Friday, February 17, 2017

संग्राम भाऊ



तर गेले कित्येक महिने विजनवासात गेलेले तरुण तडफदार आणि तरुणींच्या गळयातील ताईत असलेले Francisco D'anconia उर्फ संग्राम भाऊ यांचा आज प्रकटदिन. भाऊ फेसबुक सोडून गेल्यापासून शकडो जणांनी भाऊंना परत या म्हणून फोन केलेत. पण आमच्या विनंतीस मान देवून भाऊ फक्त आज काही वेळ सर्वांना दर्शन देतील. अर्थात त्यांच्या वस्तीवर रेंज आली तरच! भाऊ सध्या दिवस रात्र MPSC चा अभ्यास करत आहेत. तसे भाऊ अन आम्ही एकाच मातीतले आहोत. अगदी शेजारी शेजारीच म्हणा. खरे तर भाऊंचे लेखन वाचून वाचूनच आम्ही लिहायला शिकलो. भाऊ नसते तर आम्ही काही लिहुच शकलो नसतो असे वाटते कधी कधी. माझ्या पोस्टमधील माणसं ही त्यांच्याच परिसरातील असतात. अशा या भाऊंचा जन्म माण-खटाव सारख्या दुष्काळी पट्ट्यात एका भयान दुष्काळात झाला. जन्मताच दुष्काळ घेऊन जन्मलेल्या भाऊंच्या गावात तेव्हा दवाखाणे न्हवते. मग यांना एका सुईनीने जन्माला घातले. भाऊ जन्मापासुनच खूप अवखळ आहेत. म्हणजे एखान्द्या अंडील खोंडा सारखे. पण दिसायला हीरोसारखे स्मार्ट असल्यामुळे लहानपणा पासूनच शाळेतल्या पोरींचा यांच्यावर डोळा होता. लहानपणी लपंडाव खेळताना भाऊंना त्यांच्या मैत्रिणीचा हात हातात घेवून म्होरीत लपावसं खूप वाटायचं. पण प्रत्येक वेळेस राज्य भाऊवरच यायचं. आणि दुसऱ्या डावाला तिला तिच्या घरची लोक हाक मारायचे. थोडे मोठे झाल्यापासून भाऊंना पूर्वी कुठल्यातरी लग्नसमारंभात नजरानजर झालेली एक चिकणी मुलगी प्रत्येक व्हॅलेंटाईन्स डे ला आठवत राहते. मग भाऊंना आतून सारखं वाटतं राहतं की, “तेव्हा जरा डेरिंग करायला हवं होतं!असल्या जन्मापासूनच्याच दर्दभरी आठवणीआहेत आमच्या या भाऊंच्या...
अशा दर्दभरी आठवणीजगत जगत भाऊ कधीतरी मोठे होत गेले. तसे भाऊंना अनेक छंद जडत गेले. त्यापैकीच भाऊंचा आवडता छंद म्हणजे गिटार”. माकडीण जशी दिवस रात्र आपल्या पोटाला तिच्या पिलाला घेवून चिकटून राहते. तशी भाऊंना गिटार सदैव चिकटलेली असते. एक वेळ भाऊ त्यांच्या प्रेयसिला सोडतील पण गिटारीला कधीच नाही. भाऊंना गिटारीचे इतके वेड आहे की, कधीतरी एखान्द्या रात्री अचानकच भाऊंना जाग येते. मग हे घरातून उठून बाहेर अंगणात येतात. आणि पिपरणीच्या झाडाखाली अंधारातच गिटार वाजवत आणि भेसूर आवाजात दर्दभरी गाणी गात राहतात. साऱ्या वस्तीला भाऊंच्या या वेडाची सवय झालेली असते. पण अंधारात मात्र वस्तीवरची कुत्री भाऊंची दर्दभरी गाणी ऐकूण गावाकडे तोंड करून रातभर गहिवर घालत राहतात. भाऊनी एकचंपीनावाची जातीवंत ब्रिटिश बनावटीची कुत्री पण पाळली आही. या चंपीचा दरसाली न चुकता पाळणा हलत राहतो. भाऊ वर्षातून एकदा तिला खास वाहनाने पुण्याला तिच्या राजाकडेआणतात आणि दोघांची एकांतात भेट घालून देतात. काही दिवसांनी मग चंपी चांगलेच बाळसे धरते. या चंपीच्या पिलांना पंचक्रोशीत खूप मागणी असते. अशा काळात मात्र भाऊंची कॉलर ताट राहते...
भाऊंचा फेसबुक प्रोफाईल पाहून लोकांना वाटते की ते सध्या पुण्यात असतात आणि ते MTV च्या Studio मध्ये काम करतात. यांच्याकडे पाहिल्यावर हे एखांदी हॉलीवूड सिनेमाची स्टोरी वगेरे लिहित असावे असे वाटते. पण यातले काहीच खरे नसते. कारण भाऊ तिकडे गावाकडे माळरानावर गुरे ढोरे चारत राहतात. आणि एखान्द्या वस्तीवरच्या यशवदा म्हातारीवरस्टोरी लिहून हे फेमस होतात. तिकडूनच ते एखान्द्या माळावरच्या पडक्या घराचा फोटो काढून भर उन्हाचा अपलोड करतात. अन इकडे फेसबुकवरची लोकं ४०० - ५०० लाईक ठोकून देतात. मात्र भाऊ सदैव आपल्याच धुंदीत जगतात. त्या नेमाड्यांच्या खंडेरावसारखं. दुपारच ऊन डोक्यावर घेऊन रस्ता तुडवत लंगत लंगत घामाघुम होऊन, कुकवाचे ओघळ पुसत धापा टाकत देवळाच्या दिशेने चालनाऱ्या तारु म्हातारीला वाटेत थांबवून हे सांगतात, “देव बिव काय नसतोय! मग बंद कर श्वास आणि घेवून दाखव की परत जन्म स्वत:च्या हिम्मतीवर!असं तारु म्हातारी भाऊंना म्हणली की मध्यरात्री सारा गाव झोपला की हळूच भाऊ गावातल्या देवळात जावून घंटी न वाजवता देवाच्या पाया पडून येतात. लहानपणी तर भाऊ त्यांच्या मैत्रिणीला हाताला धरून मेलेली माणसं कशी जाळतात हे बघायला दडत दडत मसनवटयात जायचे. आणि काही वेळापूर्वी घरापाशी रडण्याचा आव आणणारी माणसं तिकडं प्रचंड हसत हसत तंबाखू खात वाळूत बसून गप्पा मारत बसलेली बघून आश्चर्य करत राहयचे. असे हे भाऊ कातर खटाव मधून मायणी रोडने कामाला जाताना एखाद्या ओढ्यावर मध्येच थांबतात. बाजूच्या खडकावर बसतात. तेथे बसून प्रोफाईलला “Francisco D'anconia” चा फोटो अपलोड करतात. मग शहरातली लोकं इकडे wow म्हणुन कमेंट मारत राहतात. आणि ओढ्यात हागायला बसलेले भाऊ त्यांना रिप्लाय करत करत तिकडेच जोर देत ओढ्यात बसून राहतात...
...हा विनोदाचा भाग सोडला तर माझा हा लहान भाऊ वास्तवातली भयान जिंदगी जगलाय. भोगलाय. राखेतून उठून फिनिक्स पक्षासारखी आकाशात गगन भरारी कशी घ्यावी ती याच्याकडूनच शिकावी. प्रचंड गरिबीत जन्माला आलेला हा माझा भाऊ दारिद्याच्या उरावर बसून मनगटातील बळ वाढवत गेला. म्हणूनच याने लिहिलेली प्रत्येक पोस्ट ही खरी असते. कारण त्यातले जीवन तो स्वताच कधीतरी जगलेला असतो. त्यातला प्रत्येक शब्द न शब्द काळजाचा ठाव घेत राहतो. काळजाची चिरफाड करतो. म्हणूनच झोपडीतल्या खंदीलाच्या उजेडात चुली समोर घामाघुम होवून भाकऱ्या थापणारी तुझी यस्वदा म्हातारीएका कवर फाटलेल्या जुन्या पूस्तकासारखी वाटत जाते”. आणि कसले तरी अंगावर फोड आले म्हणून तिने विहिरित उडी टाकली! अन ती मेल्यानंतर तुझ्या पोस्टीतला तिचा नवरा सकाळी पाणी भरून स्टो पेटवून तिच्या चिमुकल्या पोरींना उठवतो”. असले न पचणारे वास्तव लिहून तू आम्हांला रडायला लावतोस! आणि विहिरित खाली खाली बुडत जाताना त्या बाईला कसं वाटलं असेल?” असली काळजी करत तू स्वता विषन्न होऊन बसून राहतोस! तू लहान असताना तुझ्या घरात भांडणं आधीच कमी नव्हती आणि त्यात मागची भिंत पडली. तेव्हा तुझ्या आईनं प्रचंड एका दुपारी उंबऱ्यावर बसून चुळा भरत रडून घेतलं! तेव्हा तिच्या पदराला बिलगत तू कोणता विचार करत असशील! पण माणूस आशेवर जगतो! तू आशा सोडणारा मुलगा न्हवतासच मुळी! म्हणूनच, “कधीतरी मुल होईल या आशेवर तू पाहिलेली शेवंती जगत राहिली! कित्येक दिवस ती पोटावर चिंध्या बांधून डोहाळ्याचं नाटकही करायची! पण एक दिवस तिचा शेवट झाला! अन ओढ्याला आलेल्या पाण्यात तिच्या घरच्यानी सोडून दिलेल्या चिंध्या तू वेड्यासारखा पहायला गेलास! खरच, वेडा आहेस तू भावा.....
...घरी भांडण झालं की लहानपणी तू बापाच्या पाठीमागुन शेताकडं उगाच दडत दडत जायचास! तुला नेहमी वाटायचं बाप तिकडे जावून जिव वगैरे देवून बसल. मग दिवसभर रानातली ढेकळं तुडवत त्याच्याबरच राहायचास. घरातले, गोट्यातले सगळे कासरे तू उगाच दडवुंन ठेवलेले. त्या पिपरणीच्या झाडाची आडवी ढांपी सुद्धा तोडून टाकलीस तू! आत्महत्येला आड येणाऱ्या सगळ्या गोष्टी तू आडव्या तिडव्या करून टाकल्यास! एकदा तर प्रचंड पावसात बापाबरोबर घरी भिजत आलास तू! चुलीपुढं डोकं शेकुन दिवळीतल्या दिव्याकडं बघत कधीतरी रात्रीचा झोपी गेलास! असं कितीवेळा तरी शाळा बुडवुन तू बापाबरोबर बाप जिवंत रहावा म्हणुन फिरत राहीला असशील! तुझं शाळा बुडवण्याचं खरं कारण कधीच कुणाला समजलं नाही रे माझ्या भावा!...
प्रचंड गरीबीपुढं आणि काखेतल्या पिल्लाच्या भवितव्याच्या काळजीनं तू पाहिलेली बाई जेव्हा एका श्रीमंत माणसाच्या अंगाखाली नाहीशी होत जाते! तेव्हा तिच्या आधी तूच म्हणतोस! तिला शनी देवाच्या दर्शनात रस उरला नाही आता!!!तू नेहमी म्हणतोस! दुनियेत उध्वस्थ झालेली माणसं कमी नाहीत! आपण फक्त सितारीच्या तारेतून निघालेल्या एका एका ध्वनीतून हि अस्वस्थता डोळे झाकून अनुभवत रहावी! आणि एकटं राहणं एकूण राक्षसीच असतं! सारखं इकडे तिकडे जात राहीलं पाहिजे! लोक चांगले असतात! आपण मिसळले पाहिजे! कुणाशी वैर करता कामा नये! स्टेन्डर्ड बिंडर्ड गेलं खड्यात! मांणस जास्त महत्वाची आहेत!!!कुठे शिकलास हे रे सर्व तू..... तुझ्या प्रेमाविषयी तू एवढच म्हणाला होतास, “मी वाहून जात असताना ती काठावर आकांत करीत होती! आणि एका निसटत्या क्षणी मी तिच्या चेहेऱ्यावर प्रयत्नाने लपविलेले हास्य पहिले... आणि मी... मी..... आधारासाठी पकडलेली खडकाची कपार अलगद सोडून दिली……….”
एखदा तू माझ्या पुण्यात आलास तेव्हा म्हणाला होतास! पुण्यात घरे आहेत पण अंगण नाही! अंगण असले तर त्या अंगणात जळणाचा बिंडा नाही! चुल नाही! की फुटका रांजण नाही! सारवलेली जमीन नाही! पुण्यात अंगणातल्या चुलीच्या धुराने माखलेलं आभाळ नाही! आणि येथल्या कारखान्याच्या धूराला गावातल्या धुरा सारखं सौंदर्य नाही!असलं आहे तुझं जगण्याचं तत्वज्ञान! त्या नेमाडे बाबा सारखं! आतून माणूस उध्वस्त करणारं!!! मला माहित नाही तू येथे परत येशील की नाही... पण तुझ्या आईनं तुला वाढवताना पाहिलेलं स्वप्न तू पूर्ण करशील हीच अपेक्षा!!! तुला मोठ्या भावाच्या खूप खुप शुभेच्छा!!!


 

No comments:

Post a Comment