Monday, September 19, 2016

लव्हाराचा शिवा


ऐन थंडीचे दिवस असायचे. धुक्यानं पांदीतली झाडं झुडपं, कौलारु घरं आणि नागमोडी वळणाच्या रस्त्यानी दवबिंदूची पांढरी झालर पांघरलेली असायची. घराघरातली चुलवानं पेटून त्यातून उठलेले धुराचे लोळ कौलारु पाक्यातनं उसळत बाहेरच्या धुक्यात मिसळून जायचे. हिरव्यागार झालेल्या शिवारातल्या पिकावर पडलेले दव खाली सांडायला सुरवात झालेली असायची. अशा पौषातल्या जीव खाणाऱ्या थंडीत लव्हाराचा शिवा भल्या सकाळी माणूस गोठवणाऱ्या नदीत अंघोळ करायला उतरायचा. अंघोळ करुन पिळलेली चड्डी डोक्यावर टाकून खांद्यावर पाण्याची पितळेची कळशी घेवून नदीची डगरट चढून घराकडं येताना दिसायचा. मी नुकताच उठून घराच्या बाहेरच्या ओटयावर पूर्वेकडून बाहेर निघणाऱ्या सूर्याच्या लाल गोळ्याची कोवळी किरणं अंगावर घेत, सोफ्यातल्या आढयावर बागडणाऱ्या चिमण्या बघत अंगणात बसायचो. दारापुढनं आणवाणी पायानं खांद्यावर कळशी घेवून निघालेल्या उघडया बंब शिवावर दारातलं कुत्रं धावून जायच."आरं गप्प र" म्हणत मला बघुन शिवा क्षणभर दारावर थाबांयचा. रविवार असला की गावच्या शाळांना सुट्टी असायची. मग जेवण करुन ओढ़याला म्हसरं राखायला जायचं आमंत्रण शिवा मान वर करुन मला द्यायचा. मी हरकुन मान डोलवायचो. सुगीचं दिवस जवळ आलेलं असायच. मग दिवस उगवायला लव्हारवाडयात गर्दी जमु लागायची. कोण विळे, खुरपी शेवटायला आलेला असायचा. कुणाची बेडगी शेवटायची असायची. तर एखांदा वयस्क म्हातारा पोलादी पाटा नवी अवजारे बनविन्यासाठी घेवून आलेला असायचा. शिवा त्या खणभर पत्र्याच्या शेडात त्याच्या पिळदार रापलेल्या बापासोबत लव्हाराचा भाता फिरवत बसलेला दिसायचा. मधेच विझणाऱ्या आरावर मळकट ठिक्यातलं कोळसं टाकतानाही दिसायचा. उन्हं चांगली वर आली की मी शिवाला खुणवायचो. मग शिवा मला मान हलवुन ईशारा द्यायचा. तसा शिवा माझ्यापेक्षा पाच सात वर्षानी मोठा होता. पण बालपणीच्या दोस्तीला वयाच्या बंधनाच्या लेबलाची गरज लागत नसावी. ओढ्याच्या वरच्या बाजूला असलेल्या लव्हारकीतल्या एकरभर तुकड्यावर त्याच्या साऱ्या घरादाराची गुजराण चालायची...
...शिवाची गुरं पांदीत आलेली दिसली की मी परडयात बांधलेल्या म्हसरांच्या साखळ्या पाडायचो. वाऱ्याच्या वेगानं गुरं पांदीनं ओढयाकडच्या हिरव्यागार कुरणाकडं पळत सुटायची. कुरणात म्हशी चरायला सोडून मी शिवासोबत ओढयातल्या चिंचेला लागलेल्या हिरव्यागार चिंचा खाली झेलत राह्यचो. अन शिवा वरुन टाकत राह्यचा. खाली उतरताना त्याच्या फुगलेल्या खिशातील हिरवेगार चिंचाचे शेलके आंकड़े खाली कोसळत राह्यचे. झुडपावर बसलेला भोरडयांचा कळप शिवा हळूच जावून हातातल्या लगोरीनं उठवायचा.भोरडया केकलत हवेत उंच उड़त राह्यच्या. कधीमधी एखादी बिळात शिरणारी धामन हातात धरून गरगर हवेत फिरवत राह्यचा. भितीनं मी लांब पळून जायचो.अन शिवा माझ्या मागं धावायचा. दुपारी उन्हं डोक्यावर आली की गाणी म्हणत म्हशीवर बसलेला शिवा खाली उतरून ओढयाच्या डोहात शिरायचा. मनसोक्त डुंबायचा. दगडांच्या कपारीत लपुन बसलेले खेकडे बाजूच्या दोन्ही नांग्या चिमटीत धरून अलगद बाहेर काढायचा. वडाच्या झाड़ाखाली खिशातली खारुटीछाप काडेपेटी काढून काटक्या पेटवून खेकडे भाजायचा. त्यांचा भाजताना निघणारा खरपुस वास साऱ्या असमंतात पसरत राह्यचा. फडक्यातनं आणलेल्या भाकरी मी त्याच्यासोबत सोडायचो. मीठ लावलेल्या खेकडयासोबत शिवा दोन भाकरी सहज मुरगाळायचा. आणि ढेकर देवून ओढयात डुंबणाऱ्या म्हशीना पुन्हा कुरणात सोडून वडाच्या खाली जमिनीतुन बाहेर आलेल्या मुळ्याना उसे देवून तोंडावर लूंगी टाकून झोपुन जायचा. उन्हं मावळतीकडं सरकली की मी शिवासोबत तालीतल्या निरगुडयाच्या बनातल्या बारीक बारीक निरगुडयाच्या फोका काढायचो. शिवा मला लांबलचक फोकांचा खराटा बनवून द्यायचा. कधी कधी लव्हार असूनही बेंदराच्या सणासाठी शिवा आमच्या बैलासनी वेसनी बनवायचा. सायंकाळी घराकडे परतताना हिरानानीच्या उंच पसरलेल्या देशी शेवग्याच्या शेँगा दगडाने टिपायचा. टपा टपा शेंगा खाली पडायच्या. पंधरा वीस शेंगाचा पुंजका शर्टाच्या मागच्या बाजूला, शिकारीला मागे बाण खोवुन निघालेल्या शिकाऱ्यासारखा खोवायचा. माझ घर जवळ आलं की मी घराकडं वळायचो. शिवा लव्हार वाडयाच्या दिशेेनं म्हसरा मागं चालत राह्यचा...
...शिवाचा बाप गणपा लव्हार दिवसा राब राब राबायचा. त्याच काम बलुतेदारीवर चालायच. त्यावर तो जगायचा. पण रात्री गुत्त्यावर जावून नरडं जाळत जाणारी दारू प्यायचा. पिवुन टर्र झाल्यावर समदा लव्हारवाडा जागवायचा. आजुबाजूची माणस, "तू पेलाइस आता गप पड" म्हंटयावर "कोण पेलाय" म्हणून उलटा सवाल करायचा. शिवा म्हशीच्या धारा काढून डेरीला दूध घालून रॉकेलच्या मिनमिंनत्या चिमणीवर अभ्यास करत बसायचा. एका रात्री शिवा आमच्या घरी पळत आला अन, "देवा म्हस मेली आमची" म्हणत ढसाढसा रडला. पुढे कधीतरी पडलेल्या दुष्काळात शिवाची आजारी पडलेली आई वारली अन लहान वयातच शिवाची शाळा कायमची सुटली. कित्येक पोरं गाव सोडून जगायसाठी बाहेर पडली.पण शिवा गावातच जगत राहिला. लाकडाच्या काठवटीत पिठाचा गोळा मळून चुलीवर भाकरी थापायची वेळ शिवावर आली....
...पुढे शिक्षणासाठी मी गाव सोडलं अन शिवा गावासोबत नजरेआड झाला तो कायमचाच. शिवा माझ्या मनाच्या कप्प्यातुन दूर फेकला गेला. कसा? कधी? केव्हा? ते मला कधीच कळल नाही. कधीतरी बऱ्याच वर्षांनंतर गावात आल्यावर कळलं की शिवानं दारिद्रयाला कंटाळून कसलेतरी औषध पोटात घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. पण माझा काही विश्वास बसेना. कारण दारिद्रयाची अन शिवाची ओळख तर खुप पूर्वीपासूनची. शिवा त्यानं खचणारा न्हवताच? मग? मी धावत तालुक्याच्या सरकारी दवाखान्यात पोहचलो. खाटीवर सुन्न होवून पडलेला शिवा मला आतून काहीतरी सांगू पहात होता. पण यातलं काहीच तो बोलत नसतो. मग कधीतरी बोलता झालेल्या शिवाकडून त्याची गोरीगोमटी बायको कोणालातरी चिकटलेली कळते. त्या दिवशी मी प्रचंड अस्वस्थ झालो. दारिद्र माणसाला काय काय करायला लावत असाव?
...परवा शिवाच्या घरी जाणं झालं. कुडाच्या आड टेकुन बसलेला त्याचा जीर्ण देहाचा थकलेला बाप बीडीच्या धुरात गरीबीच्या कुडाला झाकु पहात होता. पलीकडे भात्यावर धगढ़गत्या आगीपुढं घामानं डबडबलेला मळकट कपड्यातला शिवा खुरपी बनवताना दिसला. मला बघुन "देवा कसं येणं झाल?" एवढच म्हणाला. तो आता पूर्वीसारखा हसत नाही. टिंगळटवाळी करत नाही. त्याची ती ऐटदार शान आता कधीच आटलेल्या म्हशीसारखी आटून गेलीय. खरच! त्याच्या मनात माझ्याविषयी आतून काही चालू असतं का? काहीच कळत नाही. मला त्याच्याशी खुप खुप बोलायच असत. जुन्या गोष्ठी उकरुन वर आणायच्या असतात. तसा प्रयत्नही मी करतो. पण प्रतिसाद मिळत नाही. मी खिशातून रुमाल काढतो. हातातील रुमालानं त्याचा घामानं भिजलेला मळकट चेहरा पुसून काढावा असं मला वाटतं. पण मी यातलं काहीच करीत नाही...
...शेवटी गावाच्या उबंरटया उबंरटयानं ऐन तारुण्यात वटलेला शिवा लव्हार अजुन जगवलाय. छे! अजुन कुठल्यातरी मला न कळणाऱ्या बळावर तो जगत असला पाहिजे. म्हणूनच तो जीवनामागं चालताना अजुन दिसतोय...
फोटो सौजन्य  maayboli - आशूचँप


No comments:

Post a Comment