Friday, January 20, 2017

शिवा गवंड्याची म्हातारी

शिवा गवंड्याची म्हातारी रात्री वस्तीवरच्या बायकांसोबत, गोदानानीच्या ग्रज्युएट झालेल्या पोरानं नुकत्याच घेतलेल्या सेकंड हॅन्ड "टमटम" मधून तालुक्याच्या गावाला सैराट बघायला गेलेली. जाताना अंथरुणाला लपेटून बसलेल्या म्हातार्याला "तुझ्या संगतीनं माझा सारा जनम असाच रानामाळात उन्हांन वाळून गेला, कुठली हौस केली नायीस माज़ी, आता मी तुझ्या बापाला बी भ्याची नाय, तुझं धोतराच्या गाठीला बांधलेलं पैसं तसच जपून ठिव" असा मोठा ढोस पाजून गेली होती. सिनेमा बघण्यासाठी दुपारी हिनं मुंबई वरून सुट्टीला आलेल्या कोपऱ्यावरच्या आप्पाच्या सुनांना शेवग्याच्या शेंगा अन बांधावर आलेली दोन कलिंगडे विकलेली. तशी म्हातारी उभ्या आयुष्यात दोनदाच थियटर मध्ये गेली. कधीतरी "माहेरची साडी" बघायला कराडला शिवा गवंड्याने हिला बैलगाडी जुंपून नेलेली अन दुसऱ्यांदा कालचा सैराट बघायला….
..…तर उभ्या महाराष्ट्राने जेवढ्या शिव्या "प्रिन्स दादांना" घातल्या नसतील तेवढ्या "ठेवणीतल्या" शिव्या हीनं एकटीने कालपासून दिल्यात. हिला त्या छोटया "तात्याला" आई बापाच्या मागं कोण सांभाळणार ही एकच काळजी लागून राहिलीय. हिला कोणीतरी येताना हा सिनेमा 'खरा' आहे म्हणून सांगितलय. त्यात भरीस भर म्हणून वस्तीवरची ओठ तुटकी पारू, सारखी म्हातारीजवळ येवून मिश्रीचे बोट तोंडात घालून "अगं त्या पोराला अनाथ आश्रमात ठेवत्याली की?" म्हणून हिणवतेय. मग म्हातारी पुन्हा पुन्हा बिथरतेय. आणि "प्रिन्स दादांचं" मढं जिवंतपणीच नदीवरच्या मसनवाट्यात घालवतेय…..

No comments:

Post a Comment