Tuesday, December 20, 2016

मेपलदादाची घरे

अंधार पडायला लागला तश्या पुण्याच्या वेशीतनं मेपलदादाच्या बैलगाड्या आत शिरल्या. गाडीतून कोणतरी मोठ्यानं ओरडत होता,
"खुशखबर खुशखबर खुशखबर
घ्याल तर हसाल न घ्याल तर फसाल भविष्यात शेजाऱ्याला विचारत बसाल. कुठं पण घ्या वर हड़पसरच्या माळावर घ्या नाहीतर खाली कर्वे नगरच्या पांदीत घ्या. हे पण नाहीच जमलं तर कात्रजच्या डोंगरात घ्या. पण घरं घ्या घरं. स्वस्तात घरं". तशी पुण्याच्या पेठा पेठातली माणसं खाली मुठा नदीच्या दिशेने पळत सूटली. तुडूंब भरलेल्या मुठा नदीच्या काठावर मेपलदादान बैलगाड्या सोडल्या. नदीत बैलास्नी पाणी पाजलं. आणि मेका ठोकुन् कासऱ्यानी गाठी आवळून बैलं गवतात बांधली. लकड़ी पुलाच्या खाली वडाच्या झाडाला मोठी बत्ती बांधली हुती. तिच्या उजेडात समदी माणसं मांड्या घालून माना वर करुण पुढं घोंगड्यावर बसलेल्या गोऱ्यापान तरण्याबांड मेपल दादाकडं बघत हुती. शेजारी पुण्याचे पाटील बसले होते. पाटलानं हात वर करताच मघापासून चाललेली सगळी कुजबूज थांबली. तसा मेपलदादा उठून बोलायला लागला," लोक होे, तुम्ही आता मातीच्या घरात आणि मोडकळीस आलेल्या जुन्या वाड्यात राहून राहून कंटाळला आहात हे आम्हाला माहीत आहे. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी एक चांगली योजना घेवून आलो आहोत. फक्त 50 हजार रुपयात आम्ही तुम्हाला पुणे गावाच्या चारी बाजुनी सिमेंटची घरे बांधून देणार आहोत. तर उदया संध्याकाळ पर्यंत जे लोक रोख 5 हजार आणि सोबत अर्ज जमा करतील त्यांना दिवाळी पर्यंत नक्की घरे बांधून मिळतील हे आमचे वचन आहे. हवे तर पाटलांना विचारा", तसं पाटलानं परत एखदा तोंडातील पान चघळत समोरच्या गर्दिकडं बघुन हात वर केला तश्या लोकांनी आनंदान माना हलवल्या...
...दुसऱ्या दिवशी सकाळी शनिवार वाडयासमोर मोठा आठवडी बाजार भरला होता. पुण्यात नुस्ताच सुगिचा हंगाम संपला होता. अर्ध्या पुणेकरानी घरातील सर्व किडूक मिडूक बाजारात विकून अंधार पडायच्या आत नदीत पालं ठोकुन बसलेल्या मेपलदादाकडं पैसे नेवून जमा केलं. मेपल दादाच्या पत्र्याच्या पेटया पैशांनी खच्चून भरल्या होत्या. आता चांगलाच अंधार पडू लागला होता. कामगारांनी नदीत बांधलेली बैलं सोडून गाड्या जुंपल्या. पैशांनी भरलेल्या पेठया मजुरानी गाडीच्या बावकांडाला आवळून घट्ट बांधल्या. मेपलदादान वाकून सगळ्यासनी हात जोडून रामराम केला. आणि गाड्या अंधारातून खड़ खड़ करत धुरळा उडवित मुंबईच्या दिशेने सुसाट सुटल्या. अन पुढच्या दिवाळीत स्वस्तात घर बांधून मिळणार म्हणून माणसं आनंदान आपापल्या घराकडं वळली.....
....दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गाड्या मुंबईत पोहचल्या. गेट वे ऑफ इंडीया जवळ रात्रीच्या शांत काळोखात गाड्यां खाड़ खाड आवाज करीत थांबल्या. तसा "डॉन का इंतजार तो ग्यारा मुलकोंकी पुलिस कर रही है, लेकिन डॉन को पकडना मुश्किलही नही नामुमकिन है" अशी ख्याती असलेला आणि मेपल दादाला पैसे कमविण्याची ही सगळी आयडीया देणारा मल्यांचा विजयदादा, कोळ्यांच्या वेशात लपून बसलेल्या बोटीतुन हसत हसत बाहेर आला. पैशांनी खचा खच भरलेल्या पत्र्याच्या पेटया बोटीत चढवल्या. आणि पुण्याच्या दिशेला तोंड करुण हाताच्या मुठी गुढघ्या पर्यंत वाकवून वर उचलत मोठ्यांन ओरडला," पहिलं बी पैसं घ्या काढून, अन आता ही बी पैसं घ्या काढून."
आणि समुद्र कापीत बोट लंडनच्या दिशेने अंधारातून धावत सुठली…….


No comments:

Post a Comment