Monday, February 27, 2017

मराठी भाषा दिन



"माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा" यांसारख्या ओळी लिहून मराठीचं गुणगान करणाऱ्या ज्ञानपीठविजेत्या कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून जगभरातील मराठी भाषकांकडून, दर वर्षी २७ फेब्रुवारीला साजरा केला जातो. कुसुमाग्रजांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आपली लेखणी अखंड सुरु ठेवली त्याचीच आठवण म्हणून त्यांच्या जन्मदिवशी आपण 'जागतिक मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा करतो. शिवाय १९९९ वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस जागतिक मातृभाषा दिनम्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
पण आजचा दिवस शुभेच्यांचा वर्षाव होईल. गळाभेटी होतील. कुरुमाग्र्जांची आठवण येईल वगेरे वगेरे. उद्यापासुन मागील पानापासून पुढे परत आमची सुरुवात राहील. ही आहे आमच्या ज्ञानेश्वरांच्या “ अमृतातेही पैजा जिंके” अशा मराठी भाषेची अवस्था. खरच! आपण मराठीच्या वाढीसाठी किती प्रयन करतो आहोत. काळानुसार भाषा बदलत असते. आपणही बदलायला हवे. इंग्रजीपासून पळून आता चालणार नाही, या मताशी आता सर्वच सहमत आहेत. पण खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वरांपासून सुरु झालेला तिचा प्रवास आता एका नवीन वळणावर येऊन थांबलाय. अडकलाय. तो पुढे जाईल की नाही ते येणारा काळच ठरवेल. मात्र सध्या येऊ घातलेल्या डिजिटल युगात टिकून राहण्याचे मोठे आव्हान आजच्या मराठी पुढे असेल. नवीन तंत्रज्ञानाची कास मराठीला धरावीच लागेल. तरच तिचा पुढचा प्रवास होईल.
प्रत्येक वर्षी २७ फेब्रुवारीला आपण मराठी ज्ञानभाषा झाली पाहिले म्हणून आग्रह धरतो. पण मला वाटते आता आपण जाहीरपणे स्वीकारायला हवे की मराठी ही कधीच ज्ञानभाषा होणार  नाही. कारण जी भाषा शिक्षणाची माध्यमभाषा म्हणून टिकली नाही ती आता ज्ञानभाषा कशी होईल.  आणि जी भाषा ज्ञानभाषा नसते ती भाषा जागतिकीकरणाच्या- काळात सुरक्षित तरी कितपत राहील? आज शहरांचा विचार करायचा तर मुंबईत मराठीची काय अवस्था आहे. मराठी माणूस ट्रेन मध्ये, बस मध्ये अथवा त्याच्या घराबाहेर पडल्यानंतर खरच मराठी बोलतो का? किती दैनंदिन व्यवहार मराठीतून करतो. मराठी साहित्याची पंढरी असलेल्या पुण्यातही काही वेगळे चित्र नाही. मराठी शाळांचे खांब आता कोसळू लागले आहेत. तर इंग्रजी शाळांचे पिलर आता उंच उंच चढू लागलेत. मराठी पुस्तके खरेदी करून वाचणार्यांचे प्रमाण कमी होतेय. दोनशेचा पिझा सहज घेवून खाणारी आजची पिढी दोनशेचे पुस्तक खरेदी करून कधी वाचते का? किती अभिमान आहे आम्हांला मराठी भाषा आणि तिच्या साहित्याचा. अजून शंभर वर्षे तरी मराठीला काही होणार नाही म्हणून गळे काढणाऱ्या लोकांना मराठी नाटकाच्या रिकाम्या खुर्च्या कधी दिसतील का? प्रेक्षक नाहीत म्हणून दोन दिवसात थियटर मधून मराठी सिनेमे उगीच नाही हद्दपार होत. तीच गत आहे आमच्या मराठी वाहिन्यांची. अजून पंधराच्या वर आम्ही मजल मारली नाही. मारणार तरी कसे. बघणारेही हवेत ना? यामुळे काही वाहिन्या पदार्पणातच शेवटच्या घटका मोजताहेत. याउलट दक्षिण भारतात प्रत्येक राज्यात हीच प्रादेशिक वाहिन्यांची संख्या पन्नासच्या वर जाते. कारण त्या त्या लोकांनी त्यांची भाषा, संस्कृती टिकवून ठेवलीय. त्यांना जराही धक्का लागू देत नाहीत ती लोकं. म्हणूनच हिंदी, इंग्रजी भाषेतील पुस्तके, सिनेमे त्यांच्या भाषेत अनुवादित केली जातात. इतके घट्ट चिकटून आहेत ते लोक त्यांच्या भाषेशी आणि संस्कृतीशी.
समाधानाची बाब म्हणजे मोबाईल, संगणकामध्ये मराठीचा वापर वाढताना दिसतोय. नवीन मोबाईल घेल्यानंतर त्यात मराठी फोन्ट इन्स्टॉल करणारी पिढी जन्माला येतेय. सोशल मिडीयाच्या माध्यमातून नवीन पिढी मराठी लिहीतानाही दिसतेय. नवीन वाचकवर्ग ही तयार होतोय. लिहिणार्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. इंटरनेटवरसुद्धा मराठीची वाढ अजून व्ह्यायला हवी. मराठीत बनलेला सैराट सारखा सिनेमा आता साता समुद्रापार पोहचतोय. काही अमराठी कलाकारही मराठी भाषा शिकताना दिसताहेत. दहा कोटीहून जास्त लोकसंख्या असलेली मराठी भाषा आज तंत्रज्ञानाच्या नव्या वळणावर येऊन थांबलीय तिला सोबत घेऊन पुढे जायचे की तिला तुडवून जायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न. 



No comments:

Post a Comment