Tuesday, December 20, 2016

गावाकडची दिवाळी

 लहानपणी दिवाळीच्या अगोदर खेड्यापाड्यात सुगीची काम सुरु असायची. अशातच थंडीची चाहूल लागली की घरापुढच्या अंगणात पहाटेपासूनच शेकोट्या पेटायच्या. माणसं अंगावर शाल चादरी पांघरून हात पुढं करत जाळावर ऊब घेत शेकायची. बच्चे मंडळीवर शेकोटी जळत राहण्यासाठी पाला, पाचट आणायची जाबाबदारी असायची. मग शेकताना शेकोटीवर साऱ्या गावाच्या चर्चा चालायच्या. कुणाला एवढं जुंधळं झालं. तमक्याच्या भुईमुगाला किती शेंगाचं घस लागलं इथपासुन ते अमक्याची पोरगी पावडर लावून सारखी पारासमोरुन फिरतेय इथपर्यंत त्या चर्चाना उधान यायचं. साऱ्या गावावर पहाटेपासूनच धुक्याची झालर पांघरलेली असायची...


अशातच बोचऱ्या थंडीसोबत खेड्याना दिवाळीची चाहूल लागायची. मग आनंदाला उधान यायचं. गुरांच्या गोठ्याच्या बाहेर पोरी शेणाने पाची पांडव काढायच्या. ते तयार करताना बघायला मज़्ज़ा यायची. गावातल्या रेशन दुकानासमोर माणसांच्या रांगा लागायच्या. घराघरातल्या चुलीवर कढई चढ़ली की बायका एकमेकींच्या घराकडे "शेवगा दे, चाळा दे, आमच्या करंज्या लाटायला ये" म्हणत धावपळ करायच्या. लाटलेली करंजी फिरकिने कापयचं काम बच्चे मंडळींना हमखास मिळायचं. गाणी चालायची. गोष्ठी चालायच्या. गप्पा रंगायच्या. नवीन लग्न होवून नांदायला गेलेल्या लेकी गावच्या वेशीतुन आत यायच्या. त्यांच्या भोवती सायकलवरून चिली पिली पिशव्या घेवून गावात शिरायची. मग शेजाऱ्या पाजाऱ्यासोबत सुखाच्या गप्पा रंगत. नातीकडं बघुन म्हाताऱ्या कोताऱ्या हरकुन जात. गालावरून बोटे मोडली जायची. घरात नवी केरसुनी खरेदी केली जायची. पोरांना आठ दिवस आधीच किल्ला बनवायचे वेध लागायचे. यावेळी कोणता किल्ला उभारायचा याची आखणी केली जायची. मग कुंभाराच्या टेकडीवरुन सायकला पोते लावून माती आणली जायची. चार पाच दिवसानी किल्ला तयार झाला की वर मावळे चढायचे. दोन तीन दिवसात किल्यावर हिरवळ फुलायची. आकाशकंदिल विकत घेण्याऐवजी ते घरीच बनविले जायचे. ष्टकोनी आकाराचे आकाशकंदिल बनविले जात. यासाठी ओल्या बांबूच्या नाहीतर निरगुडीच्या फोका वापरल्या जात. हा आकाशकंदिल बनवायचा उत्साह इतका असायचा की एखदा वस्तीवरच्या अण्णाच्या भुईमुगाच्या वावरात अर्धा एकर डहाळे उपटू लागलो तेव्हा रात्री त्यानी रंगबिरंगी कागद चिकटवून आकाशकंदिल बनवून दिल्याचा अजुनही आठवतो. तयार झालेला आकाशकंदिल एका उंच बांबूला बांधून घरावर चढवला जायचा. एखादा श्रीमंत बाजारातुन चांदनी विकत आणून त्यात विजेचा बल्ब सोडायचा.


मग पहिल्या अंघोळीची तयारी अधल्या रात्रीच् सुरु व्हायची. विहिरीवरुन सोफ्यातला मातीचा रांजन धुवून काठोकाठ भरला जायचा. अंगणातली पाणी तापवायची चुल पांढऱ्या मातीनं आज्जी सारवुन काढायची. अंगणात शेणाचा सडा शिंपडला जायचा. तेव्हा रांगोळीसुद्धा आम्ही घरीच तयार करायचो. नदीतून गारगोठया मिळवून त्या फोडून बारीक वाटून त्याची रांगोळी बनविली जायची. पहाट होताच आई अंथरुणातुन उठवायची. दारात कुंभारवाडयातून आणलेल्या मातीच्या पणत्यांचे दिवे अंगणातल्या तुळशीभोवती लावलेले असायचे. तोपर्यंत बाहेरच्या चुलीवर आज्जीनं पाण्याला आदण आणलेलं असायचं. मग दगडानी रचलेल्या न्हाणीत दगडाच्या चीपेवर बसून तेलानं मालिश केलेल्या अंगावर उकळतं पाणी ओतलं जायचं. कुड़कुड़त्या थंडीत आईनं चोळून घातलेल्या आंघोळीला जगात कशाचीच सर येणार नाही. अंगावर वर्षातून एखदाच् मिळणारे नवीन कपड़े चढायचे. अंगणात मातीच्या पणत्या तेवत राहायाच्या. तोपर्यंत पहाटेच्या अंधारात गावासहित आजुबाजूच्या गावातूनही फटाक्यांचा धडामधूम आवाज निघायचा. सारा आसमंत आवाजाने दणाणून जायचा. काहीजणांना गरिबीमुळे वाजवायला टिकल्याच्या चार डब्या मिळायच्या. सोबत एखादी बारीक तोटयांची माळ. मग ती आम्ही उसवुन एक एक तोटा पुरवून पुरवून वाजवायचो. शेजारी चंदू नावाचा एक गरीब मित्र असायचा. कधी अंगाला दिवाळीत नवी कपड़े घातल्याचे मी त्याला कधीच बघितले नाही. पण तो हार मानायचा नाही. मग तो फटाके मिळायचे नाहीत म्हणून हाताने दोरी वळून वादीचा चाबुक तयार करायचा. अन पहाटेच्या अंधारात बाहेरच्या सडकेवर येवून सारी गरिबी विसरून, चाबुक रस्त्यावर आपटून "फाड़ फाड़" फटाक्यासारखा हवेत आवाज काढायचा. त्यातही तो समाधानी दिसायचा. रिकामे वाजवून फुटलेले फटाके आम्ही त्याच्यासोबत जमवून त्यातून दारु काढून ती पुन्हा रिकाम्या तोट्यात घालून वाजवायचो. मग दिवस उगवुन वर आला की फराळाच्या डब्यावर उड्या पडायच्या. पण त्या गरीबीतही वाड वडिलांनी जपलेले सण साजरे करण्याचा एक उत्साह होता. एक संस्कार होता. रितीरिवाज होता.



...पूर्वी सारखा दिवाळीचा उत्साह आता खेड्यात उरला नाही. शहरांच्या रस्त्याला आता खेडी जोडलीत. शहरांचे वारे आता सहज खेड्यावरून घोंगावत जाते. काळ पुढे धावत राहतो. बालपणाच्या त्या कोवळ्या खांद्यावर असलेल्या चिमुकल्या मेंदुवर आता जगातील बऱ्या वाईट अनुभवांचा घट्ट मुलामा चढलाय. आता पहाटे उठून घराबाहेरच्या न्हाणीतल्या दगडावर आंघोळ करायला न्हाणी राहिली नाही कि बाहेरच्या कुड़कुड़त्या थंडीत चुलीवर पाण्याला जाळ घालून आदण आणणारी आज्जी सुद्धा उरली नाही. सोफ्यातला मातीचा रांजण काळाने हिरावून घेतलाय. अंगणात आता मातीचे किल्ले उभे राहत नाहीत कि त्यावर तलवारी घेऊन शिवबाचे मावळे चढ़त नाहीत. खेड्यातल्या घरात आईची कधीच मम्मा झालीय. या नवीन मम्मा आता पोरांना चिखलात हात घालू देत नाहीत. चीनचे प्लॅस्टिकचे किल्ले आता सिमेंटच्या घरापुढे दिसतात. पण प्लॅस्टिकच्या गडावर बंदुका रोखुन उभे असलेले चिनी सैनिक आता मन रिझवु शकत नाहीत. आणि स्मार्टफोनवर पेटवल्या जाणाऱ्या बिनतेलाच्या डिजिटल पणत्या कुंभार वाड्यात उजेड पाडू शकत नाहीत. ष्टकोनी आकाराचा आकाशकंदिल तयार करण्यातली मज़्ज़ा पाकिटातील तीनशे रूपये अगदी सहज मोजून घराबाहेर लावणाऱ्या आताच्या डिजिटल पिढीला तो आनंद कधीच घेता येणार नाही. आता रांगोळीसाठी नदीतून पांढऱ्या गारगोठयाचे खड़े गोळा करायला पांढरपेशीपणाचा बुरखा पाऊलाना पुढे जाऊ देत नाही. अन डब्यातला लाडू काढून तो रस्त्याने फिरत खाण्याचा जिभेला मोहही होत नाही.
गरीबीतही दिवाळी साजरी करण्याचा खेड्यात पूर्वी एक आनंद होता. जोश होता. तो आता पूर्वीसारखा उरला नाही. मात्र जगाच्या बाजारात उठणाऱ्या वादळ वाऱ्याना छातीवर झेलण्याची ताकत या जुन्या काळानेच दिलीय.


No comments:

Post a Comment