Friday, June 30, 2017

पुण्यनगरी

पुण्यात नद्या आहेत पण त्या नद्यांना वाहणारे पाणी नाही, काठावरुन उड्या मारणारी नागडी पोरं नाहीत कि पहाटे पेठापेठातून बाग देणारा खुरुड्यातला कोंबडा नाही. इथल्या घाटांवर धुणी आपटणाऱ्या बायका नाहीत, उन्हात धुऊन वाळत टाकलेल्या वाकळा नाहीत कि सकाळी सकाळी अंघोळा करायला निघालेली पेठांतली गडी माणसं सुद्धा नाहीत. न्ह्यारी उरकून पेरणी करायला निघालेल्या बैलगाड्या नाहीत, बैलांच्या गळ्यात घुमणारा घुंगरांचा आवाज नाही कि अंगणातल्या उन्हात तडतड फुटणाऱ्या मुगाच्या शेंगासुद्धा नाहीत. पर्वतीवर हिंडायला निघालेल्या म्हशी नाहीत कि पोत्याची खोळ पांघरून आडव्या काठीवर भाकरीचं गाठुळ बांधून डोंगर चढणारा गुराखी नाही. बेंदराला चिखलाची बैलं बनवायला चिकटणारा चिखल नाही, येथल्या पार्किंग मध्ये सर्ज्या राजाची बैलजोडी नाही कि म्हशीच्या धारा काढून आय. टी पार्कात कामाला जाणाऱ्या पोरीसुद्धा नाहीत. इथल्या घराघरातल्या ग्यालरीत हजारो वेलींच्या कुंड्या आहेत, फुलणारी फुलं आहेत, पण उकिरंड्यातून उगवून मागच्या बाजूनं छप्परावर चढलेला दुधी भोपळ्याचा वेल नाही, माळावर उगवणारी हिरव्या गवताची पाती नाहीत कि पावसाळ्यात निवडुंग शेराच्या कुपाडीत उगवणारा चॉकलेटी रंगाचा आंबा सुद्धा नाही. वैशाखात नांदायला जाऊन पंचिमीला नटून थटून सुखाच्या हिंदोळ्यावर झुलत झुलत वैशीतून गावा गावात परतणाऱ्या लेकी नाहीत, शाळेच्या पटांगणावर बायकांनी धरलेला रात्रीचा गाण्यांचा फेरा नाही कि अवघ्या शंभर रुपयात अख्या सालभराची दळनं दळून देणारा गावाकडचा गिरणवाला सुध्दा नाही.

पुण्यात जुने वाडे आहेत, पेठा आहेत, माड्या आहेत, झोपड्या आहेत, पांढरीच्या मातीची घरं आहेत, बिळातून बाहेर पडून पोटाच्या मागं उंदरासारखी सैरावैरा पळणारी गर्भातल्या रक्ता मासांपासून बनलेली ओली माणसं आहेत, बदललेल्या पुण्याकडे हताश पाहणारे स्वातंत्र्य वीरांचे पुतळे आहेत, इतिहासाच्या खुणा आहेत, खुणा मिटवणारी डोकी आहेत, विद्या विकणारी दुकाने आहेत, मठ आहेत, मंदिरे आहेत, हौद आहेत, गल्ल्या, बोळआळ्या सुद्धा आहेत, उंबर्‍या गणपती आहे, डुल्या मारुती आहे, सोट्या म्हसोबा आहे तसा उपाशी विठोबा सुद्धा इथल्या देवळात आहे. ताडीवाला रोड आहे, दारूवाला पूल आहे आणि माडीवाले कॉलनी सुद्धा इथे आहे. काळाच्या ओघात विझू पाहणाऱ्या गावगाड्याच्या भग्न खुणा आहेत आणि शनिवार वाड्यात विझलेला आक्रोश सुद्धा आहे. राजकर्त्यांच्या गंमती जमती आहेत, बापटांची पांढऱ्याची पुन्हा काळी झालेली दाढी आहे, तशी कलमाडींची पांढरी झालेली दाढी सुद्धा येथेच आहे. झेड ब्रिजच्या पुलावरून रात्रीचा अंधार पांघरून रोमांस करत फुलत निघालेली जोडपी आहेत, तर त्याच पुलाच्या खाली पोटाच्या लढाईत आकंड दारूत बुडून रोमांस हरवलेली झोपड्यातली माणसंसुद्धा आहेत. सकाळच्या प्रहरी ब्रिटिश बनावटीच्या कुत्र्याला रिकामं करायला निघालेल्या गुळगुळीत पायांच्या हाफ प्यांट घातलेल्या हेडफोनवाल्या तरुण महिला आहेत, बंदिस्त नाजूक कुत्रीवर डोळा ठेवून टपून बसलेले तुंबलेले मोकाट कुत्रे आहेत. तर एखांद्या गार्डन मध्ये टी शर्ट बर्मुड्यावर बॉबकट केलेल्या स्पोर्ट शूजवाल्या म्हातारी सोबत सकाळी थंड हवेत फिरणारा पेन्शनर सुद्धा येथेच आहे. तोंडाला स्कार्फ गुंडाळून वाऱ्याच्या वेगानं सुसाट जाणाऱ्या तरुण पोरी आहेत, तर पोटाच्या धावपळीत पायाला चाकं बांधून डोक्यावर पाट्या खोरी घेऊन निघालेल्या परकर पोलक्यातल्या रापलेल्या देहाच्या तरुण पोरी सुद्धा इथेच आहेत...

अंगावरून नाजूक पाऊलांच्या तरुणी चालत गेल्यानंतर अंग शहारून घेणाऱ्या डांबरी सडका आहेत, प्रेमभंगांना सामावून घेणारे बियर बार आहेत, मेंदुना साथ देणाऱ्या जळत्या सिगारेटी आहेत. 4जी मोबाईलवरुन डील ठरवून 4जी ऍक्टिव्हा वरून 4जी च्या स्पीड ने घरोघरी जाऊन पुरूषांना विकतच्या रोमांसची सफर घडवणाऱ्या मॉडर्न ललना आहेत, तर कुंटनखान्यातल्या चिखलात कोवळेपणीच रुतून बसून वासनांध नरांना दिवसरात्र अंगावर झेलणाऱ्या यूपी बिहारमधल्या विकल्या गेलेल्या तरुणपोरी सुद्धा येथेच आहेत.No comments:

Post a Comment