Tuesday, June 6, 2017

भेट


गावचा वाडा विकल्यापासून तू कधी दिसलीच नाहीस. मात्र बऱ्याच वर्षांनंतर काल स्टेशनवर दिसलीस. नुसतीच हताशपणे पहात होतीस. कदाचित तुला ओळख लपवायची असावी आता. मीच तुझ्या जवळ आलो. कुठे असतेस म्हंटल्यावर तू म्हणालीस, “अंगण नसलेल्या घरात बंदीस्त असते!” मी म्हंटलं, “गेला नाही का राग अजून!” मला थांबवत माझ्या नजरेत नजर देऊन तू म्हणालीस, “तुला फक्त नाती जुळवनं जमलं! ते वाढवनं नाही जमलं रे! मी शांत राहिलो. तुझ्या नजरेला नजर देणं मला जमत नव्हतं. पण तू आतून पार ढवळून निघत होतीस. सरणासारखी जळत होतीस. मला स्पष्ट कळत होतं. तुलाही तो प्रसंग टाळायचा असावा कदाचित. तू पुन्हा म्हणालीस, “तुला पोहचण्यासाठी ठेवलेल्या काळजातील चोरवाटासुद्धा आता मी लिपून टाकल्यात!...

...तुझी गाडी यायच्या आधीच तू उठलीस. जाताना तू पर्समधील एक कार्ड फेकत म्हणालीस, “शेवटच्या वेळी तरी जवळ असशील एवढी एकच आशा अजून जिवंत आहे!" तुझ्या शेवटच्या वाक्याचा अर्थ जुळवत मी कितीतरी वेळ तसाच तुला पाठमोरी जाताना पाहत उभा होतो. पुन्हा भेटशील की नाही मला माहित नाही. पण नवे डोळे घेऊन पुढच्या आयुष्याकडे मलाही पहाता येत नाही अजून! मला खूप काही सांगायचं होतं! आणि तुला थांबायचं न्हवतं!.. 
No comments:

Post a Comment