Friday, January 20, 2017

तुझ्या शहरात

तुझ्या शहरात आलोय, वेड्यासारखा फिरतोय, हरवलेले काहीतरी शोधतोय, तू सोडून काय नाही आहे इथल्या तुझ्या शहरात... इथे कामाला सकाळी धरपडत जाणारी माणसं आहेत, राबणाऱ्या बायका आहेत, थकून सायंकाळी घराच्या ओढीने परतणारी माणसंही आहेत. गिरण्यांचे भोंगे आहेत, वाहनांचे कर्णकर्कश आवाज आहेत, लोकलचे हॉर्न आहेत, तसे धावत सुटलेल्या अँम्बुलन्सचे सायरनही आहेत. इथे जगणारी माणसं आहेत, जगून झालेली माणसं आहेत, किड्यामुंगीसारखी मरणारी माणसं आहेत, तशी नवीन जन्माला येणारी माणसंही आहेत. इथला दिवस भकास आहे, रात्री रंगीन आहेत, झगमगत्या आहेत, स्वप्नं दाखवणाऱ्या आहेत, तशा स्वप्नं मोडणाऱ्याही आहेत. इथल्या रस्त्यांवर डोळे दिपवणारा नवनवीन वस्तूंचा बाजार आहे, दुकानात मांडलेली सोन्या चांदीची झुंबरे आहेत, उघडा माणूस बाहेरून सजवायला बसलेली सुंदर सुंदर कपड्यांची दुकाने आहेत, तसाच नर माद्यांच्या विक्रीचा बाजारही इथेच आहे. इथे बाहेरच्या माणसांच्या सापळ्यांना पोटात कोंबून घेऊन खड खड धावत सापांसारख्या सुटलेल्या लोकल आहेत, आयुष्यातील जीवघेण्या समस्यांशी संघर्ष करीत चार नंबरची सीट मिळाल्यानंतर घामेघूम होऊन विसावणारी थकलेली शांत अबोल डोळ्यांची अकाली वठलेली माणसं आहेत, तशा वखवखलेल्या वासनांनी आग ओकणाऱ्या जीवघेण्या नजरानी गर्दीत वाकलेल्या एखांद्या स्त्रीचे अर्धवट दिसलेले स्तन टिपणारी वासनांध नजरही इथेच आहेत. इथे आकाशाच्या चुंबनासाठी आसुसलेल्या गगनचुंबी इमारती आहेत, खालच्या इंच इंच जमिनीवर वेड्या वाकड्या वेलीसारख्या अस्ताव्यस्त पसरलेल्या भकास झोपडपट्या आहेत, त्याच्या आत... बागडणारा शकील आहे, खेळणारी अफसाना आहे, यशोदापण आहे अन तिच्या मांडीवर खेळणारा कृष्णही आहे, पाईपलाईनवर बसून पलिकडे आंघोळ करणाऱ्या बाईवर लाईन मारणारा वाढलेल्या केसांचा जॉनीही इथेच आहे. इथे अस्ताव्यस्त पसरलेले निर्जीव कचऱ्याचे प्रचंड ढिग आहेत, काळ्या पाण्यांनी तुडुंब भरून समुद्राकडे निघालेली गटारे आहेत, मुंगी शिरायलाही जागा नाही अशी फाईव्ह स्टार गगनचुंबी हॉटेल्सही इथेच आहेत. इथे भीक मागायला निघालेली उघड्या देहाची काळीबंब पोरं आहेत, काळपटलेले निरागस जीव आहेत, पाटीवर दप्तर बांधून डोऱेमॅनची बैग घेऊन निघालेले सुंदर कापडल्यातले चिमुकले जीवही इथेच आहेत. इथल्या सिग्नलवर सुवासिक फुलांचे गजरे विकत पोटासाठी झगडणाऱ्या करपलेल्या देहाच्या महिला आहेत, खेळणी विकणारे छोटे छोटे जीव आहेत, आतल्या कार मध्ये बसून केसात गजरे माळणाऱ्या सुंदर देहाच्या बायकाही इथेच आहेत. इथल्या शहराच्या शेवटच्या टोकावरल्या कठड्यावर फेसाळ सागराकडे पहात जीवनाच्या आणाभाका घेत मिठीत विसावलेली तरुण जोडपी आहेत, प्रेमाच्या शपथा आहेत, वचने आहेत, स्वप्ने पाहणारी तरुण ह्रदर्ये आहेत, तशीच खाडीवरल्या पुलावरून उडी मारून तरंगणारी माणसांची प्रेतेही इथेच आहेत. इथे भात खाऊन जगणारी आई आहे, पिझ्झा खाणारी मम्मा आहे, दारू पिऊन तर्रर्र झालेला मळकट कपड्यातला हताश बाप आहे, तर डार्लिंग सोबत व्हिस्कीचा पेग मारून जळती सिगारेट झाडणारा सुटाबुटातला डॅड सुद्धा इथेच आहे. इथे सिक्स पॅक बॉडी बनवून हिरोसारखा उघडा फिरणारा हशरत आहे, देहावरच्या छातीचे उघडे प्रदर्शन मांडून हिंडणाऱ्या अप्सरा आहेत, नाकात नथ पायात पैंजण घालून एखांद्या उपनगरातल्या चाळीत नऊवारी साडीत वावरणारी मऱ्हाटमोळी लावण्यवती पण तुझ्याच या शहरात आहे.....

No comments:

Post a Comment