Monday, June 12, 2017

“बॉम्बे बिट्स” एक तरुणाईचा न संपणारा प्रवास.......


भाग्यश्री भोसेकर-बीडकर यांचा बॉम्बे बिट्स हा एक तरुणाईचा प्रवास आहे. "बॉम्बे बिट्स" या शीर्षकातच खुप कुतुहल लपलेले आहे. पुस्तक वाचत वाचत पाने पलटताना कितीतरी भाव भावनांचे कंगोरे उलगडत जातात. म्हंटले तर हि कादंबरी आहे, एक कथा आहे, आणि एक पत्रमालिका सुद्धा आहे. पात्रांचे तोंडी वापरलेले निवेदन, सवांद आणि यातून वाचकाला मिळणारा मोठा आशय ही एक फार मोठी ताकद या पुस्तकाची आहे. इथे पत्रकारितेचं जोखड खांद्यावर लीलया घ्यायला तयार झालेली इरा आहे. जे. जे. हॉस्पिटल मध्ये नोकरीत रूजू झालेली सई आहे. लखलखणाऱ्या दुनियेतलं यश अपयश पचवणारी ग्रीष्मा आहे. कादंबरी वर्णन स्थळकाळ यात आजीबात अडकून रहात नाही तर सरळ विषयाला हात घालताना दिसते. आपल्या आयुष्याचा सारा अर्थ आपण जोडलेल्या नात्यात आहे हे कादंबरी वाचताना सतत जाणवत राहते. जगण्याचे अन् मानवी नात्यांचे अन्वयार्थ शोधण्याची प्रक्रिया अखंडपणे या कादंबरीत येत राहते. हॉस्पिटलचे प्रसंग, ड्रग्स घेतानाचा प्रसंग यातून लेखिकेचा अभ्यास आणि अफलातून निरीक्षण दिसून येते. व्यक्तिरेखा आणि त्याचे अंतरंग उलगडण्यात लेखिका माहिर असलेचे जाणवते. कोणताही नवखेपणा जाणवत नाही. एकूणच  लेखनाला व्यापकता आणि एकात्मता मिळवून देणारी दृष्टी भाग्यश्रीला लाभली आहे. 

आवडलेले निवेदन :-

केवढं तरी मनात घेऊन जगत होता विक्रम. मिश्किल हसणाऱ्या, मजा मस्ती करणाऱ्या या माणसाच्या मनात दुःखाचा इतका अथांग सागर दडलाय हे मला काल पहिल्यांदा उमजलं. काय आणि केवढं मानसिक ओझं वाहिलंय याने याची कल्पना काल मला आली. त्याचं स्वतःचं असं एक जग आहे, फक्त त्याचीच असणारी दुनिया ज्यात तो कोणालाही प्रवेश देत नाही पण काल त्याने मला त्याच्या त्या दुनियेत प्रवेश दिला. त्याने त्याच्या आयुष्यातल्या काही गोष्टी माझ्याशी शेअर केल्या. इथे त्या लिहाव्याश्या वाटत नाहीयेत पण त्याने त्या गोष्टी सांगितल्यामुळे त्याने मला नकार देऊनही त्याच्याबद्दल माझ्या मनातील आदर वाढला. माझा प्रेमभंग झाला असं मी मानत नाही कारण माझ्यासाठी माझं पाहिलं आणि शेवटचं प्रेम विक्रमच असेल.
ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचं आपण काही देणं लागतो असा विचार करणारे फार कमी लोक आहेत या जगात. माझी अशी इच्छा आहे की मी यात काम करावं केवळ तक्रारीचे सूर अळवण्यापेक्षा प्रत्यक्ष काहीतरी करून दाखवावं. त्यात सुदैवाने माझं क्षेत्र असं आहे जिथं खरंच मला समाजासाठी काही करता येऊ शकेल.
पण ज्यांना असे पालक लाभत नाहीत त्या मुलींना मी गर्भात मरू देणार नाही. एक डॉक्टर त्याहीपेक्षा एक स्त्री म्हणून मी यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करेन.

दोष:- 

काही ठिकाणी संवादाचा काहीसा अतिरेक... तो नेमका कुठे थांबवावा यात तो वाढत गेलेला दिसतो... प्रथम पुरशी निवेदन असल्याने प्रत्येक वेळी त्या त्या पात्रात उतरून वाचावे लागते... काही ठिकाणी वर्णने यायला हवी होती. अर्थात या काही छोटया गोष्टी वाचताना सहसा वाचकाच्या लक्षात येणार नाहीत. समिक्षेच्या दुष्टीने पहात गेलात की लक्षात येतात. मी समीक्षक वगेरे आजीबात नाही. पण खूप छान प्रयत्न आणि तो ही पहिलाच. पहिलेपणाच्या खुणा न जाणवणारा. Bhagyashree ला पुढील लेखनास शुभेच्छा !.... वाचकांनी पुस्तक खरेदी करून नक्की वाचा...




No comments:

Post a Comment