Tuesday, May 30, 2017

सैराट


अभिरुचि सिटीप्राईडला सैराट पाहिला.'नागराज पोपटराव मंजुळे - बस नाम ही काफी है। फिल्म देखने के लिये।'कुठलाही सेट उभारता ग्रामीण भागातील अप्रतिम सौंदर्य आणि वास्तवातील जिवंत चित्रीकरण उभं केलय. अस्सल गावरान गावाकड़ची जिवंत पात्रे आणि बोलीभाषा ही सिनेमाची जमेची बाजू ठरलीय. खऱ्या आयुष्यात कॉलेजची पायरी चढलेल्या रिंकूला नागराजने कॉलेज लाइ्फ मधे छान सजवलीय. तितकाच परशाला ही उभा केलाय. आपल्या प्रत्येक सिनेमातुन नव्या कलाकारांना यशस्वी नवा जन्म देण्याचा नागराजचा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद म्हणावा लागेल. नागराजच्या खऱ्या आयुष्यात कधीतरी चटका लावून गेलेल्या काही जीवघेण्या घटना कदाचित या सिनेमातुन व्यक्त ही झाल्या असाव्यात. मित्राच्या भूमिकेत वावरणाऱ्या आणि खऱ्या आयुष्यातही अपंग असणाऱ्या बाळूने आणि सल्याने आपल्या अभिनयाची छाप मागे सोडलीय. नागराज नेहमीच समाजातील विदारक सत्य परिस्थिती आपल्या सिनेमातुन लोकांसमोर आणताना दिसतो. अगदी येथेही तेच केलय. म्हणून नागराजचे सिनेमे प्रेक्षकांना रिकाम्या डोक्याने घरी जावू देत नाहीत. ते चिंतन कारायला भाग पाडतात.
करमाळा परिसरातील 96 पाय-यांच्या विहिरी अर्थात बारवं यात दाखविल्या आहेत. हाच तर खरा सिंगापुर नाही ना असे कुठेतरी वाटून जाते. स्क्रीन मध्ये दिसणाऱ्या विहिरीत आत उड़ी मारण्याची इच्छा झाल्याखेरीज राहत नाही. आपला गाव, आपला परिसर, आपल्याच सामान्य मातीतील मळकटलेल्या माणसांना घेवून नागराजने ही फ़िल्म बनविलय सोबत अजय अतुलच अप्रतिम "याड लावून" जाणारं संगीत तुम्हाला ठेका धरायला नक्कीच लावते्. तुमचं वय विसरून.
बर्लिन सारख्या इतक्या महत्वाच्या फिल्म फेस्टिवल मधे जावून आलेली ही फिल्म नागराजने खरोखर जीव ओतून बनविलीय. तिचा निखळ आनंद घ्या. टिका करणे सोपे असते पण दोन तीन वर्षापासून पडदयामागे विविध समाजातील हजारो हातानी मिळून ही फ़िल्म बनविली आहे म्हणून ती उत्तम कलाकृती झाली आहे. बाकी नागराजने सात कोटी लावलेत आपण शंभर रुपये नक्की लावा. नेहमीच नवीन चेहरे शोधून त्यांच्याकडून अभिनय करून घेवून वास्तव सिनेमा बनवण्याचे कसब नागराज कडे जन्मजातच असावे. म्हणूनच आर्ची आणि परश्या हे सर्वसामान्य समाजातील तरुणांना जवळचे वाटतात.
आर्ची ही परंपरागत रूढी आणि परंपराना छेद देणारी बिंदास नायिका वाटते. जाती पातीच्या बंधनात अडकून कित्येक प्रेम प्रकरणांची माती झाली असेल. पण सैराटची प्रेमकथा त्याला भिक घालत नाही. तर ती व्यवस्थेशी झगड़ताना दिसते. संघर्ष करत राहते. प्रेमात यश मिळ्यानंतर पलीकडची वास्तव दुनिया दाखविण्याचा यशस्वी पर्यन्त यातून केलेला दिसतोय. अर्थात गुलाबाची फुले पाहिल्यानंतर नंतर काटे पाहायला जड जातेच.
पूर्वाधातल्या खेड्यात दणक्यात वेग पकडलेला सैराट मात्र हैद्राबादच्या उत्तरार्धात काहीसा रेंगाळत जाताना दिसतो. जाणीव आलेल्या कोवळ्या दोन जीवांचा संघर्ष पेलवत नाही. नागनाथ सैराट पार्ट 2 दाखवन्याची का घाई करतोय असे सतत वाटत राहते. पण सिनेमाच्या भव्यतेपुढे या गोष्टी पळून जातात. काही गोष्टिकडे दुर्लक्ष्य केले तर हा सिनेमा पैसा वसूल करतो.
पण...
"आपल नदी काठी एक छोटसं घर असायला पाहिजे...झूळ - झुळ वाहणारं पाणी...पुढं अंगणात मोठी बाग..मी कामाला जात जाईल ...मी स्वयंपाक करील ....मी लाकडं तोडून आणीन
आणि मी दारात उभी राहून तुझी वाट पाहिन ..." या आणि या गोष्ठी फक्त आणि फक्त स्क्रीनवरच बघायला शोभून दिसतात, वास्तवात नाही याच भान आपल्या मेंदूत जिवंत ठेवुनच, वयात आलेल्या आणि येणाऱ्या मुला मुलींनी हा सिनेमा एन्जॉय करावा ही प्रमाणिक अपेक्षा.
...शेवटी..."नाग"राज सैराटच्या कथेत समाजाच्या आत पिढ्या पिढ़या लपून बसलेल्या रूढ़ी परंपरा आणि प्रथांना ढसतो. त्यामुळे सैराटची कथा डोक्यात भिनते आणि विचार करायला भाग पाडते. कारण नागराज म्हंटल की वास्तविकता येणारच. त्यामुळे फ्यांड्रीने भिरकावलेला दगड आणि सैराटच्या ट्रेलर मधून तुम्ही पाहिलेली गोळी यावेळीही मेंदू फोडून आत जाईल की तुम्हीच झिंग झिंग झिंगाट करत आनंदाने नाचत मल्टीप्लेक्स मधून बाहेर याल यासाठी हा सिनेमाच प्रत्यक्षात पहा.... 


No comments:

Post a Comment