Monday, September 19, 2016

चंदू

आजही कधी कधी ते बालपणीचे खेळ आठवले की मी सुन्न होतो. डोळे मिठून पुन्हा त्यात दंग होवून भराऱ्या घेत राहतो. क्षणात शेकडो मैल दूर असणाऱ्या गावच्या बोळाबोळातुन, माळरानावरून, नदीवरून, अन साऱ्या शिवारातून फेरफरका मारून येतो. कधी काळी त्या गावच्या इंच इंच जमिनीच्या अंगाखांद्यावर खेळणारे, आटापाट्यांचा खेळ खेळत बागडणारे असंख्य जीव आता खऱ्या जीवनाच्या आटया पाटयांचा खेळ खेळायला पृथ्वीच्या चारी दिशांना दूर निघून गेलेत. मिटलेल्या डोळ्याभोवती असंख्य जीव मला पुन्हा साद घालू लागतात. पण त्यातील एक चेहरा तळातून उठून सगळ्यात वरती येवून नाचू लागतो. तो चेहरा असतो चंदूचा.
चंदू! शरीरानं बुटका, रंगानं काळासावळा, केस वाढून कायम कानावर आलेले. घरच्या गरीबीमुळ कधीतरी दिवाळीत घेतलेली नवी कापडं वरीसभर पुरवून पुरवुन घालणारा. आणि वर्षातले आठ दहा महीने कायम खालच्या चड्डीला पाठीमागे दोन ठिगळे लावून आपल्याच तंद्रीत साऱ्या गावभर हिंडणारा चंदू मला माझ्या बालवयातच् भेटला. गावापासून मैलभर लांब असलेल्या एका वस्तीवर कौलारू मातीच्या घरात सोबत दारिद्र घेवून चंदू कधीतरी पुनवेच्या रात्री जन्माला आला. पण जीवनात अमावसेचा अंधार घेवूनच. दोन बहिणीच्या जन्मांतर तीसरे जन्मलेले शेंडेफळ म्हणजे चंदू. त्याचा बाप मी बघत आलोय तसे दुसर्याच्या शेतात खांद्यावर कुदळ, खोरे घेवून कामाला जाताना दिसायचा. पण याची बालवयात चंदूला ना फिकिर होती. ना असल्या गोष्टीची कधी पर्वा. वस्तीकडून गावाकडे सरकलेला चंदू त्याची गैंग घेवून दिवस उगवायला आमच्या दारात हजर व्हायचा. मग कुठेतरी एखांद्या आडोशाला बैठक व्हायची. मग नदीकडेने किर्र करणाऱ्या झाडीतून चंदू मधमाशांचे पोळे उध्वस्त करीत चालू लागायचा. पोळ्यातला मध काढून सगळ्यांच्या ओंजळीत पिळत राहायचा. कधी वानरासारखे सरसर आंब्याच्या झाडावर चढून शेंडयातील पिकलेले आंबे खाली सोडत राह्यचा. जांभळांच्या दिवसात तर दिसभर ओढ्यात मुक्काम ठरलेला असायचा. कुणाच्या पेरुच्या बागेत लांडग्या कोल्ह्यासारखी कुंपणावरून उडी मारून आत शिरायचा. शेताचा मालक, "सुकाळीच्या" म्हणत शिव्या घालीत खोपीतून बाहेर पडायचा पण चंदू गैंग घेवून हा हा म्हणता पसार व्हायचा. चंदू पट्टीचा पोहणारा होता. मी नेहमी नदीत कडेला एकटाच पोहत राहायचो. एखदा नदीच्या मोठ्या डोहात पोहताना पाठमागून कुणीतरी मला आता ढकललं. मी गटांगळ्या खात बुडायला लागल्यावर क्षणात उड़ी मारून चंदूनं मला नदीतून बाहेर काढलं.
चंदुच्या आईचा त्याच्यावर खुप जीव् होता. त्यानं खुप शिकून घरादाराला दारिद्राच्या अंधारातून बाहेर काढावं असं तिला मनोमन वाटायचा. त्याच्यासाठी ती दिवसभर शेतात खपत राह्यची. चंदू शाळा सुटल्यावर उशिरापर्यँत वस्तीकडं सरकायचा नाही. मग ती त्याच्या काळजीनं नदीच्या कडेनं चिखलाची पायवाट तुडवत गावाकडं यायची अन, "कुठ हुंदडतुयास अजुन बाबा अंधार लई झालाय! चल घराकडं आता" म्हणत त्याला घेवून जायची.
बालवाडीतल्या लहान लहान पोरास्नी शाळेत शिजलेली अंडी वाटली जायची. बालवाड़ीची शाळा सुटली की चिमुकली पोरं हातात अंडी घेवून घराकडं चालु लागायची. मग चौकातुन पुढं बोळात पोरं गेली की, चंदू मला पाठीमागुन जावुन पोरांचे डोळे घट्ट दाबून धरायला सांगायचा. अन पुढच्याच् क्षणी हातातली अंडी गायब करायचा. पोरं रडत घराकडं जायची. आणि आडोशाला अंडयाची टरफले सोलुन अंडी खाताना चंदू दिसायचा. जसा अंडी खाताना सगळ्यात पुढे असायचा तसाच हुतुतु, कब्बड्डी, खो खो या खेळातही तो शाळेत पुढे असायचा. पूर्वी आजुबाजूच्या गावागावात पडद्यावर सिनेमे असायचे. कुठून तरी याला खबर मिळायची. मग आम्हाला घेवून चंदू त्या गावात पडदा जोडायच्या आधी तिथ नेवून हजर करायचा. मग कधीतरी सिनेमा सुटल्यावर मध्यरात्री मला गावात पोहचवुन चंदू एकटाच रात्रीचा वस्तीची पायवाट तुडवत जायचा. तो आमच्यासोबत सातवी पर्यंत गावच्या शाळेसोबत राहिला. पण बापाच्या आजारपणामुळे आणि बहिणीच्या लग्नाच्या ओझ्यानं चंदू शिक्षणपासून दूर होत गेला. आणि तो कायमचा माझ्याही नजरेआड झाला...
...पुढे बऱ्याच वर्षांनंतर दिवाळीसाठी मी गावी आलो. जनावरांच्या गोठ्यापुढं अंगणात बसून रस्तानं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांशी आपुलकीनं विचारपुस करीत होतो. इतक्यात गळ्यात टॉवेल अडकवुन रस्त्याने दुरुन डुलत डुलत एक वक्ती जवळ येताना दिसली. मला ती व्यकी चंदूसारखीच दिसली. गोठ्यात म्हशीना बादलीने पाणी पाजत असलेल्या आईकडून तो चंदुच् असल्याचे समजले. मी अधिक खोलात जावून आईला, "हा करतो काय आता?" असे विचारले तर, "दारु पिवुन गावभर बोंबलत हिंडतो" असं आईनं सांगितलं. मी त्याला "चंदूss" म्हणून हाक मारुन जवळ बोलविलं. "देवा लई दिसानं दिसलासा! कवा आलासा?" जवळ आल्यावर तो मला म्हणाला. तो खुप दारू प्यायला होता. त्याच्या या अवस्थेबद्दल मी त्याला खुप बोललो पण तो नुसते ऐकत राहिला. आणि जाताना घरी चहाला साखर नाही सांगून पन्नास रुपये घेऊन गेला. तो दारिद्राच्या सांसाराला दारुच्या झींगेने झाकु पहात होता. त्याच तंद्रीत तो जगत होता.
दिवस मावळतीला वडील शेतातून घरी आल्यावर गोठ्यात कायतरी शोधत होते मी "काय शोधताय विचारले" तर वडील म्हणाले, "कोण आलं होत का रं गोठयांत आज? मी, 'वस्तीवरचा चंदू आला होता' म्हणून सांगितलं. तर वडील पळतच गेले आणि काही वेळाने गावाबाहेरच्या दारूच्या गुत्यावरून गोठ्यातली गायब झालेली बादली घेवून आले. थोड्या वेळाने चंदू पुन्हा डुलत डुलत आला आणि मी न विचारताच मला म्हणाला, "देवा! शपथ मी चोरी नाही केली." त्या रात्री मी प्रचंड अस्वस्थ झालो. रात्रभर या कुशीवरुन त्या कुशीवर वळत विचार करत राहिलो. पाऊले माणसाला कुठे कुठे घेवून जात असावीत. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तो येवून मी चोरी केली नाही म्हणून सांगून गेला. आपल्या बालपणीच्या मित्राला हे कळू नये ही त्याची अपेक्षा असावी म्हणूनच तो पुन्हा पुन्हा येत होता. लहानपणीच्या आटापाट्याच्या खेळातल्या देवाला तो शोधू पहात होता. पण माझ्या जवळ आल्यावर दोघातील हजारो मैलाचे अंतर त्याला कुठेतरी जाणवत असावे.
रात्री पुन्हा कुणीतरी दार वाजवले म्हणून मी लगबगीने कड़ी काढून बाहेर आलो. चंदू त्याच्या बायकोसोबत दोन चिमुरड्याना घेवून भेलकांडत इतक्या अंधारातून आला होता, "त्याला नीट बोलताही येत न्हवते. पुन्हा "या बायका पोरा शपथ मी चोरी केली नाही" हे सांगताना त्याचा भिंतीवर तोल गेला. मी घरातली बॅटरी घेतली. आणि त्याला हाताला धरून किर्र करणाऱ्या अंधारातुन कुडकुडणार्या थंडीत त्याच्या वस्तीची पाऊलवाट चालु लागलो. पुढे त्याची मळकट साडीतली बायको लहान चिमुरड्याना घेवून आणवाणी पायानी वाट तुडवित होती. त्याचा तोल जात होता आणि मी त्याला आधार देत होतो...
...बालपणी नदीच्या डोहात बुड़ताना उड़ी मारून त्यानं मला वाचविलं होतं. आणि आज तो दारुच्या जीवघेण्या डोहात बुडालेला असतानाही मी त्याला वाचवू शकत न्हवतो.

फोटो सौजन्य: प्रहार

No comments:

Post a Comment