Monday, May 29, 2017

शामराव

बायको बाळंत झाली अन शामराव गायब झाला. कुणी म्हणायचं सोन्या चांदीची दुकानदारी शिकायला परराज्यात गेलाय. कुणी म्हणायचं राजस्थानात दिसला. आता शेठ झालाय. कुणी म्हणायचं त्यानं आता तिकडच बाई ठेवलीय. पण शामराव काय गावाला कधी नजरं पडला नाही. बायकोनं मात्र नुसत्या आठवणीवर पोटाची खळगी भरण्यासाठी गावाचा रोजगार करून पोरगा वाढवला. पुढ कधीतरी त्याच्या पोराचं लग्न पण झालं. शामरावला नातवंडे झाली. एव्हाना काळाच्या ओघात गाव शामरावला विसरून गेला. पण लेकानं न पाहिलेल्या बापाला शोधायसाठी सारी दुनिया पालथी घातली. बाप पाहिलेली भावकीतली लोकं घेऊन मैलोन मैल रल्वेने प्रवास केला. अन अखेर शामराव जवळ जवळ ५० वर्षानी अजमेरमध्ये सापडला...
...शामराव आता गावात चांगलाच रूळलाय. थकून गेलाय. आतून आटून गेलाय. पाटीनं वाकून गेलाय. परवा छप्पराला कुड घेताना दिसला. अबोल असतो. पण शेवटी बोलता केला. म्हंणला, “सोन्या चांदीची दुकानदारी करणाऱ्यानी घात केला! शेठ करतो म्हणून नुसतच कोळसं फुकायला लावलं. साऱ्या आयुष्याचाच विस्कुट झाला बघ! चाळीस वर्षे तिकड तीन चाकाच्या सायकलीवरून बैलासारखी माणसं ओढायचं काम करून, आतड्यांची भूक भागवली! गुरा ढोरावाणी जनम लाभला बघ!...

2 comments:

  1. ग्रामीण भागातील घडामोडीचे यथार्थ वर्णन,प्रत्येक पोस्ट मध्ये असते

    ReplyDelete
    Replies
    1. प्रतिसादासाठी धन्यवाद

      Delete