Friday, January 20, 2017

ती सध्या काय करतेय...

वाड्यासमोरच्या फुफाट्यात मातीचे पाय रुजवत ती चालायची. तेव्हा तिच्या पायातील पैंजण मातीत न्हाऊन निघायचं. पहातच राहयचो. वाड्यापुढच्या पिंपळावरच्या फांदीवर खेळणाऱ्या पाखरांना ओटयावर बसून तासन तास पहात बसायची. कधी खेळत खेळत माझ्या घराकडही सरकायची. दारातून डोकावत आवाज दयायची. अजूनही आठवतं. गाबुळलेल्या चिंचा काढण्यासाठी चिंचेच्या झाडावर चढताना कोवळ्या नाजुक हातांचा माझ्या पायांना तिनं दिलेला आधार. आणि हळूच काढलेला चिमटा. अन तिने उडविलेले हास्याचे फवारे. गाबुळलेली आंबट गोड चिंच खाताना तिने कसेतरीच तोंड केलेले. मग धावत जाऊन परड्यातल्या माठातलं थंडगार तांब्याभर पाणी घटाघटा प्यायली होती. ते आठवणीतलं चिंचेचं झाड तेवढ ऊन वारा पचवत अजून कित्येक पिढया उभं आहे. फक्त खालचा मातीचा माठ तेवढा काळाने हिसकावून नेलाय. लपाछपी खेळताना परड्यात अशी लपायची. की तास तास सापडायची नाही. इतकी चपळ होती. पाठशिवणीच्या खेळातही तशीच. वर्गात तर मॉनिटर. सतत पुढे. तर मी मागे मागे.
पुढ गावाची नाळ तुटली. शाळा सुटली. अन तिची सोबतही सुटली. वय वाढत गेलं तशी ती दूर दूर होत गेली. वावटळीत उडत जाणाऱ्या पानासारखी. त्याला तरी कुठे दिशा असते. भरकटण्याची. पुढे कधी मधी वेस ओलांडून गावात शिरायचो. ती धुण्याची बादली घेवून नदीला जाताना दिसायची. बोलायची नाही. पण हसायची. मागे वळून बघायची. जत्रेत गावदेवाला विणकाम केलेल्या हातरुमालाने झाकलेले नैवद्याचं ताट घेऊन जाताना दिसायची. बायकांच्या घोळक्यात असायची. पण साडीत दिसायची. सुरुवातीला ओळखू यायचीच नाही. बोलण्याचा प्रयत्नही व्ह्यायचा. पण नुसतीच औपचारिकता. आतून साद अशी नाहीच. एखदा सुट्टीत गेल्यावर वाड्यासमोर डोकावलो. तर लग्नाचा रिकामा काढलेला मंडप दिसला. डोळेही पाणावले. दूर गेली होती. वेस ओलांडून. लांबच्या प्रवासाला...
ती ज्या वाड्याच्या ओसरीत दोन रेबनिंच्या वेन्या घालून खेळायची. बागडायची. त्या मोडकळीस आलेल्या वाड्यापुढच्या अंगणात आता एक उजाड कपाळावर गोंदण दिसणारी म्हातारी काठी हलवत बसलेली दिसते. दिवस रात्रीना झेलत. अबोल असते. वाड्यात गडीमाणूस असं कुणी नाहीच. त्या वाड्याचेही वासे फिरलेत आता. कोणी म्हणते ती लग्न होऊन वाड्यातून बाहेर पडली ती वेशीतून परत आत कधी आलीच नाही. तर शहरातून गावात परतलेला एखादा सूटबूट वाला ती कधीतरी शहरात दिसल्याच्याही खुणा सांगतो.
ती नात्याचं कोणतं 'वस्त्र' चढवून गेली माझ्या अंगावर माहित नाही. पण तिचा भकास वाडा पाहिला की आठवतं, "धरतीवर एखांद्या दहा बाय दहाच्या कोपऱ्यात कुठेतरी ती अस्तित्व ठेवून अजून जिवंत असेल का? तिच्या भग्न पडलेल्या वाड्यासारखीच. अजूनही सांजवेळी तिच्या पायातील पैंजणाचा आवाज होत असेल का? अनेक प्रश्न पडतात. पण उत्तर माहीत नाही. ती सध्या काय करतेय..."

No comments:

Post a Comment