Friday, February 10, 2017

ट्रम्प तात्या निघाले प्रचाराला....


व्हाईट हाऊसच्या दारावर पोस्टमनने बेल वाजवली तसं मेलानिया ट्रम्प बाईनी भाकरी थापता थापता कडी काढून दार उघडलं. पोस्टमन कडून घेतलेलं पत्र चुलीपुढं बनियन लुंगी लावून गरम भाकरी अन पिटलं खात बसलेल्या डोनाल्ड तात्यांच्या हातात दिलं. डोळे मिचमिच करीत आणि तोंडातला भाकरीचा घास गिळत गिळत ट्रम्प तात्यानी एका दमात ते वाचून काढलं.
“काय वं काय लिवलय! जरा मोठ्यानं वाचून दाखवा की?” मेलानिया बाईनी परातीत थापलेली भाकरी तव्यात टाकत प्रश्न केला.
“मुंबई मधून पत्र आलय! निवडणुकीच्या प्रचाराला या म्हणून!” ताटात हात धुवून लुंगीला हात पुसत पुसत ट्रम्प तात्या बायकोकडं बघून म्हणाले. तसं सकाळी सकाळी मेलानिया बाईनी व्हाईट हाऊसमध्ये तोंडाचा पट्टा चालू केला, “तुमी तिकडं नको जायाला! काय बी बोलून बसाल तुमी! शहाणी नाहीत तेथली लोकं!” बरीच बाचाबाची झाल्यावर अखेर मेलानिया बाई तात्यांना भारतात पाठवायला तयार झाल्या...

“कुकुक कुss...” करीत व्हाईट हाऊसमध्ये दुसऱ्या दिवशी पहाटे कोंबड्याने बाग दिली. तशी जागं झालेल्या मेलानिया बाईनी गडबडीनं घोरत पडलेल्या ट्रम्प तात्यांना हलवून जागं केलं. पोरगं अजून झोपलेलच होतं. बाहेर गोठ्यात झोपलेला गडी केव्हाच उठला होता. गुरांचं शेणघाण करून रात्री मालकीणबाईनी सांगितल्याप्रमाणे तो लवकर उठून पाण्याच्या बंबाला जाळ घालीत बसला होता. तात्या बाहेर येताच गड्यानं न्हाणीत गरम पाण्याची बादली नेवून ठेवली. ट्रम्प तात्यांनी व्हाईट हाऊसच्या बाहेरच्या हिरवळीवर एक मस्तपैकी धावत धावत राऊंड मारला. गोट्यातल्या डालग्यात कोकाणाऱ्या कोंबड्या सोडल्या. आणि न्हाणीत जाऊन अंघोळ उरकली. गड्याला भारतात प्रचाराला निघालोय म्हणून सांगितलं. आणि वरच्या तालीतल्या ऊसाचं पाणी संपलं की खालच्या मळ्यात मकंला पाणी धरायला विसरू नकोस असंही सांगितलं. घरात शिरत शिरत मागं वळून व्हाईट हाऊसवर पण लक्ष ठेवायला सांगितलं.
मेलानिया वहिनीनी तोपर्यंत चहाला कड आणलेलाच होता. गडबडीनं लुंगी अन बनियन घालून स्वयंपाक खोलीत आलेल्या ट्रम्प तात्यांना कप भरून चहा अन सोबत दोन पावबटर खायला दिले. “किती करतेस तू माझ्यासाठी? थकून जातेस! कामाला एखांदी बाई का नाहीस ठेवत!” असं चुलीपुढं बसलेल्या बायकोला ट्रम्प तात्या म्हणाले. अन परत मेलानिया बाईंचा तोंडाचा पट्टा सुरु झाला, “त्या मोनिका लेविंस्कीनं पांग फेडलाय की या वाड्याचा एखदा! आता या वाड्यात दुसरी बाई म्हणून मी तुमच्या नजरंला पडू देणार नाही! नाहीतर त्या क्लिंटनचा वाण नाहीतर गुण यायचा तुमच्याच!” ट्रम्प तात्यांनी डोळे मिचमिच करीत गपगुमान चहा बटर संपविला अन भारतात निघण्याची तयारी सुरु केली...
दिवस कासराभर उगवून वर आला होता. व्हाईट हाऊसवर सूर्याची कोवळी किरणे पसरत चालली होती. लोकं कामधंद्यासाठी हिंडू फिरू लागली. काहीजण वॉशिंग्टनच्या मळ्याकडं धारंच्या किटल्या घेवून निघाले. गाई गुरे न्युयार्कच्या डोंगरावर हिंडायला निघाली. व्हाईट हाउसच्या पुढच्या राशन दुकानावर लोकांनी गर्दी केली. मेलानिया वहिनीनी न्युयार्कच्या आठवडी बाजारात घेतलेल्या दोन नव्या कोऱ्या लुंग्या, दोन बनियन, अंडरप्यांटा, पाच सहा ढगळ्या प्यांटा, पट्या पट्याचे दहा बारा शर्ट, दाढीचे सामान आणि चार ब्लेझर सुटकेसमध्ये कोंबले. पण सुटकेसचं दार काय बसेना. “आवं नुसतं बघत काय बसलायसा! बसा की हिच्यावर?” ट्रम्प तात्यांच्याकडे बघत वहिनीनी आवाज टाकला तसं ट्रम्प तात्यांनी सुटकेसवर आपला बुड टेकलं अन खटदिशी सुटकेसचं दार बंद झालं. आणि “बाहेरचं लई कायबाय खाऊ नका! तिकडं मंबईत भय्यं उघड्यावर काय बी विकत्याती! त्येन्ची पानीपुरी तरी आज्याबात खावू नका! एका बी बाईकड वर तोंड करून बघू नका! अन ही धन्याची पुडी हे लिंबू या वरच्या ब्यागत टाकतीया! लक्षात असुंद्या!!” मेलानिया बाईच्या शंभर प्रश्नाना झेलत अखेर ट्रम्प तात्या व्हाईट हाऊसच्या बाहेर आले. गड्याने बैलगाडी जुंपुन तयार ठेवलीच होती. त्याने ब्यागा गाडीत चढविल्या. ट्रम्प तात्यांनी मेलानिया बाईंचा आणि आपल्या छोट्या बैरन ट्रम्पचा कचकून मुका घेतला. अन वॉशिंग्टन मधल्या व्हाईट हाऊसला मागे टाकत रस्त्याने धुरळा उडवीत आणि गळ्यातल्या घुंगरांचा आवाज करीत बैलं बंदराच्या दिशेने धावत सुसाट सुटली. ट्रम्पसाहेबांचा कुत्रा वाकडं शेपुट हलवत गाडीच्या खालून चालू लागला. आणि मागे गाडीच्या बावकांडाला धरून रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा नमस्कार स्वीकारत ट्रम्प तात्यांचा प्रवास सुरु झाला...

अखेर बऱ्याच दिवसांचा प्रवास करुन ट्रम्प तात्यांची बोट मुंबईत गेट वे च्या बंदरावर पोहचली. सगळ्याच पक्षांचे नेते बैलगाड्या घेवून ट्रम्प तात्यांना आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी न्यायला आलेले. जो तो पुढे होवून ट्रम्प तात्यांना ओढू लागला. पण पवार साहेब जवळ गेले अन हळूच कानात कायतरी पुटपुटले. तसं ट्रम्प तात्या ब्यागा घेवून पवार साहेबांच्या गाडीत जावून बसले. पवार साहेबानी ट्रम्प तात्यांच्या डोक्यावर लाल फेटा बांधला. कपाळावर गुलाल लावला. अन बैलगाडी धुरळा उडवत पांदीतुन मुंबई ग्रामपंचायतीच्या दिशेने सुसाट सुटली. पुढं हलगीवाले अन पिपाणीवाले सुर धरून वाजवू लागले. बाजूला समुद्रावर कोळी माशासाठी जाळं टाकायला निघालेले दिसत होते. पुढं बाजूंनी हिरवेगार ऊसाचे फुललेले मळे दिसत होते. व्हिक्टोरिया स्टेशनच्या मळीला गाई गुरे चरत होती. नरीमन पोईंटच्या रिकाम्या माळरानातल्या बाभळीच्या झुडपावर शेरडं तुटून पडली होती. मुंबईत सुगीचं दिवस असल्यानं गडीमाणसं रानात राबताना दिसत होती. कापड गिरण्यात काम करणारे रात्रपाळीचे लोक घराकडे परतत होते. अन उन्हानं लालबूंद झालेले ट्रम्प तात्या डोळे भरून सगळा नजारा मिचमिचत्या डोळ्यांनी टिपत होते. अखेर बैलगाडी मुंबई ग्रामपंचायतीच्या समोर येवून थांबली. पारावर खच्यून गर्दी जमलेली. वडाच्या पारावर स्टेज बनविलेलं. दोन मोठे कर्णे गावाच्या दिशेने जोडलेले. पवार साहेबानी पाव्हण्याची ओळख करुन दिली. अन पाव्हण्यानं झाडून भाषण ठोकलं. सगळी माणसं भारावून गेली. त्यात्यांचे देखणे रूप आपल्या नजरेत साठवू लागली.
भाषण संपल्यावर बैलगाड़ी पवार साहेबांच्या मळ्याकडं निघाली. गाड़ी सुसाट गोटयाला आली. तात्यांना बसायसाठी पवार साहेबांनी गोट्यातलं बाजलं बाहेर काढलं. पवार साहेबांचं ऊसाचं गु-हाळ चालू होतं. ट्रम्प पाव्हण्याना दणकून भूक लागलेली. पवार साहेबानी तांब्या भरून ट्रम्प पाव्हण्याना रस पाजला. गरम गरम काकवी पाजली. अन गरम गुळात ऊसाची एक कांडी भरवून तोंडाला दिली. ट्रम्प पाव्हण्यानी बघता बघता चिक्कीचा फडशा पाडला. पवार साहेबानी पाव्हण्याना मसाला पान बनवून दिले. आणि गोट्यात गुरांची वैरणकाडी करू लागले. ट्रम्प तात्या बांधावर पिचकारी मारत फिरू लागले. इतक्यात ऊसात कायतरी हलू लागलं. पाव्हण्यानं पवार साहेबांना घाबरुन हाका मारायला सुरवात केली. तसं पवार साहेबांनी गोट्याला आड़वं पडलेलं कुत्रं "छो छो" करुन ऊसात सोडलं. अन आतून रस पिवून पोट बिघाडलं म्हणून हागायला बसलेलं निरुपम बोंबलत बाहेर आलं. अन एकच हशा पिकला...

निवडणुक उद्यावर आली होती. ट्रम्प तात्यांचा प्रचार संपला. आणि दुसऱ्याच दिवशी मुंबई ग्रामपंचायतीच्या दहा वार्डातली निवडणुक सुरळीत पार पडली. कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नाही. पण पवार साहेबानी आपल्या पक्षाचाच सरपंच मुंबई ग्रामपंचायतीच्या गादीवर बसविला. मग मुंबईच्या आठवडी बाजारातून ट्रम्प तात्यानी मेलानिया बाईसाठी दोन "लुगडी अन चोळी" खरेदी केली. छोट्या बैरनसाठी एक छानसा "संग्राम ड्रेस" घेतला. अन पवार साहेबानी ट्रम्प तात्यांना संपूर्ण पोशाख करुन अखेरचा निरोप दिला. आणि ट्रम्प तात्यांची बोट समुद्राचं पाणी कापीत अमेरिकेच्या दिशेने धावू लागली.



No comments:

Post a Comment