Monday, December 19, 2016

आनंद यादव

तुम्ही जर "झोंबी, नांगरणी, घरभिंती आणि काचवेल" ही आत्मचरित्रात्मक पुस्तके वाचली असतील तर आनंद यादव यांना बालपणापासून किती कष्ट, दुःख, हालपेष्टा सहन कराव्या लागल्या याची कल्पना येईल. आनंद यादव हे नाव मिळवण्यासाठी त्यांना कितीतरी दिव्यातून जावं लागलं. तरीही त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन कोल्हापूर आणि नंतर पुणे येथून आपले शिक्षण पूर्ण केले. आकाशवाणीवरही ते काही काळ होते. पुणे विद्यापीठात ते मराठी विभाग प्रमुख असताना निवृत्त झाले. लिखानातूनही त्यांनी मागच्या दोन तीन वर्षापासून माघार घेतली होती. साहित्य अकादमी सारखा पुरस्कार त्यांच्या "झोंबीस" मिळाला, त्यांच्या आयुष्यातला शिक्षणासाठी त्यांनी केलेला संघर्ष म्हणजे ही आत्मचरित्रात्मक कादंबरी.
त्यांनी "खळाळ, घरजावई, माळावरची मैना" असे कथासंग्रह लिहिले तर "गोतावळा,नटरंग" यासारख्या प्रसिद्ध कादंबऱ्याही लिहिल्या. त्यांच्या नटरंग वर निघालेला चित्रपटही खुप गाजला.
दरिद्री, अज्ञानी, ग्रामीण कुटुंबाचे, भीषण दारिद्र्याचे वास्तव दर्शन त्यांच्या साहित्यातून दिसून येते. आपला गाव, गावातील रितीरिवाज, निसर्ग, तिथल्या माणसांचे स्वभाव, तर्हा, गावातले उरूस, जत्रा, गांधीवधानंतर झालेली स्थिती. अशा अनेक गोष्टींचे वास्तव चित्रण त्यांनी आपल्या पुस्तकातून उभे केले आहे.
व्यक्तिचित्रे, काव्यसंग्रह, ललित, वैचारिक लेख, समीक्षा ग्रंथ अशी सुमारे ४०हून अधिक पुस्तके त्यांनी लिहिली. संत तुकाराम हे त्यांचे पुस्तक वादग्रस्त ठरले पुढे येथुनच त्यांची लेखनी थांबली.
आमचे भाग्य की आम्हाला या लेखकाचा सहवास लाभला त्यांच्यापासून काही अंतरावरच राहत असल्यामुळे खुप वेळा ते सकाळी फिरायला जाताना दिसायचे. मैदानात क्रिकेट खेळणाऱ्या मुलांकडे कोपर्यात उभे राहून एकटक कसलेतरी निरीक्षण करतानाही दिसायचे. एक दोन वेळ त्यांच्याशी चहा पिणे सुद्धा घडून आले. अपुलकिने विचारपुस करायचे. ना गर्व होता ना साहित्यिक असल्याचा अभिमान. अत्यंत साधी राहणी. चेहऱ्यावर सतत हास्य. असे हे कागल मधून पूण्यनगरीत स्थायिक झालेले, जन्मजात ग्रामीण वारसा मिळालेले व्यक्तीमत्व होते. त्यांच्या निधनाची बातमी येताच धावत त्यांच्या "भूमी" बंगल्यावर जावून शेवटचं दर्शनही घेवून आलो.
शेवटी,
ज्या साहित्यिकामुळेच आम्ही लिहायला, वाचायला आणि साहित्य जगायलाही शिकलो. तो "झोंबी"कार आपल्यातून 30 नोव्हेंबरचा वाढदिवस साजरा करण्यासाठी काही तासच शिल्लक असताना काळाच्या पडदयाआड कायमचा निघून गेला...

No comments:

Post a Comment