Friday, January 20, 2017

चांदणे सांडताना भेटशील पुन्हा ?


चार भिंतींच्या आत खुरडत - धरपडत  जगण्यासाठीच
माझ्या आयुष्याचा उपयोग ?
......तेव्हा मला तुझीच आठवण येते
तू सांगून गेलास...........
" माझ्या अस्तित्वाच्या खुणा बाहेर शोधूच नकोस "
तुझ्या आठवणीनीही मला हेच सांगितलय !
पाझरत पुन्हा पुन्हा........ !!
तू मात्र निघून गेलास
अर्ध्यावरती डाव मोडून..........
तु होतास तेव्हा .....
ह्दयात रोज घंटा किणकिनायच्या
त्याचे नादमधुर सूर,
अंगभर रोमांच उठवून जायचे
....दिशा दिशात निनादत राहायचे !
आठवतंय,
प्रीतीच्या समुद्र किना-यावर आपण मनसोक्त खेळलो,
मनातून अनेक किल्ले बांधले
पण,
भरतीच्या एकाच लाटेत सारेच किल्ले...........!!!
खरं सांगू,
घरात कोणी नसतं तेव्हा घर खायला उठतं
मग उगीचच मोकळ्या भिंतीशी,
दारे खिडक्यांशी बोलते
तुझ्या तसबिरीसमोर उभी राहते
मग स्वत:शीच बोलू लागते
ही प्रतिष्ठा, संपत्ती कुणासाठी ?
कशासाठी ?
समाधान यातून मला नाही मिळत.......
मला फक्त तुझं प्रेम हवं होतं
याक्षिनीच्या पंखावर बसून,
गंधर्व नगरीतील स्वर्गसुख मला
तुझ्या संगतीनं अनुभवायचं होतं !
बेधुंद व्हायचं होतं !!
पण...........
आता,
" आठवणीच्या झाडावर अश्रूंच्या वेलींनी
पीळ टाकण्यास सुरवात केलीय
विळखे टाकून घट्ट बांधतयेत रे ! झाडाला."
किना-यावर पानलोटाने कचरा लोटावा ना 
तशी दिवस ढकलतेय मी !
तुझ्या आठवणीनी आता
या डोळ्यांची वाळवंटे बनलीत.......
आयुष्य ?
किती बरे जगलो आपण ?
" जीवन खूप सुंदर आहे " तू म्हणायचास !
छे ! जीवन एक जुगार आहे,
नियती आणि मानवात चाललेला !!
आता माणसांच्या गर्दीत राहूनही
एकटीच वावरतेय मी !
स्वतःची गाणी स्वता:च गुणगुणतेय !
या ऐन वसंतात थिजून गेलेय मी !
तुझ्या आठवणीनी घुसमटत जगतेय मी !
" मरणाचा अधिकार मानवाकडे नसतो "
तू म्हण्याचास म्हणून......
पण जगायचे तरी कसे ?
जगणे म्हणजे केवळ जिवंत राहणं ?
ते ही कदाचित जमले असते
पण.....
तू असताना !!!
तुझ्या आठवणींच्या गाळात,
माझ्या जीवनाच्या ध्येय, आकांक्षा
खोल रुतलेत रे !
या सा-यातून फक्त  
वेदनांचा महासागर तयार होतोय ?
जायचंच होतं तर कशाला केलीस
आजर्वे फुलांची ?
माझ्या जीवनाचे सारेच संकेत तू मोडून गेलास  !
कधी कधी तुझ्याकडे यायला निघते
पण......
पुढे दुःखाचे डोंगर दिसतात,
काळजीच्या गुहा दिसू लागतात ?
......दिवसा सूर्याच्या प्रकाशात
सगळी कामे आटपते
पण, कातरवेळी सूर्य क्षितिजावर गेला की,
या सिमेंटच्या जंगलात अंधाराचं सम्राज पसरत !
बाजूंच्या घरातील विजेचे दिवे पेटू लागतात,
ग्रहिणीची गडबड - धांदल उसळते,
घरधन्याच्या आणि मुलांच्या संगतीत,
दुपारी विझलेले संसार पुन्हा लखलखू लागतात,
चित्रपटातील छेड- छाड करणारी गीते
हवेतून धावू लागतात
कानांना वेदना होतात खूप !
मग मात्र,
डोळ्यांच्या कडा अलगद भिजू लागतात
घशात दिवसभर दबलेले हुंदके
ओठातून नकळत बाहेर................
........आता जणू तुझ्या अस्तित्वाची सवयच झालीय
सारे जग झोपल्यानंतर रात्री
घरातून रस्त्यावर येते ,
तेही झोपलेले असतात,
झाडे स्तब्ध, अबोल उभी असतात !
पसरलेल्या ओल्या अंधारातून
आकाशाकडे पाहते,
पण..............
तू कुठेच दिसत नाहीस ?
चांदण्या सुद्धा विझू लागतात
मग मात्र..............,
तुझ्या संगतीत रंगलेल्या कित्तेक
चांदण्या रात्री आठवतात.................!
चांदण्या विझल्यानंतर उगवलेली " निळी पहाट " 
आता कधीच उगवत नाही रे !
"...........केव्हातरी पहाटेच्या थंड हवेने जाग येते,
अंगावरची शाल भरकन दूर लोटते,
खिडकीतून बाहेर डोकावते......
वाटतं तूच आलास.........
आकाशातली " नक्षत्रपुष्पं " घेवून.........
रात्रभर विस्कटलेल्या केसांत
स्वता:च्या हाताने माळण्याकरिता ......."
पण ते भास असतात,
आजपर्यंत वाटत आलेले........
येथून पुढेही वाटणारे .........
तुझ्या जाण्यानच आता मी
" रुक्ष " वृक्ष होत चाललेय !
येथून येवू देत नाहीत हे लोक तुझ्याकडे !
धुंद प्रीतीची बाग आता कोमेजून चालली रे !
काचेच्या घरात असूनही आताशा,
अंधारी खोली तेवढी माझी राहिलीय .....
फक्त, एकदा येवून जा ,
निदान..................
तुझ्या आठवणी तरी घेवून जा ........
ते ही जमणार नसेल तर,
" माझ्या मेंदूतून सा-या शरीरभर सळसळणारी
तुझ्या आठवणीची नस,
कायमची कापून तरी टाक....................
म्हणजे रिकामी तरी होईल मी................."
शेवटी..............
.............मी विसकटलेय !
पण कोसळणार मुळीच नाही,
संस्कारक्षम माणसं कधीच कोसळत नसतात,
प्रसंगी ती कोलमडतात,
पण, उभी राहतात
नियतीच्या लाटेवर वाहत.....................!!!
-------------*------------*---------------

No comments:

Post a Comment