Saturday, April 15, 2017

पान गळती



जुन्यातला खाशा म्हातारा मेला तेव्हा
स्मशानात फसफस करून
काही क्षणात जळून गेलेला
त्याचा मेंदू पाहून
त्या रात्री मी प्रचंड अस्वस्थ झालो
लाकडाच्या ढिगाखाली
कित्येक नव्या जुन्या आठवणी सोबत
जळणारा त्याचा मेंदू पाहून
निषेध केला मी
सबंध पृथ्वीतलावरच्या
भिकार तंत्रज्ञानाचा.
त्याच्या मेंदूचं मेमरी कार्ड बनवून
जुन्या आठवणी विकणारं दुकान
या देशात अजून कुणी उघडलंच नाही.
न्हवे,
डोक्यावर बांधलेल्या मंडवळ्या
सुटायच्या आधीच नवरा मेल्यावर
त्याच्या अश्या कोणत्या आठवणीवर
हौसा म्हातारी सत्तर वर्षे नांदली
मला माहित नाही
इथल्या गावगाडयातल्या पिढ्यानाही
ते माहित नाही
पण आयुष्यभर पुरुष स्पर्श न झालेला
तिचा देह तडतड जळाला
तेव्हा तिचं म्हातारपणा पर्यंत
तरुण राहिलेलं जिवंत गर्भाशय काढून
एखादया चौकात
कोल्ड स्टोरेज उभारून
नव्या वासनांध पिढ्याना
त्याची सोशिकता दाखवता आली असती तर...
अरे,
क्षणा क्षणाला आता इथल्या स्क्रीनवर
बाईला मुतताना, भोगताना, कापताना दाखवणाऱ्या
समस्त विश्वातल्या भिकारचोट तंत्रज्ञानानो
तुम्हाला खरी झेप अजून
घेता आलीच नाही
धिक्कार करतो मी तुमचा...

No comments:

Post a Comment