Friday, January 20, 2017

कस्तुरीचा सुगंध.........


कस्तुरीचा  सुगंध शोधणा-या
त्या हरिणीसारखी माझी अवस्था झालीय !
कस्तुरी आपल्याच जवळ आहे,
हे तिला तरी कुठे माहित असते,
मी जीवनाच्या सरहद्दीवर
डोळे मिटून पडले आहे,
ह्दयाचा दगड बनविते आहे,
पण................
माझं कुणीतरी आहे
माझ्या बरोबर " तू " आहेस
माझ्या दुखाची तुला जाणीव आहे
हा एवढा विश्वास ठेवला ना ?
तरी बरीच दुखे कमी होतात बघ.
कधी कधी वाटतं........... 
तु माझ्यावरती सावली धरून उभा आहेस !
स्वत: उन्हात तळपत !
संभाळून राहा ?
आभ्यास कर ?
वाचन कर ?
.....घाई करू नकोस ?
एक ना दोन हजार सूचना देतोस ?
त्या आनंदात मी आभाळभर पसरते,
पाना फुलातून पुन्हा फुलते,
ढग होऊन पुन्हा बरसते.
किती आवडतात म्हणून सांगू तुझ्या कविता ?
पण,
त्या समजून घ्यायच्या तर,
धरती आकाशाशी आपलं नातं असावं लागतं !!
तु आता तनामनात,
आचार विचारात,
घट्ट रुजला आहेस !
खरच !
तु माझा होशील ?
बघ ! तीनच शब्द
पण,
सुंदरतेची साक्ष देणारे
किती ताकद असते नाही शब्दात ?
" हो विसरलेच ...........
परवा तू स्वप्नात आलास ..........
म्हणालास....... 
चल माझ्याबरोबर.........
मी तुझा आहे कि नाही दाखवितो !!
दूर आकाशात घेवून गेलास,
अगदी चांदण्याच्या जवळ........
आणि पटकन माझं एक चुंबन............"
खरी होतात का रे ! स्वप्ने ?
उतरतात का रे ! सत्यात ?
की अखेर ती स्वप्नेच ठरतात ?
कधी कधी असं सुद्धा वाटतं रे !
तू जीवनातून कायमचा निघून गेलास तर.......
पण,
अशी कल्पना सुद्धा करवत नाही रे !!
खरं सांगू ,
अशीच बालपणापासून मी वाढत आले...........
नातेबंध काय असू शकतात
मला माहीतच नव्हते रे !
अशीच एक बालपणीची गम्मत आठवतेय...


" अंगणात खेळायची मी

पावसात भिजायची मी,

मातीत खेळले की,

आई तेव्हा रागवायची,

संपले बालपण माझे.....

गेले दूर तेव्हाचे सवंगडी..........."


अशीच मी मोठी झाले !!!

आता ,

तुझ्या येण्यानं खरं अर्थ समजला.

आठवतय,

" अलीकडे खूप हुशार झालीस,

ज्ञान वाढतंय ! " तू म्हणालास.

" का नाही ? तूच तर देतोस,

भरभरून.......
पण,
अजून खूप कळले नाही रे ! " मी म्हणाले.
खरच !
तुला कसे सुचतात रे ! असले शब्द ?
मनाला वेड लावणारे !
काळजाचा छेद घेणारे !
धुंद बाग फुलविणारे !
आत्ता,
तुझ्या शब्दांनीच मला,
वेड लागण्याची वेळ आलीय !
वेडी होईन रे मी ?
तुझे शब्द माझ्यापासून दूर गेल्यावर.........
" हो ,
तुला कळतंय का बघ ?
बहुतेक कळणार नाहीच ?
पुरुष ना तू ?
काही अनुभव फक्त स्त्रियांचे असतात ?
.......जवळ येणं किती सोपं असतं....
पण दूर जाणं..........
त्यासारखं दुसरं दु:ख नाही जगात,
म्हणून ,
त्या दिवशी माझ्या आश्रुना बांध........"
मनुष्य प्रेम लाथाडील,
पण, विसरू शकेल का ?
माणूस आशेवर जगतो नाही का ?
मग,
ती कितीही निराधार असो !
माणूस स्वप्नावर जगतो
मग,
ती कितीही असंभवनीय असो !
सुगंध नसूनही अबोली,
सदा हसतमुखच राहते ना ?
धुके कितीही सुंदर असले तरी
ते विरून जातेच ना ?
खरं सांगू ,
वेलीला काही,
फुललेलं फुल लागत नाही !
पहिल्यांदा कळी येते..........
पानाआड लपणारी.......
कुणाला न दिसणारी........
लाजेनं मनातल्या मनात चूर होणारी......!!
म्हणून,
" प्रेम हे यौवनाच्या वेलीवरच फुल आहे "
समुद्र शिंपल्यात घालून,
कुणाला दाखविता येईल का ?
फुलांचे चित्र काढून,
त्याचा सुगंध कुणाला देता येईल का ?
माझी प्रीती अशीच आहे रे !
पण.......
तुझ्याशिवाय मी अपुरी आहे,
वेलींची पाने सुंदर असली तरी,
फुलांशिवाय शोभा नाही तिला ?
खरं सांगू ,
जीवनात दिरंगाई नको,
घाईच बरी ?
प्रेमाच्या राज्यात घाईच बरी !!
प्रेमाची फुले,
पटकन टिपावी,
वेचावी,
पुन्हा मिळतील न मिळतील ?
" वसंत ऋतू " का नेहमी राहतो ?
तू जवळ आहेस तरी मी फारशी बोलत नाही,
पण,
" चंद्राचा प्रकाश सूर्यावर अवलंबून .....
समुद्राचं उंचबाळन चंद्रावर अवलंबून .....
तसं,
माझं सारं आयुष्य तुझ्यावर........."
कधी कधी वाटतं,
" तू " एक आहेस का दोन ?
 दिवसा जो " तू " समोर असतोस,
त्याच्यात विशेष काही वाटत नाही रे !
अगदी साधा असतोस !
बोलतोस साधाच !
पण...........
शब्दातून जेव्हा तु भेठतोस ना ?
रात्रीच्या एकांतात....!
तेव्हा,
तुझे शब्दच जवळचे वाटतात,
तुझ्यापेक्षाही......!!!
छे रे ! किती वेडी आहे बघ मी !
शेवटी,
तुझं अस्तित्व एकच ना ?
पण, एक मात्र नक्की सांगेन .....
".......केवळ उपभोग म्हणजे जीवन ?
छे !  जीवनात समर्पण हवे,
कुणासाठी तरी त्याग हवा,
घेण्यापेक्षाही,
देण्याचा आनंद अधिक असावा,
काय घ्यायचे आपण ?
काय घेवून आलोय आपण ?
म्हणून,
देण्यात एक पावित्र आहे,
देणे म्हणजे कस्तुरीचा सुगंध आहे......."
आता खरेच सांगते,
निशब्ध होवून आपले विचार
समोरच्याला कळतील का ?
सूर्यात आग आहे,
चंद्राला डाग आहे,
समुद्राचं पाणी खार आहे,
पण................
नवे डोळे घेवून,
पुढच्या आयुष्याकडे,
पाहता येत नाही अजून ?
तुझी मागे उरणारी सोबत,
म्हणजे " तु "  होऊ शकत नाहीस ?
आपलं नातं फक्त जुळलंय.........!
वाढेल का रे ! कधी.............!
आता,
त्याला फुले यावीत !
असच काहीसं वाटतंय.......
माझ्या आठवणीच्या स्मरणकेंद्रातून,
तु कधीच जाणार नाहीस...
मी जावूसुद्धा देणार नाही.......?
शेवटी.........,
तुझ्यासाठी मनाची दारे,
आता उघडी केलीत,
काही चोरवाटासुद्धा ठेवल्याहेत,
फक्त तुलाच पोहचण्यासाठी......!
तु यावस म्हणून,
माझे श्वास थांबलेत.........!
तुझ्याच वाटेकडे डोळे लागलेत........!
निघशील ना रे ! प्रवासाला ......
न संपणा-या ...........!!!
अजूनही तु जवळ येशील ?
एवढीच आशा जिवंत आहे............!!! "



-------------*------------*---------------

No comments:

Post a Comment