Friday, January 20, 2017

नवा बूट



तर दोन वर्षे मागं लागलो तेव्हा कुठं एका रात्री आठवडी बाजारातनं डुलत डुलत येणाऱ्या बापानं नवा कोरा बूटाचा जोड आणला. अन आयुष्यात पहिल्यांदाच पायाला बूट घालायला मिळाला म्हणून मग तो जेवताना घातला, झोपताना घातला, सकाळी पांदीला चिंपाट घेवून जाताना घातला, आख्या गावातल्या बोळा बोळातनं फिरून समद्या पोरांसनी बी दाखविला, शाळेत घातला, एवढंच न्हवे तर पुढं फळ्यावर मास्तर शिकवताना सुद्धा मिनिटा मिनिटाला खाली पायाकडं वाकुन् वाकुन आहे का बघितला. जवळ जवळ तो पुढे अठ्ठेचाळीस तास पायातून काढलाच नाही. तिसऱ्या दिवशी अखेर म्हातारीनं तोंडभरून शिव्या घातल्या. आणि अंथरुणात झोपताना घातलेला बूटाचा जोड़ म्या येड्यानं म्हातारीच ऐकून दाराच्या बाहेर ठेवला. अन वस्तीवरच्या मालक नसलेल्या मोकाट चंपी कुत्रीनं रात्रीचा कधीतरी त्यातला एकच बूट पळवला...
...
पुढे मग कित्येक दिवस मी चंपी कुत्रीच्या मागावर राहिलो पण चंपी काय सापडली नाही. अन कित्येक वर्षे पायाला नवा बूट पण मिळाला नाही...

No comments:

Post a Comment