Friday, January 20, 2017

पुन्हा तुझ्या शहरात...

पुन्हा तुझ्या शहरात आलोय. खुप वर्षानंतर... तसा मी पण इथलाच होतो. कधीतरी. इथे येताना मी पण बरोबर घेवून आलो होतो सोबत स्वप्नाना. पण आतल्या लाटांनी मला बाहेर फेकलं. तुला आत घेतलं. बाहेर सुकत राहीलो मी. कित्येक हेलकावे खात वाहत राहिली असशील तू आत. तुझ्या शहरा सोबत पळणं नाही जमलं मला. मध्यरात्र झालीय..तुझ्या शहराच्या मध्यभागी असलेल्या एका चाळीस मजल्यांच्या टॉवरच्या टेरेस वरुन मी पाहतोय. तुझ्या फुगून गेलेल्या, अस्ताव्यस्त पसरलेल्या महाकाय रंगीन शहराकडं. दूर कोपऱ्यात तुझ्या शहरावर अंधाराची चादर धरुन उभा असेल काळ पुरुष तिकडे. त्याच पांघरलेल्या चादरेच्या आतमधुन चालले असतील कित्येक काळे धंदे तुझ्या शहरात. मला फक्त दिसताहेत दूर दूर पर्यंत पसलेल्या दिव्यांच्या रंगबेरंगी माळा. कुठून तरी खड़ खड़ करत येणारे लोकलचे आवाज. लांब पर्यंत पसरत गेलेली सिमेंटची जीवघेणी बेटं. आकाशाचे चुंबन घ्यायला आसुसलेल्या गगनचुंबी इमारती. खाली फुटपाथवर मांडलेले कित्येक उघड्यावरचे संसार. वरती लूडबुड करायला उगवलेली एक चंद्राची कोर. फक्त रात्रीलाच दिवस समजून जन्म घेतलेले कित्येक नर मादी असलेले लोक. लाखो प्रणयक्रीड़ा सुरु असतील या क्षणी तुझ्या निपचिप पडलेल्या शहरातील बंद दरवाजांच्या आत. तर हजारो तरुण माद्या विकल्या जात असतील संपूर्ण शरीरासहित तुझ्याच या शहरात... पसरलेल्या या गगनचुंबी इमारत्यामधुन... एवढ्या मोठ्या शहरात दहा बाय दहाच्या एखांद्या कोपऱ्यातील घरात तू निपचिप पडली असशील. चिलीपिली सोबत घेवून. कदाचित तुझ्या नराला झेलत..."खरच तू विटली असशील का आता संसाराला? माहीत नाही..." "गर्दीनी भरून गेलेल्या या तुझ्या शहरात ह्रदयाने जिवंत राहिली असशील का तू अजुन? माहीत नाही..." पहाटे 5.40 च्या लोकलमागं धावताना अजूनही तेच सळसळतं रक्त उरलं असेल का तुझ्या देहाच्या धमन्यामधून? का गेली असशील आटून, इथे स्वप्न घेवून आलेल्या इतर नर माद्या सारखीच? माहीत नाही..." पण कधीकाळी याच शहरात तू नात्याचं असं कोणतं 'वस्त्र' चढवुन गेलीस माझ्या अंगावर? माहित नाही..." फक्त ते उतरवू शकलो नाही अजुन मी. एवढेच मला माहीत आहे...
...तुला कवेत घेतलेल्या या शहरात परत तुलाच शोधणं आता या जन्मी तरी शक्य नाही...
म्हणून अखेरचा हा दंडवत मला बाहेर फेकुन तुला पोटात घेतलेल्या तुझ्या या शहराला...

No comments:

Post a Comment