Friday, January 20, 2017

नकुसाबाई

होय!
मी नकुसाबाई.
माझा बाप नक्की कोण ते कधी आईला पण कळले नाही. पण तिची कुस उजावी म्हणून कधीतरी आईने यल्लमाबाईच्या घरातल्या मरीआईला गंडा डोरा गुंडाळून पोर देवाला सोडीन म्हणून नवस केलेला. मग कुणाकडून तरी भोगली जाताना कोणाचा तरी पोटात आलेला विर्याचा थेंब आईने नऊ महिने पोटात वाढविला अन मी गावकुसाबाहेरच्या वस्तीवर दिवस उगवायच्या वेळी जन्माला आले. बरेच दिवस तिच्या कळा सोसत आई मला जगवत गेली. अन पेशीनी बनलेलं माझं काळं शरीर वाढत राहिलं. त्यातच एके दिवशी आई तापानं फनफनली. चार दिवस निपचिप पडली. मग यल्लमाबाई घरी येवून "मरीआईचा कोप झालाय, पोरगी न्हाती धुती व्हायच्या आत देवाला सोडली पाहिजेल" असं माझ्या आईला म्हणाली.
मग साळत जायच्या वयात गळ्यात पांढऱ्या मण्याची माळ, पायात पत्र्याच्या वेढन्या अन कपाळावर मळवट भरून मला नव पातळ नेसवलं. माझं देवासंग लगीन लागलं. मग रोजच मी गावभर जोगवा मागत हिंडू फिरु लागली. माझ्या वयाच्या पोरी लाल रेबिनिच्या दोन वेण्या घालून शाळेत जायच्या. मी एड्यागत त्यांच्याकडं बघत बसायची. मला पण साळत लई जावू वाटायचं. पण जोगतीनीच्या नशिबात असलं काही नसतय असं यल्लमाबाई मला सांगायची. असच दिस गेलं. परकर पोलक्यात वाढणारं माझं शरीर फुगत गेलं. मला पदर आला. मग मला गावातल्या विंचू इंगळ्या ढसायला लागल्या. आता मला देवाची गाणी पाठ झाली होती. इतर जोगतीनी सोबत हातात चवंडक घेवून मी गावोगावी जागरण गोंधळाला रातची हिंडू फिरू लागले. जोगतीनीचं कधी लग्न होवू शकत नाही हे मला अगोदरच कळालं होत. त्यातच गावातल्या एका वासनांध सावकाराची माझ्या चोळीवर नजार पडली अन त्याच्यासोबत माझा पहिला झुलवा लागला. अन पुढं माझं शरीर फक्त अनेकजनांची रखेल म्हणून खाली पड़त गेलं...
...थकलेली नकुसाबाई जीर्ण झालेल्या काळ्या देहावरच्या लुकलुकत्या डोळ्यातून लुगडयावर पाणी सांडत, "बाईचा जन्म लई वंगाळ अस्तुया" म्हणून सांगत होती. अन मी तिचे डोळे पुसन्यासाठी खिशातील रुमाल काढून देन्याशिवाय दुसरे काहीच करु शकत न्हवतो...

No comments:

Post a Comment