Friday, July 21, 2017

गिरणगावातला जॅबर

सहा महिने उलटलं तरी वरच्या आळीतल्या म्हाताऱ्या जॅबरच्या पोटात दुखायचं काय थांबत नव्हतं. अगोदर गावातला डॉक्टर झाला. मग तालुक्याचा झाला. शेवटी जिल्ह्याच्या डॉक्टरकडे तपासल्यावर पोटात गाठ झालेचं कळालं. तेव्हापासून तर म्हाताऱ्यानं जास्तच हाय खाल्लेली. ऑपरेशन करायचं तर गाठीला पैका नाही. होता तो पोरांच्या स्वाधीन केलेला. दोन पोरं. ती पण बायका पोरं घेऊन मुंबईला. कधी उन्हाळ्यात आली तर चार दिवस आई बापाची भेट. नुसती वर वरची विचारपूस. पण या आजारपणाची जॅबरनं चांगलीच धास्ती घेतलेली. आता तुम्ही म्हणाल जॅबर कधी नाव असतं का? तर असतं. तसं गावातल्या पंचायतीच्या जन्म मृत्यू रजिस्टरवर त्याचं खर नाव दत्तूबा. आमच्या गावातनं तरुणपणी बाहेर पडलेला आणि गावात पहिल्यांदा शहर घुसवलेला माणूस म्हणजे दत्तूबा. आता तुम्ही म्हणाल गावात शहर कसे काय घुसवता आलं असेल. तर आलं. आमच्या शे सव्वाशे उंबरा असलेल्या गावात येणारा मुख्य रस्ता होता तो बैलांच्या चाकोरीचा. अशा रस्त्यावरून पहिल्यांदा तालुक्यापासून गावात धुरळा उडवत एस.टी आणली ती या दत्तूबाने. गावात मुक्कामी एस.टी सुरु केली त्या रात्री दवंडीवाल्या सोबत साऱ्या गावभर तो दवंडी देत फिरला. आक्खी गुळाची ढेप गावात फिरून वाटली. पण बैलगाडीनं आणि सायकलवरून मैलो न मैल प्रवास करणाऱ्या गावकऱ्यांना त्याची एस.टी काय पचनी पडेना. गाडीचा ड्रायव्हर कंडाक्टर रोज रात्री या दत्तुबाच्या घरी जेवायला. पण गावातला एकबी माणूस एस.टीत बसायला तयार होईना. पण गडी जिद्दी. एस.टी सुरु रहावी म्हणून रोज सकाळी भाकरीचं गठुळ बांधून गावातून तालुक्याला जाणारा गाडीतला हा एकमेव प्रवासी. दिवसभर तिकडेच हा कुठेतरी फिरायचा अन रात्री मुक्कामी गाडीनं गावात येणारा पण हा एकटाच प्रवासी. एस. टी बंद पडू नये म्हणून सहा महिने अशी एकट्यानं ये जा केली. पण प्रवासी नाहीत म्हणून अखेर बैलगाडीच्या चाकोरीवरून धुरळा उडवीत गावात धावणारी एस.टी बंद झाली. दत्तोबा त्या रात्री घरात ढसाढसा रडला. हताश होऊन दत्तोबानं गाव सोडलं. मुंबई गाठली. गावाला मागं सोडून पहिल्यांदा मुंबईत पोहचणारा गावातला पहिला माणूस पण दत्तुबाच. मुंबईत जाऊन मिल मध्ये कामाला लागला. गिरणी कामगार बनला. गिरणीत जॅबर या हुद्द्यावर पोहचला. पुढं काही दिवसांनी दत्तुबा गावात आला तो जॅबर बनूनच. जॅबर म्हणजे गिरणीत वेगवेगळ्या खात्यात काम करणाऱ्या कामगारांचा म्होरक्या. मिलमधील कामगारात सर्वात जास्त रुबाब असायचा तो जॅबरचा...

तर असा हा जॅबर वयाची जवळ जवळ ऐंशी गाठल्यावर पोटदुखीनं आजारी पडला. पोटात गाठ झालेली. ऑपरेशन करावं लागणार. भीतीनं म्हाताऱ्यानं हाय खाल्लेली. पोरं नुसतीच फोनवरून विचारपूस करायची. मग म्हातारीच पोरांना म्हणाली, "त्येंच्या आपरिशनचं काय बी करून बघा! त्यांनी जनमभर कष्ट उपसलं म्हणून तुम्हास्नी हे दिस आलं! मी दोन दिसात जॅबरला मुंबईला पाठवतीय!" थोरला पोरगा बघू म्हणल्यावर इकडे म्हातारी तयारीला लागली. रानातून ओटा भरून लेकास्नी शेंगा, भाज्या घेऊन आली. गाडग्या मडक्यात ठेवलेल्या डाळी बांधल्या. शहरात महाग दळण दळून देत्यात म्हणून म्हातारीनं पायलीभर हरभऱ्याची डाळ काढली अन कडूसं पडायला गावातल्या गिरणीत आली. गिरणीत बायकांची गर्दी झालेली. उखाळ्या पाकाळ्यांचा खेळ चाललेला. गिरणीच्या प्रचंड आवाजात मिसळून बाहेर पडणारा बायकांचा विशिष्ट प्रकारचा नादमधुर आवाज पाराजवळच्या पटांगणात ऐकायला जात होता. गडी माणसे गुरं घेऊन शेतातून गावाकडे परतत होती. मारुतीच्या देवळातला दगडी दिवा तेवत होता. शनिवार असल्यानं मध्येच घंटा वाजल्याच्या आवाज घुमायचा...

इतक्यात अचानक लाईट गेली आणि गिरणीची मोटर हळू हळू बंद होत गेली. सोबत फट फट वाजणाऱ्या पट्ट्याचा आवाजही थांबला. सगळीकडे निरव शांतता पसरली. अन बायकांच्या रांगेत उडणाऱ्या पिठाचे थर अंगावर घेत उभी असलेली मैना म्हातारी गिरणवाल्याला म्हणाली, "आता कवा रं बाबा लाईट यायची? आमचं जॅबर पहिल्या गाडीनं सकाळ मुंबईला जायचं हायत!" आपरिशन कराय लेकाकड! पण आता माझ्या तरी हातात हाय का लाईटीचं! असं गिरणवाल्यांनं म्हंटल्यावर म्हातारी समोरच्या मारुतीच्या देवळात शिरली. मोठ्यानं घंटा वाजवून मारुतीला जागा केला. वाकली. हात जोडले. जॅबर बरा होऊन गावाला लवकर परत येऊदे म्हणाली आणि माघारी फिरली. गिरणीच्या पायऱ्यावर येऊन अंधारात एकटीच बसली. गिरणीतले सगळे निघून गलेले. गिरणवाला एकटाच. दोन तीन तासांचा वेळ गेला. गडी माणसे जेवणं आटोपून वस्तीवर मुक्कामी निघाली. तरी लाईट काही येईना. गिरणवाला म्हणाला, “येरवाळी दळू सकाळ!” म्हातारी उठणार इतक्यात लाईट आली. म्हातारी हरखली. दळणाचं घमेले घेऊन म्हातारी गडबडीनं घरी आली. शेजापाजारी सामसूम झालेली. जॅबर वाट बघत बसलेलं. म्हातारीनं गडबडींनं चूल पेटवली अन स्वयंपाकाला लागली...

तांबडं फुटायला मैना म्हातारी उठली. आवरा आवर केली. डाळ, भाजीपाला, पीठ मीठ, सगळं मिळून एक मोठ्ठ गठूळ तयार झालं. जॅबरनं हलवून बघितलं. तर हलता हलेना. आधी पोटदुखी. त्यात असं वजं म्हणल्यावर जॅबर विचारात पडला. पण दुसऱ्याच क्षणी म्हातारी म्हणाली, “मी हितं चढवून देते, तालुक्याला गाडी बदलताना कुणालातरी हात द्याला सांगा! मुंबईत घ्याला माझी पोरं येतील!” आवरा आवर झाली. दोघांनी मिळून गठुळ रस्त्यावर आणलं. दिवस उगवायला गावात आलेल्या पहिल्या गाडीनं जॅबरचा प्रवास सुरु झाला. म्हातारी पांदीतून गाडी दिसायची बंद होईपर्यंत न दिसणाऱ्या जॅबरला बघत राहिली...

एस.टी मुंबईत घुसली. तेव्हाच्या आणि आताच्या मुंबईत जमीन अस्मानाचा फरक पडलेला. जुन्या रिकाम्या जागी उभे राहिलेले टोलेजंग मॉल, एका बाजुला बंद पडलेल्या गिरण्यांच्या चिमण्या तर दुसऱ्या बाजुला धनदाडंग्यांचे टोलेजंग टॉवर. आजूबाजूला सुसाट धावणारी वाहनं. त्यातून मार्ग काढत पायाला चाकं बांधलेल्या चाकरमान्यांची धावपळ चाललेली. एस.टीने दादर ईस्ट पार करून परळकडे वळसा घातला. अन एका वळणावर जॅबर गठुळ घेऊन उतरला. तास दोन तास उलटून गेला. दिवस मावळून अंधार पडायची वेळ आली तरी एका पण लेकाचा पत्ता नाही. म्हातारी सकाळी फोन करून सांगतो म्हणालेली. मग असं विसरली तरी कशी? या विचारात म्हातारा पडलेला. इतक्यात थोरला पोरगा हजर झाला. म्हातारा हरखला. “ऑफिस मधून याला उशीर झाला!” एवढंच बोलला. गठुळ्यासहित लेकासोबत जॅबर टॅक्सीत बसून चाळीत आला...

खोलीत आल्यावर लेकानं गठुळ कोपऱ्यात ठेवलं. म्हातारा खुर्चीत येऊन बसला. तोपर्यंत “आजोबा आले! आजोबा आले!” म्हणत धाकटा नातू येऊन जॅबरला बिलगला. जॅबरला घेऊन गावाकड पोहचला. गुरांढोरासोबत काही क्षण शेताकडे फिरून आला. नातीनं पाण्याचा ग्लास आणून दिला. तिच्या नाजूक गालावरून एक खरबडीत हात फिरत गेला. खुर्चीवर बसल्या जागीच जॅबर खोलीचा कोपरा न कोपरा न्याहाळत बसलेले. वरच्या सिलिंग पर्यँत फरशी बसवलेली. चाळीस वर्षांपूर्वी बारा बारा तास गिरणीत काम करून पै पै जमवून हि खोली घेतलेली. तिचे पैसे फेडताना कित्येक उपास तापस काढलेले. सगळा जुना काळ डोळ्यापुढून फिरू लागला. आपण गिरणगावात केलेली आंदोलनं, श्रीपाद डांगे, जॉर्ज फर्नांडीस, दत्ता सामंतांची भाषणे. अखेर बंद पडून गिरण्यांच्या विझलेल्या चिमण्या. लाखो कामगारांचे उद्ध्वस्त झालेले संसार. एक ना अनेक एखाद्या चित्रपटासारख्याच कितीतरी या गिरणगावातल्या आठवणी. इतक्यात कपाळाला आट्या पडलेला एक चेहरा दरवाजापासून जॅबर चालत आलेल्या खुर्ची पर्यंतची फरशी न्याहाळून पुन्हा आत गेला. पुढच्याच क्षणी आतला निरोप घेऊन नात आली. “आजोबा पाय धुऊन घ्या तुमचे! किती घाण झालेत बघा! "अंग शेतकऱ्याचं असच पाय असत्याती!" म्हणत जॅबर बाथरूम मध्ये जाऊन हात पाय धुऊन आले. अखेर सुनेने चहाचा कप आणून हातात दिला. थरथरत्या हातांनी तो घशात घुसत गेला...

जेवणं झाल्यावर जॅबरने गठुळ सोडलं. म्हातारीनं त्याच्या पण आता दोन्ही पोरास्नी दोन गठुळी बांधलेली. त्यातील एक काढून ठेवलं आणि दुसरं घेऊन धाकट्या लेकाकडं जायला जॅबर उठलं. तर पोरगा म्हणाला, “सकाळी जावा तिकडं! आता येथेच झोपा!”. पण भाज्या सकाळी तिकडं कामाला येतील अन मी बी तिकडच झोपतो म्हणत जॅबर बाहेर पडलं. दुसऱ्या लेकाची खोली पण मागच्याच लाईन मध्ये होती. जॅबर तिकडेच जाऊन झोपले...

चार पाच दिवस संपून गेले. या खोलीवरून त्या खोलीकडे जॅबरच्या फेऱ्या सुरु होत्या. कधी या सुनेला वाटायचं तिकडून जेवून आले असतील. तर दुसरीला वाटायचं इकडे झोपायला आले म्हणजे तिकडे जेवले असणार. अधे मध्ये जॅबरचे उपास घडत गेले. आता मुंबईत येऊन आठवडा झालेला. पोटदुःखीनं पुन्हा जोर धरलेला. पण ऑपरेशन करायचं कोण नावच काढीना. सकाळी जेवताना म्हाताऱ्याने थोरल्याच्या खोलीवर विषय काढला. "माज्या आपरिशनचं काय बघताय का नाय!" पोरगा काही बोलणार इतक्याच नवऱ्याला थांबवत मध्येच सून म्हणाली, "आहो आमचंच भागंना झालय! शाळांची फी अजून भरली नाही पोरांची! भावजीना म्हणावं तुम्हाला जास्त नाही हा खर्च! काय परक्यासाठी नाही करायचं म्हणावं!" त्याच रात्री धाकट्या लेकाकडं जाऊन जॅबरनं विषय काढला, "आरं तू तरी बघतूयास का नाहीस!" तर तिकडेही सूनबाई कडून उत्तर आले. "आम्हाला काय दिलंय का तुम्ही! खोली पण त्येंच्याच नावावर केलीसा! आम्ही आपलं राहतोय भाड्याच्या खोलीत! गावची सगळी जमीन आता आमच्या नावावर करा! मगच बघू काय ते! आणि वरून म्हणाली, "तुम्हीच सांगा आमचं काय चुकत असेल तर!" हे सगळं ऐकून म्हातारा जॅबर कोलमडला. आतून तुटला. डोक्याने विस्कटला. काळजावर दगडाचा घाव मारावा तशी अवस्था झाली. अंथरुणावर पडला. पण डोळ्याला डोळा लागेना. आपली पोरं शिकावीत म्हणून आपण गिरणीत काम करून रात्रीचा दिवस केला. पण का केला? कुणासाठी राबलो आपण? कशासाठी उपवास काढले? विचारांनी मेंदू गरगर फिरू लागला. तसाच ताडकन म्हातारा उठला. दरवाजा उघडून बाहेर पडला. गिरणगावाने दिलेली जॅबर नावाची पदवी घेऊन म्हातारा अंधारात व्याकुळ होऊन वेड्यासारखा पाय नेतील तिकडे धावत सुटला. सगळा जुना काळ डोळ्यापुढे खुणावू लागला. “कामगार आहे मी तळपती तलवार आहे मी! सारस्वतानो! थोडासा गुन्हा करणार आहे मी!” आता नारायण सुर्व्यांच्या कविता त्याला पुन्हा साद घालू लागल्या. तो यांत्रिक होत गेला. धावू लागला. प्रचंड अंधार. इतक्यात गिरणीचा भोंगा वाजल्याचा त्याला भास झाला. पुन्हा गिरण्यांच्या चिमण्या आग ओतू लागल्याहेत. तिसऱ्या पाळीचे कामगार गिरणीतून बाहेर पडताना त्याला रस्त्या रस्त्याने दिसू लागले. ते गाणी म्हणताहेत. अण्णा भाऊ साठेंचे पोवाडे म्हणताहेत. खिंडार झालेल्या गिरणीच्या गेटवर तो पोहचला. गंजलेल्या लोखंडी गेटवर जोर जोरात वाजवू लागला. हताश झाला. व्याकूळ झाला. तरुणपणी याच जागी राबताना शेकडो मैल दूर असलेल्या मैनेच्या कितीतरी आठवणी ह्रदयात लपलेल्या. आत लपलेली मैना त्याला पुन्हा साद घालू लागली. म्हाताऱ्या झालेल्या मैनेची त्याला पुन्हा आठवण आली आणि तो मोठ्याने ओरडला..."माझी मैना गावावर राहिलीsss माझ्या जीवाची होतीया काहिलीsss....

...चार दिवसांनी साऱ्या गावात कुजबुज सुरु झाली. जॅबरच्या कुलूप लावलेल्या घराकडे बघून कोण म्हणायचं. म्हाताऱ्यानं असं टोकाचं पाऊल उचलायला नको होतं. कोण म्हणायचं कितीही झालं तरी पोटची पोरंच होती ती. कोण म्हणायचं जॅबरनं लई हलाखीत दिवस काढलं. पण सगळ्यांच्या तोंडी एकच प्रश्न होता. घरादारा सहित गावचा सारा जमीन जुमला विकून आणि मैना म्हातारीला सोबत घेऊन म्हातारा जॅबर या वयात नेमका गेला तरी कुठे? 
फोटो सौजन्य: प्रहार

No comments:

Post a Comment