Monday, June 19, 2017

शंकऱ्या घिसाडी
शंकऱ्या घिसाडी पावसाळा सुरु झाला कि बिऱ्हाड घेऊन गावात उतरायचा. त्याच्या तीन पिढ्यांनी जपलेली हि परंपरा. त्याचा झुबकेदार मिशिवाला म्हातारा बाप आधी पूर्वजांची परंपरा चालवायचा. त्याला सारा गाव ओळखायचा. पण तो थकल्यानं आता ही परंपरा शंकऱ्या चालवायचा. अश्या या शंकऱ्या घिसाड्याचं बिऱ्हाड गावात शिरलं कि पहिला कल्लोळ व्हायचा तो कुत्र्यांचा. नक्षीकाम केलेल्या त्याच्या छकडा गाडीवर गोलाकार ताडपत्री टाकलेली असायची. पुढच्या बाजूला “हय हय” करीत शंकऱ्या जोरात गाडी हकलायचा. त्याच्या हडकुळ्या एका-घोड्याच्या गाडीत मागच्या बाजूला डुलणारी कोंबडयाची डालगी, त्याला चिकटून पेंगाळलेली मळक्या देहाची उघडी पोरं, दोन बायका, गाडीच्या मागून काठी खांद्यावर टाकून, रस्त्यानं निघालेल्या जुन्या माणसाना हात दाखवत राम राम घालत चालणारं म्हातारं. अन गाडीखालून पळणारी दोन चवळ्या पवळ्या नावाची तांबडी कुत्री. पाराशेजारी शंकऱ्याच्या पालाची जागा ठरलेली. तशी ती तीन पिढ्यापासून ठरलेली. पाराजवळ लोखंडी पहारा रोवून वरून ताडपदरी पसरून दोरीने पहारासनी तिढा देऊन त्याचं पाल बघता बघता उभं राहायचं. पण चवळ्या पवळ्यावर गावातली कुत्री चाल करायची. सारा गावभर कुत्र्यांचा कल्लोळ. पण शंकऱ्याची कुत्री पालाभोवती शांत फिरत राहायची. दुसऱ्याच्या गावात भुंकायचं नाही अशी जन्मजात शिकवणच त्यांना असावी. पालात शंकऱ्याचं बिऱ्हाड अन गाडीखाली चवळ्या पवळ्याच्या सोबतीनं म्हाताऱ्याचा मुक्काम पडायचा. हेच शंकऱ्याचं पिढ्यान पिढ्या भटकं घर...

खोरी, टिकाव, खुरपी, विळे, कुऱ्हाडी, म्हशीच्या भोरकड्या, कोयते, डुबी, कुळवाच्या पासा, आदी शेतीच्या कामासाठी व जनावरांसाठी लागणारी लोखंडी हत्यारे गावाला अगदी तटपुंज्या रूपयांवर अथवा धान्यावर बनवून देणे हा शंकऱ्या घिसाड्याचा परंपरागत व्यवसाय. शंकऱ्या घीसाड्याला दोन बायका. पहिल्या मंगलाबाईची कूस फुलली नाही म्हणून त्यानं दुसरी शेवंताबाई केलेली. तिला चार पोरं झालेली. पण दोन्ही बायकांचं काही पटायचं नाही. रात्री रोज गाव जागवित भांडणं चालायची. मात्र कधी कधी दोघी उन्हाच्या एकमेकींच्या उवा मारत बसायच्या. त्यांच्या केसांना तेल नावाचा काही प्रकार असतो याचा पत्ता सुद्धा नव्हता. तर पोरं नदीच्या झाडीत ससं हुडकत फिरायची. सशाच्या मागं कुत्री लावायची. ससं पकडायला त्यांची कुत्री हातखंडा असायची. पडक्या विहिरीत उड्या मारून कुत्री आत शिरायची अन पोरं वरून लाव्हर टिपायची. कुत्री तोंडात लाव्हरं धरून वर आणायची. मग समद्या बिऱ्हाडाची चंगळ व्हायची. नदीच्या झाडीत असलेल्या हातभट्टीवर जाऊन शंकऱ्या झिंगून यायचा. मग रातभर बायका पोरास्नी बदडायचा. एका रात्री तर त्यानं बारक्या पोरास्नी दारू पाजली. हातभट्टीची दारू सहन न झाल्यानं पोरं जीवाच्या आकांतानं ओरडायची. झोपलेला गाव जागा करायची...
मात्र सकाळ झाली की पालावर शांतता असायची. अवजारे बनविण्यासाठी लोकांची धावपळ चालायची. भट्टी पेटलेली असायची. शंकऱ्याच्या दोन्ही बायका दहा पंधरा किलोच्या हातोडीचा घण तापलेल्या लाल लोखंडावर मारायच्या. शंकऱ्या काणसीने जोर लावून हत्यारे घासायचा. तर दुपार नंतर तयार केलेली हत्यारे, अवजारे आसपासच्या गावांतील आठवडी बाजारात जाऊन त्याच्या दोन्ही बायका विकायला जायच्या. पोरं सकाळी शिळ्या भाकरी मागायची. हाकलली तरी उंबऱ्याला चिकटून राहायची. पोरांना भूक आवरता आली पाहिजे म्हणून बालवयातच त्यांच्या पोटावर तप्त लोखंडाच्या सळईने डागण्या दिलेल्या होत्या. त्याचे व्रण त्यांच्या उघड्या पोटावर दिसायचे. दुपारची पोरं उकीरंड्यावर कोळसा हुडकत फिरायची. आणि गाडीखाली दिवस रात्र बिड्या फुंकत बसलेला म्हातारा गावातल्या जुन्या ओळखीच्या माणसाना जमवून, आम्ही महाराणा प्रतापसिंहांचे वंशज आहोत असं अभिमानानं सांगायचा...

अशातच एक दिवस चमत्कार झाला. शंकऱ्याची पहिली बायको मंगलाबाई लग्नानंतर तब्बल पंधरा वर्षानी गरोदर राहिली. गरोदरपणात आठव्या महिन्यापर्यंत ती घण मारताना गावाला दिसली. बघता बघता दिवस सरत गेले. पाऊसानं गावोगावी नुसतं थैमान घातलेलं. जरा कुठं उसंत पडली की पुन्हा पावसाला सुरवात व्हायची. नदी पाण्यानं फुगून गेलेली. पाल पाण्यात गेलं तसं बिऱ्हाडानं देवळात आसरा घेतला. देवळातच तिला कळा सुरु झाल्या. पण दुसऱ्या बायकोनं तिचं सुरक्षित बाळंतपण केलं. समद्या बिऱ्हाडाचा आनंद गगनात मावेनासा झाला. मंगलाबाईची वार पालाच्या एका कोपऱ्यात पुरली गेली. भर पावसात पाचव्या दिवशी न्हाणीपूजनाचा आणि सटवाईपूजनाचा कार्यक्रम झाला. पालाजवळ गोल खड्डा करून त्यात बाळ-बाळंतणीला बसवून आंघोळ घातली. पाडलेला खड्डा बुजवून त्या जागी पूजा करून कोंबड्याचा नैवेद्य दाखविला. बाळंतपणाचा विटाळ संपला. काही दिवसात त्याची बायको लोखंडावर घण मारायला मोकळी झाली. पण पाऊसच इतका की त्याच्या हाताला काम मिळेणासे झाले. ओल्या दुष्काळागत स्थिती झाली. गावच्या अख्या पिढीनं असा पावसाळा कधी पहिला नव्हता. माणसं कामधंद्यासाठी फिरेणाशी झाली. शंकऱ्याला कामच नसल्यानं बिऱ्हाडाचं पोटाचं हाल सुरु झालं...

अश्या एका मुसळधार पावसात रात्रीचं म्हातारं गारठलं. म्हाताऱ्याच्या साऱ्या अंगाला वाकळा गुंडाळल्या गेल्या. पण हुडहुडी भरून म्हातारं दात आपटू लागलं. मध्यरात्रीच्या सुमारास म्हाताऱ्याचा श्वास थांबला. बायका पोरांनी रडून गोंधळ सुरु केला. त्यात रातभर नुसती पाऊसाची गळती सुरु होती. म्हाताऱ्याला पावसात जाळताच येणार नव्हतं. नदीची माणसं जाळायची जागा पुरानं व्यापून टाकलेली. शंकऱ्या तश्या पावसात गावभर हिंडून आला. गावातल्या करत्या माणसाना भेटला. पण एखदा एका डवऱ्याचं मडं गावात पुरलेलं. त्याचं भूत बनून गावातल्या कितीतरी लोकांना झपाटलेलं होतं अशी गावाची ठाम समजूत. काही झालं तरी गावात मडं पुरायचं नाही यावर गाव ठाम राहिला. शंकऱ्यानं लोकांचं हातपाय धरलं, “तीन पिड्यापासनं ही आमचं गाव हाय! बापाला हातभर पुरायला जागा द्या!” म्हणून विनवणी केली. म्हाताऱ्यापाशी बिड्या फुकीत बसणारी काही लोकं जागा द्याला तयार होती. पण एकजूटी पुढं त्यांचं पण काय चालेना झालं. दुसरी रात्रपण सरली. म्हातारा ताठून गेलेला. आता मड्याला वास सुटू लागला होता. वरून गावावर पावसाचा मारा सुरु होता. सकाळ झाली. सकाळी पालातली कोंबड्याची डालगी रिकामी केली गेली नाहीत. आता रडारडी थांबली होती. आख्खा पावसाळा अंगावर झेललेला पाराशेजारचा घोडा शंकऱ्यानं सोडला. पावसाच्या उभ्या धारेत पाल रिकामं केलं. आवराआवर झाली. कोंबड्याची डालगी गाडीत बांधली. म्हाताऱ्याचं ताठ्लेलं मडं डोक्याकडून शंकऱ्यानं कवळा घालून उचललं. बायकांनी पायाकडून धरलं. भर पावसात ताठ्लेलं मडं गाडीत कोंबलं. बायका पोरं गाडीत बसली. शंकऱ्या पालं काढलेल्या रिकाम्या जागेवर आला अन हात जोडून म्हणाला, “देवा ही जागा आमच्यासाठी राखून ठेवा! पुढच्या वरसाला!” पुन्हा शंकऱ्या तुफान कोसळणाऱ्या भर पावसात पुढच्या बाजूनं गाडीत शिरला. अन घोड्याला “हय हय” करीत जोरात छकडा-गाडी हाकू लागला. निदान ताठलेल्या बापाचं मडं पुरायला पुढच्या गावात तरी हातभार जागा मिळेल या जीवघेण्या आशेवर स्वार होऊन.......


 

No comments:

Post a Comment