळ्याला आलं बघ! तुझा काय इचार हाय! हितं या तुकड्यात राबून बी पॉट भरायचं नाय! आता त्यो बी तुज्या नावावर करून घेतला पाहिजे!" मला दोन दिसात जायालाच लागल नाना! मालकाचं फोन याला लागल्याती सारखं!" पण सुंदराचं कसं रं करायचं असं नाना म्हंटल्यावर तिला महिनाभर माहेराला पाठवू असं तात्या म्हणेपर्यंत लगेच सुंदरी म्हणाली, "मी आता शाप माहेराला जायची नाही! एक तर तुमच्या मागं यिन नाहीतर हितच राहीन!" तिच्या अशा बोलण्यानं तात्या मोठ्या पेचात सापडला. मग नानाच म्हणाला, " तू जा अन महिन्या दोन महिन्यात काय बी करून बारकीशी खोली घे भाड्यानं! तवर हि सांच्याला आमच्यात झोपल नानीबर!" बायको माहेरात जात नाही म्हंटल्यावर तात्याला हा मार्ग पटला. इतक्यात सूर्याजी चेरमन दारावरून जाताना दिसला. तशी तात्यानं चेरमन म्हणून हाक दिली. सूर्याजी चेरमन आत येताच तात्यानं बसायला सतरंजी टाकली. सुंदरानं सगळ्यांना चहा आणून दिला. नाही म्हणायला चेरमन मुळेच तात्याची बायको नांदायला आली होती. नानानं लगेच विषय काढला."आर हयो उदया जायाचा म्हणतोय! तेवढं रान म्हातारीच्या नावावरनं हेच्या नावावर कर बाबा! तलाट्याला सांगून! नानाचं बोलणं संपायच्या आधीच सूर्याजी चेरमन म्हणाला, "नाना आजच तालुक्याला कचेरीत निघालोय! चल तात्या तू बी! आजच काम करून टाकतो तुझं! एक पैसा जाऊन देत नाय तुझा!" तात्या हरखून गेला. दुपारी कचेरीत गेल्यावर चेरमनच्या ओळखी असल्यानं वारसाच्या नोंदीचा अर्ज अन अफेडेव्हीचं काम चेरमननं अवघ्या तासाभरातच करून टाकलं. तात्यानं त्याचं आभार मानलं. दुसऱ्या दिवशी तात्या बायकोचा आणि नाना नानीचा निरोप घेऊन मुंबईला जाणाऱ्या एस.टीत बसला....

गावाला सगळं पैसं संपल्यामुळे मुंबईत येवूनबी तात्याची ओढाताण चाललेली. खर्चासाठी काही मित्रांकडं उधारी केली. मग रंगाच्या कामात डबल ड्युटी करू लागला. अधून मधून सुंदरीला फोन करायचा. घरावर नीट लक्ष ठेव म्हणून सांगायचा. महिना भरल्यावर काही पैसे हातात आले. काही मित्रांच्या सोबतीनं भाड्यानं रूम शोधायला त्यानं सुरु केली. पण डिपॉझिट देण्यासाठी अजून एक महिना काम करावं लागणार होतं. बघता बघता दुसरा महिनाही संपला. रूमचं डिपॉझट भरलं. बायको सोबत राहायला येणार आणि दुरावलेले सासू सासरे परत आपल्या जवळ येणार या कल्पनेनेच तात्याला आभाळभरून आनंद झाला. त्यानं सुंदराला फोन लावला. रूम बघितलेचं सांगितलं. परवाच तुला न्यायला गावाला येतोय. सामानाची भराभर करून ठेव म्हणून सांगितलं. सुंदराशी बोलताना मागून टी.व्ही.च्या सिरियल मध्ये चाललेला “तुझ्यात जीव रंगला” आवाज येत होता. घरात टी. व्ही नसताना बाजूला कुठला गं टी. व्ही. चा आवाज इतुया! विचारल्यावर सुंदरी म्हणाली, 'आपणच घेतलाय!' एवढा चेंगाट सासरा पण शेवटी लेकीसाठी घरात टी. व्ही. घेऊन आला म्हणून कधी नव्हे ते त्याला सासऱ्याचं कौतुक वाटलं...

रविवारी सुट्टी म्हणून तात्या शनिवारी रात्री शेवटच्या गाडीनं गावात उतरला. अमावस्या असल्यानं गावावर अंधार चांगलाच पडला होता. जेवणं खाणं संपवून माणसं रानातल्या वस्तीवर झोपायला निघाली होती. कुणी पाळीचं पाणी पाजायला निघालं होतं. कुणी गोठ्याला वैरण टाकायला निघालं होतं. तात्या अंधाराला कापीत रस्ता ओलांडून घरापुढच्या अंगणात आला. पण घराचा दरवाजा बंद. सुंदरा नानाच्यात झोपायला गेली असल म्हणून नानाच्या घराकडं तात्या वळला. ओसरीवरच नाना जेवणखाण आटपून मिसरी घासत बसला होता. नानाला बघितल्या बघितल्या तात्या म्हणाला, "सुंदरा झोपली कि काय नाना!" ओसरीच्या खाली अंधारात उभा असलेला तात्या असं काय विचारतोय म्हणून नाना म्हणाला,
"म्हंजी तुला काय यातलं माहितच नाय का काय!"
"काय झालं व्ह नाना!"
क्षणात गेलेलं अवसान थरथरत्या अंगात परत आणून, अंधारात आ वासून समोर उभ्या असलेल्या तात्याकडं बघत नाना फक्त एवढंच म्हणाला,
"तुला सांगत हुतू त्या सुर्याजीचा नादाला लागायला नको म्हणून! महिना झालं गावातनं सूर्याजी बी गायब हाय अन आपली सुंदरा बी गायब हाय!"...
सौजन्य:सोशल मीडिया 

No comments:

Post a Comment