Friday, January 20, 2017

खिंडारातला धोंडिबा

जवळ जवळ तीस वर्षानंतर अंधार पडल्यावर शेवटच्या एस.टीनं तो गावाबाहेरच्या स्टैंडवर उतरला. हातातल्या एका कापडी पिशवीसहीत काठी टेकत टेकत नदीचा पुल ओलांडून गावात शिरला. गुरवाच्या वाडयाच्या मागच्या बाजूला असलेल्या पडक्या खिंडारात कधीकाळी मुजलेल्या त्याच्या पडक्या घराकडं बघत अंधारात तिथच बसून राहिला. मागच्या पाटलाच्या घरातली सुमी खरकटं पाणी टाकायला खिंडाराकडं गेली तर अंधारात बसलेला म्हातारा माणूस बघुन "भुत भुत" करुन मोठ्याने ओरडली. तशी अर्ध्या गावातली माणसं खिंडाराकडं पळाली. गावातल्या काही वयस्क लोकांनी त्याला नुसत्या अंदाजावर बरोबर ओळखला. बराच वेळ बाया माणसांची सगळीकडे कुजबुज चालली. मग पांडू तात्या बॅटरी घेवून खिंडारावर चढ़ला अन पाठीमागून त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, "धोंडीबा ऊठ बाबा कवासा आलास? चल माझ्या घराकडं, हितं ईचवा काट्याचा कशाला बसलायिस!!! कोण आता राहिलय बाबा हितं तूझं" तसा धोंडीबा जवळ पडलेल्या काठीचा आधार घेत लटलटत उठला अन पांडु तात्याच्या गळ्यात मिठी मारून हुंदके देत ओरडला, "तात्या म्हातारी कवा गेली रं माझी!!! मला कळवायचं तरी हूतं रं, निदान एखांदं टपाल तरी धाडायचस, काय करु आता जगून?" तात्यालापण अंधारात गहीवरुन आलं. एका रात्रीत ही बातमी साऱ्या गावासहीत आजुबाजूच्या वस्त्यावर वाऱ्यासारखी पसरली...
...खुप वर्षापुर्वी गावा गावात प्रचंड दुष्काळ पडलेला. गावंच्या गावं ओस पडायला लागलेली. हाताला काम मिळत न्हवतं. धोंडीबाच्या घरात तर रोजचीच उपासमार चाललेली. गरीबीला कंटाळून धोंडीबानं गावातल्याच एका सावकाराकडून ज्वारीचं एक पोतं उसनवार घेतलेलं. त्यावर चढवलेल्या व्याजापोठी धोंडीबाच्या बायकोच्या 'निऱ्या' सावकारांनं ओढयात एकटीला गाठून वढल्या. सावकाराखाली कलंडलेली बायको पाहिल्यावर धोंडीबानं तिथंच पडलेली मोठी दगडाची चिप उचलून सावकाराच्या डोक्यात घालून मूडदा पाडलेला..."
...त्या प्रकरणात साक्षीदार राहिलेल्या काही वयस्क लोकांकडून गावात घडलेली ही जुनी घटना समजली अन धोंडीबाच्या जीवघेण्या दुखांनं सारं गाव पुन्हा गलबलून गेलं...

No comments:

Post a Comment