Tuesday, January 24, 2017

दवंडीऐका हो ऐका SSSS...... ढुम ढुम ढुमाक ढुम ढुम ढुमाक होSSS…. असा हालगीचा आवाज काढीत दवंड्या बोळात शिरून दवंडी द्यायचा. त्याच्या आवाजाची चाहूल लागताच घराघरातली डोकी कान देऊन आणि श्वासाला थांबवून दवंडीचा अंदाज घ्यायची. अरुंद बोळातल्या अंधारातून वाट काढत दवंड्या दुसऱ्या बोळात पुढे निघून जायचा. सोबत मागे फिरणाऱ्या चिलीपिलीना घेवूनच. दवंड्या एखांद्या खिंडाराजळ पाचट पेटवून हलगीला गरम करायचा. मग हलगी पुन्हा घुमू लागायची. सोबत ऐका हो ऐका SSSS.. ही त्याची आरोळी घेऊनच. जाहीर माहिती देण्यासाठी दवंडीची आरोळी सोडली जाई. जनावरांना लसीकरण, चावडीवरीच्या मिटींगा, कर वसुली, सामुदायिक काम, भांडण तंटा, इत्यादीसाठी दवंडी सोडली जायची. या निमित्ताने लोक एकत्र जमायचे. मग चावडी माणसांनी फ़ुलायची. चावडीसमोरची दीपमाळ तेल पीत मध्यरात्रीपर्यंत तेवत राहयची. तिच्या उजेडात गावाच्या भल्याबुऱ्याच्या चर्चा व्हायच्या. अडल्या नडल्याला मदत व्हायची...
पण माहिती तंत्रज्ञानाचं वारं गावात शिरलं आणि रात्रीच्या अंधारात घुमणारी दंवडीची आरोळी थांबली. सोबत हलगीवरची थापही विसावली. ती कायमची विझली. दंवडी कालबाह्य झाली. गावागावातील दवंडीचा आवाज बंद झाला. चावडीवरच्या गप्पा थांबल्या. गावाच्या भल्याबुऱ्याचे विषय आटले. त्यांना राजकारणाच्या चर्चाचे स्वरूप आले. स्मार्टफोन आणि सोशल नेटवर्किंगवरल्या आभासी जगातल्या विषयांनी आता ही जागा घेतलीय. आता दवंडी देणे आणि ऐकणे कमीपणाचे मानले जात आहे. चोहीकडे ब्रेकिंग न्यूजचा भडिमार होत असताना आता गाव दवंडीला सामावून घ्यायला तयार नाही. बदलत्या काळासोबत दवंड्याने दंवडी देण्यात काही बदल घडवून आणले नाहीत. गावानेही त्याला ते करू दिले नाहीत. दवंडी देत देतच गावातला नाऱ्या वाढला. जगला. थकला. आता त्याची हालगी काळासोबत भिंतीवरच्या खुंटीला अडकून पडलीय. आणि खुंटीखालच्या पोफडे उडालेल्या भुईवर दवंड्या हालगीकडे हताशपणे बघत दिवसभर गरीबीला झेलत डोळे मिचमिच करत पडून राहतो. अंधार झाला की धरपडत उठावे आणि गावातील पाराकडे तोंड करत ऐका हो ऐका..... ची आरोळी हलगी बडवीत अजून सोडावी असे त्याला काळजातून वाटत राहते. पण ती साद ऐकणारी जुनी माणसं आता माती होऊन गेलेली असतात. हलगीची आरोळी ऐकणारे कान आता बहिरे झालेले असतात. गावाच्या बोळाबोळात आता डिजिटल पोस्टर लागलेले असतात. नवी पिढी त्यांचा आदर्श घेत आता मेंदू वाढवत राहते. आणि दवंडीला विझवून गावही त्यांना पोसत राहतो. No comments:

Post a Comment