Monday, February 13, 2017

बज्या

बज्या बायकोला घेऊन गावाबाहेरच्या धरणावर उघड्या अंगानं दिवसभर राबायचा. कित्येक वर्षे. मुरमाच्या पाट्या फेकत फेकतच तो वाढला. घरादाराला पोसत राहिला. त्यांच्या सोबत जगलासुद्धा. मध्यंतरी धरणाचं काम संपलं अन बज्यासहित पोराबाळांचंही पोट उपाशी पडलं. बायकोनं माहेरहून आणलेली दोन लहान करडं पाळली. उन्हांताणात खपून तिनं करडाची मोठी शेरडं केली. विझलेली चुल पुन्हा पेट घेवू लागली. पण म्हातारीचा विरोध झुगारून बज्या धरणाच्या खालच्या अंगाला झाडीत असलेली एका पुढाऱ्याची हातभट्टी चालवू लागला. नासकी दारू विकता विकता प्यायला कधी शिकला त्याचे त्यालाच कळाले नाही...
...मागच्या चार दिवसापासून गायब होता बज्या. ज्या धरणावर पाट्या वाहण्यात आणि घामाच्या धारा सांडण्यात त्याचं अर्धे आयुष्य सरलं. सकाळी तिथे एका दगडाच्या कपारीत गढूळ पाण्यात भोपळ्यासारखा फुगून वर आलेला बज्या सापडला. अन चंद्रामावशीनं कपाळ बडवून फोडलेल्या आरोळीने धरणाच्या भिंतीनीही क्षणभर पाझर फोडला.

No comments:

Post a Comment