Sunday, December 18, 2016

तालीम



गावात तालीम होती. सोबतीला लाल माती होती. भल्या पहाटे गोठ्यातल्या गाई म्हशीच्या फेस आलेल्या दुधाच्या चरव्या रिकाम्या करणारी तरुण पोरं होती. गावातलं दूध गावच्या पोराबाळांसाठी राखून ठेवलं जायचं. अशी गावाची रीत होती. झुंजूमुंजू झालं की तालमीला जाग यायची. दिवळीतल्या कंदिलाची वात चढायची. दंड थोपटले जायचे. जोर बैठका निघायच्या. हौद्यातली माती पेटून उठायची. गावचे तारुण्य लाल मातीत घुसळून निघायचं. मातीत शरीरे झाकली जायची. यात्रा जत्रा व्हायच्या. कुस्त्यांचे आखाड़े फुलायचे. वस्ताद आखाडयातून फिरायचे. कुस्ती रंगात यायची. लाऊडस्पीकर घुमू लागायचा. "अमक्या वस्तादाचा पट्ठा हाय बघ!" कुस्ती जिंकल्यावर आरोळी उठायची...
...काळ कात टाकतो. कुस्ती शरण येते. तालीम आजही असते. तिला मोडका दरवाजाही असतो. दिवसभर आता तो गावाकडे विषन्न नजरेने पहात राहतो. तालमीच्या हौद्यात घटलेली मातीही असते. मातीत आता उंदीर कुस्त्या खेळतात. पावसाळयात तालीम फुटक्या कौलांतून अश्रू ढाळत राहते. तालीम आज सूनी सूनी असते. तर गावातले तारुण्य बार मध्ये कलंडत राहते. तालमीत बाटल्यांचा खच दिसतो. दिवळीतल्या हनुमानचा फोटो हौदयातल्या मातीकडे हताश पणे पहात राहतो. मातीतल्या कोपऱ्यात तांबडी कुत्री तिच्या सात पिलांना पैलवान करण्याची स्वप्ने पहात दूध पाजत पडून राहते. तर सकाळी एखादा जीर्ण देहाचा म्हातारा झालेला वस्ताद तालमीचे भग्न अवशेष शोधत बाटल्यांच्या काचा थरथरत्या हाताने गोळा करत राहतो.
 
 
फोटो सौजन्य:Tehelka Magazine

No comments:

Post a Comment